शैक्षणिक खेळ आणि साधने – निवड करताना

गेल्या काही वर्षांत आपला सभोवताल फार झपाट्याने बदलत चालला आहे. मुलांना दोन घरातले आणि एकदोन ठेवणीतले कपडे आणि चारदोन खेळणी असण्याचा काळ कधीच मागे पडला. कपाटे कपड्यांनी आणि खेळण्यांनी ओसंडून वाहणे हा हौसेचा मामला झालाय. मात्र हल्ली मिळणारी मुलांची खेळणी तुम्ही नीट पाहिली, तर लक्षात येईल, की खेळण्यांकडे केवळ ‘मनोरंजनाचे साधन’ ह्या पलीकडे बघितले जाऊ लागलेय. मुलांसाठीच्या दुकानात शिरल्यावर, ‘शैक्षणिक साधने आणि शैक्षणिक खेळणी’ हा आता एक मोठा विभाग झाल्याचे आपल्या निदर्शनास येईल. विशेषतः एखाद्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त भेट द्यायची झाल्यास, इतर पालकांशी चर्चा करताना, इतर देशांमध्ये, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार्‍या संधी आणि संसाधने पाहिल्यावर आपल्याला शैक्षणिक साधनांचे आणि शैक्षणिक खेळांचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की ‘शैक्षणिक’ या शब्दाचा अर्थ इथे फक्त शालेय शिक्षणापुरता मर्यादित नसून, त्यात सामाजिक जीवनकौशल्य, वैचारिक कौशल्य इत्यादींचा देखील समावेश आहे. इंग्रजीमध्ये त्याला टीचिंग लर्निंग मटेरियल (ढङच) असे संबोधले जाते. आपल्या पाल्याची सर्वांगीण प्रगती व्हावी, असे सर्वच पालकांना वाटते. आपले मूल स्पर्धेत टिकून राहावे, इतरांच्या तुलनेत मागे पडू नये, शिकत असलेल्या संकल्पना त्याला स्पष्ट व्हाव्यात, प्रत्यक्षात न दिसणार्‍या (अमूर्त) गोष्टींची कल्पना करता यावी, यासाठी अधिकाधिक अत्याधुनिक खेळणी आणि साधने आणून देण्याची पालकांची जणू चढाओढ लागते. त्यासाठी मग अगदी साध्या माहितीपर तक्त्यांपासून बायजू सारख्या महागड्या मोबाईल अ‍ॅप्सपर्यंत सर्व गोष्टी विकत घेण्याचा त्यांना एकीकडे मोह होतो, तर दुसरीकडे ‘या मुलांना काहीही आणून द्या, नुसतं पडून राहतं, त्यातून काही शिकत नाहीत’, असा तक्रारीचा सूर उमटलेला ऐकू येतो. बरेचदा मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने देखील साधने आणि खेळ यांचा उपयोग मुलांना ‘व्यस्त ठेवणे’ इतक्या मर्यादित दृष्टीने केलेला दिसतो. साधनांचे आणि खेळांचे मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये नक्की स्थान काय, त्यांची निवड करताना काय विचार केला पाहिजे, याबद्दल अधिक विचार होणे महत्त्वाचे आहे.

TLM1

कल्पना करण्याच्या संधी

साधने आणि खेळ यांचे आपण दोन ढोबळ भाग करू शकतो. परिसरात उपलब्ध असणारी साधने आणि काही विशिष्ट संकल्पना स्पष्ट होण्यासाठी निर्मिलेली, बाजारात उपलब्ध असणारी साधने. या दोन्हींचे आपापले गुणदोष आहेत. परिसरातील प्रत्येकच साधनाचा उपयोग खरे तर शिक्षणासाठी करता येऊ शकतो. अगदी लहान मूल हे त्याच्या आजूबाजूच्या वस्तू, साहित्य हाताळून, त्यांच्यावर क्रिया करून शिकते. आजूबाजूच्या वस्तूंच्या निरीक्षणातून, त्या हाताळण्यातून मुलांच्या सर्व इंद्रियांचा, हालचालींचा विकास होत जातो, एखाद्या गोष्टीचा कार्यकारण भाव लावणे मुलाला जमायला लागते. वस्तूंसोबतची, साधनांसोबतची ही परस्परक्रिया मुक्त, उत्स्फूर्त असते आणि मुलाने स्वतः ठरवलेली असते. कोणत्या साधनाचा वापर कसा करावा हे संपूर्णपणे, मूल ठरवत असते. अनेकदा त्या साधनाच्या, वस्तूच्या नियोजित उपयोगापेक्षा वेगळा उपयोग ते करू पाहते. हा खेळ, हे प्रयोग, हे हाताळणे मुलाच्या शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. मूल या टप्प्यावर हाताळत असलेले साधन कोणत्याही एका विषयासाठी निर्माण केलेले असले, त्याचे उद्दिष्ट विशिष्ट असले, तरी त्यापलीकडे जाऊन संकल्पना स्पष्ट करणे इतके त्याचे उद्दिष्ट मर्यादित नसते आणि शिकणे-शिकवणे या प्रक्रियेला डोळ्यासमोर ठेवून ते निर्माण केलेले नसते. मुलाच्या कल्पनेला, प्रयोगशील वृत्तीला खतपाणी घालणारे असे ते साहित्य असते.

