मित्रहो ! | पु. ल. देशपांडे

मॉरिशस येथे झालेल्या द्वितीय जागतिक मराठी परिषदेत पु. ल. देशपांडे यांनी केलेल्या (26-4-1991) अध्यक्षीय भाषणातील काही भाग

मॉरिशसमधल्या मराठी लोकांनी महाराष्ट्रापासून इतक्या दूर राहूनही मराठीचं प्रेम टिकवून ठेवलेलं पाहून मला वासुदेवशास्त्री खर्‍यांचा एक श्लोक आठवला.

नेवो नेतें जड तनुस ह्या दूरदेशास दैव

राहे चित्तीं प्रिय मम तरी जन्मभूमी सदैव

आज उपजीविकेसाठी जगभर पांगलेल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनातले भाव ह्या श्लोकात आले आहेत. आपण आपल्या माणसांपासून दूर जाऊन पडलो आहोत ही खंत ज्यांच्या मनाला लागून राहिली होती ते वासुदेवशास्त्री तर महाराष्ट्र सोडून कुठे परदेशात गेले नव्हते. फक्त कोकण सोडून देशावर मिरजेला येऊन स्थायिक झाले होते; पण मनात मात्र जिथे त्यांनी बालपण घालवले ते कोकण होते. मनाला रुखरुख लावत होते.

आंबे पोफळि साग नारळि तटीं दाटे तरुंचे वन

झोके घेति सुरम्य चंचल जळीं छाया तयांच्या घन

आकाशीं जणु कीं विजा चमकती मासे जळीं त्यापरी

खाड्या त्या तव जन्मभूमि, नयनीं पाहीन केव्हां तरी

आपल्या एखाद्या दूरदेशी राहणाऱ्या नातलगाची यावी तशी त्यांना कोकणातल्या खाड्यांची आणि आंबे-पोफळीची आठवण येत होती. आपली मातृभूमी, आपली मातृभाषा, आपली माती, आपली झाडं, वेली-फुलं आपल्या मनाच्या गुहेत लपून राहिलेली असतात. ही ओढ सामान्य आणि असामान्य माणसाला लागणं हे नैसर्गिक आहे. ती कुणी जबरदस्तीने लावू शकत नाही किंवा हिरावूनही घेऊ शकत नाही

… ही ओढ मनाला लावणारे अनेक घटक असतात. वृक्षवेली असतात, नद्या असतात, त्या त्या परिसरातलं संगीत असतं. भोवतालची माणसं आपली असण्याची भावना असते. पण ह्या सगळ्या घटकांत अत्यंत जिव्हाळ्याचा कुठला घटक असेल तर तो मातृभाषेचा. मातृभूमीइतकंच मनोभूमीला महत्त्व असतं. आणि त्या मनोभूमीची मशागत करणारं सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे मातृभाषा. माटेमास्तरांनी संस्कृतीला मनाची मशागत म्हटलं आहे. ही मशागत ज्या भाषेतून होते ती आपली मातृभाषा. राष्ट्राराष्ट्रांत जी भिन्नता निर्माण होते ती भिन्न भाषांमुळे. एकाच युरोपखंडात असूनही फ्रेंच, जर्मन, इटली ही राष्ट्रं एकमेकांपासून भिन्न आहेत. कारण प्रत्येक राष्ट्राची भाषा भिन्न आहे म्हणून. भारतातही एकतेतली अनेकता आहे ती भिन्न भाषांमुळे. तसं पाहिलं तर मराठी माणसाला आपल्या हिमालयाबद्दल अभिमान आहे तितकाच गुजराती माणसालाही आहे. दोघेही भारतालाच आपला देश मानतात, पण त्या मायदेशाचं गाणं मात्र प्रत्येकजण आपल्या भाषेत गातो. कुणी ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा’ असं उर्दूत गातो तर तीच भावना मराठी कवी ‘आनंदकंद ऐसा हा हिंद देश माझा’ असं मराठीत गातो. आपली भावना किंवा विचार व्यक्त करण्यासाठी सहजतेने फुलणारी जी भाषा ती आपली मातृभाषा. तिला पारखं व्हायला लागणं हे दुःख मोठं आहे. अशा वेळी परदेशात लाभलेलं ऐश्वर्य, तिथल्या सोयी, माणसाचं जगणं सुखाचं करणाऱ्या असंख्य गोष्टी असूनही कधीकधी कितीही वर्षं परदेशात वास्तव्य करत असलो, तरी आपण उपरेच आहोत ही भावना काही मनातून जात नाही.

