कुणी घर देता का घर… मराठीला ?

... अमेरिकेत राहणाऱ्या पालकांच्या, मुलांना मराठी भाषा शिकवण्यामागच्या भूमिकेचं अवलोकन

‘‘तिला आस्क कर.’’

‘‘जास्त हॉट लागत असेल, तर शुगर घालायची का स्वीट करायला?’’

‘‘माझी मॉम मँगोचं पिकल सो टेस्टी बनवते, की फिंगर्स लिक करावेसे वाटतात!’’

मी (मनात): ‘‘अय्या, टंगला स्टॅन्डतं का?’’

अशी वाक्यं कानावर पडली, की मला फळ्यावर खडूनं चर्रर्रर्रर् असा आवाज केल्यावर यावा तसा अंगावर काटा येतो! पुरणपोळीवर शेजवान सॉस ओतल्यासारखं किंवा हाक्का नूडल्समध्ये सोलकढी मिसळल्यासारखी वाटते. स्वतःची वेगवेगळी सुंदर चव असलेल्या दोन उत्तम पदार्थांची भेसळ खावी लागल्याचा भास होतो. दोन उत्कृष्ट भाषा वापरताना प्रत्येकीत असलेले साधे साधे अर्थपूर्ण शब्द डावलून त्यांची अशी खिचडी का करावी? मराठीत बोलताना छान अख्खं वाक्य नीट मराठीतच बोलावं. इंग्रजी बोलताना तसा प्रयत्न करावा. नाहीतरी ‘आय डिडन्ट वेन्ट’ आणि ‘ही विल कम इन युवर होम’ वगैरे ‘डिफरंट डिफरंट’ प्रयोग करतच असतात अशी माणसं!

आम्ही राहतो त्या सियॅटलमधली थंडी जास्त बेकार की भाषा हे कळत नाही. आता, आल्या आल्या खूप छान उबदार अशा मैत्रिणी मिळाल्या खऱ्या, त्यामुळे थंडीशी झगडता आलं; पण भाषेचं काय करावं? निरीक्षणांती माझ्या लक्षात आलंय, की मातृभाषेतून बोलताना त्यात इंग्रजीची सरमिसळ करणं हे काही उल्लेखनीय अपवाद वगळता सर्रास चाललेलं असतं.

इंग्रजी भाषेबद्दल मलाही खूप प्रेम आहे, आदर आहे; परंतु ‘इंग्लिश’ बोलण्याबद्दलचं ग्लॅमर, त्यात काहीतरी ‘मॉडर्न’ किंवा ‘फॉरवर्ड’ असल्याची भावना मला समजू शकत नाही. बरं, एकमेकांशी अस्खलित, शुद्ध मराठीत बोलणारे आईबाप मुलांशी मात्र अचानकपणे इंग्रजीत बोलायला लागतात तेव्हा मी माझं ‘हेड स्क्रॅच’ करते! ‘ती ऐकतच नाही’, ‘आम्ही मराठीत बोललो तरी तो इंग्लिशमध्येच उत्तर देतो’ असले बहाणे कायम ऐकायला मिळतात.

माझा त्यांना एकच प्रश्न असतो: आठव्या वर्षीदेखील तुम्ही तिला भरवता का? सहाव्या वर्षापर्यंत तो डायपर घालून हिंडतो का? नाही ना? आग्रह धरून, कधी दटावून तुम्ही ती शिस्त त्यांना लावलीच की नाही? मग आपल्या मातृभाषेत, मराठीत बोलण्याबद्दल असेच प्रयत्न करणं सहज शक्य आहे. आपला आग्रह हवा. प्रचंड धीर लागतो, अर्थात पेशन्स लागतो. निष्ठा असावी लागते. ती दाखवायला हवी.

माझा मुलगा चार वर्षांचा असताना इथल्या शाळेत जाऊ लागला. त्यानंदेखील सुरुवातीला असाच हट्टीपणा केला. आम्ही- मी व (सुदैवानं) माझ्या नवऱ्यानं- मिळून त्याला सांगितलं, की जोपर्यंत तू आमच्याशी मराठीत बोलत नाहीस, तोपर्यंत आम्ही तुला काहीही प्रतिसादच देणार नाही. इंग्रजी ही इथली बाहेरची भाषा आहे. मराठी आपली घरची भाषा आहे, म्हणून.

