भान येताना


नीता सस्ते व मधुरा राजवंशी
शाळा संपून दुसर्‍या दिवसापासून परीक्षा सुरू होणार होती. सातवीच्या वर्गात
मराठीच्या ताई मुलांना परीक्षेबाबत काही सूचना देत होत्या. मुले खाली सतरंजीवर
बसली होती. मागे बसलेल्या मुलग्यांचे आपापसात काहीतरी चालले आहे हे ताईंच्या
लक्षात आले. एक चिठ्ठी पास होते आहे हे त्यांच्या नजरेस पडले. त्यांनी ती
चिठ्ठी मागवून घेतली. मुले भीतीने एकमेकांची नावे सांगू लागली. काही जण
म्हणाले, ‘‘ताई, चिठ्ठी आमची नाही. इथे सतरंजीखाली आधीपासूनच होती.’’ ताईंनी
चिठ्ठी ताब्यात घेतली. कोणी लिहिली विचारता कोणाकडूनच उत्तर आले नाही. तास
संपल्यावर त्या माझ्याकडे आल्या. वर्गशिक्षिका म्हणून मला वर्गात घडलेला प्रकार
सांगून ती चिठ्ठी दिली. मला वाटले, लिहिले असेल असेच काहीतरी; परंतु चिठ्ठी
वाचण्यास सुरुवात केली आणि पायाखालची जमीनच सरकल्यासारखे झाले. ज्या
मुलांची लहानपणची निरागसता, भाबडे विचार पाहून मन भरून यायचे त्यातीलच
एक-दोन मुलांची लिखाणातील ती भेसूरता पाहून मलाच लाजेने अर्धमेल्यासारखे
झाले. मनात काहूर, बैचेनी वाढली; परंतु स्वतःला सावरून घेतले.
सायंकाळी मंजूताईंना* घडलेला प्रकार सांगितला. चिठ्ठीतील शब्द मला धड
सांगताही येईनात म्हणून चिठ्ठीचा फोटो पाठवला. चिठ्ठी वाचून त्यांना मुलांच्या
मानसिक स्थितीचा अंदाज आला. कोविडकाळात मुलांचा मोबाईलशी आलेला संबंध,
मोठ्या मुलांची संगत, एकटेपणा याचा हा परिणाम आहे हे समजण्यास त्यांना वेळ
लागला नाही. मुलांशी लगेच बोलण्यापेक्षा परीक्षा संपल्यानंतर बोलावे असे त्यांनी
सुचवले.
एका मुलाचे नाव त्या चिठ्ठीत लिहिलेले असल्यामुळे तो खूपच अस्वस्थ झाला
होता. तो घरी रडत होता असे त्याच्या पालकांनी सांगितले. पेपर लिहिण्यापूर्वी
मुलांची ही अस्वस्थता दूर व्हावी म्हणून मधुराताई मुलांशी बोलल्या, ‘‘झाले ते
योग्य झाले नाही, परंतु आम्ही तुमच्या पालकांना इतक्यात कळवणार नाही,
तुम्हाला कोणत्याही प्रकारची शिक्षा केली जाणार नाही. त्यामुळे तुम्ही ताण घेऊ

नका. मात्र हा गंभीर विषय आहे. त्यावर बोलणे आवश्यक असल्याने शेवटचा पेपर
झाल्यानंतर आपण नीट बोलणार आहोत.’’
मुलांना थोडा दिलासा मिळाला.
शेवटचा पेपर झाल्यानंतर सातवीची मुले मंजूताईंसोबत हॉलमध्ये जमली. वर्गात
घडलेल्या घटनेमागचे कारण जाणून घेताना चर्चा मोबाईलकडे वळली. वर्गातील सहा
विद्यार्थ्यांकडे त्यांचे स्वतःचे फोन असल्याचे निदर्शनास आले. ही गंभीर बाब होती.
जे झाले त्याचे कारण काय आणि असे काही घडू नये, स्वतःशी व इतरांशी आपले
नाते निरोगी राहावे यासाठी मुलांच्या स्वतःकडून, पालकांकडून आणि शिक्षकांकडून
काय अपेक्षा आहेत यावर मंजूताई मुलांशी बोलल्या. मुलांकडून आलेल्या अपेक्षा बघू
या –
स्वतःकडून असलेल्या अपेक्षा प्रत्यक्षात आणायला अवघड असल्या तरी मुले असा
विचार करत आहेत हे महत्त्वाचे वाटले.
शाळेत घडलेले पालकांना सांगूच नये असे एका मुलाचे म्हणणे होते. पण पालकांवर
तुमची मुख्य जबाबदारी असल्याने काही गंभीर गोष्ट घडली तर त्यांना सांगणे ही
शाळेची जबाबदारी आहे असे सांगितल्यावर त्याला ते पटले. तरीही ‘लगेच सांगू
नये’, त्या घटनेची झळ जरा कमी झाल्यावर बोलावे याबद्दल मुलांचे एकमत होते.
प्रसंग घडल्या घडल्या रागाच्या भरात काय प्रतिक्रिया (ीशरलींळेप) दिली जाईल हे
सांगता येत नाही. त्यापेक्षा नंतर शांततेत प्रतिसाद (ीशीिेपीश) द्यावा ही गोष्ट या
मुलांकडून शिकण्यासारखी वाटली.
शाळेत काय झाले ते घरी सांगितल्यावर आपल्यालाच मार बसल्याचे एका मुलाने
सांगितले. त्याने ना चिठ्ठी लिहिली होती, ना पाहिली होती. एक विद्यार्थी
म्हणाला, ‘आता आमचे पालक आमच्याशी जसे वागत आहेत तसे आम्ही आमच्या
मुलांशी अजिबात नाही वागणार.’ पालकांपर्यंत हे पोचवणे अत्यावश्यक होते.