मूल जसजसे मोठे होत जाते, तसतसे अधिकाधिक गुंतागुंतीच्या संकल्पना समजवण्यासाठी बाजारात मिळणार्‍या विशिष्ट साहित्याची पालकांना गरज जाणवायला लागते आणि त्याचे आपापले असे महत्त्व आहेच, ते नाकारता येणारच नाही; पण त्याचवेळी हे देखील लक्षात घेतले पाहिजे, की बाजारात मिळणारे प्रत्येकच साहित्य हे सर्वार्थाने चांगले असेल असे नाही. लेगो ब्लॉक्सचे ठोकळे एकमेकांवर रचून मूल अमर्याद नवनिर्मिती करू शकते; पण काही साहित्य हे मुलाच्या कल्पनांवर खूपच मर्यादा आणणारे असते. उदा. ऊखध (ऊे ळीं र्ूेीीीशश्रष) अशा नावाखाली मिळणारे तयार संच. ऊखध घरासाठीचे संच वापरून मुलाला ठरवून दिलेलेच घर तयार करता येते. खूपदा असे दिसून येते, की अशा प्रकारच्या आयत्या (रेडीमेड) संचामधील साहित्याचा वापर मुलाला मुक्तपणे करता येत नसेल, तर त्यात ठरवून दिलेल्या गोष्टी केल्यानंतर मुलाची त्यातील रुची संपते.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा एखादे मूल तयार साहित्य वापरण्याऐवजी उपलब्ध साहित्याची जुळवाजुळव करून तीच वस्तू, खेळणे किंवा प्रयोग निर्माण करते, तेव्हा निरीक्षण करण्याच्या, कल्पना करण्याच्या, प्रश्न सोडवण्याच्या, चुका करून शिकण्याच्या, आत्मविश्वास वाढवण्याच्या संधी कैकपट वाढतात. तयार संचामधील एकातएक बसणार्‍या, मोजूनमापून तयार केलेल्या भागांना जोडताना यापैकी खूप मर्यादित क्रिया घडतात. आणि लागणारे सर्व भाग उपलब्ध असल्यामुळे प्रत्येक भाग नेमका का गरजेचा आहे हे देखील मुलाला नीटसे उमगत नाही.

TLM3

अमूर्त संकल्पना समजून घेण्याच्या संधी

अनुभवाधारित शिक्षण म्हणजे फक्त हाताने, मूर्त साहित्यावर क्रिया करून मिळालेले शिक्षण, असा एक सार्वत्रिक समज पाहायला मिळतो. कृती करून शिकण्याचे महत्त्व निश्चितच नाकारता येत नाही; पण अनुभवाधारित शिक्षणाचा परीघ एवढा संकुचित नाही. शिक्षणाचे एक उद्दिष्ट हे मूर्तपणाच्या पलीकडे जाऊन अमूर्त संकल्पनांशी, विचारांशी खेळणे, त्यांच्या आधारे, पूर्वी अस्तित्वात नसलेल्या, नवनवीन कल्पना करणे हे देखील आहे. अशाप्रकारे अमूर्त संकल्पना हाताळण्याचे कौशल्य विकसित करण्याची संधी आणि मुभा देणारी साधने आणि खेळ महत्त्वाचे असतात. शब्दांचे खेळ, गोष्टींची पुस्तके, वर्तमानपत्रातील बातम्या, मनातल्या मनात कल्पना करण्याचे, अंदाज लावण्याचे, शक्यता वर्तवण्याचे, निरीक्षण करून निष्कर्ष काढण्याचे उपक्रम यांचा त्यात समावेश होऊ शकतो. बरेचदा असे साहित्य आणि खेळ हे आपल्याला तितके चकचकीत आणि परिपूर्ण वाटत नसल्यामुळे त्याकडे थोडेसे दुर्लक्ष होते. मात्र पालक म्हणून साहित्याची निवड करताना आपण याचे भान आवर्जून ठेवले पाहिजे.

