अरुणा बुरटे
एक असे जग जिथे फक्त प्रेम असेल… कोणीही ‘दुसरे’ नसेल… मन निर्वैर असेल… माणसाचे माणूसपण मोलाचे असेल… आपल्याला गवसलेली मूठभर सूर्यकिरणे वाटून घेताना निखळ आनंद होईल… समता आणि सहकार्यातून अन्याय, भेदभाव आणि शोषण दूर करण्याचा मनामनांत ध्यास असेल… प्रत्येकाला क्षमता जोपासण्याचा अवकाश असेल… असे जग शक्य आहे. ‘सावित्रीची शबरी’ ही उत्कंठापूर्ण गोष्ट वाचकाला असा विश्वास देते. लेखिका संगीता मुळे यांनी ही गोष्ट अतिशय संवेदनशीलतेने आणि कौशल्याने सांगितली आहे. ही गोष्ट सावित्रीबाई फुले, संगीता मुळे आणि शबरी या तिघींची आहे.
लेखिका संगीता मुळे यांच्या गोष्टीमागे कुठल्या धारणा आहेत ते बघूया. अनेक अभावांतून बाहेर पडण्यासाठी उच्च शिक्षणाची संधी देणारे आरक्षण धोरण अत्यंत आवश्यक आणि न्याय्य आहे. शिक्षणासाठी खेड्यातून शहरात आलेल्या एका दलित मुलीची, अत्यंत बिकट परिस्थितीत, स्त्री म्हणून सोसलेल्या आघातांवर मात करून उभे राहण्याची गोष्ट सांगण्याची त्यांना तळमळ आहे. स्त्री-पुरुष समता, स्त्री-शिक्षण, जातिभेद-निर्मूलन यासाठी जोतिबा व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कामाप्रती त्यांना कृतज्ञता व्यक्त करायची आहे.
त्यातून त्यांनी शबरीला तिच्या साहसाची गोष्ट सांगण्यास उद्युक्त केले आहे. शबरीने स्वतःची घुसमट, चढ-उतार, निराशा आणि निश्चय अगदी मनापासून सांगितले आहेत. तिला प्रतिष्ठित इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे; पण ‘आरक्षणामुळे’ हा शिक्का आणि जोडीने येणाऱ्या हेटाळणीला, अवहेलनेला तिला पदोपदी सामोरे जावे लागते. पहिल्या परीक्षेत सर्व विषयांत नापास झाल्याने तिला आत्महत्येचे विचार घेरतात. पण अचानकपणे हाती आलेल्या सावित्रीच्या नोंदवहीतून तिला स्फूर्ती, प्रेरणा मिळत राहते. एका क्षणी ‘मलाही माझा जोतिबा शोधायला हवा’ असे तिला उमगते. अडथळे पार करण्यासाठी ती धीराने अनेक शक्यतांचा मेळ घालते. मन घट्ट करून ‘अभ्यासात मदत हवी आहे’ अशी चिट्ठी महाविद्यालयाच्या सूचना-फलकावर लावते. अनपेक्षितपणे तिला मदतीसाठी भुवन भेटतो. अभ्यासाची गाडी रुळावर येते. त्या मैत्रीतून शबरी विद्यार्थीगटाशी जोडली जाते. स्वतःकडे आणि जगाकडे पाहण्याचे नवे संदर्भ तिला गवसतात. भुवन तिचा घट्ट मित्र बनतो. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ‘मुलींचा शिक्षण दिन’ म्हणून साजरा व्हावा ही मागणी सरकार दरबारी मान्य करून घेण्यापर्यंत ती जिवटपणा दाखवते. आणि एक क्रांती घडते!
सावित्रीबाई फुले यांची गोष्ट लेखिका संगीता आणि शबरी या दोघींना जोडणारा दुवा आहे. सावित्रीबाई फुल्यांची गोष्ट सर्वदूर पोचावी, सर्वांना त्यातून प्रेरणा मिळावी, हा ध्यास दोघींचा आहे. आपण त्यात गुंततो. नकळत त्यांची गोष्ट तुमची-आमची, सर्वांची होते.
