अंधमित्र

आरती शिराळकर

अंधांचे मित्र बनून 

त्यांच्या विकासाच्या कामात 

आप-आपल्या परीनं काही भर घालावी 

या इच्छेतून सुरू झालेल्या 

या संस्थेचे काम सुरवातीपासून 

अरविंद व आरती शिराळकर पहातात. अनेक सहकारी आले, 

काही राहिले, पांगलेही. 

इतर अनेक सहकार्‍यांच्या मदतीनं 

हे काम चालू आहे.

अंधमित्र स्थापन झाल्याला आता एक तप उलटलं आहे. काम सुरू केलं तेव्हा फार काही भव्य दिव्य करावं अशी महत्त्वाकांक्षा नव्हती. पण अंधांसाठी अभ्यासक्रम कॅसेटवर टेप करण्याची, त्यावेळी अगदीच नवी असलेली कल्पना राबवायचं ठरवलं होतं. ब्रेल लिपीमधील पुस्तकं आपल्या पुस्तकांसारखी टिकणारी नसतात. उठावावर बोट फिरवून वाचताना ते थोडे दबतात आणि पुढे पुढे लिहिलेलं अगदी अस्पष्ट, कळेनासं होऊन जातं. हाताने ब्रेलमधे लिहायला वेळ बराच लागतो आणि लिहिलेल्या साहित्याचं आयुष्य मर्यादित असतं.

यावर उपाय म्हणून कॅसेट्सवर पाठ्यपुस्तकं आणण्याच्या या कल्पनेला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला. कॅसेटच्या उपक्रमाची माहिती देणार्‍या दै.सकाळमधील एका लेखाने हजारो कॅसेटस् आणि हजारो रूपये जमा झाले. साहजिकच अंधमित्र संस्था रजिस्टर करण्याची जबाबदारी आम्हा ‘अंधांच्या मित्रांवर’ आली.

अमाप उत्साहाने रात्र रात्र जागून पहिली ते दहावीची पाठ्यपुस्तकं कॅसेटवर ध्वनिमुद्रित केली गेली. ती महाराष्ट्रातील अनेक अंध शाळांना वितरीतही केली गेली. इथे एक प्रोजेक्ट संपला. तोपर्यंत डोळस लोकांकडून ललित साहित्य बे‘लमध्ये तयार करून घेऊन ते अंधांपर्यंत पोहोचवावं असा विचार सुरू झाला होता. त्यातली मु‘य अडचण बे‘ल पाट्यांची होती. ती देखील अंधमित्रच्या कार्यकर्त्यांनी धडपड करून सोडवली. बे‘ल पाट्या डोळस लोकांना 25 रु.त उपलब्ध करून दिल्या गेल्या. बे‘लचे वर्ग घेतले. अनेकांनी बे‘ल शिकून काही पुस्तकंही तयार झाली.

ह्या कालावधीपर्यंत आमच्यातील अनेक जण शिक्षण संपवून नोकरीला लागले. सांसारिक बनले. कोणी परदेशी गेले. तर कोणी आपलं कार्यक्षेत्र बदललं, अधिक रुंदावलं. साहजिकच अंधमित्रचं काम मंदावलं. आमच्यावर परिणाम करणारी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंधशाळांचा प्रतिसाद अगदी निराश करणारा होता. ‘आपला जिल्हा’ हे इयत्ता तिसरीचं भूगोलाचं पुस्तक ब्रेलमध्ये उपलब्ध नव्हतं कारण प्रत्येक जिल्ह्याचं वेगळं पुस्तक कोण छापणार! आमच्यातील एकीने ते ब्रेलमध्ये लिहून अंधशाळेत दिलं. एका प्रदर्शनासाठी आणल्यावर ते परत द्यायचं राहून गेलं. पण 3-4 महिने त्या पुस्तकाविषयी विचारलंही गेलं नाही. तेव्हा लक्षात आलं की ते वापरात नसणार! 

मग आम्ही कॅसेट तरी वापरतात का नाही ते पहायचं ठरवलं. काही शाळा चांगल्या प्रकारे वापरत होत्या. पण काही शाळांकडे त्या धूळ खात पडल्या होत्या. कारण कॅसेट मुलांना ऐकविण्यासाठी शिक्षकांना अधिक वेळ व कष्ट करावे लागत होते. शिवाय कॅसेट वापरल्याने ‘रीडर’ साठी सरकारकडून मिळणारा भत्ता बंद होईल अशी काहीना शंका आली. हे सर्व पाहून आम्हीही निराश झालो. तरी देखील वरील गोष्टींना अंधमुलांना जबाबदार धरता येणार नाही. त्याच्यासाठी आपण काम करत रहायला पाहिजे. कोणतंही काम करताना असे निराशेचे क्षण येणारच, त्यातूनच आपल्याला वाटचाल करायची आहे अशी मनाची समजून घालून काम पुढे चालू ठेवलं.