आज मराठी भाषा ही मराठी मुलखात दुय्यम ठरली आहे आणि तिची जागा इंग्रजीने घेतली आहे. इंग्रजांचं राज्य जाऊन इंग्रजीचं राज्य सुरू झालेलं आहे. आणि दुसरी भाषा जेव्हा आपली सत्ता प्रस्थापित करते त्यावेळी केवळ एक भाषा जाऊन दुसरी भाषा आली एवढंच होत नाही; ती दुसरी संस्कृती घेऊन येते. भाषेचा उगम हा शब्दकोशातून होत नसतो. माणसाचे आचार-विचार, आशा-आकांक्षा, नवी निर्मिती, जीवन अधिक सुंदर करणाऱ्या कल्पना, समाजात स्वीकारलेली ध्येयधोरणं ह्यांतून भाषेची श्रीमंती वाढत असते. प्रत्येक नवा शब्द जीवनात एक नवा संदर्भ घेऊन येत असतो. एखादा शब्द डोळ्यांपुढे नानाप्रकारची चित्रमालिका उभी करून जातो. नुसतं ‘जत्रा’ म्हटलं, की ज्या देवाची जत्रा आपण कधी पाहिलेली असेल तर मनापुढून झर्रकन त्या देवाच्या देवळाचं शिखर, मैदानात फिरणारी ती प्रचंड फिरती चाकं, त्या परिसरात मांडलेली हलवायांची, खेळण्यांची, भांड्यांची, कपड्यांची दुकानं, पिपाण्या वाजवीत मोकाट सुटलेली मुलं, लाउडस्पीकरवरून कानांवर आदळणारी ती गाणी… असा चित्रपट डोळ्यांपुढून सरकून जातो. ही चित्रं मनात घर करून बसलेली असतात. व्यक्तिगत मनात असतात तशी जनमानसातही असतात. हेच पाहा ना: ‘माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरीं’. आता ‘पंढरीला आपलं माहेर आहे,’ असं सांगणं म्हणजे कोणालातरी पोस्टाचा पत्ता देणं नव्हे. इथे ‘पंढरी’ हे नकाशातून शोधून काढायचं गाव राहत नाही; जिथे जाऊन विठाईमाउलीचं दर्शन घेऊन यायची तहान ज्ञानोबा, तुकोबा, चोखोबा ह्यांच्यासारख्या संतांना लागली होती ती भागवणारं स्थान म्हणून आपल्या अंतःकरणाला जाऊन भिडतं. ज्याला संतांचं कार्यच माहीत नाही त्याला पंढरी या शब्दाचा, त्या ओळीत अभिप्रेत असणारा अर्थ कळणार नाही. आणि विठ्ठलाची ‘विठाईमाउली’ का झाली ह्याचं रहस्य उलगडणार नाही. त्याचा अर्थ त्या वारकरी परंपरेशी एकरूप झालेल्या माणसालाच उमगेल. ज्यांना त्या शब्दाच्या संदर्भाची जाण आली आहे अशा माणसांचा एक समुदाय तयार होतो. त्या त्या विशिष्ट ध्वनीचे संकेत त्या समुदायाला समजायला लागतात. ध्वनीचे असे असंख्य संकेत तयार होतात आणि ते समजणाऱ्या समुदायाची भाषा तयार होते. आणि प्रत्येक क्षेत्रात नवीन निर्मिती करायची ओढ ही निसर्गाने फक्त माणसालाच दिलेली असल्यामुळे त्या भाषेत नवीन ध्वनिरूप संकेत तयार होतात. त्यांतून माणसाला आपल्याला आलेले सुखदुःखाचे नानाप्रकारचे अनुभव, संशोधनातून उलगडलेली सृष्टीतली रहस्यं अशा निरनिराळ्या घटना, आपल्याला जीवनात आढळलेलं जे काही असेल ते दुसऱ्याला सांगायला भाषा नावाचं साधन सापडतं. नवी निर्मिती करायची आणि ती दुसर्‍यांना सांगायची ओढ फक्त माणसांनाच दिलेली असल्यामुळे जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात सतत काहीतरी नवीन, काहीतरी निराळं करण्याची त्याची धडपड चालू असते. ह्या धडपडीतूनच नवी संस्कृती जन्माला येत असते.

