मुले नुकतीच पूर्ण वेळाच्या शाळेत जाऊ लागली आहेत. अजून त्यांची शिकायची पद्धत बाळपणीचीच आहे. ती खेळातून, दंगा करण्यातून शिकतात. अजून एका जागी बसून ऐकायला, शिकायला त्यांना अवघड जाते. शाळेत ते करावेच लागते. खेळघरात मात्र चालतंय…

ती वर्गात आली की मुलांना नुसत्या उड्या मारायच्या असतात. जमीर तर आला की रोज कोलांटी उड्या मारायलाच सुरुवात करतो.

त्याला मी म्हटले की, “आपण कॉर्नर मधले काम झाले की उड्या मारूयात. आज आपल्याला उड्या मारायचाच खेळ खेळायचा आहे.

थोडा वेळ मुलं कॉर्नर्स मध्ये रमली.

नंतर मी डफली वाजवायला सुरुवात केली. मदारी सारखा खेळ घेतला. “जमुरे अभी जमीर उडी लगायेगा”, असं म्हटलं. सगळ्या मुलांना खूप मज्जा वाटली. “जमीर कितना उडी लगाके दिखायेगा?” लगेच मुलांनी सांगितले 10.

त्यानंतर मुलेच आकडा ठरवत होती आणि तेवढ्या उड्या मारत होती.

माझ्या भाषेत एक ते दहा आकड्यांचा भरपूर सराव झाला आणि मुलांना भरपूर दंगा करायला मिळाला. हा खेळ खूपच मजेशीर झाला.

त्याला जोडून मी ‘हुप्पा हुय्या क्रिकेट कल्ला’ ही गोष्ट वाचायला घेतली. त्यात माकडांची चित्र आणि संवाद होते.

“आली माकडं आली आणि बॉल घेऊन गेली”, असं म्हणलं की मुलं सगळी माकडं जशी ॲक्शन करतात तशीच ॲक्शन करत होती. मुलं परत जागेवर येऊन बसावीत म्हणून मी म्हणाले, “अभि सब बंदर जगह पे आकर बैठेंगेl” की सगळेजण परत जागेवर येऊन बसत होते. गोष्ट ऐकायचे आणि परत माकडासारखे उड्या मारून जात माकडाची अक्टिंग कयायचे. गोष्ट खूप छान ऐकली, त्यांना खूपच मज्जा आली.

शेवटी सगळे बंदर घरी जायला निघाले. एकटा किरण राहिला. तो खिडकीत चढला आणि म्हणाला,” अरे एक बंदर रहे गयाl तो अभी ये बंदर भी घर जायेगा.”

खूपच मजेशीर झाला कालचा वर्ग! मला खूप मजा आली आणि मुलांनाही खूप मजा आली काही वेगळाच आनंद होता मुलांच्या चेहेऱ्यावर! 😃

सपना लंगडे