सजिता लिमये
मुकुंद आणि रियाज हे या दोन मित्रांच्या मैत्रीचे एक वेगळे पुस्तक आहे. त्याला पार्श्वभूमी आहे भारताच्या फाळणीची. त्यातली चित्रशैली विशेष आहे. भरतकामातील पॅचवर्क प्रकाराचा कथेला साजेसा कलात्मक वापर चित्रांसाठी केलेला आहे.
‘सजग’ संस्थेच्या वतीनं वस्तीत मुलांसाठी आम्ही ‘विद्यासदन’ नावाचं अभ्यासकेंद्र चालवतो. मी एकदा तिथल्या मुलांना निना साबनानी ह्यांचं ‘मुकंद आणि रियाज’ (तुलिका प्रकाशन) हे पुस्तक वाचून दाखवत होते. पुस्तक वाचून संपताच विनय (नाव बदललेलं आहे) एकदम म्हणाला, ‘‘सगळ्या मुसलमानांनी पाकिस्तानात चालतं व्हावं.’’ विनय साधारण 12 वर्षांचा आहे. इथे येणारी मुलं साधारण 12 ते 14 वर्षांची असतात. विनयचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला. ह्या अशा भडक प्रतिक्रियेची मी अपेक्षाच केली नव्हती. कारण ह्या पुस्तकाबद्दलचं माझं मत अगदीच वेगळं आहे. ह्या पुस्तकातला काळ फाळणीच्या वेळचा आहे. गोष्ट वाचताना माझा उद्देश असा होता, की फाळणीच्या पार्श्वभूमीवर घडणारी मुकंद आणि रियाजच्या निखळ मैत्रीची गोष्ट मुलांना सांगावी आणि त्या निमित्तानं मानवी स्वभावात दडलेली असुरक्षितता त्यांच्यासमोर उलगडावी.
अर्थात, विनयच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करूनही चालणार नव्हतं. आपल्या बोलण्यात ताईंना काही वावगं वाटतं आहे, हे त्याला जाणवू न देता ही चर्चा पुढे नेणं आवश्यक होतं. हे माझ्यापुढे मोठंच आव्हान होतं. कारण ह्यापूर्वी माझ्यावर अशी वेळ कधीच आली नव्हती.
चर्चेत पुढे काय झालं, हे सांगण्याच्या आधी जरा आमच्या ह्या मुलांबद्दल आणि आमच्या कामाबद्दल सांगते. विद्यासदनमध्ये येणारी मुलं अनुसूचित जातीची आहेत. ती कल्याणमधल्या जुन्या डम्पिंग ग्राउंडजवळ असलेल्या झोपडवस्तीत राहतात आणि कचरा वेचून आपला उदरनिर्वाह करतात. सहसा शहरातल्या झोपडपट्ट्यांमध्ये असते तशी इथे मिश्र वस्ती नाही. सगळी वस्तीच अनुसूचित जातीच्या लोकांची आहे. मात्र कचरा वेचण्याच्या कामात कातकरी आणि मुस्लीम लोकही असल्यानं ह्यांची त्यांच्याशी स्पर्धा असते. खरं तर सगळेच आर्थिक-सामाजिकदृष्ट्या वंचित गटातलेच आहेत; पण प्रत्येकालाच वाटतं, की दुसर्या जमातीमुळे आपली रोजी कमी होते. एकंदर परिस्थितीमुळे ही माणसं अगतिक झालेली असतात. ही संधी साधून अनेक सेवाभावी संस्था ह्यांच्यासाठी काम करायला पुढे सरसावतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते रोज शाखा भरवतात, आरोग्य-शिबिरं घेतात, हळदी-कुंकवासारखे उपक्रम राबवतात. मिशनरी लोक नाताळ साजरा करतात, सहली काढतात, भेटवस्तू देतात, अडीअडचणीला इथल्या लोकांना कर्जाऊ रक्कम देतात. आणखी इतर काही सेवाभावी संस्थाही काही ना काही उपक्रम राबवत असतात.
