प्रास्ताविक

झकिया कुरियन

शून्य ते आठ हा बालकांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा जडणघडणीचा काळ
मानला जातो. या वयातील मुलांच्या वाढीमध्ये त्यांचे पालक, त्यांची काळजी घेणारी
इतर माणसे, आजी-आजोबा, अंगणवाडीच्या ताई, शिक्षक या सगळ्यांचा सहभाग
अतिशय कळीचा असतो. केंद्र आणि राज्य सरकारे या विषयासंबंधी धोरणात्मक
पावले उचलताना दिसत आहेत. व्यक्तिगत पातळीवरही स्वत:च्या, नातलगांच्या,
किंवा परिसरातील मुलामुलींच्या विकासात आपण सगळे जण काही ना काही
जबाबदारी पार पाडत असतो. सर्व सुजाण पालक, शिक्षक, अंगणवाडीताई, आरोग्य
क्षेत्रातील कर्मचारी, या सगळ्यांपर्यंत या विषयाबद्दल अधिक विस्तृत आणि सखोल
माहिती, नवे-जुने विचारप्रवाह, चर्चा पोचवणे हा या लेखमालेचा मुख्य उद्देश आहे.
बालविकास आणि बालशिक्षणाच्या क्षेत्रात वैविध्यपूर्ण आणि प्रदीर्घ अनुभव
असणार्‍या तज्ज्ञांनी लिहिलेल्या या लेखमालेतील हा पहिला लेख.
माझ्या व्यावसायिक आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कधी मी पूर्वप्राथमिकच्या
मुलांना शिकवलंय, कधी प्राथमिक शाळेत शिकवलंय, तर कधी शिक्षकांचंही
प्रशिक्षण घेतलंय. सर्वात छोट्या वयोगटाला शिकवणं, त्यांचे शिक्षक आणि त्यांना
सांभाळणार्‍या व्यक्तींना प्रशिक्षण देणं हा माझ्या कारकिर्दीतला सर्वात
सुखावणार्‍या अनुभवांपैकी एक. 3 ते 5 ह्या वयोगटातल्या मुलांची वाढ फार
झपाट्यानं होत असते. त्यांचा उत्साह दांडगा असतो, अमर्याद कुतूहल, अफाट ऊर्जा,
आणि आवडीनिवडीही टोकाच्या असतात. त्यांच्या पायाभूत शिक्षणाला न्याय देणं हे
काम आव्हानात्मक होतं. ते नीट पेलता यावं, ह्यासाठी मला आधी त्यांच्या
विकासाच्या गरजा समजून घ्याव्या लागल्या.
व्यक्तीच्या विकासात तिच्या आयुष्यातली पहिली पाच वर्षं सर्वात महत्त्वाची
असतात हे आता जगभरातून मान्य केलं जातंय. माणसाच्या आयुष्यातला हा