ज्या भाषेत त्याची आई तो पाळण्यात असल्यापासून बोलली, ज्या भाषेतली बाळगाणी त्याने ऐकली, झोपताना ज्या भाषेतले पाळणे तिने म्हटले, ज्या भाषेत तिने त्याचे लाड केले, ती भाषा हीच त्या बालकाची मातृभाषा. दोन-तीन वर्षांचा होईपर्यंत मुलाच्या कानी पडणाऱ्या संस्कारांतून तो भाषा शिकतो. ती मुद्दाम शिकवावी लागत नाही. इतकंच नव्हे, आपण भाषा म्हणून काही शिकलो याचीही त्याला दाद नसते. बालपणापासून माणसावर नानाप्रकारचे संस्कार करणारी भाषा हळूहळू त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होऊन जाते. माणसाचं व्यक्तिमत्व घडवण्यात अत्यंत महत्त्वाचा वाटा भाषेचा असतो. ती ती भाषा बोलणार्‍यांची एक संस्कृती तयार होते. ती एका माणसाची न राहता एका समूहाची होते. आणि तो समूह आपल्या श्रमांतून, चातुर्यातून, शौर्यातून, तत्त्वज्ञानातून, साहित्य-संगीतातून आपलं जीवन अधिक अधिक समृद्ध करीत असतो.

जेत्यांच्या भाषेबरोबर अपरिहार्यपणे त्यांची संस्कृती येते. आणि मग ती भाषा, ती भाषा बोलणार्‍यांचे रीतीरिवाज, त्यांचं साहित्य, त्यांचं संगीत ह्या गोष्टींचं कधी सक्तीनं, तर कधी लाचार वृत्तीनं अनुकरण सुरू होतं. सत्ताधीशांची भाषा ही मातृभाषेपेक्षा श्रेष्ठ ठरते.

ज्ञानाची भाषा म्हणून काही कोणी इंग्रजी शिकले नाहीत. इंग्रजांच्या नोकरीत चिकटायला लागणारा डिंक म्हणून इंग्लिश शिकले. ठिकठिकाणी इंग्रज साम्राज्यशाहीचा स्पर्श जाणवायला लागला. मराठी बोलताना मध्येच इंग्रजी शब्द टाकला, की आपला भाव वाढतो असं वाटायला लागलं. इंग्रजी शब्दांची ही पेरणी आपल्या सर्व भाषांत झाली आहे…