TLM2

गटात काम करण्याच्या संधी

बाजारात मिळणार्‍या काही शैक्षणिक साधनांची आणि खेळांची अजून एक मर्यादा म्हणजे बरेचदा मुलाने ती एकट्याने वापरून कृती करणे अपेक्षित असते. किंवा तसे नसले, तरी पालक त्या खेळांकडे ‘मुलाला व्यस्त ठेवण्याचा एक मार्ग’ म्हणून बघण्याची शक्यता असते. परिणामी प्रयोग करणे, मॉडेल बनवणे, चार्ट जोडणे अशा कृती मूल एकट्याने करताना दिसून येते. अशाप्रकारे शिकणे हे उपयुक्त आणि मुलाला स्वतःच शोध घेण्याच्या, प्रयोग करून बघण्याच्या संधी देणारे आहे, हे खरे. मात्र तेवढेच पुरेसे नाही. वायगॉट्स्कीपासून अनेक शिक्षणतज्ज्ञांनी शिक्षणाचे सामाजिक स्वरूप अधोरेखित केले आहे. समवयस्क गटासोबत चर्चा, कल्पनांची देवाण-घेवाण, पर्यायांची तुलना अशा अनेक प्रक्रियांचे शिक्षणात मोठे स्थान आहे. ‘मी काम करतोय, तू या साहित्याशी खेळ’, असा मार्ग बरेच पालक अवलंबताना दिसतात. आपण जी कृती करतो आहे ती पालकांना महत्त्वाची वाटत नाही, असा संदेशच एका प्रकारे ह्यातून मुलापर्यंत पोचत असतो. म्हणून देखील मूल त्या खेळांना लवकर कंटाळते. आपल्यालाही हा अनुभव असेल, की घरातली छोटी-छोटी कामे करताना ‘मी करतो/करते’ म्हणत मध्ये-मध्ये करणारे मूल आपण आणलेल्या साधनांकडे मात्र पाठ फिरवते, कारण मोठी माणसे ज्या गोष्टींकडे लक्ष देतात त्या महत्त्वाच्या असे एक समीकरण त्याच्या मनात पक्के झालेले असते. दुसरे म्हणजे, एकेकटे कृती करताना मूल एखाद्या टप्प्यावर अडले आणि त्याबद्दल काहीच मार्गदर्शन मिळाले नाही तरीदेखील त्याची त्यातील रुची संपते. आपला खेळ, साहित्य इतर मुलांसोबत वाटून घेणे, इतरांना आपल्या कृतीत सामावून घेणे या वृत्ती जोपासणे महत्त्वाचे आहे. सारखेच एकेकट्याने खेळल्याने आपल्या साहित्याबद्दल एकप्रकारची असुरक्षितता, स्पर्धात्मक वृत्ती वाढू शकते.

तंत्रज्ञानाचा वापर किती आणि कशासाठी?

सध्या शैक्षणिक साधनांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण केलेली गाणी, गोष्टी, संगणकाचा वापर करून, मोबाईलवर खेळावयाचे शैक्षणिक खेळ, व्हिडीओ इत्यादी गोष्टींचे पेवच फुटलेले बघायला मिळते. तंत्रज्ञानामुळे शिकण्याची प्रक्रिया जास्त लवचीक होते हे खरे. स्वतःच्या गतीने, पुन्हा-पुन्हा ऐकून-बघून एखादी संकल्पना शिकणे, इंग्रजीसारखी परकीय भाषा कानावर पडण्याची संधी मिळणे, काही नवीन प्रयोग शिकायला मिळणे असे अनेक फायदे त्यामुळे होतात. पण खूपदा हे शिक्षण एकतर्फी होण्याची आणि त्या प्रक्रियेत मूल निष्क्रिय श्रोता ठरण्याची शक्यता असते. मुलांना जगाबद्दल पडलेल्या एखाद्या प्रश्नावर विचार करायला, निरीक्षण करायला मदत न करता, आपण इंटरनेटच्या माध्यमातून, व्हिडिओंच्या माध्यमातून त्याचे तपशीलवार पण आयते (रेडिमेड) उत्तर त्यांना देत राहिलो, तर त्यांना माहिती तर मिळते; पण त्यात त्यांची स्वतः विचार करण्याची क्षमता खुंटण्याची शक्यता असते. तीच बाब मोबाईल अ‍ॅप्स आणि खेळांची देखील आहे. बहुतांश वेळा खेळांच्या, अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून माहिती लक्षात राहणे आणि सराव होणे यावर त्यांचा भर असतो. पूर्वीसारखे अगदी ‘घोका आणि ओका’ असे नसले, तरी इथेही स्वतंत्रपणे विचार करण्यावर भर दिला जात नाही. मग असे खेळ, अ‍ॅप्स घेऊच नयेत का, तर असे नाही; पण आपण ते का घेत आहोत, त्यातून काय होणे अपेक्षित आहे आणि त्यात आपल्या सहभागाची कुठे गरज आहे, हे ओळखणे महत्त्वाचे आहे. उदा. एखादे गाणे, व्हिडीओ, गोष्ट संगणकावर पाहिल्यावर त्यात केलेली मांडणी मुलांना पटली का, त्यात काही शंका आहेत का, त्या आधारे ती काही नवनिर्मिती करू शकतील का, ह्या अनुषंगाने बोलणे होणे गरजेचे आहे.

