बाबा पाव जमिनीवर फेकतो तेव्हा


व्हेन डॅडी वॉज अ लिटिल बॉय अलेक्झांडर रास्किन
अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश


लहानपणी बाबाला सगळ्या चविष्ट गोष्टी आवडायच्या. त्याला सलामी आवडायची.
त्याला चीज आवडायचं. त्याला मीटबॉल आवडायचे. पण त्याला पाव मात्र अजिबात
आवडायचा नाही. कारण त्याला सदा सर्वकाळ हेच ऐकवलं जायचं, ‘तुझा पाव
खायला विसरू नकोस!’
पण पाव काही ‘यम्मी’ नव्हता. आणि पाव खाण्यात काही मजाही नव्हती. छोट्या
बुद्धू बाबाला तरी असंच वाटत होतं. त्यामुळे जेवताना, नाष्ट्याला तो क्वचितच
पाव खायचा. त्याला वाढलेल्या पावाचे तो छोटे गोल गोळे करायचा. कधी मधला
मऊ भाग खाऊन कडा टाकून द्यायचा. कधी टेबलक्लॉथच्या खाली पाव लपवायचा
आणि खाल्ला म्हणून खोटंच सांगायचा. त्यानं ठरवून टाकलं होतं, की मोठं
झाल्यावर तो अजिबात पाव खाणार नाही म्हणून. आणि त्याच्या मुलांनाही खायला
लावणार नाही.
बुद्धू बाबा स्वतःशीच म्हणायचा, ‘पावच खायचा नाही हे कसलं भारी असेल ना! मी
म्हणेन, आज आपण नाश्त्याला काय बरं खाऊ या? चीज? आणि आपण पावात न
घालता नुसतंच चीज खाऊ. आणि सलामीसोबतही पाव नाही. पावाशिवाय रात्रीचं
जेवण किती भारी लागेल! सूप आणि मांसासोबतही पाव नाही. काय मस्त आयुष्य
असेल ते! मधल्या वेळच्या खाण्यातही पाव नाही.’ उद्या दिवसभरात अजिबात पाव
खावा लागणार नाहीय असा विचार करत झोपायला जाण्यात काय सुख असेल, असं
छोट्या बाबाला वाटत होतं. त्यामुळे कधी एकदाचा मोठा होतोय, असं त्याला झालं
होतं.
हा विचार कसा चुकीचा आहे, हे त्याला आजी, आजोबा आणि इतर मोठ्या
माणसांनी वेळोवेळी सांगूनही तो ऐकायलाच तयार नव्हता. सगळे त्याला सांगायचे,

