अनघा जलतारे

लॅडन लष्करी ह्या मुलीचा ‘व्हॉट डज लव मीन?’ हा लेख मध्यंतरी माझ्या वाचण्यात आला. चार ते आठ वर्षे वयाच्या मुलांबाबत केलेल्या सर्वेक्षणावर हा लेख आधारलेला आहे. अर्थात, हे सर्वेक्षण परदेशात केलेले असल्यामुळे मुलांची काही उत्तरे आपल्या परिप्रेक्ष्याच्या बाहेरची आहेत. ह्या वयोगटातल्या मुलांना एक प्रश्न विचारण्यात आला होता – ‘प्रेम म्हणजे तुला काय वाटते?’ यावर मुलांची उत्तरे, त्यांचा प्रतिसाद थक्क करणारा होता. आपण कल्पना करू शकू त्यापेक्षा त्यांची उत्तरे खूपच व्यापक आणि सखोल होती. एवढ्या लहान वयातली त्यांची समज, प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुखावणारा आहे.

आठ वर्षांच्या रिबेकाला हा प्रश्न विचारल्यावर ती म्हणाली, “माझ्या आजीला संधिवात झाल्यामुळे तिला खाली वाकून पायाच्या नखांना नेलपॉलिश लावता येईना. माझ्या आजोबांनाही खरे म्हणजे संधिवात आहे. त्यामुळे त्यांचे हात जखडलेले असतात, तरीही आजीला आवडते म्हणून ते तिला दरवेळी नेलपॉलिश लावून देतात. हे आहे प्रेम!” कौतुक वाटले ना रिबेकाचे उत्तर वाचून? ‘या मुलांना काय कळणार प्रेम म्हणजे काय ते?’ हे वाक्य आपण घासून घासून किती गुळगुळीत करून टाकले आहे.

आता चार वर्षांचा बिली काय म्हणतोय बघा. “तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती तुमचे नाव वेगळेच उच्चारते. तुम्हाला कळतेच की ह्यांच्याकडे आपले नाव सुरक्षित आहे.”

“तुम्ही दमले भागलेले असताना तुम्हाला हसवते ते प्रेम!” चार वर्षांची टेरी.

डॅनी आहे सात वर्षांचा. त्याचे उत्तर ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तो म्हणतो, “माझी आई माझ्या बाबासाठी कॉफी करते आणि ती चांगली झाली आहे न याची खात्री करण्यासाठी बाबाला देण्याआधी प्रेमाने एक घोट स्वतः पिऊन बघते.”

बॉबीदेखील सात वर्षांचाच आहे. त्याचीही प्रेमाची कल्पना वस्तूंच्या पलीकडची आहे. तो म्हणतो, “ख्रिसमसच्या दिवशी तुम्ही मिळालेल्या भेटींमध्येच गुंतून न पडता खोलीत आजूबाजूला काय चाललेले आहे याकडे जरा कान दिलात, तर तिथे तुम्हाला प्रेम दिसेल.” केवढी परिपक्वता आहे एवढ्याशा चिमुरड्याकडे.

आजच्या जागतिक अशांततेच्या, जागोजागी त्वेषाने आणि हिरिरीने लढल्या जाणाऱ्या युद्धांच्या पार्श्वभूमीवर ‘प्रेम म्हणजे काय?’ या प्रश्नाला सहा वर्षांच्या निक्काने दिलेले उत्तर जीव ओवाळून टाकावा असेच आहे. अशा लाखो-कोटी निक्कांची आज पृथ्वीला गरज आहे. तो म्हणतो, “प्रेमाचा अर्थ तुम्हाला अधिक चांगला समजून घ्यावासा वाटत असेल, तर त्याची सुरुवात तुम्ही तुमच्या नावडत्या मित्रापासून करा.”

सात वर्षांच्या नोएलच्या मते प्रेम म्हणजे समजा तुम्ही एखाद्या मुलाला म्हटले, की तुझा शर्ट मस्त आहे, मला आवडला, आणि मग तो रोज तोच शर्ट घालून येऊ लागतो… किती गोड कल्पना आहे प्रेमाची.

आठ वर्षांची छोटुकली सिंडी प्रेमाचा तिला कळलेला अर्थ सांगते. “एका कार्यक्रमात मी पियानो वाजवणार होते. मी स्टेजवर गेले पण समोर एवढे लोक बघून मी तर अगदी घाबरूनच गेले. सगळे आपले माझ्याकडेच टक लावून पाहताहेत! पण माझा बाबा मात्र हसऱ्या चेहऱ्याने माझ्याकडे बघत होता, लाटेसारखे आपले हात हलवत होता. एवढ्या माणसांमध्ये तो एकटाच हे करत होता. माझी भीती कुठच्या कुठे पळून गेली.”