अत्यंत विशेष काळ असतो. अगदी कमी कालावधीत मूल इतकं काही शिकतं!
जगभरात सगळीकडेच पूर्व-प्राथमिक शिक्षण हे औपचारिक शिक्षण-व्यवस्थेचा भाग
आहे. एक छोटीशी ऐतिहासिक नोंद इथे समयोचित ठरावी. 1914 सालापासून
भारतीयांना इटालियन शिक्षणतज्ज्ञ मारिया माँटेसरी ह्यांच्या लिखाणाचा परिचय
झाला. तुलनेनं सुखवस्तू मुलांसाठी असलेल्या अनेक बालवाड्यांनी ही ‘माँटेसरी
पद्धत’ स्वीकारली होती. लहान मुलांची शिकण्याची प्रक्रिया मोठ्यांपेक्षा वेगळी
असते, हा माँटेसरी ह्यांच्या विचारांचा गाभा आहे. त्या दृष्टीनं त्यांच्यासाठी वस्तू
तयार केल्या जायला हव्यात, त्यांना त्या प्रत्यक्ष हाताळायला मिळायला हव्यात.
मात्र त्यांनी सुचवलेलं साहित्य दर्जेदार असलं, तरी खूप महाग होतं. 1931 साली
गांधीजी माँटेसरींना भेटले होते. बालशिक्षणात माँटेसरी पद्धत अंगीकारली जावी
आणि भारतातल्या गरीब मुलांनाही ती सहज उपलब्ध व्हावी असं गांधीजींना वाटत
होतं. हे काम पुढे नेण्यात ताराबाई मोडक अग्रेसर होत्या. 1926 साली त्यांनी
गिजूभाई बधेका ह्यांच्या समवेत नूतन बाल शिक्षण संघाची (NBSS) स्थापना
केली. ग्रामीण महाराष्ट्रात त्यांचं हे कार्य अनुताई वाघांनी पुढे नेलं. त्याकाळी
भारताच्या विविध भागांत पूर्व-प्राथमिक शिक्षण दिलं जात असलं, तरी सामाजिक व
सांस्कृतिक संदर्भ लक्षात घेत बालपणातल्या शिक्षणाचा पाया घालण्याचं श्रेय अशा
प्रकारे निश्चितपणे महाराष्ट्राकडे जातं. पुढे देशभरात त्याचं सार्वत्रिकीकरण झालं.
माँटेसरी आणि NBSS चा काळ, त्या काळात या क्षेत्रात घडलेलं काम पायाभरणीचं
ठरलं. अलीकडच्या काळात मेंदूविज्ञानातलं संशोधन मानवी मेंदूच्या विकासाचं एक
नवंच दालन उघडून दाखवतं. संशोधन सांगतं, की मूल लहान असताना त्याला
सभोवतालच्या वातावरणातून प्रोत्साहन मिळाल्यास त्याच्या मेंदूचा विकास होतो.
त्याचा त्याच्या आकलनात्मक, सामाजिक आणि भावनिक वाढीवर परिणाम होतो.
एवढंच नाही, तर व्यक्तीच्या आयुष्यभर शिकण्याच्या क्षमतेवरही ह्याचा प्रभाव
पडतो. माणसाच्या विकासात दर्जेदार पूर्व-प्राथमिक शिक्षणाचं किती महत्त्व आहे, ते
ह्यातून अधोरेखित होतं.
मात्र ‘उच्च दर्जाचं पूर्व-प्राथमिक शिक्षण म्हणजे काय?’ हा एकंदरीत वादाचाच मुद्दा
राहिला आहे. कधी धोरणकर्ते त्यांच्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमाची आखणी

करतात, तर कधी पालक शिक्षणाबद्दलच्या आपल्या तोकड्या आणि चुकीच्या
ज्ञानाच्या आधारावर व्यवस्थेकडून अपेक्षा ठेवतात. म्हणायला आपल्या देशातली
बहुतांश मुलं आज पूर्व-प्राथमिक शिक्षण-व्यवस्थेत असली, तरी त्यातल्या फार
थोड्या मुलांना मनोविकास करणारे, व्यक्तिमत्त्वाची मशागत करणारे अनुभव
मिळतात.
मूल समजून घ्यायचं तर त्याच्यातले शारीरिक, भावनिक, सामाजिक,
आकलनात्मक, सर्जनशील असे पैलू लक्षात घ्यावे लागतील. मुलाचं व्यक्ती म्हणून
असणारं अस्तित्व हे या पाच पैलूंच्या संतुलित विकासावर अवलंबून असतं. त्याचा
शारीरिक विकास होण्यासाठी त्याच्या आरोग्याची, पोषणाची नीट काळजी घेतली
जायला हवी. पूर्व-प्राथमिक शाळांमध्ये जोरकसपणे खेळल्या जाणार्‍या शारीरिक
खेळांतून त्यांचे स्नायू बळकट व्हायला आपोआपच मदत मिळते, स्नायूंवर नियंत्रण
मिळवता येतं, मुलं डोळे आणि हातांचा समन्वय शिकतात, आरोग्याच्या चांगल्या
सवयी शिकतात.
मुलांची भावनिक वाढ होण्यासाठी त्यांना आश्वासक, प्रेमळ वातावरण मिळालं
पाहिजे. अशा वातावरणात ती दुसर्‍यावर विश्वास ठेवायला, स्वतःच्या भावनांवर
नियंत्रण ठेवायला शिकतात. भीती, राग, आक्रमकपणा ह्या भावनांशी जुळवून
घ्यायला शिकतात. निरनिराळ्या उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होऊन, पुढाकार
घेऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढीस लागतो, स्वतःची सकारात्मक प्रतिमा
निर्माण होते. बाळपणीचा हा काळ समृद्ध सामाजिक जाणिवा निर्माण
होण्यासाठीसुद्धा उत्तम आहे. इतरांशी वाटून घेणं, एकमेकांसाठी काही गोष्टी सोडणं,
एकमेकांना मदत करणं, मैत्री करणं, त्यांना सांभाळणार्‍या मोठ्या माणसांच्या
भावनांचा आदर करणं ह्या गोष्टी आपण शिकवू शकतो. प्रत्येक मुलात
सर्जनशीलता असतेच; फक्त त्यांना संधी मिळण्याची गरज असते; कल्पना
करण्याची संधी, कला, हस्तकला, संगीत, मुक्त खेळ ह्या सगळ्यातून व्यक्त
होण्याची संधी.
मुलांकडे उपजत काही बौद्धिक क्षमता असतात. मोकळेपणी संवाद साधण्यासाठी
त्यांना व्यक्त होण्याची संधी मिळायला हवी. पंचज्ञानेंद्रियांनी घेण्याचे अनुभव

