खेळांची जादुई दुनिया खेळणं मुलांना अतिशय प्रिय! ‘चला खेळूया,’ म्हटले की मुलांचा आनंद गगनात मावत नाही. पालकनीती परिवारच्या खेळघर या उपक्रमात खेळ मध्यवर्ती ठेऊन उपक्रमांची आखणी केली जाते. मोठ्या माणसांच्या दुनियेत मात्र खेळाला महत्व दिले जात नाही. त्यांच्या मते खेळणे म्हणजे वेळ वाया घालवणे, करमणूक किंवा टाईमपास! मुलांसाठी खेळ म्हणजे आनंदाच्या दिशेने घेतलेली एक उडीच असते. खेळताना काही साध्य करण्याच्या ताण नसतो. खेळताना शरीर, मन आणि बुद्धीचा समन्वय साधला जातो. तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता, चपळाई, गटाने काम करण्याची क्षमता, संवाद कौशल्य अशा अनेक क्षमता विकसित होण्याची ताकद खेळांत आहे. खेळ ही अशी एक जागा आहे जिथे मोठी माणसे आणि मुले यांच्यातील दरी मिटते. त्यांच्या नात्यातली प्रेमाची आणि समजुतीची वीण खेळमुळे अधिक पक्की होते.