शिकणे : निसर्गाकडून आणि माणसांकडून

सुरुवातीच्या काळात फक्त पुस्तकांकडे शैक्षणिक साहित्य म्हणून पाहण्यात येई. नंतर मात्र गोट्या, बिल्ले, काड्या इत्यादींचा देखील शैक्षणिक साहित्य म्हणून उपयोग व्हायला सुरुवात झाली. परिसरातील प्रत्येकच वस्तूचा शैक्षणिक दृष्टीने कसा विचार करता येईल याबाबत जागृती निर्माण होऊ लागली. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये बाजारपेठेच्या रेट्यामुळे शैक्षणिक साहित्यनिर्मितीची जबाबदारी बाजारपेठेनी उचलली आहे आणि पालकांनी त्यात फारशी ढवळाढवळ न करता पैसे देऊन फक्त ते साहित्य विकत घ्यावे अशी एक विचारसरणी हेतुतः पसरवलेली जाणवते. अधिकाधिक गुंतागुंतीचे आणि दिसायला चकचकीत साहित्य निर्माण करण्याच्या बाजारपेठेच्या दबावामुळे उत्तम शिक्षणाच्या मूळ तत्त्वांपासून फारकत घेतली जात आहे. इंग्रजी कवी विलियम ब्लेक त्यांच्या जेरूसलेम या पुस्तकात एके ठिकाणी लिहितात, की जर आपण स्वतः नवनिर्मिती केली नाही, तर आपण इतरांनी तयार केलेल्या व्यवस्थांचे गुलाम बनून राहू. हा विचार शैक्षणिक साहित्यनिर्मितीला अगदी तंतोतंत लागू आहे. आपले मूल आणि आपणही फक्त ग्राहकाच्या भूमिकेत न राहता निर्मात्याच्या भूमिकेत शिरले पाहिजे. त्याची सुरुवात ही योग्य शैक्षणिक साहित्य निर्माण करण्यापासून होऊ शकते. इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यासाच्या पुस्तकाच्या सी.डी. सध्या बाजारात उपलब्ध आहेत आणि आश्चर्य म्हणजे शाळा आणि पालक अशा दोन्ही वर्गांतून त्यांना मागणी आहे. ज्या विषयाचे नावच ‘परिसर अभ्यास’ आहे, तो विषय परिसराचे निरीक्षण न करता शिकणे, यातील विरोधाभास त्यांच्या लक्षात येत नाही. शिक्षणतज्ज्ञ कमला मुकुंदा म्हणतात, ‘शैक्षणिक साधनांचा विचार करताना दोन मुख्य संसाधनांचा आपल्याला विसर पडतो – निसर्ग आणि माणूस. निसर्गातील विविध घटकांमधील परस्परसंबंध आणि देवघेव आणि माणसांचा रोजच्या जगण्यातील एकमेकांसोबतचा संवाद आणि क्रिया-प्रतिक्रिया यातून विद्यार्थ्यांना शिकण्यासारखे अमाप आहे.’ आपण मात्र त्याकडे त्या दृष्टीने बघत नाही.