तो तीन दिवस नेमानं इंग्रजीतच बोलत राहिला व आम्ही त्याच्याशी नेटानं मराठीतच बोलत राहिलो. मग तो नाईलाजानं अधूनमधून मराठीत बोलू लागला व आम्ही कटाक्षानं फक्त तेवढ्यालाच उत्तर देत राहिलो. तुझा हट्ट मोठा की माझा, अशी अटीतटीची वेळ आल्यावर शेवटी त्याला कळून चुकलं, की आपले आईवडील काही बधत नाहीत व तो आपसूक पूर्णपणे मराठीत बोलू लागला. आता आम्ही तिघंही एकमेकांशी बोलताना सवयीनं रुळलेले इंग्रजी शब्द किंवा वाक्य वापरतोच; मात्र त्यांचं प्रमाण 1/3पेक्षा फार पुढे जाता कामा नये, याची खबरदारी घेतो. मला वाटतं, कोणत्याही पालकांना ते सहज शक्य व्हावं. प्रश्न शक्यतेचा नाही, इच्छाशक्तीचा आहे.

आपली संस्कृती आपल्या मुलांपर्यंत पोहोचावी म्हणून इथे सगळे सण-समारंभ, उत्सव भारतापेक्षा जास्त उत्साहानं साजरे केले जातात हे बघून छान वाटतं; परंतु ते तेवढ्यावरच थांबतं. इथे मराठी शाळा सुरू केली; आजपर्यंत चालवली आहे ह्याबद्दल शाळा काढणार्‍यांचं कौतुक आणि प्रचंड आदर वाटतो. मात्र इथले पालक आठवड्यातून एकदा आपल्या बालकाला तेथे पाठवतात व उरलेले साडेसहा दिवस स्वतः इंग्रजीत बोलत असतात.

त्या छोट्याशा मुला-मुलींच्या भूमिकेतून विचार केला तर पालक त्यांना संदेशच देत असतात, की स्वतः वापरण्याइतकी काही ती भाषा आम्हाला महत्त्वाची वाटत नाही; पण केवळ आमची लहर म्हणून तुला आठवड्यातून मिळणारा एक मोकळा रविवार आम्ही त्यासाठी वाया घालवणार!

मग अशानं ती मुलं एखाद-दोन किंवा फार फार तर चार-पाच वर्षं त्या ‘शाळेत’ जातात, क्रेडिट्स म्हणजेच उच्च शिक्षणात उपयोगी पडणारे छोटे-छोटे गुण मिळवतात आणि मराठी भाषेला कायमचे राम राम ठोकतात किंवा ‘गुडबाय’ करतात असं म्हणा ना!

पालकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, की मुलं जोपर्यंत मराठी हा एक विषय म्हणून शिकतील, तोपर्यंत तो कधीही त्यागतील. जेव्हा मराठी हे एक माध्यम होईल, विचार करण्याचं, व्यक्त होण्याचं अथवा एकमेकांशी जोडलं जाण्याचं तेव्हाच त्यांना त्या भाषेबद्दल आपुलकी निर्माण होईल आणि मग हा जिव्हाळा सहजासहजी सुटणार नाही. अनेक भाषातज्ज्ञ गेली अनेक दशकं वारंवार सांगत आले आहेत, की मातृभाषेतून संवाद आणि जगाशी प्राथमिक ओळख होण्याचे खूप फायदे आहेत. त्याचवेळी लहानपणी मुलं जितक्या जास्त भाषा शिकतील, तितकं त्यांच्या मेंदूतल्या न्यूरॉन्सचं जाळं वाढून बुद्धीची क्षमता प्रचंड प्रमाणात वृद्धिंगत होते. त्याचा इतर सर्वच विषय आत्मसात करण्यासाठी उल्लेखनीय लाभ होतो; हो, विज्ञान आणि गणितदेखील! इथले प्रशिक्षित शिक्षकही हाच सल्ला देतात. ते सांगतात, की तुमच्या घरी तुम्ही तुमच्या मातृभाषेतच बोला व शाळेत आम्ही तुमच्या मुलाला इंग्रजी शिकवू. इथल्या पालकांनी हे समजून घेतलं आणि ते तसं वागले, तर त्याचा सगळ्यात चांगला परिणाम हा त्यांच्याच मुलांवर, त्यांच्या शैक्षणिक भविष्यावर होणार आहे. आपल्या मुलांनी अभिमानानं सांगितलं पाहिजे, की मी भारतीय आहे, मराठी आहे. काहीच नाही तर किमान तसं असण्याचा कमीपणा तरी त्यांना वाटता कामा नये एवढी काळजी आपण घ्यायलाच हवी.

