संवादकीय – डिसेंबर २०१९

बाबरी मशिदीच्या जागी राममंदीर बांधायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मिळाली. मशिदीसाठी दुसरी जागा देण्यात आली. असो. मुळात बाबरी मशीद तोडणं हेच योग्य होतं का? मानवी हक्कांची जाणीव निर्माण झालेल्या आजच्या जगात प्रत्येकाला आपापला देव, त्यानुसारचा धर्म मानण्याचा आणि पूजा करण्याचा हक्क असतो. स्वतंत्र भारतात तर तो आहेच. मात्र त्यातून इतरांचं पूजास्थान नष्ट करण्याचा हक्क कदापि निर्माण होत नाही. एके काळी मानवी हक्कांच्या जाणिवेची जगाला पुरेशी समज नव्हती. बळी तो कान पिळी हाच सार्वत्रिक न्याय असे. त्यातून अनेकांवर अन्याय होत होते यात शंका नाही. तर मुद्दा असा, की त्याकाळी कुणी कुणावर अन्याय केला तर जगाच्या अंतापर्यंत त्याची परतफेड आजच्या शहाण्या माणसानं करत बसावं का? त्यावेळी कुणी काय केलं, हे आठवून आज त्याचा बदला घेण्यात कुठलाच शहाणपणा नाही.

बाबरानं मशीद बांधली तेव्हा त्या जागी आधी एक मंदीर होतं. असेलही; पण ही घटना किती जुनी आहे, त्या राममंदिराच्या खाली आणखी काही असेल का, देशातल्या अनेक मंदिरांच्या खाली मशिदी नसतील का, आणि मशिदींच्या, चर्चच्या खाली मंदिरं? मग आपण सगळं उखडून बघायचं का? आज सूर्यमंडल पादाक्रांत करण्याचं स्वप्न अर्थपूर्णतेनं बघणार्‍या तरुणाईनं ह्याचा सजगपणे विचार करू नये, याचं आश्चर्य वाटतं, आणि वैषम्यही.

शतकांपूर्वीच्या जगातली देशकल्पनाही आजच्याहून वेगळीच होती. इतिहासाकडे बघताना मानवी जीवन कुठून कुठे कसं विकसत गेलं, त्यात काय चुका घडल्या हेही अभ्यासायला हवं; पण ते कशासाठी, तर आपली समजूत आणि आपल्यातली विकसनशीलता जपण्यासाठी. या भूमीवर पूर्वी कोण राहायचे, ते कसे राहायचे, कशासाठी एकमेकांचा जीव घ्यायचे हे कळल्यावर आपण त्यांची अधुरी लढाई लढत असलो, त्यांच्या सांस्कृतिक स्थळांची तोडमोड करत असलो, तर याचा अर्थ आपण एकविसाव्या शतकातल्या शहाण्या माणसासारखं वागलो असा होईल का?

आज हा भारत नावाचा धर्मनिरपेक्ष देश जगाच्या नकाशावर आलेला आहे. शिवाय, आपण जाणीवपूर्वक संवेदनशील पालकत्वाचा विचार करतो आहोत. मानवी हक्कांचा विचार करतो आहोत. अजूनही आपण जर मध्ययुगीन मनोवृत्तीनं वागलो, तर आपली मुलं जीवनात विचक्षण वृत्तीनं पाहू शकतील का? मला खरंच सांगा, भारतातल्या शहाण्या नागरिकांना सर्वसमाजघटकांना एकत्र घेऊन सर्वसमावेशकतेनं, एकोप्यानं, सलोख्यानं, संस्कृतीतलं वैविध्य जपत कसं जगता येईल या दिशेनं जाता येणार नाही का?

मुलांना हे फार छान जमतं. ती पूर्वग्रहाशिवाय कोणामध्येही पटकन मिसळतात, आनंदानं खेळतात. मुलांमधली ही संवेदनशीलता, प्रेम आणि ऋजू न्यायभाव जपणं हीच आपली खरी जबाबदारी आहे. आपली श्रद्धा, आपला देव, धर्म सर्वश्रेष्ठ मानण्यात कुणाला प्रतिष्ठा वाटत असेलही; पण त्यातून जर माणसामाणसात वैरभाव निर्माण होत असेल तर आपल्याला हा धर्मकोष फाडून त्यातून बाहेर यायलाच हवं!