की पाव त्याच्यासाठी खरंच चांगला आहे. फक्त वेडा मुलगाच पानात वाढलेला पाव
खाणार नाही. ब्राऊन ब्रेड खाल्ला नाही, तर माणूस आजारी पडेल. अगदी पाव
खाल्ला नाहीस तर शिक्षा होईल इथपर्यंत सांगितलं जायचं; पण तरीही तो पाव
खायचा नाहीच.
एकदा एक भयंकर गोष्ट घडली. छोट्या बाबाला सांभाळायला एक खूप म्हातारी
आजी यायची. तिचं बाबावर खूप प्रेम होतं; पण जेवणाच्या टेबलावर बाबा कुरकूर
करू लागला, की मात्र ती जाम चिडायची. एकदा आजी-आजोबा बाहेर गेले होते.
छोटा बाबा त्याचं संध्याकाळचं खाणं एकटाच खात बसला होता. नेहमीप्रमाणेच
वाढलेला पाव त्याला नको होता. सांभाळणारी आजी म्हणाली, ‘‘तू तुझा पाव खा,
नाही तर मी तुला इतर काहीही देणार नाही.’’
‘‘नाही, मी नाही खाणार.’’ असं म्हणून त्यानं पाव जमिनीवर फेकला.
आजी इतकी चिडली, की रागानं तिच्या तोंडून शब्दच फुटेनात. हे रागवण्यापेक्षाही
भयानक होतं. ती शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली.
अखेर ती म्हणाली, ‘‘तुला काय वाटतं तू पावाचा एक तुकडा जमिनीवर फेकलायस?
नाही, एवढंच नाही. ऐक आता मी काय सांगते ते. लहान असताना एक छोटा
पावाचा तुकडा मिळवण्यासाठी मला दिवसभर बदकांचा थवा सांभाळायला लागायचा.
एका हिवाळ्यात आमच्याकडे धान्याचा एक कणदेखील शिल्लक नव्हता. माझा
भाऊ, साधारण तुझ्याच वयाचा होता, तो भुकेनं मेला. कोणी त्याला पावाचा एक
तुकडा दिला असता तर तो वाचला असता. तुम्हाला लिहायला वाचायला तर
शिकवलं जातं; पण पाव कुठून मिळवायचा हे कुणी नाही शिकवत. धान्य
पिकवण्यासाठी आणि पाव बनवण्यासाठी लोक राब राब राबतात. आणि तू तो
जमिनीवर फेकतो. लाज वाटायला हवी तुला! मला तर तुझ्याकडे पाहावंसंदेखील
वाटत नाही.’’
छोटा बाबा झोपायला गेला पण त्याला धड झोप लागलीच नाही. त्याला भयानक
स्वप्नं पडत राहिली. दुसर्‍या दिवशी सकाळी बाबा उठला. कालच्या प्रकाराची शिक्षा
म्हणून आज दिवसभरात पाव मिळणार नाही, असं त्याला सांगण्यात आलं. बाबाला
बर्‍याचदा शिक्षा म्हणून गोड खायला मिळायचं नाही. कधी कधी त्याला रात्री न

जेवताच झोपी जायला लागायचं. पण पावच खायला मिळणार नाही अशी शिक्षा
त्याला प्रथमच होत होती. ही सगळी त्या आजीची कल्पना होती. एकदम भारी.
बाबानं नाष्ट्याला पावाशिवायचं चीज-सँडविच खाल्लं. ते फारच चविष्ट होतं आणि
खायला फक्त एकच मिनिट लागलं. पण नाष्टा करून झाला, तरी त्याला अजून
भूक होती. त्यानं पाव खाल्ला नव्हता न! रात्रीच्या जेवणापर्यंत कळ काढणं बाबाला
फारच अवघड गेलं. पण पावाशिवाय मीटबॉल खाऊन त्याचं पोटच भरलं नाही.
दिवसभर त्याला पाव-पाव होत होतं. संध्याकाळच्या खाण्यात स्क्रॅम्बल्ड अंडी होती.
पावाशिवाय ती कशीतरीच लागली.
सगळे जण बाबाला हसले. म्हणाले, ‘एक अख्खं वर्ष तुला आता पाव मिळणार
नाहीए, आता तरी खूश आहेस नं?’ पण मग त्यांनी दुसर्‍या दिवशी सकाळी त्याला
पावाचा एकच तुकडा दिला. तो खूपच चविष्ट होता. कोणी एका शब्दानंही काही
बोललं नाही. पण बाबा पाव खाताना सगळे त्याच्याकडे बघत होते. बाबाला अगदीच
वरमल्यासारखं झालं. त्यानंतर मात्र त्यानं नेहमी पानात वाढलेला पाव खाल्ला
आणि पुन्हा कधीच जमिनीवर फेकला नाही.
टीप: आपल्याकडे आपण जवळजवळ प्रत्येक जेवणात पोळी खातो तसं त्यांच्याकडे
पाव खातात. ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि पौष्टिकही. आपल्याकडे
बहुतकरून मैद्याचे पाव मिळतात. त्यामुळे ते क्वचितच मज्जा म्हणून, सोय
म्हणून खावेत. आपण पोळीच खावी.
अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश
opreetee@gmail.com
अनुवादक पूर्णवेळ आई असून लेखन, निसर्गस्नेही पालकत्व, बागकाम, शेती,
पर्यावरण, शिक्षण हे त्यांचे आवडीचे विषय आहेत
सौजन्य : अरविंद गुप्ता टॉईज