… अलीकडे ग्रामीण भागातल्या निरक्षर शेतकर्‍यांच्या तोंडूनसुद्धा इंग्लिश शब्द ऐकायला मिळतात.कारण त्या त्या बाबतीत वापरले गेलेले इंग्लिश शब्दच त्यांच्या कानावर पडलेले असतात. मोटारगाड्या दुरुस्त करणारे कामगार मोटारीच्या निरनिराळ्या भागांचे मूळ इंग्लिश शब्दच वापरतात. कारण एखाद्याचं नाव दिलीप आहे म्हटल्यावर आपण त्याला दिलीप म्हणून ओळखतो. तसंच, अमुक एका यंत्राच्या भागाला कार्ब्युरेटर म्हटल्यावर भाषांतर करायची त्याला गरज वाटत नाही. कारण त्या यंत्रभागाची त्याची ओळख झालेली असते ती कार्ब्युरेटर म्हणूनच. त्याला हा शब्द इंग्लिश आहे की फ्रेंच हेही ठाऊक नसतं. जेव्हा ब्रेक, क्लच अशांसारखे शब्द तो वापरतो तेव्हा त्या त्या भागाचं ती मोटार चालण्यात काय काम असतं ह्याची अचूक माहिती असण्याला महत्त्व असतं. परकीय भाषेतल्या शब्दाला स्वतःच्या भाषेतला प्रतिशब्द तयार करून भागत नाही. तो शब्द सतत कानावर पडावा लागतो, तरच तो भाषेत येऊन बसतो आणि एखादा शब्द वाचण्यात रूढ झाला की तो परकी आहे म्हणून उचलून बाहेर फेकणं कधीही शक्य नसतं आणि पुष्कळदा आवश्यकही नसतं. नवे शब्द बोलण्यात येतात तेव्हाच भाषा समृद्ध होते. जनतेनं सरकारी बसला ‘येष्टी’ म्हणायला सुरुवात केली. स्टेट ट्रान्सपोर्टची एस.टी. ही आद्याक्षरे आहेत वगैरे काहीही लोकांना माहीत नव्हतं. तिथल्या अधिकारी वर्गाने एस.टी. म्हणायला सुरुवात केली ते जनतेच्या कानावर पडायला लागलं आणि ती बस ‘येष्टी’ झाली. मूळचा इंग्रजी ‘बस’ हा शब्दसुद्धा इतका मराठी केला, की ‘बशीत लय गर्दी झाली’, ‘बशीतनं आलो’ अशीही भाषा सुरू झाली. ड्रायव्हर, कंडक्टर, बस-ष्टाप, पाशिंजर, तिकीट, असे शब्द इतके मराठी झाले, की त्यांना मराठीसारखे विभक्तिप्रत्ययही लागायला लागले. ष्टेशनात गर्दी होती, गाडी टायमावर आली, डायवरने स्पीडमध्ये बस हाणली असली वाक्यं कानावर पडली तरी, ‘हरहर! मराठी भाषेची काय ही विटंबना’ असं काही वाटलं नाही. किंबहुना परकी शब्द सहजपणाने पचवायची भाषेतली ताकद तिला अधिक सशक्त बनवते. ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात अनेक शोध लागत असतात. त्या त्या शोधाचं नामकरण ज्या देशातल्या प्रयोगशाळेत ते शोध प्रथम लागतात तिथल्या भाषेत होत असतं. एखादी नवी संकल्पना येते तीही जिथे तिचा जन्म झाला तिथल्या भाषेतून प्रकटते. खुद्द इंग्लिश भाषेने भारतीय भाषांमधून शेकडो शब्द स्वीकारले. अशा परकीय शब्दांचा ‘हॉबसन जॉबसन’ नावाचा कोशही प्रसिद्ध झाला आहे. त्यात निरनिराळ्या भारतीय भाषांतले निरनिराळे शब्द केव्हा वापरले, इंग्रजी साहित्यात त्यांचा कोठे वापर केलेला आढळतो- हे देखील संशोधन करून सांगितलं आहे. परक्या भाषेतल्या शब्दांमुळे आपली इंग्रजी भाषा बाटली असं त्यांना वाटलं नाही. आपण मराठी शब्द ज्या सहजतेने वापरतो त्या सहजतेने परभाषेतला शब्द वापरला गेला पाहिजे. मात्र इंग्रजी शब्द आपलं वरचं स्थान किंवा मोठेपणा सिद्ध करण्याच्या हेतूने वापरला तर ते मात्र चुकीचं ठरेल.

माझा इंग्रजीला विरोध नाही. माझ्या मराठी भाषेवरचं प्रेम म्हणजे इतर भाषांशी वैर असा त्याचा अर्थ नाही. उलट आपापल्या मातृभाषेवर प्रेम करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. प्रत्येक भाषा आपापली सुंदर वैशिष्ट्ये घेऊन आलेली असते. इंग्रजी तर शेक्सपियर, मिल्टन, वर्डस्वर्थ, कीट्स, वुडहाऊस यांची भाषा. अशी भाषा आपल्याला यावी म्हणून कोणी इंग्रजी शिकत असेल तर त्या माणसाचं कौतुकच करायला हवं. किंवा इंग्रजी ही जगभर पसरलेली भाषा आहे, तिच्यावर प्रभुत्व मिळवावं म्हणजे ज्ञान-विज्ञानाचे अनेक ग्रंथ वाचायला मिळतील, जगातील शास्त्रज्ञांशी, कलावंतांशी, लेखकांशी संवाद साधता येईल अशा हेतूने कोणी इंग्रजीच कशाला, देशातल्या जर्मन, रशियन, फ्रेंच, यासारख्या भाषा आत्मसात करायचा प्रयत्न करील तर अशा विद्यार्थ्याला उत्तेजन दिलं पाहिजे. पण त्यासाठी मराठीला झिडकारायची किंवा तिच्याकडे तुच्छतेने पाहायची जरुरी नाही. आपल्याला इंग्रजी येतं आहे, आपल्याला आता मराठीची गरज नाही म्हणून तिला टाकाऊ ठरवणं हा अक्षम्य गुन्हा आहे…

(पु.ल. देशपांडे ह्यांच्या वेळोवेळी दिलेल्या भाषणांचे ग्रंथरूप ‘मित्रहो !’ मधून साभार)