
बर्टोल्ट ब्रेश्ट
अनुवाद : शर्मिष्ठा खेर
गिओर्डानो ब्रूनो. इटलीतल्या नोला शहराचा पुत्र. इ. स. 1600 मध्ये रोमन कॅथॉलिक चर्चच्या इन्क्विझिशन नामक न्यायालयाने त्याला त्याच्या पाखंडीपणासाठी जाळून मारण्याची शिक्षा दिली. जनतेच्या नजरेत तो एक आदरणीय पुरुष होता ते केवळ त्याच्या धीट विचारांमुळे नव्हे, ग्रहतार्यांच्या हालचालींबद्दलच्या सिद्धांतामुळेही नव्हे; तर त्याने ज्या ठामपणाने इन्क्किझिशनचा प्रतिवाद केला त्यामुळे. तो म्हणाला होता, ‘‘तुम्ही मला शिक्षा देताय, ती तुम्ही आतून घाबरलेले आहात म्हणून. मला तुमची भीती ऐकू येते आहे.’’ त्याचे लिखाण वाचले आणि त्याने त्याच्यावर झालेल्या आरोपांना दिलेल्या उत्तरांवर साधी नजर टाकली, तरी त्याला महान व्यक्ती म्हणून मानायला ते पुरेसे होईल. त्याच्याबद्दलची एक प्रसिद्ध आख्यायिका बघितली, तर त्याची महत्ता आणखीनच दृश्यमान होते. ती आख्यायिका आहे त्याच्या कोटासंबंधी.
तो इन्क्विझिशनच्या तावडीत कसा सापडला?
व्हेनिसमध्ये मोसेनिगो नावाचा एक श्रीमंत व्यापारी होता. ब्रूनोने आपल्याला पदार्थविज्ञान आणि मेंदूची स्मृतिशक्ती याबद्दल काही शिकवावे आणि त्यासाठी काही दिवस आपल्या घरी मुक्काम करावा अशी त्याने ब्रूनोला विनंती केली. त्याप्रमाणे ब्रूनो काही दिवस मोसेनिगोकडे राहिला. शिकवणीबद्दल त्याला काही मोबदला मिळाला.
मोसेनिगोला खरे तर जादूटोणा शिकायचा होता. पण ब्रूनोने शिकवले फक्त अस्सल पदार्थविज्ञान. त्याचा मोसेनिगोला काही उपयोग नव्हता. तो बेचैन झाला. ब्रूनोच्या पाहुणचारावर झालेला खर्च त्याला टोचू लागला. त्याने ब्रूनोला खूपदा विनंती केली, की त्याने आपल्याला गुप्त आणि फायदेशीर असे पदार्थविज्ञान शिकवावे. ब्रूनोला हे ज्ञान असणार अशी मोसेनिगोची खात्रीच होती. मात्र विनंत्यांचा उपयोग होत नाही म्हटल्यावर त्याने इन्क्विझिशनला ब्रूनोची तक्रार करणारे पत्र लिहिले.‘‘ह्या नालायक माणसानं आपल्या उपकाराची जाणीव ठेवली नाही आणि सतत ख्रिस्त, चर्च आणि चर्चमधले साधुसंत यांची निंदानालस्ती केली. ते गाढव आहेत आणि प्रजेला चुकीचं ज्ञान देऊन मूर्ख बनवताहेत; एवढेच नव्हे, तर बायबलमध्ये म्हटल्याप्रमाणे जगात एकच एक सूर्य नसून असंख्य सूर्य आहेत असंही तो प्रतिपादन करतो. म्हणून आपण त्याला आपल्या घरात कैद केलं असून चर्चनं लवकरात लवकर आपले अधिकारी पाठवून ब्रूनोला घेऊन जाण्याची व्यवस्था करावी.’’
त्याप्रमाणे नंतरच्या रविवारी रात्री चर्चचे अधिकारी आले आणि ब्रूनोला पकडून नेऊन इन्क्विझिशनच्या हवाली केले. हे घडले 25 मे 1592 या दिवशी. 17 फेब्रुवारी 1600 रोजी ब्रूनोला जाळण्यात आले. तो कैदेतून कधीच बाहेर आला नाही. आठ वर्षे स्वतःच्या जीवितासाठी तो लढत राहिला. त्याला व्हेनिसमध्ये न ठेवता रोमला नेण्यात यावे ही त्याची विनंती मान्य झाली नाही. ब्रूनोच्या कोटाची गोष्ट याच काळातली.