त्यानंतर अंधांसाठी संगीत स्पर्धा, त्यांनी बनविलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक‘ी असे उपक्रम राबवले. त्यांना शाळांनी आणि समाजाने प्रतिसादही चांगला दिला.

अंधांसाठी एक वाचनालय असावं अशी एक कल्पना डोक्यात होती. पण ती काही प्रत्यक्षात उतरली नाही. आतापर्यंत आमच्याकडे उपलब्ध असलेल्या पुस्तकांत बालवाङमय जास्त होतं. पण ही शाळेतील मुलं वाचनालयात येणार कशी? त्यांची नेण्या आणण्याची जबाबदारी कोण घेणार? बरं मोठ्यांसाठी सुरू करावं म्हटलं तर वाचायला यायला वेळ कोणाला? पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडताना दिवस कसा जातो ते कळत नाही.

इतक्या वर्षांच्या अनुभवातून असं लक्षात आलं की शाळेतील मुलांपेक्षा 10/12 वी नंतरच्या मुलामुलींचे प्रश्न फार गंभीर आहेत. त्यांना उपजीविकेचं साधन उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या विषयी अनेक अंध मुलांशी बोलल्यावर असं लक्षात आलं की ही मुलं लहानपणापासून निवासी अंधशाळांमधून राहिली आहेत. शहरांत वाढली आहेत. आपल्या घरांपासून तुटली आहेत. अंधशाळेतल्या स्वतंत्र, प्रशस्त, सोयीस्कर आणि शहरी राहणीमानाला सरावली आहेत. खेड्यापाड्यांत, आपापल्या घर परिवारांत राहून काही व्यवसाय (उदा. शेती, दुग्ध व्यवसाय, गिरणी चालवणं) करण्यास ती तयार नाहीत. आपापल्या गावी जाऊन करता येणार्‍या कोणत्याही व्यवसायाला लागणारं भांडवल उपलब्ध करून देण्याची तयारी अंधमित्रने दाखविली आहे पण त्या गोष्टीसाठी कोणीही अंधव्यक्ती पुढे आली नाही. सर्वांची उद्दिष्टे अगदी मर्यादित आहेत. एकतर टीचर्स ट्रेनिंग करून कोणत्या तरी अंधशाळेत नोकरी मिळविणं, टेलिफोन बूथ टाकणं किंवा सरकारी नोकरीमध्ये असणार्‍या राखीव जागांसाठी धडपडणं. पण सरकारी अंधशाळांमध्ये महिनोन् महिने पगार मिळत नाहीत. घरोघरी टेलिफोन आल्यामुळे बूथची गरज कमी झाली आहे. सरकारी नोकर्‍यांमध्ये असे किती जण सामावले जाणार ह्याबद्दल फारसा विचार अजून होताना दिसत नाही.

लहानपणीच घर सोडून अंधशाळेच्या सुरक्षित पण मर्यादित जगामधे वावरल्यामुळे कष्ट करण्याची, वेगळं काही करून पाहण्याची, स्वत:च्या पायावर उभं रहाण्याची आच कमी होत असेल का? बाकीच्यांनी काही गोष्टी आपल्यासाठी करूनच द्यायच्या असतात, त्यासाठी आपण धडपडायचं नसतं अशी कल्पना मनात कुठतरी रूतून बसल्याचंही अनेकदा जाणवतं. काही कष्टाळू मुलं खूप शिकतात, चांगले गुण मिळवतात. चांगलं कामही शोधतात. पण बहुसं‘य सामान्यांची पद्धत  उत्साहाने काही करण्याची दिसत नाही.

त्यातही धडपडणारे, काहीतरी वेगळं करणार्‍या अंध व्यक्तीही आहेत. कोणी संगीताचे क्लास चालवतात कोणी कॉम्यूटर शिकतात. पण हे प्रमाण अंधाच्या तुलनेत एक टक्कासुद्धा नाही. शाळांमधून ह्या मुलांना जे व्यवसाय प्रशिक्षण दिलं जातं त्यात प्रामु‘याने असणार्‍या मेणबत्त्या, खडू, पायपुसणी बनविणं, केनच्या खुर्च्या विणणं अशा गोष्टीत त्यांच्या डोक्यांचा आणि मनातल्या कल्पनांचा वापर फारसा करता येत नाही. त्यासाठी त्यांना दुसरं काय काम देता येईल ह्या गोष्टीचा विचार करायला हवा आहे.  कोणतंही मोनोटोनस काम अंध व्यक्ती डोळस व्यक्तीपेक्षा अधिक कार्यक्षमतेने करते. म्हणून ह्यांनी इतरांना कंटाळा आणणारं मोनोटोनस काम करत रहायचं का? बुद्धीच्या वेगवेगळ्या क्षमतांचा उपयोग ज्यांत करता येतो अश्या कामांच्या संधी त्यांना कधी मिळणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ‘अंधमित्र’ला आपल्यासार‘या सुजाण पालकांचं मार्गदर्शन अन् अर्थातच सहभाग हवा आहे.