मिळायला हवेत. निरीक्षण करण्याची, प्रश्न विचारण्याची, समस्या सोडवण्याची
आणि भाषिक कौशल्यं विकसित करण्याची संधी मिळायला हवी. त्याच वेळी त्यांची
शाळेत जाण्याच्या दृष्टीनं काही तयारी होणं (School Readiness Skills) गरजेचं
आहे; पण म्हणजे अकालीच त्यांना औपचारिक वाचन-लेखन-गणित (3R)
शिकवायचं असा त्याचा अर्थ नाही.
उच्च दर्जाचं पूर्व-प्राथमिक शिक्षण हे सर्वांगीण असतं. त्यातून मुलाच्या सर्व
कौशल्यांचा एकत्रितपणे विकास साधला जातो. रटाळपणे पाठांतर करणं हा अजूनही
आपल्या शिक्षण-व्यवस्थेत मुलांच्या दिनक्रमाचा भागच आहे. अशात विकासाच्या
खर्‍या गरजांकडे लक्षच न जाणं अगदीच शक्य आहे. अगदी चिमुकल्यांचीही
परीक्षा, मूल्यमापन ह्या गोष्टींसाठी तयारी करून घेण्याच्या नादात कधी कधी
त्यांच्या मनाचं, व्यक्तित्वाचं संगोपन होतंय की नाही, ह्याकडे दुर्लक्ष होतं.
चांगल्या दर्जाच्या पूर्व-प्राथमिक शिक्षणात 3 ते 5 वर्षांच्या मुलांना ‘काय’ शिकवलं
जावं एवढ्याचाच विचार फक्त अभिप्रेत नाही, तर मुलं परिणामकारकपणे ‘कसं’
शिकतील ह्याचाही विचार येतो. ह्या वयाच्या मुलांच्या संवेदना अत्यंत तीक्ष्ण
असतात. निरीक्षण, स्पर्श, चव, गंध अशा सगळ्याच बाबतीत त्यांच्या ऊर्मी प्रबळ
असतात. या वयोगटाच्या मुलांबरोबर अगदी थोडासा वेळ घालवलेलं कुणीही हे
सांगेल. ह्यावरून अगदी कमी वयातही शिकण्याची त्यांची ताकद लक्षात यावी.
त्यांना वस्तू प्रत्यक्ष हाताळायला मिळाल्या, काही करून बघायला मिळालं, तर ती
चांगली शिकतात. त्यामुळे सुरुवातीचं शिक्षण प्रत्यक्ष अनुभवावर बेतलेलंच असलं
पाहिजे.
खेळ हा शिकण्याचा आणखी एक राजमार्ग आहे. ज्या पालकांनी आणि शिक्षकांनी
छोट्या मुलांना खेळताना पाहिलं असेल, त्यांना मुलं किती उत्कटपणे आणि
मनापासून खेळत असतात ते जाणवलं असेल. मात्र ‘शिक्षणाचं गांभीर्य टिकवायचं
असेल, तर हे खेळणंबिळणं बाजूला ठेवलं पाहिजे’ असं दुर्दैवानं बर्‍याच जणांना
वाटतं. मुलांची विचारप्रक्रिया विकसित होण्यामध्ये असलेलं खेळाचं महत्त्वच
आपल्याला अजून पुरतं समजलेलं नाही.

सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस (CLR) ह्या आमच्या संस्थेमार्फत आम्ही शिक्षक,
अंगणवाडी कार्यकर्ते आणि पालकांसाठी प्रशिक्षण सत्रं घेतो. त्यात आम्ही लहान
मुलांच्या वाढ-विकासात असलेलं खेळाचं महत्त्व जोरकसपणे मांडतो. सहभागी
प्रशिक्षणार्थी प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आमच्या आदर्श अंगणवाड्यांमध्ये काही वेळ
घालवतात. परतून आम्हाला त्यांचे अनुभव सांगतात. असेच काही अनुभव पाहू.
 लहानगी सुमन ताईंनी ठेवलेल्या रंगांशी खेळत होती. ‘‘ताई बघा! मी केशरी रंग
तयार केला,’’ ती एकदम ओरडली. ताई म्हणाल्या, ‘‘बघू बरं काय केलं आहेस
ते.’’ ती चटकन म्हणाली, ‘‘मी पिवळ्यात लाल घातला.’’
 गणिताच्या वर्कबुकमध्ये उत्तरं भरण्याऐवजी मुलं साहित्य वापरून खेळाच्या
माध्यमातून गणिती संकल्पना समजून घेत होती. 4 वर्षांचा मुनीर आणि 5
वर्षांची दीपा सागरगोटे खेळता खेळता गणिती संकल्पना समजून घेत होती.
दीपा म्हणाली, ‘‘मी एक अंक मोठ्यानं म्हणेन आणि तुला काही सागरगोटे
दाखवेन. तू मला सांगायचंस की मी म्हटलेला अंक होण्यासाठी आणखी किती
सागरगोटे लागतील.’’ तिनं मोठ्यानं म्हटलं ‘सात’ आणि 4 सागरगोटे दाखवले.
मुनीरला लगेच काही उत्तर सांगता आलं नाही. पण त्यानं 4 च्या पुढे एकेक
सागरगोटा ठेवत मोठ्या रुबाबात उत्तर दिलं, ‘‘सात व्हायला आणखी तीन.’’
 मुलांचा एका गट त्यांना शिकवलेल्या अक्षरांवरून प्रदर्शन मांडत होता. त्यांनी 4
अक्षरं निवडली आणि त्यावरून नाव सुरू होणार्‍या वस्तू गोळा करण्यात ती
गढून गेली. मग त्या वस्तू नीट काळजीपूर्वक मांडून त्यांनी बाकीच्यांना खोटी
खोटी निमंत्रणपत्रं वाटली आणि प्रदर्शन बघायला बोलवलं.
खेळातून मुलांच्या संकल्पना स्पष्ट होतात. त्यांना नवनवीन गोष्टी शोधण्याची,
कल्पना करण्याची आणि अनुभवाचा त्यांना कळलेला अर्थ मांडण्याची संधी मिळते.
कुठल्याही लहान मुलासाठी वेगवेगळे उपक्रम आणि खेळ ही शिकण्याची नैसर्गिक
आणि सर्वात प्रभावी माध्यमं आहेत.
मात्र मुलांना ज्ञानेंद्रियांनी घेण्याचे ठोस अनुभव मिळतील असं पाहिलं, खेळाच्या
उपक्रमांची तरतूद केली, साहित्य उपलब्ध करून दिलं, म्हणजे शिकणं
परिणामकारक होईलच असं नाही. उपक्रम किंवा त्यांचं त्यांनी खेळणं एवढं पुरेसं

नाही. त्या अनुभवांचा अर्थ समजावून सांगण्यासाठी, त्यांना असलेल्या ज्ञानाशी ह्या
नव्या शिकण्याचा संबंध जोडून देण्यासाठी मुलांना जिव्हाळ्याचं मोठं माणूस लागतं.
मोठी माणसं आणि मुलांमधला संवाद फार महत्त्वाचा असतो. मोठे प्रश्नांची सरबत्ती
करताहेत आणि लहानगे त्यांची उत्तरं देताहेत, असा तो एकतर्फी असू नये. लहान
मुलांचे प्रश्न, त्यांना काय वाटतंय हे मोठे लक्ष देऊन ऐकताहेत, त्याची संगती
लावायला त्यांना मदत करताहेत, अशा प्रकारे परस्परसंवाद होत असेल तर ते
मुलांसाठी उपयुक्त ठरतं, असं अलीकडचं संशोधन सांगतं.
मुलांच्या प्राथमिक शाळा-प्रवेशाच्या तयारीचं काय? भारतातल्या पूर्व-प्राथमिक
अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या अनेक मुलांची पुढील शाळा-प्रवेशाची तयारी अजिबात
झालेली नाही, हे एकामागून एक सर्वेक्षणं दाखवून देत आहेत. त्याचवेळी राष्ट्रीय
शैक्षणिक धोरण 2020 (NEP) आणि निपुण भारत मिशननंही ह्याच मुद्द्यावर
भर दिलेला आहे. त्यांचं म्हणणं, प्राथमिक शाळेत प्रवेश घेण्याआधी मुलांची भाषा,
गणित शिकण्याच्या दृष्टीनं पूर्वतयारी झालेली असली पाहिजे. पूर्व-प्राथमिक
कार्यक्रमांचा हा भागच असायला पाहिजे. महाराष्ट्र राज्याच्या ‘आकार’
अभ्यासक्रमात त्याचा समावेश योग्य प्रकारे केलेला आहे. मात्र इथे ‘तयारी’ हा शब्द
महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ भाषिक साक्षरता हा मुद्दा पाहू. प्राथमिक शाळांतल्या
बर्‍याच मुलांना बाराखडी येत असते. ती वापरून ते शब्द लिहू शकतात; पण
आपण जे वाचतोय त्याचा अर्थ त्यांना कळत असतोच असं नाही.
म्हणजे ही कौशल्यं लवकर शिकली म्हणजे मुलांना अर्थ समजून वाचता येईलच
(आकलनासहित वाचन) असं नाही. ह्यापेक्षा त्यांना समृद्ध करणारे अनुभव,
उपक्रम मिळतील असं पाहणं, त्यांचं शब्दभांडार वाढेल, भाषेचा अधिकाधिक वापर
करता येईल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाचनाची गोडी लागावी म्हणून
त्यांना मज्जा वाटेल अशी गोष्टींची पुस्तकं उपलब्ध करून देणं, त्यांच्याबरोबर ती
मोठ्यानं वाचणं ह्या गोष्टींचा खूप फायदा होताना दिसतो.
हे झालं भाषेबद्दल; पण गणिताच्या बाबतीतही प्राथमिक शाळेतली कितीतरी मुलं
संख्यांचा अर्थ न समजताच बेरजा-वजाबाक्या, गुणाकार-भागाकार अशी आकडेमोड
करताना दिसतात. गणित हा अमूर्त विषय आहे. त्यामुळे मूल पूर्व-प्राथमिकला

