थेट भेट एक आनंद सोहळा
११ ऑगस्ट संध्याकाळ! युवक गटाची ३५ मुले – मुली, १०-१२ शिक्षिका आणि चाळीसेक पाहुणे असे आम्ही सगळे एकत्र जमलो होतो. खेळघराच्या कामाबद्दल आस्था असलेले आणि या कामात मदत करण्याची इच्छा असलेल्या मित्र – सुहृदांचा आणि युवकगटातील मुलांचा मोकळा संवाद व्हावा, मुलांना प्रोत्साहन मिळावे हा या ‘थेट भेट’ कार्यक्रमाचा उद्देश होता. या वर्षी खेळघरातील१७ मुले दहावी तर ८ मुले १२ वी पास झाली आहेत. पाच मुले डिग्रीपर्यंत पोचली आहेत. पुढे शिक्षण देखील घेत आहोत. त्यांचे कौतुक करावे, पेढे आणि छोटीशी भेट त्यांना द्यावी आणि त्यांचा शिक्षण प्रवास जाणून घ्यावा अशी आखणी होती. मुलांनी मोकळेपणाने त्यांच्या शिक्षण प्रवासातल्या अडचणी, प्रश्न आणि त्यांनी त्यातून काढलेला मार्ग याबद्दल सांगितले. पाहुण्यांच्या प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तरे दिली.एकट्या आईने निभावलेले पालकत्व, व्यसनांचा प्रभाव, मुलांना कुटुंबाला आधार म्हणून करावी लागणारी कष्टाची कामे, प्रादेशिक स्थलांतरामुळे अनुसूचित जाती मध्ये समवेश असूनही जातीचे दाखले न मिळणे असे अनेक प्रश्न समोर आले. खेळघरात फक्त उत्तम मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मदत मिळते असे नाही तर सर्व विद्यार्थ्यांना मदत मिळते असे मुलांनी आवर्जून नोंदवले. खेळघर ही त्यांच्यासाठी मन मोकळे करण्याची, समजून घेतले जाण्याची आणि जिथे स्वतःबद्दल एक सकारात्मक इमेज बनेल अशी जागा आहे हे मुलांकडून ऐकून आम्हाला फार बरे वाटले.मुलांचा हा शिक्षण प्रवास आणि त्या निमित्ताने झालेली चर्चा अतिशय हृद्य आणि हेलावून टाकणारी होती.मुलांच्या ह्या धडपडीत खेळघराचा देखील खारीचा वाटा आहे याचा आनंद आम्हा सर्व शिक्षकांना उभारी देत होता.अशा या आनंद सोहळ्याबद्दल आपल्यालाही सांगावे असे मनापासून वाटले.