1592 मध्ये मोसेनिगोच्या घरी राहायला जाण्याआधी तो एका हॉटेलमध्ये राहत होता. त्याने गाब्रिएल झुंटो नावाच्या एका शिंप्याला कोट शिवण्यासाठी माप दिले होते. त्याला अटक झाली तेव्हा शिलाईचे पैसे दिलेले नव्हते. ब्रूनोच्या अटकेची बातमी कळल्यावर उशिरा संध्याकाळी झुंटो मोसेनिगोच्या घरी येऊन पोचला आणि शिलाईचे बिल त्याने मोसेनिगोसमोर ठेवले. मोसेनिगोच्या नोकराने झुंटोला हाकलून दिले. ‘आम्ही या बदमाश माणसावर आधीच खूप पैसा खर्चलाय,’ असे त्याने झुंटोला एवढ्या जोरात ओरडून सांगितले, की रस्त्यावरून जाणारी माणसे वळून पाहू लागली. ‘‘त्या पवित्र कचेरीत जाऊन सांग त्या पाखंड्याची तक्रार.’’ मोसेनिगो म्हणाला.
शिंपी घाबरून रस्त्यावर आला. जवळच उनाड पोरांचे टोळके उभे होते. त्यातल्या अंगावर चिंध्या घातलेल्या एका वात्रट मुलाने झुंटोवर दगड भिरकावला. तिथल्या एका घरातून एक स्त्री बाहेर आली आणि तिने पोराच्या गालफाडात ठेवून दिली. मग झुंटोच्या एवढे लक्षात आले, की एका पाखंडी माणसाशी संबंध आलेले आपण इथे जास्त वेळ रेंगाळणे धोक्याचे आहे. तो पळत घरी परतला. काय झाले याबद्दल त्याने बायकोला काही सांगितले नाही.
नंतर हिशोब तपासत असताना तिच्या लक्षात आले, की एका कोटाच्या शिलाईची वसुली झालेली नाहीये. आणि ज्याचे नाव सध्या शेजारीपाजारी सगळ्यांच्या तोंडी आहे, त्या माणसाचाच तो कोट आहे. त्याचे विचार भयंकर पापी आहेत. तो खुद्द जीझसला ढोंगी, लुच्चा म्हणतो. सूर्याबद्दल मूर्ख विधाने करतो. असल्या माणसाने शिलाईचे पैसे चुकते केले असते तरच नवल म्हणायचे. हे नुकसान सहन करण्याची झुंटोबाईंची मुळीच तयारी नव्हती. त्यावरून नवर्याशी तिचे कडाक्याचे भांडण झाले. तिने चर्चची कचेरी गाठली. रागारागाने तिथे तिने तिची बत्तीस स्कूडी ही शिलाईची रक्कम मागितली. तिथल्या अधिकार्याने तिचा अर्ज लिहून घेतला आणि त्याचा पाठपुरावा करू असे सांगितले.
काही दिवसातच झुंटोला चर्चकडून हजर होण्याचे फर्मान आले. मोठा दरारा असलेल्या या इमारतीत तो घाबरत घाबरतच शिरला. पण कोणी त्याची सुनावणी घेतली नाही. त्याला माहिती देण्यात आली, की त्याच्या शिलाईच्या मागणीची हिशोबखात्याने दखल घेतलेली आहे. मात्र त्यातून फार काही निष्पन्न होणार नाही असेही त्याला त्या कारकुनाने सांगितले.
आपल्यावरच काही बिलामत येत नाहीये हे पाहून झुंटोला इतके हायसे झाले, की चारचारदा कमरेत वाकून आभार मानत अत्यंत नम्रतेने तो तिथून बाहेर पडला. पण बायकोचे समाधान होईना. कारण ब्रूनो कापडाचे पैसे झुंटोला देणे लागत होता. कितीतरी संध्याकाळी विरंगुळ्याचे घुटके न घेता कोट शिवण्यासाठी झुंटोला डोळेफोड करावी लागली होती. अंगणात उभे राहून ती मोठ्या आवाजात सरकारवर ताशेरे ओढू लागली. ‘गुन्हेगाराने सर्व देणी फेडण्याआधी त्याला कैद करणे हे सरकार आणि चर्चसाठी लाजिरवाणे आहे. वेळ आली तर मी रोममधल्या मोठ्ठ्या बापापर्यंत फिर्याद नेऊन माझे बत्तीस स्कूडी वसूल करेन. चितेवर चढताना त्याला कोट कशाला हवाय?’
