प्रतिसाद – मे २००२
गेल्या वर्षी चकमकसाठी मी साहित्य पाठविले होते. ते आत्तापर्यंत छापले नसेल; पण ते छापू नये असे मला आता वाटते. कारण माझ्या मुलाने विचारलेल्या प्रश्नाबाबत मी त्याची समजूत काढू शकले. त्यासाठी बराच वेळ जावा लागला पण हरकत नाही. प्रसंग असा होता –
माझा मुलगा नीहार चार वर्षांचा आहे. 15 ऑगस्टला त्याला गांधीजींच्या वेषात जायचे होते. म्हणून 14 ऑगस्टला त्याला मी पंचा नेसून बघूया, असे म्हटले, परंतु पंचा नेसून वर उघडा राहण्यास तो तयार होईना. तो म्हणत होता, ‘‘मला गांधीजी व्हायचे नाही, उघडे रहायचे नाही,’’ मी त्याला समजावीत असताना त्याने विचारले, ‘‘गांधीजी पंचाच का नेसत?’’ मी त्याला समजेल अशा भाषेत सांगितले, ‘‘आपण असे कितीतरी लोक बघतो की जे अंगभर कपडे घालू शकत नाही, या लोकांविषयी गांधीजींना वाईट वाटले, म्हणून त्यांनी ठरविले पंचाच नेसायचा.’’ मला वाटले त्याला पटेल पण त्याने विचारले, ‘‘गांधीजींनी असे ठरवल्यावर त्या लोकांना मिळाले का कपडे?’’
त्याचा हा प्रश्न मला खूप अस्वस्थ करत राहिला. आज जरी तो लहान आहे, तरी आजूबाजूच्या समाजातील विचारांचा हा प्रभाव तर नाही ना? कारण समाजात चांगले विचार वाईट कसे आहेत, मोठी माणसे कशी चुकली किंवा त्याचे प्रयोग कसे फसले यावर जोरदार चर्चा होते. चर्चा करणार्यांनी गांधीजींचे किंवा इतर कोणाचे विचार वाचलेलेही नसतात. म्हणूनच माझ्या मुलापुरते मी ठरविले की याला गांधीजींच्या जीवनातल्या घटना हळूहळू समजावून सांगायच्या. गांधीजी त्यांच्या निर्णयाने या लोकांच्या दु:खाशी कसे जोडले गेले हे त्याला सांगायचे. मी गांधीजींचे चरित्र, त्यांच्याविषयीचे अनेक लेख गोळा करून, सोप्या भाषेत काही घटना लिहिल्या. हळूहळू रोज एक एक घटना त्याला सांगितली. समजून घेण्याची वाट पाहिली. घरात घडणार्या इतरही अनेक छोट्या छोट्या प्रसंगांतून त्याला त्यातले बरेच समजले हे मला जाणवले. मी पालकनीतीची फार पूर्वीपासूनची वाचक आहे. वेळोवेळी माझ्या मुलाच्या वाढीत मी तुमची मदत घेतली आहे.
आजही मी आम्ही ज्या गावी रहात असू त्या त्या शाळेत काही पालकांना गोळा करून, किंवा शाळेत घ्यायला आल्यावर एखादा लेख वाचून दाखविते किंवा वाचायला देते. पालकांच्या सभेत ‘मुलांशी कसे वागावे? यावर मुद्दाम चर्चा घडवून आणल्या. कारण इथला पालक अनेक गोष्टीबाबत अजाण आहे. पालक फारसे उत्सुक नाहीत. पण मी हलविण्याचे काम करीत आहे. पालकांच्या विचार पद्धती कळाव्यात म्हणून मी प्रश्नावली तयार केली. माझ्या डोक्यात मुलांच्या प्राथमिक गरजा, त्यांना हवे असलेले वातावरण यासाठी शाळा, पालक आणि मला वैयक्तिकरित्या काय करता येईल याचा विचार चालू आहे.
बदलीच्या नोकरीमुळे मला किंवा माझ्यासारख्या अनेक पालकांना विशिष्ट अशा शाळेत मुलांना घालता येणार नाही. म्हणून शाळेच्या चौकटीत सर्वांबरोबर होणार्या शिक्षणापेक्षा वेगळं शिक्षण जर आम्हाला मुलाला द्यायचे असेल तर आम्ही काय करावं? अशा प्रकारचे प्रयोग किमान आम्हाला वाचायला तरी मिळावेत अशी इच्छा आहे. उदा. अक्षरनंदन, सृजन आनंद या शाळांमध्ये भाषा, विज्ञान, गणित, इतिहास या विषयांसाठी प्रयोग होतात ते आम्हाला पालकनीतीच्या माध्यमातून समजावेत असे मला वाटते.
अश्विनी मनोहर बरवे, ठाणे.