कापसाची बी ते वस्त्र हा प्रवास
खेळघरात रुबी आणि श्रेयस यांनी कापसाची बी ते वस्त्र हा प्रवास ,या विषयावर सर्व बॅचेस मधील मुलांबरोबर सत्र घेतली. खूप सुंदर झाली ती. त्याबद्दल रुबी ने लीहले आहे – मुलांचं वर्गाबाहेरचं आयुष्य फारच धमाल असतं. त्यांनी वर्गात बसणं अपेक्षित असेल तर त्याहून जास्त धमाल वर्गात यायला हवी. तसं करण्याच्या प्रयत्नात आपण सगळे असतोच कायम. तसाच हा एक प्रयत्न होता. मला मजा आली. बोलवलंत त्याबद्दल तुम्हाला खूप खूप थॅंक्यू. ४ दिवस येऊन सगळ्याच मुलांना कापूस ते कापड प्रक्रीया दाखवता आली. प्रत्येक वेळेस वेगवेगळी मजा आली. पहिल्या दिवशी अनुराधा ताईंचाच वर्ग! सांगितल्याप्रमाणे लॅपटॅाप, टिव्ही, कागद, पेन्सिली, फळा, सगळी तयारी जय्यत होती त्यांची. ह्या वर्गातली काही मुलं माधवकाकांकडे जाऊन आली होती. त्यांनी पेटी चरखा पाहिला होता. बी ते कापड पूर्ण प्रक्रिया नीट मांडता आली. ३ मुली शेवटी सोडायला आल्या त्या मस्त प्रश्न विचारत होत्या! २-३-५-६वीच्या वेळेस खूप ताया आणि काकू आल्या होत्या. माझा एक मित्रही आला होता- श्रेयश. हातमाग आणि पेटीचरख्याचा भाग त्यानं सांगितला. काकूंनी शेवटी छान समारोप केला. मुलं खूप रस घेत होती. नंतरही गल्लीत गप्पा करत होती. ९-१०वीच्या वेळेस सर्व प्रकारच्या गप्पा मारता आल्या- आपण वापरतो त्या गोष्टी वेळ पडल्यास आपण तयार करू शकतो ही एक पॅावर आहे पासून ते गांधींच्या चरखा डिझाइन स्पर्धेपर्यंत. चौथ्या दिवशी श्रेयशने वर्ग घेतला. मी मदत केली. वर्ग सुरू व्हायच्या आधी युवा गटाशी छान चर्चा झाली. इंग्रजीत! एकाने नेमके प्रश्न विचारले. इथेसुद्धा गांधींच्या स्पर्धेविषयी थोडं बोलता आलं. शेवटी एक-दोन मुली खूपदा ‘चरखा शिकवायला उद्या या’ म्हणत होत्या! मला येत असलेलं काहीतरी मी तुम्हाला सांगितलं, आता तुमची पाळी, असं मी मुलांना सांगून ठेवलंय. त्यामुळे मला त्यांची भाषा आणि चित्रकला (अनेकांनी सुंदर चित्र काढली पूर्ण प्रक्रीयेची) हे दोन विषय ते शिकवतील असं काही मुलांनी ठरवलंय. त्यासाठी मला परत यावंच लागेल! इतरही गमती करायला पुन्हा यायला आवडेलच मला, पण आता ही कापूस ते कापड प्रक्रीयेची ओळख सर्वांना झाल्याने, त्यात थोडा अजून रस कोणाला आहे का, हे मुलांना विचारण्याची सोय निर्माण झाली आहे. तसं विचारून, रस असलेल्या मुलांना एकदा बोलवून, त्यांच्याशी ह्या विषयावर नुसत्या गप्पा मारायला आवडेल मला. कारण बऱ्याच मुलांना बरंच विचारायचं होतं असं वाटलं. गप्पांमधून विषय पुढे गेला तर जाईल! रुबी