ज्या मुलाना वयाने आणि इयत्तेने पुढे गेली तरी नीट वाचता लिहिता येत नाही त्यांच्या मनांना आयुष्यभराकरता न्यूनगंड व्यापून टाकतो.
कुठलीही गोष्ट करताना, नव्याने शिकताना ही स्वतःबद्दलची कमी पणाची भावना अडथळा बनून राहते…
घरी, शाळेत, समाजात सन्मान मिळत नाही म्हणून अनेकदा ही मुले गैर मार्गाकडे वळलेली खेळघरात काम करताना अनुभवला येते.
या वर्षी मे महिन्यात आम्ही अशा मुलांबरोबर १५ दिवसांचे एक वर्कशॉप घेतले.
या विषयावर, म्हणजे उपचारात्मक पद्धतीवर सुजाता लोहोकरे यांनी आमचे एक वर्कशॉप घेतले.
Quest ने तयार केलेली सक्षम ची workbooks वापरायची ठरवली.
या कार्यशाळेत खेळघराच्या शिक्षकांबरोबरच ७-८ स्वयंसेवी कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते.
एका शिक्षक कार्यकर्त्याकडे दोन मुले असे रोज २ तास काम झाले.
एरवी अभ्यासाचा कंटाळा करणारी मुले या वर्कशॉप मध्ये मात्र १.५ -२ तास रमून जाऊन अभ्यास करत होती.
१५ दिवसांच्या शेवटी मुले छान पुढे आली आहेत. मुळाक्षरे सुद्धा नीट ओळखू शकत नसलेली मुले… शब्द आणि छोटी वाक्ये वाचू लिहू लागली. मुलांमधला हा बदल आम्हाला देखील अतिशय आनंददायी आहे.
३० मे ला मुलांचा कौतुक समारंभ झाला. यात प्रत्येक मुलाला आम्ही एक सर्टिफिकेट दिले. कौतुक पत्र. मुलाना आवडेल, प्रोत्साहन मिळेल असे त्याचे design केले होते.
ज्या मुलांना कधीच बक्षीस सोडा, कौतुक देखील मिळत नाही त्यांच्यासाठी हे सर्टिफिकेट फार महत्वाचे आहे. ते त्यांच्या कायम लक्षात राहील.
पुढील काळात देखील या मुलांचे बोट सोडून चालणार नाही. या वर्षी या कामासाठी आम्हाला स्वयंसेवी कार्यकर्त्यांची फार मदत होणार आहे.
…. घेतला वसा टाकणार नाही, अशी प्रेरणा आम्हालाही या कार्यक्रमातून मिळाली…
शुभदा जोशी,पालकनीती परिवार विश्वस्त,खेळघर कार्यकर्ती