जुलै महिन्याचे प्रश्न
कुटुंबाचा पोशिंदा’, ‘मुलांना शिस्त लावणारा’ ही वडिलांची पारंपरिक छबी आज बदलते आहे असं पालकत्वाच्या अभ्यासकांना दिसून येतंय. आपलं बाबापण अधिक चांगल्याप्रकारे कसं पेलता येईल यासाठी प्रयत्न करायला हल्लीचे बाबा उत्सुक असलेले दिसून येतात. मुलांचं संगोपन आणि त्यांच्या जडणघडणीत वडिलांचा सहभाग असल्यास फायदाच होतो असं निरीक्षण अनेक संशोधकांनी नोंदवलं आहे. त्यांच्या मते नव्यानं बाबा झालेल्या पुरुषांना मूल सांभाळण्याचा आत्मविश्वास नसतो. त्यामुळे त्यांना कुटुंबाकडून तसेच मित्रमंडळींकडून मदत मिळणं आवश्यक असतं. त्याचबरोबर, स्वतःला आणि जोडीदाराला समाधान वाटेल अशा पालकत्वाच्या जबाबदाऱ्या बाबाने पार पाडणं हेही तेवढंच महत्त्वाचं असल्याचं ते आवर्जून सांगतात.
आपल्याला माहिती आहेच की आई आणि मुलांच्या नात्याइतकंच बाबा आणि मुलांचं नातं पण तेवढंच सखोल आणि महत्त्वपूर्ण आहे. बाबाच्या भूमिकेत शिरणं हे कित्येक पुरुषांसाठी त्यांचा संपूर्ण कायापालट करणारं ठरतं. आपला जुलै महिन्याचा अंक ह्याच ‘वडिलपण’ विषयावर आधारित असणार आहे. तुम्ही स्वतः वडील, मुलगा, मुलगी, जोडीदार इ. कुठल्याही भूमिकेतून वडिलपण कसं पाहता ते जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. काही प्रश्न खाली नमूद केले आहेत. त्यांची उत्तरं; आणि एकंदरच या विषयावरील तुमची मतं खाली दिलेल्या मार्गांनी आम्हाला जरूर कळवा.
१) आईला ‘ए’ आणि बाबांना ‘अहो’ असे संबोधन का वापरले गेले असावे?
२) मुलांच्या विकासामध्ये वडिलांचा किती वाटा असतो?
३) मुलं आणि वडिलांच्या नात्यावर कोणकोणत्या गोष्टींचा प्रभाव पडतो?
४) गेल्या काही वर्षांमध्ये वडिलांसाठी पालकत्वाची परिभाषा किंवा त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा कशाप्रकारे बदलत आहेत?
५) एक जोडीदार म्हणून आपल्या जोडीदाराकडून वडिलांच्या भूमिकेबद्दल तुमच्या काय अपेक्षा आहेत?
६) एक वडील म्हणून मुलांना वाढवताना आज तुम्हाला कुठली आव्हानं जाणवतात?
ह्या व्यतिरिक्त, या अंकातील किंवा पूर्व-प्रकाशित लेखांबद्दलची तुमची मतं, टिप्पणी, प्रतिक्रिया आणि पालकनीतीमध्ये कुठल्या विषयांवरचे लेख वाचायला तुम्हाला आवडतील; याबद्दलसुद्धा आम्हाला कळवा.