बालपण सरताना…..
वृन्दा भार्गवे
न्या, फॉर्ममध्ये विषय कोणकोणते
भरणार?’’
‘‘बाबा सांगतील ना.. ते लिहितील ते विषय घ्यायचे…’’
‘‘लँग्वेज कोणती घेणार?’’
‘‘त्यांच म्हणणं फ‘ेंच घे.. फे‘ंच घेऊ.’’
‘‘अवघड नाही जाणार…’’
‘‘क्लास लावायचा…’’
महाविद्यालयाचा पहिला आठवडा अशा तर्हेच्या संवादाचाही दिसतो. मुलांबरोबर आई-वडील आलेले. प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी फॉर्म-पैशासह लागलेली रांग. महाविद्यालयात कुठेही काऊन्सिलींग नाही. निर्णय स्वत:लाच घ्यायचा असल्यामुळे पाल्य-पालक दोघांवर असलेले दडपण. लहानपणापासूनच मुलांच्या निर्णयाला दुय्यम स्थान दिले गेले असल्यामुळे शक्यतो आपण आपली विचारशक्ती कार्यान्वित करायची नाही, हा मुलांचा बाणा!
पालक फॉर्मवर विषयाच्या पुढे टीक मार्क करणार…
त्यांच्या दृष्टीने सोपा-अवघड विषय तेच ठरविणार…
मुलाला अजूनही कळत नाहीच.
‘अन्या’ देखील आंधळेपणाने फॉर्मवर फक्त सही करणार, कारण त्याचे अक्षरही चांगले नसते. त्याच्याकडून स्पेलींग चुकण्याची दाट शक्यता असते. तो निश्चित गडबड गोंधळ करणार याबद्दल पालकांच्या मनात तिळमात्र संशय नसतो. पालक बरोबर असल्यामुळेच तो हातात पेनही धरत नाही. ‘वेंधळ्यासारखं करून ठेवशील’ हे वाक्य लहानपणापासून त्याने ऐकलेले असते आणि त्याप्रमाणे आपण वागणार, हे त्यानेही गृहीत धरलेले असते.
आई वडिलांनी भरलेला फॉर्म अन्या देतो. नीट पाहून घे वर्ग कुठे आहे तो, उद्यापासून आम्ही येणार नाही इथं… सुनील तू रहात जा हं त्याच्याबरोबर… असं सांगून सुनीलला पालकत्व बहाल करण्यात येते.
अनिल अकरावीत प्रवेश घेतो. पण तो मोठा झालेलाच नसतो. त्याला मित्र जोडण्याची कला येत नसते, ती कशी अवगत करायची याचे ज्ञान नसते. तो एखाद्या मित्राला धरून ठेवायचा आटोकाट प्रयत्न करीत असतो. कॉलेजमध्ये येता-जाताना मित्रांना तो हाक मारायला जातो. त्यांची वाट पाहतो. ते येणार नसतील तर हा कॉलेजला जातच नाही. आई वडील त्याला विचारतात… त्याच्या न जाण्याची कारणे तो सांगतोही… त्यावर मात्र गंभीरपणे विचार होत नाही.
नसेल जात कॉलेजमध्ये.
नसेल त्याचा मूड.
बसला असेल घरी, कंटाळत असेल.
इतकाच विचार काही पालक करतात. परंतु या कारणांच्या मुळाशी थोडं भिडावं असं मात्र वाटत नाही. कधी अनिलच्या पालकांसारखे काही जण त्याला घरातून कॉलेजमध्ये घालवतातच. तासांना बैस… लायब‘रीत जा.. नोटीसेस वाच… रोज काय नवीन घडतंय का ते पहा… असं सांगून त्याला पाठविलं जातं.
हे सगळं तो करतो देखील पण त्यात रस-रुची नसते. तिर्हाईतासारखं घडत असतं. एक प्रकारची भीती आणि प्रश्न विचारल्यानंतर उत्तरं देण्यापुरता असलेला तपशील मुलं गोळा करीत असतात.
अशी मुलं सं‘येने बरीच असतात. त्यांच्यात आणि त्यांच्या पालकांमध्ये नेमकं नातं काय असतं?
नातेसंबंधातच त्रुटी असतात की वाढ होतानाच खुंटण्याची प्रकि‘या सुरू झालेली असते?
मुलांना-मुलींना महाविद्यालयात पाठविणारे पालक पहिल्या दिवशी प्रवेशासाठी जेवढी गुंतवणूक दाखवतात तेवढी टिकवण्याची गरज त्यांना पुढे का भासत नाही?
या प्रश्नांची अनेक उत्तरे आहेत.
महत्त्वाचे हेच की मुलांना मोठं होऊ न देणारे असं‘य पालक सभोवताली आहेत. शालान्त परीक्षेचा निकाल लागला की गुणांच्या टक्केवारीनुसार विशिष्ट शाखा पालकच पक्की करतात. मुलांशी बोलून, प्रत्येक शाखेची सखोल माहिती विस्ताराने त्याच्या समोर मांडून, त्या त्या शाखेची वैशिष्ट्ये त्यांच्यापर्यंत पोचविणारे पालक सं‘येने कमी आहेत.