आपल्या आजूबाजूला १५ ते २० वर्षे वयाची तरुणाई असली, तर ही गोष्ट आवर्जून वाचायला आपण त्यांना प्रोत्साहित करू. स्त्रियांचा गट असला, तर त्याचे अभिवाचन करण्याचे सुचवू. कोणी निराशेने झाकोळले असेल, तर शबरीची गोष्ट त्यांच्या हाती देऊ. प्रत्येकाला आपल्या क्षमता फुलवण्याचा अवकाश मिळायला हवा असे आपल्याला वाटेल. वंचितांना आरक्षण का आवश्यक आहे, याबद्दल आपण अंतर्मुख होऊन विचार करू. शबरीच्या साहसाला, धैर्याला आणि न्याय-अन्यायाच्या धारणांना आपण दाद देऊ. कारण गोष्ट वाचताना शबरीचे सर्व क्षेम व्हावे ही माणुसकी आपल्यात नक्कीच जागी झालेली असेल.
शबरीच्या गोष्टीचे काही खास पैलू आहेत. ती अनेक अडचणींवर मात करते. त्यामध्ये विद्यार्थी संघटनेची साथ मोठी आहे. आपले अनेक वैयक्तिक प्रश्न सामाजिक पातळीवर संघर्ष करून सोडवावे लागतात. सर्व प्रश्नांची उकल केवळ व्यक्तिगत पातळीवर होऊ शकत नाही, याचे भान या गोष्टीत आहे. सावित्रीबाई फुल्यांचा जन्मदिवस ‘मुलींचा शिक्षण दिन’ म्हणून साजरा व्हावा ही मागणी सरकार दरबारी मान्य करून घेण्यासाठी याचिका दाखल करून आंदोलन केल्याने शबरीला धमक्या आणि हल्ले, दोन्ही झेलावे लागतात. विभागप्रमुख कॉलेजमधून काढून टाकण्याची धमकी देतात. शबरी काही क्षण निराश होते. त्यावेळी विद्यार्थी संघटनेतील मित्रमैत्रिणी तिला ‘तू एकटी नाहीस’ असा धीर देतात. ‘ताण कमी होईपर्यंत थांब, आम्ही आंदोलन चालू ठेवू’ असे सांगतात. समाजाला जागे करण्यासाठी ‘आम्ही सारे शूद्र’ असे जाहीर करतात. ‘माझ्याकडे सावित्रीबाईंची नोंदवही आहे’ असे शबरी संघटनेतील मित्रमैत्रिणींना सांगते. त्यानंतर ‘मुलींचा शिक्षण दिन’ ही मागणी वास्तवात येण्यासाठी व्यापक पाठिंबा तयार होतो. व्यक्तिगत प्रयत्न आणि संघटित कृतीचे पाठबळ याचा मेळ शबरीच्या गोष्टीत घातलेला आहे. शबरी, भुवन आणि विद्यार्थी संघटनेतील इतर सदस्य यांच्यामध्ये असलेले सहज, सुंदर, सहकार्याचे नातेसंबंध, हा गोष्टीचा मोहक पैलू आहे. या छोट्याशा सुघड कादंबरीतून संगीता मुळे यांनी जाणीवजागृतीचा प्रत्ययकारी प्रयोग केला आहे.
‘मी एकटी नाही. दूरचा पल्ला गाठायचा आहे. अनेक शबरी आणि सावित्री अद्यापही संघर्ष करत आहेत’ असे शेवटाला शबरी सांगते. ते खरेच आहे. त्यासाठी भेदभाव, शोषण, स्त्रियांना दुय्यम लेखणारे रीतीरिवाज, अंधश्रद्धा, स्त्री-शिक्षण, आरक्षण इत्यादी समस्यांचे बारकावे समजून घ्यावे लागतील. बदलत्या आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक पार्श्वभूमीवर जातिभेद, धर्मभेद या प्रश्नांचे तपशील नोंदवावे लागतील. जोतिबा आणि सावित्रीबाई यांचा अभ्यास अधिक सजगतेने करावा लागेल. बहुविध समस्यांचे निराकरण करण्याचा निरंतर ध्यास घ्यावा लागेल. सर्वांना इच्छित संधी आणि साधने मिळण्याचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी हे सारे प्रयत्न गावोगावच्या अनेक शबरी, सावित्री आणि विद्यार्थी संघटना नक्की करतील! त्यासाठी त्यांना मनापासून पाठिंबा!
अरुणा बुरटे
aruna.burte@gmail.com
गेली ५ दशके मुंबई, सोलापूर आणि पुणे येथे विविध सामाजिक प्रश्नांवर काम व त्या अनुषंगाने लिखाण करतात.
मूळ इंग्रजी पुस्तक : ‘सावित्रीबाई फुले अँड आय’
(Savitribai Phule and I) – लेखक संगीता मुळे
मराठी अनुवाद : ‘सावित्रीची शबरी’ – अनुवादक सुजाता देशमुख
मनोविकास प्रकाशन २०२४
मूल्य ₹ १३०