आजीआजोबा – आई बाबा – नातवंडंं
पूर्वीची मोठमोठी घरं आणि त्यात राहणारी भरपूर माणसं हे कुटुंबाचं सार्वत्रिक चित्र मागे पडल्याला बराच अवधी उलटून गेलाय. घरांचा आकार आक्रसत गेला तशी त्यात राहणार्या माणसांची संख्याही रोडावत गेली. जागतिकीकरणाच्या रेट्यात हा बदल अपरिहार्य म्हणावा असाच. एकत्र कुटुंबाची व्याख्याही बदलत बदलत आजीआजोबा, आईवडील आणि त्यांची मुलं अशी झाली. आणि मग एवढी वर्षं कुणाच्या खिजगणतीतही नसलेलं मुलांचं पालकत्व हा विषय ऐरणीवर आला. पूर्वी घरातल्या मुलांचं पालकत्व हे संपूर्ण घरादारानंच स्वीकारलेलं असायचं. त्यामुळे त्यांना ‘मोठं’ करणं हा काही फार चर्चेचा विषय असत नसे. जे वाचक आज आपल्या पन्नाशीत, साठीत असतील त्यांना हे नक्की पटेल; कित्येकांनी स्वतःदेखील आजीआजोबांचं पालकपण अनुभवलं असेल. त्यांच्याबरोबर शिक्षणाच्या ठिकाणी राहणं, शिक्षणासाठी म्हणून आजोळी राहणं अशा गोष्टी सर्रास बघायला मिळायच्या. आपण काही विशेष करतोय असं ना आजीआजोबांना वाटायचं ना त्यांच्या पालन करण्याच्या पद्धतींबद्दल आईवडील कुरबुरायचे. म्हणजे त्यांना त्यातलं सगळंच मान्य असायचं असं नसलं तरी तसं ठामपणे सांगायची पद्धतही नव्हती. कारण आजीआजोबा मुलांना प्रेमानं खाऊपिऊ घालायचे आणि पालकत्वाच्या संकल्पनेत यापेक्षा अधिक काही येत नव्हतं.
नातवंडं हे तसं पाहता आजीआजोबांचं आनंदाचं निधान. आपल्याच अपत्याचं बाळरूप नव्यानं अनुभवण्याची संधी. सगळा आपखुशीचाच मामला! त्यामुळे मुलांचं पालकत्व ही जरी आईवडिलांची प्राथमिक जबाबदारी मानली गेली तरी आजीआजोबाही आपल्या परीनं पालकत्वाचा वाटा उचलत असतात. त्यात अनुभवातून आलेलं शहाणपण असतं; जे आईवडील म्हणून भूमिका निभावताना जरा कमीच असतं. आणि सगळ्याचा केंद्रबिंदू असलेली मुलं तर काय; प्रेमाची भुकेली असतातच. जिथून म्हणून ते वाट्याला येईल तिथून पदरात पाडून घेत असतात. ‘आनंद देण्याच्या बदल्यात आनंद मिळवणे’ इतका तो साधा सोपा मामला असतो.
मात्र या चित्राचं सरसकटीकरण होऊ शकतं का? या प्रश्नाचं ठामपणे ‘हो’ असं उत्तर देताना बिचकायला होतंय खरं. आजूबाजूला नजर टाकली तर विविध पैलू पुढे येतात.
आज जी सामाजिक स्थित्यंतरं आपण बघतोय त्यातलं एक म्हणजे घरातल्या मुलांच्या पालकत्वात आजीआजोबांचं बदलत गेलेलं स्थान.
स्त्रिया शिक्षण घेऊ लागल्याला आता काळ उलटून गेलाय; पण आता त्या निरनिराळी क्षेत्रं पादाक्रांत करताना दिसू लागल्या आहेत. स्वत्वाचं भान येऊन आपला अवकाश शोधायला म्हणून बाहेर पडू लागल्या आहेत. केवळ आर्थिक गरज आहे म्हणून नव्हे तर स्वतःच्या अस्तित्वाचं बोलावणं म्हणूनही त्यांचा बाहेरच्या जगातला वावर वाढू लागलाय. समाजाच्या प्रागतिक विचारांसाठी ते आवश्यकही आहे. नाहीतर समाज निम्म्या लोकसंख्येच्या वैचारिक योगदानापासून वंचितच राहील. अशावेळी मुलांसाठी घरात लागतात ती प्रेमाची माणसं. अशी माणसं जी त्या आईच्या अनुपस्थितीत मुलांना भावनिकदृष्ट्या एकटं पडू देणार नाहीत. असं कोण तर साहजिकच घरातले आजीआजोबा. यात एक कडी निसटतेय आणि ती आहे बाबाची. आपल्याकडे मुलांचं पालकत्व निभावण्यात बाबाची म्हणून काही भूमिका असते, असली पाहिजे; असा काही आग्रह धरला गेलेला नाही. हल्ली हे चित्र थोड्या प्रमाणात जरूर बदलताना दिसतंय आणि ते निश्चितच स्वागतार्ह आहे; पण एकंदर हे प्रमाण अंमळ कमीच आहे. मग या सगळ्या चित्रात आजीआजोबांना नातवंडांची जबाबदारी घेणं शक्य आहे आणि त्यांनी ती घेतली आहे; आईबाबांची पिढी त्याची जाणीव ठेवून आपल्या वागण्यातून ती व्यक्त करते आहे असं घडतं तेव्हा ते घर सुखानं वाटचाल करताना दिसतं. अशा घरातील नातवंडंही खुशाल असतात.