अशा विविध संस्था-संघटनांच्या प्रभावामुळे आपोआपच सामाजिक ध्रुवीकरण होत जातं. इथली मुलं ह्याच वातावरणात जगत असतात. प्रत्येकाची कट्टर धार्मिक ओळख असते. गेली
8 वर्षं आम्ही ह्या मुलांबरोबर काम करतोय. त्यांचं लेखन, वाचन, गणित यामध्ये सुधारणा व्हावी ह्यासाठी अभ्यासकेंद्रात त्यांना मदत केली जाते. आणि त्याबरोबरीनं आत्मसन्मान, जबाबदारीची जाणीव अशी सामाजिक-भावनिक कौशल्यंही शिकवली जातात. खेळ, नाटक, कलाकुसर, प्रकट वाचनही घेतलं जातं. अशाच एका तासाला आम्ही निना साबनानी ह्यांचं ‘मुकंद आणि रियाज’ हे पुस्तक वाचलं होतं.
आपण मघाच्या प्रसंगाचा विचार केला, तर एक गोष्ट लक्षात येते, की विनयच्या मनात मुस्लीम समाजाप्रति तिरस्कार भरलेला आहे. ‘ते’ आणि ‘आपण’ ही भावना त्याच्या शब्दांतून स्पष्टपणे व्यक्त होते आहे आणि त्यातूनच अस्तित्वाला धोका असल्याची भीतीही. प्रश्न हा आहे, की एवढ्याश्या 12-13 वर्षांच्या मुलाच्या मनात ही भीती आणि द्वेषाची भावना निर्माण कशी झाली! मानसशास्त्रात झालेला भावनांचा अभ्यास सांगतो, की आपल्या प्रत्येकाच्या मनात हिंसक विचार निर्माण करणारं एक चक्र सतत कार्यरत असतं. लेखाच्या खाली चौकटीत हा मुद्दा सविस्तर मांडलेला आहे. त्याचा जरूर संदर्भ घ्यावा.

विद्यासदनची बहुतांश मुलं ही अनुसूचित जातीची आहेत. मात्र ती स्वतःला तसं मानत नाहीत. त्यांच्यापैकी अनेकांनी तर कधी आरक्षणाचा लाभही घेतलेला नाही. जातीचं नाव घेऊन ती सर्रास ‘मी अमूकतमूक आहे’ म्हणतात. आपला स्वतंत्र बावटा घेऊनच ती उभी असतात. कल्याणमध्ये त्यांची ओळख कचरा उचलण्याच्या त्यांच्या व्यवसायाशीदेखील जोडलेली आहे. अशा परिस्थितीत आपल्या रोजीरोटीला धोका आहे अशी समजा त्यांना भीती वाटली, तर त्यांच्या मनात घबराट निर्माण होणारच.
ह्या धारणा, पूर्वग्रह ह्यातून पुढे द्वेष फोफावतो. हे चक्र भेदायचं असेल, पुढे हिंसेकडे जाण्याआधी थांबवायचं असेल, तर तथ्यं, गैरसमज आणि पूर्वग्रह ह्यांतला फरक आधी समजून घेतला पाहिजे. आधी भीतीचा स्वीकार करणं गरजेचं आहे. एकदा का भीतीनं मनात ठाण मांडलं, तर द्वेषभावनेतून हिंसाचार भडकतो. असं हे सगळं हिंसेचं चक्र आहे, हे समजणं महत्त्वाचं. सर्वात आधी आपला आतला आवाज ऐकणं, आपल्या भावना ओळखायला शिकणं आणि मग धारणा आणि गैरसमज ह्यात फरक करायला शिकणं, ह्या मार्गानं पुढे गेल्यास हे हिंसाचक्र भेदता येईल. हे अवघड असलं, तरी शक्य आहे. त्याच्यासाठी ताकदीचा मार्ग म्हणजे संवाद.
विनयचं धर्माबद्दलचं मत ऐकल्यावर सर्वांसह चर्चा पुढे नेताना मी त्यांना म्हटलं, ‘ही आपली जागा’ आहे किंवा मी इथला आहे हे आपण कशावरून ठरवतो? शाळेमुळे, मित्रांमुळे की कामामुळे? ह्यातल्या बहुतेक मुलांची कुटुंबं 2-3 पिढ्यांअगोदर महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या ग्रामीण भागांतून स्थलांतरित होऊन कल्याणमध्ये स्थिरावली आहेत. मीही बाहेरून इथे आले आहे आणि हे मुलांना माहीत असल्यानं मला तुम्ही ‘कल्याणकर’ मानता का, हेही विचारलं. ह्या प्रश्नांसोबत मुकंद-रियाजच्या गोष्टीत रियाजची भूमिका काय होती, ह्यासारख्या काही प्रश्नांवरही गाडी नेली. चर्चा खूप रंगली. फाळणीबद्दलची काही तथ्यं मी त्यांना सांगितली. चर्चा सुरू असताना वर्गात मध्येच शांतता पसरायची, कधी मुलं आपापसात कुजबूज करू लागायची, कधी गटाचा आवाज चढायचा. काहींना प्रश्न पडत आणि त्यांची उत्तरं ताबडतोब हवी असत. खूप वेळ त्यादिवशी आम्ही चर्चा केली. विषय मिळाला की मुलांना खूप बोलायचंही असतं.
काही दिवसांनी मुलं पुन्हा ईदबद्दल बोलत होती. ईद साजरी करताना पाळल्या जाणार्या काही प्रथांबद्दल त्यातल्या काही मुलांची तक्रार होती. पण ह्यावेळी मला फरसं काही बोलावं लागलं नाही. एकजण म्हणाला, की ईदच्या दिवशी लोक खुशीनं ‘ईदी’ वाटतात. ही मिठाई, पैसे घ्यायला आम्हीही मुद्दामहून मुसलमान वस्तीत जातो. काही मुलं म्हणाली, की कल्याणमधली बरीच महत्त्वाची दुकानं मुसलमानांची आहेत. अर्थात, मुलांकडून पुढे येणार्या गोष्टी त्यांच्या कामाच्या विश्वाशी जोडलेल्या होत्या. पण त्यातून एक गोष्ट झाली. मुस्लीम धर्माची माणसं म्हणजे कुणी ‘दुसरी’ नसून आपल्यातलीच एक आहेत हे सर्वांच्याच लक्षात आलं.
त्या दिवशी मलाही एक खास गोष्ट कळली, आणि खूप बरं वाटलं मुलांना वर्गात सुरक्षित वाटलं म्हणून ती मोकळेपणी व्यक्त झाली. आपली मतं कुठलाही पूर्वग्रह न ठेवता इथे ऐकून घेतली जातील, ह्याची त्यांना खात्री वाटली म्हणून. आणि हो, अशी बहुरंगी आणि विचार समृद्ध करणारी चर्चा केवळ त्या पुस्तकामुळे घडून आली. लेखक आणि वाचक ह्यांच्यातली वैचारिक देवाणघेवाण ह्यापूर्वी कधी ध्यानीमनी न आलेल्या किंवा विचारल्या न गेलेल्या प्रश्नांना जन्माला घालू शकते.
सजिता लिमये
sajitha@sajagtrust.org
गेल्या 10 वर्षांपासून शिक्षणक्षेत्रात कार्यरत. आदिवासी विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित गुणवत्तापूर्ण पद्धतीने शिकवण्यात काम. मराठीच्या प्रारंभिक वाचन आणि लेखनाच्या अध्ययन आणि अध्यापन पद्धती समजून घेण्याबाबत शोधनिबंध प्रकाशित. 2016 मध्ये ‘सजग’ची स्थापना.
‘सजग’ ही स्वयंसेवी संस्था वस्तीतल्या मुलांची शाळा सुटल्यावर त्यांच्यासाठी ‘विद्यासदन’ ही अभ्यासकेंद्रे चालवते. वेगाने वाढणार्या शहरांच्या परिघावर असलेल्या गरीब कुटुंबांना संधी आणि माहितीच्या अभावाचा सामना करावा लागतो. शासनाच्या लोककल्याणकारी योजना आणि समाजातील घटकांच्या मदतीचा पुरेसा लाभ ह्या कुटुंबांना, विशेषतः विद्यार्थ्यांना, मिळत नाही. हा पूल सांधणे, हे ‘सजग’ संस्थेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कल्याण(पश्चिम) शहरात संस्थेतर्फे विविध प्रकल्प राबवले जातात. कल्याण तालुक्यातील वस्त्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासवर्ग भरतात. शालेय अभ्यासासोबत मुलांना संवादकौशल्य, प्राथमिक अंकगणित आणि विविध कौशल्यांची ओळख करून दिली जाते. तसेच ‘सजग’ त्यांच्या कुटुंबाच्याही संपर्कात राहते. पायाभूत शिक्षण प्रशिक्षण न मिळणे, शाळेबद्दलची भीती किंवा पालकांकडून पुरेशी मदत न मिळणे अशा कारणांनी शाळा जवळ असूनही मुले शालेय शिक्षण पूर्ण करत नाहीत. सजग संस्था विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसोबत काम करून ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करते.
वेबसाईट – https://www.sajagtrust.org/
इमेल – sajagtrust@gmail.com
हिंसेचे चक्र
- या चक्राचा पहिला बिंदू आहे ‘स्व ओळखी’चा.
त्यातील काही भाग जैविक असतो, उदा. लिंग, त्वचेचा रंग. आणि काही भाग सामाजिक असतो, उदा. नाव, आडनाव, आवडी-निवडी, व्यवसाय, वर्ग, जात, धर्म, भाषा, प्रदेश, देश, विचारधारा. या आणि अशा अनेक गोष्टींशी स्वओळख जोडलेली असते. ह्यातले काही पदर आपण एखाद्या समूहाचा भाग आहोत हे सांगतात, उदा. धर्म, जात, विचारसरणी इत्यादी. तसेच ती जैविक आणि सामाजिक असते. ओळखीच्या या सर्व पदरांसह आपण या चक्राच्या दुसऱ्या बिंदूवर सहज जातो.
- दुसरा बिंदू आहे ‘अभिमान आणि अस्मिता’ यांचा
आपल्या काही गोष्टींचा आपल्याला अभिमान वाटत असतो. उदा. आपण गोरे असणं, श्रीमंत असणं, मराठी भाषक असणं इत्यादी. या अभिमान वाटणाऱ्या गोष्टींच्या अस्मिता तयार होतात. त्यांचा आग्रह धरला जातो. या बिंदूवर स्वओळखीमधील विविध पैलूंचा विसर पडतो. त्यातील गतिशीलता आणि बहुपदरीपण हे दोन्ही थिजवलं जातं. उदा. आपण फक्त ‘हिंदू’ आहोत असं सतत आपल्या मनावर बिंबवलं जातं. आणि सहजच आपल्याला त्यात मोठीच फुशारकी वाटायला लागते.
- तिसरा बिंदू आहे ‘गैरसमज आणि पूर्वग्रह’
आपल्या आजूबाजूचा समाज, व्यक्ती-व्यक्तींमधील नाती ही खूप गुंतागुंतीची असतात. त्यामुळे आपल्या ओळखीतील ज्या पैलूंबद्दल आपल्याला अभिमान, गर्व वाटतो, त्यानुसार आपल्या अस्मिता रुजत जातात. आपण आजूबाजूच्या माणसांची ‘आपण’ आणि ‘ते’ अशी विभागणी करतो. सहज बोलताना आपण म्हणतो, ‘आमची सोसायटी चांगली आहे. त्यात सगळे ‘आपले’ लोक आहेत.’ आपण ज्यांना ‘ते’ म्हणतो त्यांच्याबद्दलची आपल्याला खूप कमी माहिती असते. केवळ गैरसमज आणि पूर्वग्रह असतात. आपण ‘आपल्याला’ श्रेष्ठ आणि ‘त्यांना’ खालचे, कनिष्ठ समजायला लागतो. त्यांची हेटाळणी करतो. येथेच आपण या चक्राच्या चौथ्या बिंदूवर नकळत जातो.
- चौथा बिंदू आहे ‘दुरभिमान आणि द्वेष’
आपल्या मनात अभिमान, श्रेष्ठता, दुरभिमान म्हणजेच गर्व तयार होतो. मग आपण आपल्या मनातले इतरांबद्दलचे गैरसमज तपासून बघायला तयार नसतो. आपल्याला त्यांची फारशी माहितीही नसते.
त्यामुळे त्यांच्याबद्दल भीती आणि असुरक्षितता वाटायला लागते. त्या भीतीवर मात करण्यासाठी आपण त्यांचा राग, संताप, द्वेष, तिरस्कार करायला लागतो. त्यांना धडा शिकवायला पाहिजे अशी भावना आपल्या मनात मूळ धरू लागते. येथे आपण या चक्राच्या शेवटच्या म्हणजे पाचव्या बिंदूवर जातो.
- पाचवा बिंदू आहे ‘हिंसा’
‘त्यां’चा समूळ नायनाट केल्यानं प्रश्न कायमचा सुटेल असं वाटायला लागतं. ‘त्यांना धडा शिकवण्यासाठी’ केलेली हिंसा योग्य वाटायला लागते. आपण हिंसेचं समर्थन करायला लागतो. प्रसंगी अशा हिंसेत सहभागी होतो. असं करणं शूरपणाचं आणि गरजेचं वाटायला लागतं. एवढंच नव्हे, तर आपण त्याला देशप्रेम आणि धर्मप्रेम समजायला लागतो.
अरुणा बुरटे ह्यांच्या मांडणीवरून