रविवारच्या कन्फेशनच्या पाद्र्याला तिने काय झाले ते सांगितले. त्याने सल्ला दिला, की निदान तो कोट त्यांना सुपूर्त व्हावा अशी मागणी तिने करावी. चर्चकडून कोणीतरी आपले हक्क मानतेय असे तिला वाटले. तिने स्पष्ट केले, की कोट मिळून भागणार नाही. तिला बत्तीस स्कूडी मिळायला हवेत. हे सांगताना तिचा आवाज चढतोय म्हटल्यावर पाद्र्याने तिला हाकलून दिले.
ती आता जरा नरमली. काही दिवस शांत राहिली. इन्क्विझिशनकडून ह्या खटल्यावर कुठलीच प्रतिक्रिया येईना. परंतु नगरात कुजबुज होती, की सुनावणीत अतिशय लाजिरवाण्या गोष्टी उघड होतायत. शिंपीण ह्या बाजारगप्पांच्या मागावर होती. ब्रूनो या खटल्यातून सुटून कदापि बाहेर येणार नाही असे कानावर आले, की तिला असह्य दुःख होई. मग ऑगस्टमध्ये उन्हाळा सुरू झाला आणि उन्हाळ्याने तिच्या मूडची पार वाट लागली.मग जिथे कुठे ती खरेदीला जाई त्या दुकानांमध्ये आणि तिच्याकडे कपडे घालून बघायला येणार्या गिर्हाईकांशी बोलताना तिच्या तोंडाचा पट्टा चालू होई. त्यांच्यासारख्या गरीब कामगार कुटुंबाला न्याय देण्याची फिकीर न करणे म्हणजे चर्चमधल्या लहानथोर पाद्र्यांचे पाप होय असेही तिच्या बडबडीतून ध्वनित होत असे. सगळे कर तर वाढत जात होते आणि ब्रेडच्या किमतीही नुकत्याच वाढल्या होत्या.
एका दुपारी चर्चचे कर्मचारी येऊन तिला त्यांच्या मोठ्या इमारतीत घेऊन गेले. तिने आपले तोंड जोरात चालवू नये अशी तंबी तिला आधीच देण्यात आली. काही थोड्या स्कूडी एवढ्या किरकोळ रकमेसाठी एवढ्या उच्च पदावरच्या कारभार्यांना दोष द्यायला तिला लाज कशी वाटत नाही, तिच्यासारख्या हलक्या दर्जाच्या माणसांविरुद्ध वापरण्याचे अनेक उपाय असतात, वगैरे तिला ऐकवण्यात आले. मात्र ‘किरकोळ रक्कम’, ‘काही थोडेच स्कूडी’ वगैरे शब्द ऐकून होणारा तिचा संताप लगेच तिच्या चेहर्यावर दिसू लागे. सप्टेंबरमध्ये तिच्या कानावर आले, की रोममधल्या पीठासीन अधिकार्याने ब्रूनोचा ताबा मिळावा अशी मागणी केली आहे. सरकारमध्ये या मागणीवर विचार चालू होता.
ब्रूनोला रोमच्या मोठ्या चर्चकडे सोपवण्यात येणार ही बातमी गावात चघळली जात होती, आणि लोकांमध्ये एकंदरीत त्या विरोधात भावना होती. विशेषत: वेगवेगळ्या स्वतंत्र कामगार संघटनांना रोमचे कायदे स्वतःवर लादून घ्यायचे नव्हते. शिंपीण पुन्हा भडकली. इथली देणी फेडण्याआधी ब्रूनोला खरोखरीच रोमला धाडण्यात येणार होते की काय? हे अति झाले. होती त्या कपड्यात ती तडक चर्चमध्ये येऊन थडकली. ह्या वेळी तिला एका थोड्या वरच्या अधिकार्याची भेट मिळाली. तो जवळ जवळ तिच्याच वयाचा होता. तिच्याशी बर्याच सौम्यपणे बोलत त्याने लक्षपूर्वक तिची तक्रार ऐकून घेतली. तिचे बोलून झाल्यावर त्याने तिला ब्रूनोची भेट घ्यायची आहे का म्हणून विचारले. ती लगेच हो म्हणाली. दुसर्याच दिवशीची भेट ठरली.
एका अगदी लहान खोलीच्या गजांच्या खिडकीतून ती ब्रूनोशी बोलली. लहानखुरा, कृश शरीरयष्टीचा, बारीक दाढी असलेला ब्रूनो तिच्याशी नम्रपणे बोलला. तिची त्याच्याकडून काय अपेक्षा आहे ते त्याने विचारले. तो माप द्यायला आला होता तेव्हा तिने त्याला बघितले होते. त्याचा त्या वेळचा चेहराही तिच्या लक्षात होता. पण आता सततच्या सुनावण्यांना तोंड देता देता त्याचा चेहरा पार बदललेला दिसत होता.
‘‘तुम्ही कोटाचे पैसे दिलेले नाहीत.’’
त्याला आश्चर्य वाटलेले दिसत होते. थोडा वेळ विचार करून त्याने म्हटले, ‘‘किती देणं लागतो मी?’’
‘‘बत्तीस स्कूडी. तुम्हाला बिलावर लिहून दिलंय की!’’
त्यांच्या मुलाखतीवर लक्ष ठेवून असलेल्या कर्मचार्याकडे वळून ब्रूनोने विचारले, ‘‘घरातल्या सगळ्या वस्तूंबरोबर किती रोख रक्कम चर्चकडे जमा करण्यात आली आहे?’’
कर्मचार्याने चौकशी करून सांगतो असे उत्तर दिले.
‘‘कसे आहेत तुमचे यजमान?’’ एक सर्वसाधारण विश्वासाची स्थिती प्रस्थापित व्हावी या हेतूने ब्रूनोने तिला प्रश्न केला. त्याच्या सुसंस्कृत सभ्यपणाने गडबडून जाऊन ‘‘ठीक आहेत’’ असे म्हणून शिवाय त्याच्या संधिवाताविषयीही काहीतरी बोलली.
ब्रूनोला सर्व माहिती मिळण्यासाठी दोन-तीन दिवस लागतील म्हणून तेवढे दिवस मध्ये ठेवून ती परत चर्चमध्ये गेली. त्याला परत एकदा भेटण्याची तिला परवानगी मिळाली. पण त्याची सुनावणी चालू असल्याने तिला तास-दीड तास वाट बघत बसावे लागले. तो खोलीत परत आला तेव्हा अतिशय दमलेला दिसत होता. पण त्याने ताबडतोब तिच्याशी बोलणे सुरू केले. दुर्दैवाने आपण तिचे पैसे देऊ शकत नाही, कारण त्याच्या घरातल्या जप्त केलेल्या वस्तूंबरोबर काहीही रोख रक्कम सापडली नाही असे चर्चचे म्हणणे होते. तरीही तिने निराश होऊ नये, असे तो म्हणाला. कारण फ्रँकफुर्टमधल्या ज्या प्रकाशकाने त्याचे पुस्तक छापले त्याच्याकडून आपल्याला काही पैसे येणे आहेत, त्याला सांगून आपण तिचे देणे फेडू शकतो, फक्त चर्चने तशी व्यवस्था करायला हवी असे त्याचे म्हणणे पडले. त्या दिवशीच्या सुनावणीत वातावरण अगदी वाईट होते म्हणून त्याने ही गोष्ट विचारली नव्हती.
अगदी तीव्र भेदक नजरेने तिने त्याला वरपासून खालपर्यंत निरखले. तिला पैसे बुडवणारी गिर्हाईके चांगलीच माहिती होती. अशी माणसे कोणालाच आणि कशालाच जुमानत नसत.
‘‘अहो पण जवळ पैसे नसताना कशाला हवा होता तुम्हाला कोट?’’
तिचा प्रश्न बरोबर आहे अशा अर्थाची मान हलवत तो म्हणाला, ‘‘मी नेहमीच माझी पुस्तकं आणि शिकवण्या यातून पैसा मिळवत आलोय. तसेच पुढेही मिळवत राहीन, नेहमी असाच मुक्तपणे फिरत राहीन असं मला वाटलं. आणि म्हणून मला कोटाची गरज वाटली.’’ हे तो कुठल्याही कटूतेने म्हणाला नव्हता. तिला उत्तर द्यायला पाहिजे अशा निरागसपणे तो बोलला.