“चिकन केले की आई त्यातला सर्वात चांगला तुकडा बाबाला देते प्रेमाने”, पाच वर्षांची चिमुरडी एलन म्हणाली.

सात वर्षांच्या ख्रिसला आईचे बाबाबद्दलचे प्रेम जाणवते. तो म्हणाला, “बाबा बाहेरून येतो तेव्हा त्याचे कपडे घामेजलेले, चुरगळलेले असतात; पण तरी आई बाबाला म्हणते की तो रॉबर्ट रेडफॉर्ड ह्या हिरोपेक्षाही हॅन्डसम आहे. तेव्हा ती त्याच्यावर किती प्रेम करते हे मला कळतं.”

चार वर्षांच्या छोट्याशा मेरीचे आपल्या कुत्र्याच्या पिल्लावर फार प्रेम आहे. त्याचेही तिच्यावर प्रेम आहे आणि मेरीला ते कळते. ती म्हणते, “दिवसभर पिल्लूला घरात एकटं सोडून गेलं, तरी घरी आल्यावर ते प्रेमानं माझा चेहरा चाटायला लागतं. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे.”

चार वर्षांच्या लॉरेनची प्रेमाची व्याख्या वाचून आपल्याला हसू फुटते आणि त्याचा निरागसपणा पाहून मन भरूनही येते. तो म्हणतो, “माझ्या मोठ्या बहिणीचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आपले सगळे जुने कपडे ती मला देऊन टाकते. त्यामुळे तिला बाजारात जाऊन नवीन कपडे आणावे लागतात.”

केरन सात वर्षांची आहे. तिला कळलेला प्रेमाचा अर्थ एखाद्या कवीमनालाच सुचणे शक्य आहे. ती म्हणते तुम्ही दुसऱ्यावर प्रेम करता तेव्हा तुमच्या पापण्यांची उघडझाप होत असते आणि छोट्या छोट्या चांदण्या तुमच्यामधून बाहेर पडतात.

जेसिका फक्त आठ वर्षांची आहे. तिने काय सांगितले पाहा. “तुम्हाला मनापासून तसं वाटल्याशिवाय कुणालाही आय लव यू म्हणू नका. मात्र खरंच तसं वाटत असेल, तर ते पुन्हापुन्हा म्हटलं पाहिजे. लोक विसरून जातात नाहीतर.”

या सर्वेक्षणातला शेवटचा किस्सा अचंबित करणारा आहे. लेखक, व्याख्याता लिओ बुस्कॅलिया यांनी हा किस्सा सांगितला. ते एकदा एका स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गेले होते. स्पर्धेत भाग घेतलेल्या मुलांमधून सर्वात सहृदय मूल शोधून काढणे हा त्या स्पर्धेचा उद्देश होता. पण सहृदयता वयावर अवलंबून नसते हेच ह्या निकालाने सिद्ध केले. कारण स्पर्धेत विजयी ठरलेल्या मुलाचे वय होते अवघे चार वर्षे. झाले असे, की त्या मुलाच्या शेजारी एक काका-काकू राहायचे. या मुलाची त्यांच्याकडे दिवसातून किमान एक फेरी ठरलेली असायची. मधल्या काळात काकू अचानक वारल्या. काकांना रडताना पाहून हा मुलगा शांतपणे त्यांच्या मांडीवर जाऊन बसला. नंतर त्याच्या आईने त्याला विचारले, की तू त्यांच्याशी काय बोललास? मुलगा म्हणाला, “काही नाही ग, मी फक्त त्यांना रडताना सोबत केली. I just helped him cry.” एवढ्या लहान वयात ही समज!

‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’ असे समोरच्याला उघड उघड शब्दांमध्ये निःसंकोचपणे म्हणणे आपल्याला जरा जडच जाते. आणि कुठल्याही नात्याला ते लागू आहे. आपल्याकडे ना आईबाप आपल्या मुलांना तसे सांगत, ना मुले आपल्या आईवडिलांना. बाकी भाऊ, बहीण, काका, मामा, आत्या, मावशी… कोणी कोणावरचे प्रेम शब्दांनी व्यक्त करायला जात नाही. बोलून कशाला दाखवायला हवे असा आपला मराठी खाक्या.

या मुलांची उत्तरे वाचल्यावर वाटले, एवढ्या कमी वयात प्रेम ही भावना, तिचा अर्थ त्यांना कसा कळला असेल? काही एक विचार केल्यानंतर वाटले, ज्यांनी आयुष्यात निखळ प्रेमाचा स्वतः अनुभव घेतला असेल त्यांना न शिकवताच ही गोष्ट आपोआप कळत असणार. पण मग मोठेपणी प्रेमाबद्दलची समज संकुचित का होत जाते?

म्हणजे समज आणि वय यांचे प्रमाण व्यस्त असते की काय?

अनघा जलतारे

anagha31274@gmail.com

पालकनीतीच्या कार्यकारी संपादक.