प्रतिसाद – जुलै २००३
‘तुमचा मुलगा जरा जास्तच संवेदनशील आहे!’
विनू नुकताच पाचवीत गेला होता तेव्हा एके दिवशी डबडबल्या डोळ्यांनी घरी आला. ‘‘काय झाले?’’ ‘‘आज आमचे हेडमास्तर आमच्या वर्गात आले होते. ते म्हणाले, ‘‘सगळ्या गावामधली डुकरं आणून जमा केली आहेत इथं.’’ ‘‘मग जर आम्ही डुकरंच आहोत तर कशाला शिकवितात ते आम्हाला? मास्तरही टाकून बोलतात, कान पिरगाळतात; चपराशीही संधी सापडली की ठेवून देतात. इतके नालायक आहोत आम्ही?’’
विनूची तक्रार आम्ही हेडमास्तरांपर्यंत पोचवली तेव्हा ते उद्गारले, ‘‘तुमचा मुलगा जास्तच संवेदनशील आहे!’’
पेशाने शेतकरी असलेले हे हेडमास्तर जेव्हा बाजारात बैल घ्यायला जातात, तेव्हा त्याच्या पाठीवर थाप मारून बघतात, त्याची त्वचा थरथरते की नाही ते. नाही थरथरली तर त्याला मद्दड ठरवून नापास करतात. पण पोराला त्यांचे वाग्बाण लागले, तर मात्र अति संवेदनशील ठरवून मोकळे होतात.
(करुणा फुटाणे, मिळून सार्याजणी, जुलै, 03 मधून साभार)