तिने परत एकदा तिच्या भेदक नजरेने त्याला आपादमस्तक पाहिले आणि एक शब्दही न बोलता ती परत फिरली.

घरी आल्यावर रागाने फणफणतच ती नवर्याला म्हणाली, ‘‘इन्क्विझिशन ज्याची चौकशी करते आहे अशा माणसाचं देणं कोण फेडत बसेल?’’ चर्चने त्याच्याबाबत सौम्य भूमिका घेतल्याबद्दल झुंटो आनंदात होता. मात्र वसुलीसाठी त्याच्या बायकोने चर्चला मारलेल्या असंख्य फेर्यांबद्दल त्याला वाईटही वाटत होते.
‘‘अग त्याला आता इतर अनेक काळज्यांनी घेरलेलं असणार.’’ त्यावर ती काही बोलली नाही. बरेच महिने गेले. येणे असलेल्या त्यांच्या पैशांच्या बाबतीत काहीही घडले नाही. जानेवारीच्या सुरुवातीला कानावर येऊ लागले, की व्हेनिसच्या आमसभेने पोपची मागणी मान्य करायचे ठरवले आहे. त्यानुसार ब्रूनोला पोपच्या स्वाधीन केले जाणार आहे. आणि मग एक दिवस झुंटो कुटुंबाला गावातल्या चर्चने बोलावणे धाडले. निश्चित असा दिवस सांगितलेला नव्हता. शिंपीण तिच्या सोयीने एक दिवस चर्चमध्ये दाखल झाली. पण ती वेळ तितकीशी योग्य नव्हती. त्याच दिवशी गणराज्याचा वकील कैद्याचा ताबा देण्याची कागदपत्रे करण्यासाठी येणार होता. याआधी तिची ब्रूनोशी भेट घडवून आणणारा अधिकारी तिथेच होता. कैदी एका फार महत्त्वाच्या सुनावणीला सामोरे जात असल्याने आत्ता त्याची भेट मिळाली, तरी ही योग्य वेळ होईल का याचा तिने विचार करावा, असे त्याचे म्हणणे पडले. ती म्हणाली, ‘‘त्याला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे.’’ मग ब्रूनोला तिच्यासमोर आणण्यात आले. मोठ्या अधिकार्यासमोरच प्रश्नोत्तरे होणार होती. ब्रूनोने तिच्याकडे पाहून ओळखीचे पुसटसे स्मित केले. शिंपीण अधीरपणे म्हणाली, ‘‘तुम्हाला जर सुटून बाहेर यायचंय, तर एवढे ताठरपणे का बोलताय तिथे?’’
तो क्षणभर गोंधळला.
ह्या मधल्या तीन-चार महिन्यांच्या काळात कैद्याने इतके तर्हेतर्हेचे प्रश्न ऐकले होते, की त्यांच्या आधीच्या भेटीत ते काय बोलले होते हे त्याला आठवले नाही.
‘‘मला कुठूनही पैसे आले नाहीत,’’ शेवटी तो म्हणाला.
‘‘मी दोन-तीन वेळा आठवण केली, तरीही नाही आले. तुम्ही तो कोटच परत घेता का?’’
‘‘मला माहितीच होतं, हे शेवटी इथे येऊन पोचणार. तो कोट तुमच्या मापाचा शिवलाय, त्यामुळे कोणालाही बसणार नाही. फार आखूड आहे तो सगळ्यांसाठी.’’ ती फणकारली.
‘‘ओह! ते माझ्या लक्षात आलं नाही.’’
मग तो पाद्र्याकडे वळून म्हणाला, ‘‘माझ्या सर्व गोष्टी विकून यांचे पैसे देता येतील ना?’’
‘‘ते जमणार नाही.’’ अधिकारी मध्येच बोलला. ‘‘त्या सगळ्या वस्तूंवर पहिला दावा मोसेनिगोचा आहे. तुम्ही बराच काळ त्याचा पाहुणचार झोडलात.’’
‘‘त्यानं मला आमंत्रित केलं होतं.’’ ब्रूनोने दमल्या आवाजात उत्तर दिलं.
‘‘कोट या बाईंना द्यायला हरकत नाही.’’ पाद्र्याने हस्तक्षेप केला.