साहित्याची बनावट

शैक्षणिक साहित्य आणि खेळ विकत घेताना आपण बहुतांश वेळा त्यातून कोणत्या संकल्पना शिकायला मुलांना मदत होऊ शकेल इतकाच विचार करतो. रोनाल्ड बार्थेस ह्या फ्रेंच भाषातज्ज्ञाच्या मते, मुलांचे खेळाचे साहित्य कोणत्या पदार्थापासून बनलेले आहेत हे देखील महत्त्वाचे असते. प्लास्टिक आणि धातूच्या वस्तूंचा स्पर्श कोरडा, रुक्ष असतो. त्यात भावनिक ओलावा नसतो. लाकडासारख्या मऊ, तरीही मजबूत पदार्थांचा स्पर्श हा एका अर्थाने काव्यात्मक असतो. लाकडी खेळणे एकदम तुटून जात नाही. त्याची झीज होईल तसेतसे त्याचे आणि मुलाचे नाते हळूहळू बदलत जाते. एखादी प्लास्टिकची बैलगाडी आणि लाकडी किंवा मातीची बैलगाडी यामध्ये मुलांच्या दृष्टीने खूप फरक आहे. प्रत्येक पदार्थासोबत येणारा त्याचा स्पर्श, आवाज, वजन, आकार या सगळ्याचे मुलांच्या भावविश्वात खूप महत्त्वाचे स्थान असते.

वापरातील लवचीकता

शैक्षणिक साहित्याच्या उपयोगात जितकी लवचीकता आणि स्वातंत्र्य असेल, तितके ते मुलांना अधिक उपयुक्त ठरते. म्हणजे एकच साहित्य जेवढ्या विविध प्रकारे वापरता येऊ शकते, तितके तिचे शैक्षणिक मूल्य जास्त ठरते.

मुलांच्या भावविश्वातील साहित्य

मुलांच्या भावविश्वात स्थान असलेल्या वस्तूंचा शिक्षणासाठी उपयोग करून घेतल्यास मुले त्याच्याशी पटकन जोडली जातात. मुलांच्या गप्पांतले विषय, त्यांनी काढलेल्या रेघोट्या, त्यांच्या खिशातले दगड, रबरबँड, पत्ते, स्क्रू, इतकंच काय अगदी मुलांच्या शिव्या आणि गाणी देखील शैक्षणिक साहित्य ठरू शकतात असे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ कृष्णकुमार म्हणतात. या सर्व गोष्टींशी मुलांचे एक भावनिक नाते असते आणि नेमके त्याच गोष्टींकडे आपण निरुपयोगी म्हणून दुर्लक्ष करतो.

योग्य साहित्याचा योग्य वापर

शैक्षणिक साहित्यातून मुलांना सराव मिळून सूत्रे, तत्त्वे त्यांच्या लक्षात राहतील, असे मानणारे एकीकडे, तर शैक्षणिक साधनांमुळे मूल स्वतःचे स्वतः सर्व शिकेल असे मानणारे दुसरीकडे. या दोन टोकांभोवती सध्या शैक्षणिक साधनांबद्दलचा सर्व संवाद केंद्रित आहे. शैक्षणिक साहित्याचे महत्त्व आहेच; मात्र त्यासोबत पालक म्हणून आपण मुलाच्या विचारांना दिशा देण्याचे, त्याच्याशी संवाद साधून मार्गदर्शन करण्याचे काम करू शकलो, तर शैक्षणिक साहित्याची परिणामकारकता कैक पटीने वाढण्यास मदत होऊ शकेल. एखादे साहित्य किंवा खेळ त्यातील अंगभूत वैशिष्ट्यांमुळे काही प्रमाणात उपयोगाचे नक्कीच ठरते; पण त्या पलीकडे जाऊन, त्याचा कधी, कसा आणि किती उपयोग करायचा याबद्दल स्पष्टता असल्यास आपण पुढची मजल मारू शकतो. साधनांचा योग्य वापर करण्याबाबत पालक आणि शिक्षकांनाच पुरेशी स्पष्टता नसेल, तर ती उपयुक्त ठरण्याऐवजी मुलांच्या वैचारिक वाढीस बाधा ठरण्याचीच शक्यता अधिक आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि अमूर्त संकल्पना समजून घेण्याच्या व रचना करण्याच्या क्षमतेला त्यामुळे अटकाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालक म्हणून योग्य शैक्षणिक साधन निवडून ते परिणामकारकरित्या वापरण्याची क्षमता आपण जितकी विकसित करू, तितका मुलाला त्याचा फायदा होईल हे नक्की.

(या लेखासाठी ‘लर्निंग कर्व्ह’ या मासिकातील काही लेखांचा आधार घेतलेला आहे.)

Sayali

सायली तामणे  | sayali.tamane@gmail.com

लेखिका भारत विद्यालय, वाई येथे शिक्षक समन्वयक म्हणून कार्यरत असून त्यांनी शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे.