अनुराधा सी

मुलांना प्रोग्रामिंग शिकवणार्‍या जाहिरातींचा हल्ली निरनिराळ्या समाज-माध्यमांवर झालेला प्रचंड सुळसुळाट आणि त्याद्वारे पालकांवर होत असलेला भडिमार आपण सगळेच पाहतो आहोत. अशा क्लासला प्रवेश घेतलेली मुले तुमच्या घरात किंवा तुमच्या पाहण्यात असतील. पालक म्हणून आपल्याला मुलांच्या भवितव्याची काळजी वाटणे साहजिकच आहे. त्यांचा उत्कर्ष व्हावा असे वाटण्यात गैर काहीच नाही; पण भविष्याची काळजी करण्याच्या नादात आपल्याला वर्तमानाचा, मुलांच्या आवडी-निवडी, त्यांचा कल, ह्याचा मात्र विसर पडतो. मुलांना प्रोग्रामिंग शिकवण्याचे सध्या हे जे ‘फॅड’ आलेले आहे, त्याबद्दल माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्‍या अनुराधा सी ह्यांचे म्हणणे ह्या लेखातून वाचायला मिळते. मुलांच्या नैसर्गिक वाढ-विकासावर ह्या सगळ्याचा कसा परिणाम होऊ शकतो, हेही कळते. ह्या निमित्ताने सध्या चर्चेत असलेल्या विषयावर मंथन व्हावे, अशी अपेक्षा आहे. पालक म्हणून तुमची मते, अनुभवांचे स्वागत आहे.

‘सॉफ्टवेअर डेव्हलपर’ म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर एक विशिष्ट आकृती येते. विशी-पंचविशीच्या, विज्ञान किंवा अभियांत्रिकीचा पदवीधर असलेल्या, जगातल्या अग्रगण्य कंपन्यांमध्ये काम करण्याचे स्वप्न पाहणार्‍या महत्त्वाकांक्षी भारतीय तरुणाची. कम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये तो आकंठ बुडालेला असतो. आणि हो; काम करायला लागल्यापासून अगदी काहीच वर्षांत आपल्या आईवडिलांपेक्षा मोठा बँक-बॅलन्स बाळगून असतो. 

आता हे दुसरे चित्र पाहा. बंगळुरूची एक सहा वर्षांची चिमुरडी. अधूनमधून दातांच्या खिडक्या आणि डोळ्यांवर जाड फ्रेमचा चष्मा. शहरातल्या कुठल्या तरी महागड्या शाळेत इयत्ता पहिलीत शिकणारी. तिच्या पालकांनी उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या ऑनलाईन कोडिंगच्या कार्यशाळेसाठी तिचे नाव नोंदवलेले आहे. हे प्रशिक्षण देणार्‍या कंपनीने तिचा चेहरा स्वतःच्या जाहिरातीत वापरला आहे. त्यात त्यांनी ती कोडिंगमध्ये पारंगत असल्याचा दावा केलाय. एवढेच नाही, तर एका बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीतून तिला दहा लाख डॉलरचा चेक मिळू घातलाय, असेही त्यात ठोकून दिलेले आहे. 

पहिल्या चित्रातला नुकताच पदवीधर झालेला तरुण, हे दृश्य डोळ्यांना सुखावणारे आहे. भारतातल्या प्रतिभेचे ते प्रातिनिधिक चित्र आहे. दुसरे चित्र मात्र काहीसे व्यथित करणारे, मुलाच्या बालपणात आगंतुकपणे घुसखोरी करणार्‍या आयटी शिक्षणावर प्रश्न उठवणारे आहे. मुलांनी त्यांच्या बालपणी शिकण्याच्या गोष्टींत सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग येते का? ते मुलांनी नेमके केव्हा शिकायला सुरुवात करावी, ह्याचा जरा धांडोळा घेऊ या. 

लहान मुलांकडे कोणकोणती कौशल्ये असायला हवीत, ह्या प्रश्नाला अगदी आत्ता काही वर्षांपूर्वीपर्यंत, संवाद साधण्यासाठी भाषेचे ज्ञान असायला हवे, मैदानी खेळ, गरजेपुरते गणित यावे, वैयक्तिक स्वच्छता कळायला हवी, गटाशी जुळवून घेता यायला हवे, अशी काहीशी उत्तरे मिळत. हल्ली मात्र झपाट्याने ह्या यादीतल्या काही गोष्टींची जागा सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग घेऊ लागले आहे. तुम्हाला वाटेल, की हे दृश्य फक्त काही प्रमुख शहरांपुरते मर्यादित असेल. पण प्राथमिक शाळेतल्या मुलांसाठी घेतल्या जाणार्‍या कोडिंगच्या कार्यशाळांसाठी मध्यम आकाराच्या शहरांमधूनही मोठी नावनोंदणी झालेली बघायला मिळते.  