‘‘काय करू मी तो कोट घेऊन?’’
पाद्री म्हणाला, ‘‘बाईसाहेब, जीझसला स्मरून थोडी माणुसकी दाखवलीत तर तुमचंच भलं होईल. त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न उभा आहे. त्यानं तुमच्या कोटाची काळजी करत बसावं अशी अपेक्षा बरोबर नाही.’’
आपण कुठे आहोत याचे भान तिला आले.
आता निघावे असा विचार ती करत होती, तोच मागून ब्रूनोचा आवाज आला, ‘‘मला वाटतं, बाई अशी मागणी करू शकतात.’’
तिने वळून त्याच्याकडे पाहिले. तो म्हणाला ‘‘आपण मला क्षमा करावी. कृपा करून असं समजू नका, की तुमच्या नुकसानीचं मला वाईट वाटत नाहीये. मी एक अर्ज करतो.’’
पाद्र्याने इशारा केल्यामुळे कर्मचारी खोलीबाहेर गेला. परत येऊन हात फैलावत म्हणाला, ‘‘पण तो कोट सामानाबरोबर आलेलाच नाहीये. मोसेनिगोनं ठेवून घेतलेला दिसतोय.’’
हे ऐकून ब्रूनोला खचायलाच झाले. तो म्हणाला ‘‘हे बरोबर नाही. मी मोसेनिगोविरुद्ध तक्रार करतो.’’
पाद्री जोरात मान हलवत म्हणाला, ‘‘त्यापेक्षा थोड्याच वेळात तुला ज्या सुनावणीला तोंड द्यायचं आहे तिचा विचार करावास. काही थोड्या स्कूडींसाठी इथे भांडण व्हावं हे मला चालणार नाही.’’
शिंपीणीचं डोकं भडकलं. ब्रूनो बोलत असताना ती शांतपणे खोलीच्या एका कोपर्यात नजर लावून बसली होती. पण आता तिचा संयम संपला, ‘‘काही थोडे स्कूडी? ते माझं एका अख्ख्या महिन्याचं उत्पन्न आहे. जीझसला स्मरून माणुसकी-बिणुसकी दाखवायला तुमचं काय जातंय?’’
याच क्षणी एक उंचापुरा भिक्षू दारात दाखल झाला. तिच्याकडे आश्चर्याने बघत त्याने वर्दी दिली, की गणराज्याचे वकील-महोदय आलेले आहेत. ब्रूनोच्या दंडाला पकडून त्याला तिथून नेण्यात आले. तो बराच वेळ मागे वळून तिच्याकडे बघत राहिला. त्याचा चेहरा आक्रसून जाऊन निस्तेज झाला होता.
इमारतीच्या दगडी पायर्या उतरून शिंपीण खाली आली. काय फळ खटपटीचे? पण त्या माणसाने शक्य ते सर्व केले हे मानलेच पाहिजे.
सुमारे एक आठवड्याने तो उंचापुरा भिक्षू कोट घेऊन त्यांच्याकडे आला तेव्हा ती पुढे झाली नाही. पण कान लावून बाहेरचे संभाषण ऐकत राहिली. ‘‘अहो तो शेवटपर्यंत ह्या कोटासाठी खटपट करून राहिला होता. सुनावणीच्या दरम्यान दोन-तीनदा त्यानं अधिकार्यांना आठवण केली आणि पोपच्या वकिलाकडेही त्या संदर्भात अनेक वेळा पोपच्या भेटीची मागणी केली. त्यानं अगदी लावून धरला हो त्याचा मुद्दा. शेवटी मोसेनिगोला कोट आणून द्यावा लागला. खरं तर त्यालाच आता ह्या कोटाची फार गरज होती. एका आठवड्यात त्याची रोमला रवानगी होईल.’’
हं! जानेवारीचा शेवट जवळ येत होता.
मूळ लेखक : बर्टोल्ट ब्रेश्ट
अनुवाद : शर्मिष्ठा खेर

अनुवादक जर्मन भाषेच्या निवृत्त प्राध्यापक आहेत. ‘केल्याने भाषांतर’,
‘मिळून सार्याजणी’, ‘पालकनीती’ इ. नियतकालिकांतून त्यांनी केलेली जर्मन कथांची भाषांतरे प्रसिद्ध झाली आहेत.