मात्र नेहमी हे असं घडत नाही हीच खरी मेख आहे. मध्यंतरी एक वाक्य माझ्या कानी आलं, ‘आज आजीआजोबांचं स्थान हे पाळणाघरासारखं झालं आहे’. ऐकून मनात चरकलंच. पण विचार करावं असंच आहे ते. पाळणाघराएवढ्या अलिप्ततेनं आजीआजोबांनी नातवंडांच करावं, आम्ही सांगू ती पद्धत पाळावी. सगळ्या कामांना माणसं आहेत; फक्त लक्षच तर द्यायचंय असाही युक्तिवाद केला जातो. मुलं आमची आहेत तेव्हा निर्णयप्रकियेत लुडबूड नसावी अशीही अपेक्षा असते. अशावेळेस जबाबदारी घेण्यास नकार द्यावा, तर नात्यात ताणतणाव, दुरावा येणार. मग सुरू होते घुसमट. कधीकधी वरच्या दोन पिढ्यांमध्ये काही कारणाने अंतराय निर्माण झालेला असतो. कारणं काही का असेनात; दरवेळी त्याची झळ पोचते ती लहानग्यांनाच. यात पुन्हा काही मुद्दे दुर्लक्षित राहण्याची शक्यता असते. आम्ही सगळं आयुष्य कष्टात, काटकसरीत, इतरांचं करण्यात; यापैकी काहीही प्रकारे घालवलं तर आता उत्तरायुष्यात तरी ते आमच्या मनाप्रमाणे घालवण्याची मुभा आम्हाला नसावी का? किंवा आता आमची शारीरिक क्षमता, उत्साह, उमेद पूर्वीसारखी राहिलेली नाही. मुलांच्या ऊर्जेच्या धबधब्यापुढे आमचा सगळावेळ निभाव लागत नाही. तेव्हा पूर्णवेळ त्यांची जबाबदारी घेणं आम्हाला शक्य नाही. काही वेळेला वयानुसार येणार्या व्याधीही असा उत्साह दाखवण्यास अटकाव करत असतात. यातला कुठलाच मुद्दा गैरलागू असत नाही हेही तितंकच खरं.
तरीही ‘पाळणाघर’ ही संस्था शेवटचा पर्याय म्हणूनच आपल्याकडे बघितली जाते. शक्यतोवर मूल आपल्या प्रेमाच्या माणसांत राहील असंच बघितलं जातं.
काही ठिकाणी आजीआजोबा नातवंडांची जबाबदारी घेताना दिसतात; पण त्याचं त्या बाळाच्या आईवर एक दडपण राहतं. आई गरजू असते; तिचं बाळ आजी सांभाळत असते (यात पुन्हा एक गंमत आहेच. सहसा कष्टानं आजी करणार असते, आजोबा फक्त फिरायला नेणं किंवा काहीतरी बारीकसारीक गोष्टी करत असतात.) आईला तक्रार करायला जागाच उरत नाही. घरात टी.व्ही. वरच्या मालिकांचा अखंड रतीब घातला जात असतो. त्यातल्या पात्रांच्या तालावर आजी नातवाला भरवत असते आणि तिकडे आईची तगमग होत असते. धरवतही नाही आणि सोडूही शकत नाही अशी ही परिस्थिती.
या सगळ्यावेळी ते करणं न आजीआजोबांना सुखावह, न आईवडिलांना आणि सगळ्यात वाईट परिस्थिती म्हणाल तर नातवंडांची होऊन बसते.
अजून एक मुद्दा आहे तो वाढलेल्या आयुर्मर्यादेचा. म्हणायला आपल्या नातवंडांचे आजीआजोबा असलेली काही माणसं अजूनही आपल्या आईवडिलांची मुलं असतात. म्हणजे आपले दुखरे गुडघे बाजूला ठेवून नातवंडांच्या मागे धावू की आईवडिलांच्या हाकेला धावू अशी परिस्थिती असते.
आज बघू जाता साधनांची कुठेही कमतरता नाहीये, दिमतीला गाड्या आहेत, मनोरंजनाची साधनं हाताच्या बोटाशी आहेत. वैद्यकशास्त्रातल्या प्रगतीमुळे आरोग्य चांगलं आहे, आयुर्मान वाढलंय पण ‘आहे मनोहर तरी ……’ अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसते आहे. समस्या वाढतानाच दिसतेय. यावर उपाय काय म्हणाल तर एकचएक असं काहीही उत्तरं देणं अवघडच. वर्षानुवर्षं प्रश्न आहे तसाच आहे; अनुत्तरित! काहींना आपल्यापुरतं उत्तर शोधणं जमलंय असं दिसतंय तर काही झगडताहेत त्यासाठी. तिढा तर आहेच पण हा पीळ सोडवावा कसा; कुणास ठाऊक. प्रत्येकजण आपापल्या स्थानावरून समस्येचं विश्लेषण करतोय. सगळ्यांची वेगवेगळी अवकाशं एकमेकांवर आदळताहेत.
आणि सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेलं मूल; आई–वडिलांचं लाडकं आणि आजी–आजोबांनाही हवंहवंसं. या सगळ्या अस्वस्थतेची झळ जर त्यालाच पोचणार असेल तर आपापल्या आग्रही भूमिका जरा बाजूला ठेवत एकमेकांशी मनमोकळा संवाद साधून या परिस्थितीतून बाहेर पडता येईल का असा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे.
–अनघा जलतारे
अनघा पालकनीतीच्या कार्यकारी संपादक आहेत.