श्री. अरविंद गुप्ता यांना पद्मश्री पुरस्कार

या वर्षीच्या 26 जानेवारीला एक आनंदाची बातमी मिळाली… श्री. अरविंद गुप्ता यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र फौंडेशनचाही पुरस्कार अरविंद गुप्तांना मिळालेला होताच. मुलांनी आनंदात खेळावं आणि आनंदात शिकावं इथपासून विज्ञानाची सुरवात करायला धडपडणाऱ्या या वैज्ञानिकाला पुन्हा एकदा सलाम.

पालकनीतीच्या वाचकांना अरविंदजींची ओळख अनेक वर्षांपासून आहे. खेळणी स्वतःच तयार करावीत आणि खेळावीत ही कल्पना त्यांच्या ‘कबाड से जुगाड’, ‘खिलौनोंका बस्ता’ या पुस्तकांमुळेच आमच्या मनात रुजली. लोकांनी चांगलेचुंगले वाचावे म्हणून स्वतःच्या खर्चाने देशोदेशीची पुस्तके छापून घेऊन वाटणारा हा माणूस!

मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष म्हणून ते महाराष्ट्रातल्या विज्ञानप्रेमींना भेटले. आणि पुढे आयुकामध्ये आल्यावर तर या जादूगाराची टीम शालेय वयातल्या मुलांना असंख्य वैज्ञानिक संकल्पनांवर आधारलेली देशोदेशीची खेळणी कशी करायची हे दाखवत राहिली. मुलांसाठीची उत्तमोत्तम पुस्तकं सर्वत्र उपलब्ध व्हावीत म्हणून झिजत राहिली. त्या कामात त्यांनी इतकी माणसं जोडली आणि इतकी खेळणी आपल्यासाठी इंटरनेटवर टाकली आहेत, की ते एक रेकॉर्ड असेल. देशोदेशीच्या पुस्तकांचे कॉपीराईट मिळवून, भाषांतरे करवून तीही इंटरनेटवर टाकली.

तुम्ही अजूनपर्यंत याचा लाभ घेतला नसेल, तर या निमित्ताने हा खजिना धुंडाळायला सुरवात नक्की करा: www.arvindguptatoys.com