आता आपल्या एवढ्या चिमुरड्या मुलांकडे हे कौशल्य असायला हवे, असे त्यांच्या पालकांना का वाटत असेल, हा वादाचा मुद्दा आहे. काही पालकांना स्वतःलाच ह्या गोष्टींची फार आवड असते. त्यामुळे त्यांची मुले आपोआपच हे कौशल्य आत्मसात करतात. हे अगदीच समजण्यासारखे आहे. परंतु सर्वेक्षणात पालकांकडून दिली गेलेली कारणे बघा – ‘जितक्या लवकर माझे मूल आयटीसाठी लागणारी कौशल्ये आत्मसात करील, तेवढे त्याचे भवितव्य उज्ज्वल असेल’, ‘माझ्या मुलाला आयटीमध्ये नोकरी मिळणे हा आमच्या कुटुंबाचा सामाजिक-आर्थिक स्तर उंचावण्याचा हमखास उपाय आहे’, ‘इतर क्षेत्रांत नोकरीची शाश्वती नाही. आयटीचे तसे नाही. हा एक सुरक्षित पर्याय आहे’ इ. इ. 

ह्या त्यांच्या दाव्यांच्या समर्थनार्थ ते आपल्या तोंडावर काही आकडेवारीही फेकतात. ‘बघाच तुम्ही, येत्या दहा वर्षांत उपलब्ध होणार्‍या नव्या नोकर्‍यांपैकी 71% संधी संगणक क्षेत्रातील असतील.’ किंवा ‘येत्या 4-5 वर्षांमध्ये प्रोग्रामिंगमधल्या 24 लाख जागा न भरता तशाच रिक्त राहण्याची शक्यता आहे.’ 

ह्या कारणांकडे नजर टाकली तर एक लक्षात येईल, की त्या मुलाच्या नैसर्गिक ओढ्याचा किंवा क्षमतेचा कुठेच विचार केलेला नाहीय. कुणी म्हणेल, ‘आता यावर एवढा गहजब करण्याची काय गरज आहे?’ ‘एवढ्या लहान मुलाला आपल्या आवडीनिवडी कशा कळणार?’ ‘मुलांच्या वतीने पालकच नेहमी त्यांच्या करियरचा विचार करत आलेले आहेत. मग त्यांनी आपल्या मुलांसाठी कोडिंगचा पर्याय निवडला, तर काय बिघडले?’ 

मुलाला समजा प्रोग्रामिंगची आवड आहे आणि कधी आणि कुठे थांबायचे ते पालकांना कळणार असेल तर काहीच आक्षेप नाही. मात्र इतर कुठलेही पर्याय अजिबात विचारात न घेता पालकांचा सगळा भर मुलांसाठी कोडिंगचा पर्याय निवडण्यावर असेल, तर त्याकडे काणाडोळा करता येणार नाही. चिंता निर्माण करणार्‍या काही बाबी पालकांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. 

वैयक्तिक कौशल्य – आकलन वाढवण्यासाठी आणि मेंदूच्या विकासासाठी सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग उत्तम आहे, ह्यात काही शंका नाही. त्याच्यामुळे तर्कशक्ती आणि समस्यांशी दोन हात करण्याची क्षमता वाढीस लागते, हेही खरे. परंतु ह्या प्रदेशात लहान मुलांचा एकट्याने वावर काहीसा काळजी वाढवणारा असतो. मुले घंटो एकेकटी प्रोग्रामिंग करत राहतात; कम्प्युटर हाच काय तो सोबती. कोडिंगवर बेसुमार वेळ घालवणारी मुले समाजापासून तुटून एकाकी पडण्याची शक्यता बालमानसतज्ज्ञांनी नोंदवली आहे. मित्रमंडळी, परिचितांमध्ये त्यांचा जीव रमेनासा होतो. मोठे झाल्यावर समाजात वावरताना ह्या मुलांना गंभीर अडचणी येऊ शकतात. 

स्क्रीनटाईमचा अतिरेक – कोडिंग शिकण्याव्यतिरिक्तही हल्ली मुले डिजिटल स्क्रीनला अखंड चिकटून बसलेली असतात. मोबाईल, गेमिंग डिवाईस, लॅपटॉप आणि काहीच नसले तर टीव्ही तरी! थडाथड बटणे दाबणे सुरू असते आणि तहानभूक हरपून नजर लॅपटॉपच्या स्क्रीनवर खिळलेली असते. आजूबाजूच्या मुलांवर नजर टाकलीत, तर एक धक्कादायक वास्तव बघायला मिळेल. बहुतांश मुलांच्या डोळ्यांवर चष्मे चढलेले आहेत. आणि हे वय अगदी चार वर्षांपर्यंत खाली आलेले आहे. फार लहान वयात एवढा वेळ कम्प्युटरवर डोळे जडवून बसणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.  

नो नॉनसेन्स – नवीन भाषा शिकणे हा मुलांच्या शिक्षणातील महत्त्वाचा भाग मानला जातो. अर्थात, नवीन भाषा म्हणजे आपापसातील संवादभाषा. मग ती मुलाची मातृभाषा असो, इंग्रजी किंवा इतर कुठलीही भारतीय किंवा परदेशी भाषा. प्रोग्रामिंगच्या भाषेला मात्र हे तत्त्व लागू पडत नाही. बोलीभाषेतील लवचीकता प्रोग्रामिंगच्या भाषांमध्ये नावालाही नसते. नियमांच्या काटेरी कुंपणाने तिची बांधबंदिस्ती केलेली असते. शिकण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर मुले भारंभार चुका करतात. आता कम्प्युटर हा काही मायाळू शिक्षक नाही. त्यामुळे अगदी बारकी चूकही तो ‘एरर’चा झेंडा फडकवून दाखवून देतो. बोलायला शिकत असलेले मूल चुकीची, अर्धवट वाक्ये बोलत असले, तर पालक एकतर ते हसण्यावारी नेतात, किंवा हळुवारपणे त्याची चूक सुधारतात. इथे म्हणजे ‘चुकीला माफी नाही’ असा काहीसा प्रकार. चुका करायला काही वावच नाही. ह्यातून मुलांचा आत्मविश्वास तेवढा खच्ची होणार.  

‘रॅट-रेस’मध्ये धावण्याची घाई – कोडिंग-कार्यशाळांच्या जाहिरातीतील सर्वात वाईट भाग म्हणजे ते करत असलेले दावे. करिअरच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावरच मुले कशी लठ्ठ पगार मिळवू लागतील, हे अधोरेखित केलेले असते. एवढ्या लहान वयात ‘पैसा कमावणे’ हे मुलांच्या आयुष्याचे ध्येय व्हावे, हे मुळीच स्वागतार्ह नाही. ह्याने मूल आयुष्यातले छोटे छोटे आनंद गमावून बसते. आधीच तर शिक्षण, छंद, खेळ, सगळ्या गोष्टींमध्ये स्पर्धा शिरलेली आहे. आता हे कोडिंग सुरू करून, त्यासाठी शिष्यवृत्ती देऊन आणि लवकर नोकरी लागण्याची आमिषे दाखवून मुलांना मोठ्यांच्या जगात ढकलण्याची घिसाडघाई चालू झालेली आहे.

शुल्कापोटी चाललेली लूट – लहान मुलांच्या संगणक-प्रशिक्षणाचे व्यापारीकरण होत असल्याची कुजबूज आम्हा संगणक व्यावसायिकांच्या बिरादरीतही ऐकू येऊ लागलेली आहे. तीही तुमच्यापर्यंत पोचवायची आहे. कोडिंग शिकवणार्‍या बहुतांश कार्यशाळा काही तासांच्या प्रशिक्षणासाठी तीस हजारांपासून ते एक लाखांपर्यंत वाट्टेल ते शुल्क आकारतात. महत्त्वाकांक्षी पालकांच्या मनातील असुरक्षिततेला हात घालण्यासाठी ते आपले सगळे विक्रीकौशल्य पणाला लावतात. 

वाचकांना लेखातले युक्तिवाद कदाचित एकतर्फी वाटतील. 10-11 वर्षांच्या मुलांनी कोडिंगचा गांभीर्याने विचार करणे मला सलतेय, असाही कुणी आरोप करेल. एवढ्या लहान वयात व्यावसायिक प्रोग्रामर होण्याची सकारात्मक बाजू काही मी अजून तपासलेली नाहीय. शोधायला गेले तर तसे मुद्देही सापडतील. मी स्वतः संगणक अभियंता आहे. आयुष्यभर मी हाच व्यवसाय केला आहे आणि म्हणूनच एक पाऊल मागे जात सद्यपरिस्थितीकडे त्रयस्थपणाने बघावेसे वाटले. जे धोके मला जाणवले, त्यांचे गांभीर्य जाणवून अशा कुठल्या अभ्यासक्रमाची आपल्या मुलासाठी निवड करणार्‍या पालकांच्या कानी सावधगिरीचा इशारा पोचवावा, म्हणून हा लेखनप्रपंच.  

(‘टीचर प्लस’मधून साभार.) 

https://www.teacherplus.org/coding-for-kids-how-soon-is-too-soon/

अनुराधा सी

anuradhac@gmail.com

लेखक पूर्वी माहिती-तंत्रज्ञानक्षेत्रात कार्यरत होत्या. आता त्या कॉर्पोरेट टेक्निकल ट्रेनर आणि कंटेंट राईटर म्हणून स्वतंत्रपणे काम करतात. 

अनुवाद: अनघा जलतारे