अन्यथा, ही मुलं बालपणापासून स्वतःला अमेरिकन समजतात, परंतु मोठेपणी त्यांना दणका मिळतो. They get a rude shock. त्यांच्या लक्षात येतं की, बाकी कोणीही आपल्याला तसं समजत नाही. आपण त्यांच्यासाठी ‘इंडियन’च असतो. कायम ‘बाहेरचेच’ राहणार.

सामाजिक कार्यक्रमांत अथवा सांस्कृतिक संदर्भात त्यांना कधीही ‘अमेरिकन’ ह्या गटात सामावून घेतलं जात नाही. अशानं कमीपणाची भावना येते, संभ्रम निर्माण होतो आणि तोपर्यंत उशीर झालेला असतो. त्यापेक्षा आत्ताच आपण सजगतेनं पावलं उचलली तर बरं!

आणि ह्यासाठी सगळ्यांनी मिळून संघटितपणे एक परिपूर्ण मराठी समाज उभारायला हवा. तरच आपली पुढची पिढी एकमेकांशी मराठीत बोलेल, ती भाषा त्यांच्या तोंडी रुळेल, खेळेल आणि त्यांची आपल्या भाषेशी घट्ट मैत्री होईल!

हे भाषाप्रेम आणि पर्यायानं आपल्या संस्कृतीची इथल्या मुलांना ओळख व्हावी, प्रेम आणि आदर निर्माण व्हावा या हेतूनं मी ‘सवंगडी’ ही संस्था स्थापन केली आहे. बालनाट्य बसवणं, त्यांचा प्रयोग पार पाडणं, उन्हाळी शिबिर आयोजित करणं, 15 ऑगस्टला ध्वजवंदन, विविध सण-उत्सव साजरे करणं असे उपक्रम मी राबवत असते. इथल्या जागरूक मैत्रिणी, त्यांची कुटुंबं या कार्यात जीव लावून मदत करतात.

आपली भाषा किती शास्त्रशुद्ध आहे, इतकी गोड आणि परिपूर्ण आहे; ती माझ्या लेकराला आलीच पाहिजे, असा आग्रह पालकांनी धरायला हवा. त्यासाठी commitment लागणार आहे, बांधिलकी लागणार आहे. थोडे कष्ट करावे लागणार आहेत. परंतु, आपल्या बाळाचा सर्वांगीण विकास व्हावा, ह्यासाठी वेगवेगळ्या क्लासेसना न थकता ने-आण करणारे, आपल्या कष्टाचे पैसे सुमार दर्जाच्या का असेना, अमेरिकन क्लासेसमध्ये भरणारे पालक, एवढा प्रयत्न नक्कीच करू शकतील अशी मला खात्री आहे.

अन्यथा, अत्यंत सुलभ, मनोहर, दर्जेदार आणि निखळ आनंद देणारं मराठी साहित्य तरी त्या निरागस मनांपर्यंत कसं पोहोचणार? ‘मराठी माणसाला अस्मिता नाही’ हे वाक्य लहानपणापासून मी ऐकत, वाचत आलेले आहे. दुर्देवानं अजूनही त्याची प्रचीती वारंवार येत असते.

मात्र, आत्तासारख्या माझ्या मोठ्या मनाच्या मैत्रिणी, चुलत मैत्रिणी व त्यांची कार्यशील कुटुंबं ह्याच गतीनं एकत्र येत राहिली, तर परिस्थिती नक्की पालटेल अशी आशा ठेवून आम्ही मार्गक्रमण करतो आहोत.

शेवटी काय, रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलंच आहे ना:

‘‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे !!!’’

127

यशस्विनी गोरे लिमये |  yashas.winee@gmail.com

लेखिका आर्किटेक्ट आणि इंटीरियर डिझाईनर असून आपल्या कुटुंबासह अमेरिकेतील सियॅटल येथे राहतात. तिथे त्या ‘सवंगडी’ ही विशेषत: मराठी मुलांसाठी संस्था चालवतात.