त्याला काय कळतंय? हे लाडकं पालुपद घेत ‘सगळं कसं रे आई वडिलांनीच ठरवायचं?’ असा उलट प्रश्न मुलाला विचारत संभ‘मावस्थेत ठेवण्याचं काम अनेकदा पालकांकडून घडते. मुलाला लहानपणापासून मोठ्ठ्या सावलीत वाढवलेलं असतं. त्याला कुठेही एकटं सोडलेलं नसतं. ‘थांब, मी येते तुझ्या बरोबर’ हे वरवर अतिशय साधं वाटणारं विधान, पण त्या विधानाशी संबधित अनेक प्रकि‘या घडतात.
सोळा वर्षाच्या मुलामुलीला विश्वासात घेऊन हे विधान केलं गेलं असेल तर ठीक. अन्यथा तुला काहीच येत नाही. मलाच काय ते केले पाहिजे… हा स्वर कायम ठेवून मुलांशी वर्तन केले जाते.
वयाने-जाणिवांनी-विचारांनी मोठी होणारी मुलं स्वत:ला खुजी समजू लागतात. आई बापांशी आई बाप म्हणूनही नाते प्रस्थापित होत नाही. या नात्यात वडीलकीबद्दलचा धाक अधिक, आदर कमी असतो. यांनी सांगायचं आपण ऐकायचं ही भूमिका घट्टपणे बांधून घेतली जाते. महाविद्यालयात जाणे म्हणजे खरे तर एकदम अनो‘या विश्वात जाणे असा प्रकार नसतो. पण घरात त्याविषयी एकतर खूप बोललं जातं किंवा कळेल तुला हळूहळू असं गूढही बोललं जातं.
मुलांना आपल्याजवळ बसवून काही सांगावे. त्यांच्यात घडणार्या शारीरिक, मानसिक, भावनिक बदलांना सामोरं ठेवत त्यांच्याशी वर्तन करावे असा विचार काही पालक करतात – अन्य अनिलच्या पालकांसारखे, ‘आपण सांगू ती पूर्व’ या चालीवर त्याचं जीवन (बि)घडविणारे! वडीलधार्या मंडळीकडे वयानुरूप येणारे मोठेपण असते. अनुभवांनी येणारे शहाणपण असते. व्यवहारज्ञानही असते. परंतु मुलाचा वकूब ओळखून तो जसा आहे, जितपत आहे, ते मान्य करण्याची हिंमत नसते.
हा किंवा ही माझ्यापोटी जन्माला आली..
लहानपणापासून नसानसाने ओळखते मी तुला.. असं वाक्य प्रेमातून नव्हे… तर ‘तू’ काय ‘चीज’ आहेस हे मला माहीत आहे, तुझ्या मर्यादा आणि तुझ्यातील काही करण्याचं सामर्थ्य.. याची नोंद मी घेऊ शकते. अशा विधानांनी या मुलांचं लहानपण सरलेलं असतं.
ही मुलं महाविद्यालयात मग चमकूच शकत नाहीत. मुली ‘आई रागवेल, बाबांना आवडत नाही. मी कॉलेजच्या वेळेपेक्षा अधिक थांबलेले.. चालले..’ असं म्हणून तात्काळ घरी जातात. मुलं बारावीनंतर… आता काय करू. हा प्रश्न घरी विचारतात. ‘जा फावल्या वेळात कॉम्प्युटरला’ असं म्हटलं तर तो क्लास लावतात, प्रथम टायपिंग शिक-असं कुणी सांगितलं तर तसं करतात.
कधीतरी वाद घालण्यासारखा प्रसंग आला तरी त्यांना त्यांची म्हणून बाजू मांडता येत नाही. तसा सरावही नसतो.
ही मुलं आज्ञाधारक असतात का?
आई वडिलांच्या अर्ध्या वचनात असतात का?
ती अधिक चांगली असतात का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे होकारार्थी नाहीत.
लादलेला आज्ञाधारकपणा अधिक घातक असतो. लहानपणापासून स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार गमावून बसलेली ही दुबळी मनं ‘आज्ञाधारकते’च्या नावाखाली विनम‘ जीवन जगतात. पण स्वत:ला फसवत, स्वत:ला मारत!
सांगेल ते व तसे ऐकायची सवय झालेली ही मुलं. मनातल्या कोपर्यात अस्वस्थ असतात. मित्रांपुढे ती दबतात, त्यांच्या शेलक्या विशेषणांनी स्वत:ला अधिक दुर्बल समजतात. आपले मित्र पुढे काय बनणार. हे ठरवूनच अमूक एका शाखेकडे प्रवेश घेतात, वेगवेगळ्या परीक्षा देतात…. आणि आपण कोणताही निर्णय न घेता ढकल दिवसाला सामोरे जातो.. त्यांच्यासमोर त्यांचे लहानपण येते.
पण आता विरोध करण्यासारखं जवळपास काही नसतं.
अशी मुलं वर्गात बसतात, विशेष लक्ष देत नाहीत. आई वडिलांबद्दलचे प्रेम आणि निव्वळ आदर यामधून स्वत:संदर्भातले मूल्यमापन त्यांना करता येत नाही. ‘मी काय करू?’ हा एकमेव प्रश्न घेऊन ते या वडीलधार्यासमोर येतात… आणि स्वत:चे आयुष्य अधिकच दु:खी करतात !