असतानाच दोन गोष्टींवर काम होणं आवश्यक आहे : गणिती कौशल्यं त्याच्या
रोजच्या आयुष्याशी जोडली गेली पाहिजेत आणि मूल स्वतः हाताळू शकेल अशा
साहित्याच्या माध्यमातून त्या संकल्पनांची समज निर्माण करायला पाहिजे.
आत्तापर्यंत मी जे काही म्हटलंय, ते फक्त पूर्व-प्राथमिकच्याच नाही, तर इयत्ता
तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनाही लागू आहे. छएझ नेही आता मुलांची पहिली आठ
वर्षं पाया पक्का करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची मानली आहेत. ह्यामागचा हेतू असा
आहे, की समृद्ध बालपणाच्या दिशेनं नेणारा पूर्व-प्राथमिक शिक्षण-प्रवाह प्राथमिक
शाळेच्या पहिल्या 3 वर्षांमध्येही तसाच विनासायास पुढे जावा. हे निश्चितच एक
स्वागतार्ह पाऊल आहे.
एकविसाव्या शतकातल्या शिकण्या-शिकवण्याबद्दल बोलत असताना लहानपणी
होणार्‍या डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापराचा उल्लेख अपरिहार्य आहे. अगदी छोट्या
छोट्या मुलांनाही हल्ली डिजिटल साधनं उपलब्ध करून दिली जातात, ती कशी
‘स्मार्टपणे’ हाताळतात ह्याचं कौतुक केलं जातं. निम्न आर्थिक स्तरातील घरंही
ह्याला अपवाद नाहीत. कधी कधी तर तंत्रज्ञानावरची पालकांची श्रद्धा पराकोटीची
असते. जगभरातील साहित्यात ह्या विषयावर लिहिल्या गेलेल्या फायद्या-तोट्यांची
तुलना केली, तर डिजिटल सॉफ्टवेअर आणि ऑनलाईन शिक्षणाची नवलाई
शिक्षणाच्या पुढील टप्प्यांसाठी राखून ठेवली गेली आणि त्याही पुढे ती विचारपूर्वक
शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी वापरली, तर मला व्यक्तिशः अधिक आनंद होईल.
छोट्या मुलांनी आभासी जगाच्या आधी खरंखुरं जग अनुभवणं गरजेचं आहे. ठोस
अनुभव आणि हाताळायला मिळणारं साहित्य हे सुरुवातीच्या शिक्षणाचा आत्मा
आहेत. त्यापासून आपल्या मुलांना वंचित ठेवायला नको.
झकिया कुरियन
zkurrien@gmail.com
लेखक सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेसच्या (CLR) सहसंस्थापक आणि सध्या मानद
संचालक आहेत. वंचित मुलांच्या विकास आणि शिक्षणासाठी अभ्यासक्रम ठरवणे,

प्रशिक्षण कार्यक्रम घेणे तसेच विविध शिक्षणसाहित्यनिर्मिती असा त्यांच्या कामाचा
चौफेर आवाका आहे.
अनुवाद : अनघा जलतारे