विक्रांत पाटील
एकटा जीव सदाशीव! मला वाटेल तसं, मला हवं तेव्हा आणि मला जे जमेल ते… असं सगळं. सर्व निर्णय माझ्या मर्जीनं, त्यात कोणी ढवळाढवळ करणारं नाही. जंगलात एकटं राहत असाल तर हे ठीक. अन्यत्र आपण एकटं असलो, तरी अशा ना तशा प्रकारे, कुठे ना कुठे समूहाचा भाग असतोच. मग समूहाचे म्हणून जे निर्णय असतात ते कसे होतात? त्यासाठी योग्य मार्ग काय असेल?
प्रत्येकाचं मत विचारात घेऊन निर्णय घेणं म्हणजे लोकशाही. मात्र प्रत्येकाचं मत घेऊन निर्णय घेणं दर वेळी शक्य होत नाही. मग निवडक प्रतिनिधी आपापल्या गटाच्या वतीनं निर्णय घेतात. प्रतिनिधींना निर्णयाचे अधिकार देऊन त्यांनी सर्वांच्या वतीनं निर्णय घेणं ही झाली प्रजासत्ताक पद्धती. लोकशाहीत प्रत्येक निर्णयात सर्वांचा सहभाग असल्यानं नियमांची तशी काही गरज नसते. लोकशाहीत निर्णय बहुमतानं होतात; पण म्हणून घेतलेले निर्णय बरोबर असतीलच असं नाही. प्रजासत्ताक पद्धतीत लोकप्रतिनिधी सर्वांच्या वतीनं निर्णय घेत असल्यानं त्यानं काही मार्गदर्शक तत्त्वं पाळायची असतात. ती आधीच ठरवलेली असतात. या तत्त्वांना ‘संविधान’ म्हणतात. संविधानात मूलभूत अधिकार आणि जबाबदाऱ्या नमूद केलेल्या असतात.
लोकशाही म्हणजे केवळ मतदान करणं किंवा प्रजासत्ताक म्हणजे केवळ राजपथावरील संचलन नव्हे. हे एक जीवनमूल्य आहे. आपल्याला मुलांना ‘सुजाण नागरिक’ बनण्यास प्रोत्साहन द्यायचं आहे असं आपण म्हणतो, तेव्हा नकळत आपण आपल्या घरातली ‘पालकत्वाची शैली’ आणि ‘राजकीय तत्त्वज्ञान’ यांची सांगड घालत असतो. पालकत्वात लोकशाही आणि प्रजासत्ताक मूल्यं रुजलेली असतील, तर ती मुलांमध्ये येतील आणि पुढे प्रौढ झाल्यावर मुलं सुजाण नागरिक होतील. रोजच्या जीवनात पालकांकडून मिळणाऱ्या वागणुकीतूनच मुलांपर्यंत स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्यं पोचत असतात. सर्वांचा सहभाग हा लोकशाहीचा गाभा आहे. ज्या घरात लहान मुलांनाही निर्णय-प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जातं, त्यांना त्यांचं मत मांडण्याची मुभा असते, लहान मोठे सर्वांना त्यांचे हक्क न मागता मिळतील असं बघितलं जातं. अशी कुटुंबं घरातच लोकशाहीचा पाया भक्कम करतात. अशा घरात वाढलेली मुलं मोठी झाल्यावर आपल्या राष्ट्रात जे काही चालू आहे त्यात सहभाग घेतात. गरज असेल तिथे बहुमताच्या विरोधात जाऊन चुकीच्या निर्णयांवर टीका करतात.
माझे बाबा सैन्यात होते. ते बाहेरगावी असत. त्यामुळे घर आईनंच सांभाळलं. भावंडांमध्ये मी मोठा आणि मला धाकट्या दोन बहिणी. पैसे जेमतेम असायचे. बाबांकडून ड्राफ्ट आला, की तो बॅंकेत जमा करायला आई मला किंवा बहिणीला सोबत घेऊन जायची. शनिवारी आमच्या गावचा आठवडे-बाजार असायचा. भाजीपाला, धान्य, घरगुती जिन्नस अशा गोष्टींबरोबरच काळा ऊस, चुरमुरे, फुटाणे, रेवड्या असे खाऊचे पदार्थसुद्धा बाजारात असायचे. तेव्हा यातलं काहीतरी एक आई आमच्यासाठी खाऊ म्हणून आणायची. पुढे आईला तात्पुरती नोकरी मिळाली, त्यामुळे बाजाराच्या दिवशी ती घरी नसायची. त्यामुळे नेहमी घेतो त्याप्रमाणे आठवड्याचा भाजीपाला आणि गरजेचे जिन्नस घेण्याचं स्वातंत्र्य आणि जबाबदारी माझ्यावर आली. आई मला दहा ते पंधरा रुपये द्यायची. साधारण एक रुपयाचा खाऊ घेण्याची मुभापण दिलेली होती. जबाबदारी आणि स्वातंत्र्य असं एकत्र येतं! विश्वास टाकला की माणूस जबाबदारी नीट पार पाडतो हे पालकांनी लक्षात घ्यावं. मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर न करणं आणि पहिल्याच प्रयत्नात जबाबदारी नीट हाताळता येणं हे लहान मुलांना जमेलच असं नाही; पण तशी संधी दिली, तर झालेल्या चुकांतून शिकता येतं हे पालकांना समजणं महत्त्वाचं.
आमची मुलगी बोलायला शिकली तेव्हापासून मी तिला तिचं मत विचारायचो. ‘तुझं यावर मत काय?’ असं तिला विचारलं, की ‘माझं मत आहे!’ अशी ती सुरुवात करायची. यातला गमतीचा भाग सोडता, कुटुंबाशी संबंधित निर्णयात मुलांचं मत नक्की विचारात घ्यायला हवं. त्यांच्या वयानुरूप झेपतील एवढे निर्णय त्यांचे त्यांना घेऊ द्यावेत. ‘आज शाळेत जायचं नाही’ हा त्यांनी घेतलेला निर्णय कधीकधी सारासार विचार करून मान्य करायला लागतो, तर कधी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेऊन योग्य कारणांसकट अमान्यपण करायला लागतं. महत्त्वाचं हे, की मुलांना त्यांचं मत मोकळेपणानं मांडायला घरात सहजसोप्पं वातावरण हवं. ती त्यांची मतदानाची पहिली पायरी आहे. ज्यांना असं मत मांडायचं स्वातंत्र्य मिळत नाही, त्यांना असं वाटायला लागतं, की माझ्या एका मतानं फार काय बदलणार आहे? नाही तरी माझ्या मताला काय किंमत आहे?
कुटुंबाचं संविधान समानता आणि दुर्बल घटकांचं रक्षण या दोघांचा समतोल राखणारं असलं, तर कुटुंबातल्या सर्वांना न्याय्य व समान वाटेल अशी वागणूक मिळते. ज्या मुलांना घरात न्याय्य वागणूक मिळते ती समाजात न्यायानं वागण्याची शक्यता जास्त.
काही घरांत भावंडांपैकी एखाद्याच्या हक्कांची पायमल्ली होते. भांडण असो का खाऊचं वाटप, ‘तू मोठा आहेस ना!’ या वाक्यानं मोठ्या भावंडाला अन्याय सहन करावा लागतो. असं कधीच करू नये असं मला म्हणायचं नाहीये. जिथे लहान भावंडाच्या म्हणजे दुर्बलाच्या हक्कांचं रक्षण करायचं आहे तिथे पालकांनी मोठ्या भावंडाला त्याची जाणीव करून देऊन लहानग्याला सुरक्षाकवच मिळवून द्यायला पाहिजे. मात्र हे करताना सारासार विचार व्हायला हवा. हा अंदाज चुकला, तर मुलं गैरफायदा घेतात. पालक मोठ्या भावंडाला तडजोड करायला लावतात ही नेहमीची बाब झाली, की धाकटी भावंडं स्वतःच्या चुका मोठ्यावर ढकलून मोकळी होतात. म्हणजे मी स्वतःला दुर्बल ठेवलं की मला सहानुभूती मिळते, माझ्या चुका इतरांवर ढकलता येतात हा संदेश ते लहान मूल बरोब्बर घेतं. झालेला अन्याय मोठं भावंड विसरू शकत नाही. कोणीही दुर्बल व्यक्ती दिसली, की त्याला ‘ही आता काहीतरी गैरफायदा घेणार’ असंच वाटायची शक्यता जास्त!
मध्यमवर्गापासून वरच्या सर्व आर्थिक स्तरांतील कुटुंबांत खाण्यापिण्याची सुबत्ता असते. पण तरीही असं घडतंच ना, की परसबागेतल्या झाडाला एकच पेरू आला आहे. आणि तो खाण्याची घरातल्या सर्वांनाच इच्छा आहे. अशा परिस्थितीत आमच्या घरातलं संविधान असं आहे, की दुर्मीळ किंवा क्वचित मिळणारे खाद्यपदार्थ समान वाटे करून खायचे. कोणाला नको असेल तर त्याला नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य आहे; पण हक्क लहान-मोठे सर्वांना सारखा मिळणार.
‘असहमती’ किंवा ‘विरोध’ म्हणजे दर वेळी भांडण किंवा बंडखोरी नव्हे; तो प्रगल्भ विचारांचा एक भाग आहे. ‘मला वाटतं’ त्यापेक्षा निराळं म्हणजे वाईट नाही. कोणाचे विचार मला कितीही न पटणारे असोत, ते जोपर्यंत फक्त विचार आहेत, तोवर कोणतंही शस्त्र न उपसता किमान ऐकून घेणं एवढं लोकशाहीत प्रत्येकाला जमलंच पाहिजे. भावंडं आणि मित्रमंडळी यांच्यासोबतचे वाद मुलं कशी हाताळतात, तर जसे त्यांचे पालक आपापसातले किंवा मुलांचे ‘विरोधी’ विचार हाताळतात! पूर्वी माझ्यात आणि बायकोत काही मुद्द्यांवर थोडेफार का होईना खटके उडायचे. हळूहळू आम्ही त्यात सुधारणा करत गेलो. आता सर्व प्रकारच्या परस्परविरोधी विचारांवर आमच्यात रीतसर चर्चा होतात. आम्हाला दोघांनाही एकमेकांच्या विचारांमागच्या भूमिका माहीत आहेत. हे सर्व आमची मुलगी बघत असते. मला असं दिसतं, की विविध स्वभावांच्या आणि आवडीनिवडी असलेल्या खूप मित्रमैत्रिणींशी तिचं छान जमतं.
मुलांना शिकवण्यात पालक खूप शक्ती खर्च करतात. मुळात त्यांना मुलांनी जे करायला हवं आहे ती त्यांचीच राहून गेलेली इच्छा असते. माझं प्रामाणिक मत आहे, की जे काय शिकायचं ते पालकांनी स्वतः शिकावं; खरं स्वतः बोलावं; शिस्त स्वतः पाळावी, मैदानी खेळ स्वतः खेळावेत वगैरे. पालकांना बघून मुलं आपोआप शिकतात. समोरच्या माणसात बदल करायची चूक पालक फक्त मुलांच्याच बाबतीत करतात असं नाही. बरीचशी जोडपी माझ्याकडे समुपदेशनासाठी येतात. त्या दोघांचं एकच म्हणणं असतं, ‘मला कळतं! त्याला / तिलाच समजवा!’ त्यांना हे पटवून द्यायला मला खूप प्रयत्न करायला लागतो, की बदल स्वतःमध्येच होऊ शकतात. दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न हाच खरा तुमचा प्रश्न आहे. दोघांच्या विचारांत स्पष्टता आली, की आपापसातले प्रश्न आपोआप सुटतात.
प्रजासत्ताक लोकशाहीत ‘जसा राजा तशी प्रजा’ नसते, तर जशी प्रजा असते तसे राजे निवडून येतात. निवडून आलेले प्रतिनिधी प्रजेच्या इच्छांना मूर्त रूप देतात. हे केलं तरच लोक त्यांना निवडून देतील ना! हल्लीचं देशातलं राजकीय वातावरण अतिशय वाईट झालंय, पर्यावरणाची दैना झालीये, अशी टीका साहजिक आहे. हा सगळा गोंधळ जनतेच्या मनात आहे, कुटुंबात आहे, माझ्या मनात आहे. तो निस्तरायची सुरुवात माझ्यापासूनच करायची आहे. स्वतःच्या विचारांमध्ये स्पष्टता आली, की पुढे कुटुंब, समाज आणि देशात ही स्पष्टता रुजवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. समजलेल्या स्पष्ट विचारांबद्दल बोलायला हवं, समाजात वावरताना काय त्रास होतोय त्याबद्दल बोलायला हवं, लिहायला हवं, मतदानाच्या वेळेस विचारपूर्वक मत द्यायला हवं. जेवढे जास्त लोक हे करतील तेवढा लवकर बदल होईल. प्रजा बोलली तरच प्रतिनिधींना कळेल, की प्रजेला काय हवंय आणि कशाचा त्रास होतोय. मग प्रतिनिधीपण बदलतील अशी आशा करायला काय हरकत आहे! ते कसेही असोत, निवडून यायचं असेल तर त्यांना बदलण्याशिवाय पर्याय नाही!
विक्रांत पाटील

vikrant.patil@gmail.com
संगणकतज्ज्ञ. त्यांचा गणित, पर्यावरणस्नेही जीवनशैली, मानसशास्त्र अशा विविध विषयांचा अभ्यास आहे.