दुसर्‍या दिवशी सातवीच्या वर्गाची पालकसभा बोलवली. दुर्दैवाने निम्मेच पालक
उपस्थित होते. मंजूताईंनी मुलांचे म्हणणे पालकांसमोर मांडले. लॉकडाऊनमध्ये मुले
कोंडली गेली होती. त्यांची अवस्था मोठ्यांपेक्षाही वाईट झाली होती. ती टीव्ही,

मोबाईलवर काय पाहत होती याकडे मोठ्यांचे पुरेसे लक्ष नव्हते. या वयात मुले
वेगळ्या मार्गाकडे वळली तर त्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होऊ शकतो,
त्यामुळे पालकांनी सजग राहणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मंजूताईंनी मांडले.
13-14 व्या वर्षी आपण मोठे झालो आहोत, आता मोठ्या मुलांसोबत उठले-बसले
पाहिजे ही भावना मुलांमध्ये बळावते. मुली शक्यतो आईच्या आसपास असतात;
पण मुलगे लांब जायला लागतात. ‘आम्हाला कुणी जवळ घेत नाही’ हे मुलग्यांचे
म्हणणे मंजूताईंनी पालकांसमोर ठेवले. इथे बाबांची भूमिका खास महत्त्वाची
असल्याचे त्यांनी सांगितले. मुलग्यांना जवळ घेणे, त्यांच्याशी बोलणे फार गरजेचे
आहे. ‘आमच्याशीपण कुणी बोललं नव्हतं. आम्ही नाही का नीट वाढलो?’ या
प्रश्नाला काहीच अर्थ नाही, कारण आता काळ खूप बदलला आहे. पूर्वी इतक्या
सहजतेने माहिती आणि दृश्यात्मक मनोरंजन उपलब्ध नव्हते. त्यामुळे सजग न
राहणे, मुलांशी संवाद नसणे आजच्या काळात अतिशय महाग पडू शकते.
अंतर्मुख करणारा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मंजूताईंनी पालकांसमोर ठेवला.
मुलाची प्रत्येक उर्मी आपण मारत आहोत का? मुलाने काहीही करू का, कुठे जाऊ
का, विचारले तर आपले पहिले उत्तर ‘नाही, नको’ का बरे असते? आपल्याला
काळजी वाटते हे समजण्यासारखे असले, तरी आज मुले घरात बसून जे करत
आहेत त्यामुळे काळजी वाढत नाही का? त्यापेक्षा मूल पोहायला, सायकल
चालवायला, बोरे काढायला गेलेले परवडले. त्यात शारीरिक कष्ट आहेत, निखळ
आनंद आहे. कुणासोबत चालला आहेस आणि किती वाजता परतशील एवढे
विचारावे, बस. आणि हो, मुलाने वेळ पाळली तर त्याबद्दल त्याचे कौतुक करायला
अजिबात विसरू नये.
काही मुलांनी मार मिळाल्याचे सांगितले होते. त्याबद्दलही मंजूताई बोलल्या.
पालकांना अपराधी वाटत असावे, आपण कुठे कमी पडलो का ही भावना जोर धरून
त्याचे रूपांतर रागात होत असावे. यामुळे मुले जास्तच दुरावतात. असे काही शाळेत
झालेले घरी सांगायची मुलांना भीती वाटते कारण मग बोर्डिंग-स्कूलला पाठवण्याची
धमकी मिळते. मुले बोलायची थांबतात. त्यांच्या मनात काय चालले आहे हे जाणून
घ्यायचे आपले रस्ते बंद होतात.


मग पालकांनी नक्की करायचे तरी काय? वाढत्या वयाच्या या मुलांशी वागायचे
कसे? काही सूचना पालकांकाडूनच आल्या. मंजूताईंनी त्यात भर घातली.
संवाद – चौकशी किंवा उलटतपासणी नव्हे. ‘शाळेत काय-काय झाले?’ ‘अभ्यास
झाला का?’ यावरच संवाद थांबू नये. मुलांच्या आवडीच्या गोष्टींबद्दल त्यांच्याशी
गप्पा मारा. तुमच्या कामाबद्दल सांगा. तुमचा दिवस कसा गेला, शेतावर,
दुकानात, बँकेत काय झाले, कोण भेटले, कुणाला मदत केली, कुणामुळे त्रास झाला,
कामाचे ओझे वाटले की ते करायला मजा आली याबद्दल बोला. मुलांना बाबांच्या
आयुष्याबद्दल काही माहीतच नसते. संवादातून त्यांना बाबा कळतील. आईनेही
तिचे काम, आवडीनावडी याबद्दल मुलांशी बोलावे. घरकाम करणारी आणि आपली
काळजी घेणारी व्यक्ती एवढीच तिची ओळख न राहता स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून
ती मुलांसमोर यायला हवी.
ताज्या घडामोडी आणि बातम्यांबद्दल मुलांशी चर्चा करा. कायदा काय म्हणतो,
जनतेचे म्हणणे काय आहे ते मुलांना सांगा. मुलांसोबत वर्तमानपत्र, पुस्तके यांचे
वाचन करा. मुलांशी बोलायला, चर्चा करायला त्यातून विषय मिळतात.
व्हॉट्सअपवर येणार्‍या बातम्यांपासून दूरच राहिलेले बरे.
एकत्र काही गोष्टी करणे – स्वच्छता, सामान आणणे, स्वयंपाक अशा रोजच्या
कामांमध्ये मुलांना सहभागी करून घ्या. घराचे महिन्याचे बजेट समजून घेऊ द्या.
मुलांच्या खेळांमध्ये भाग घ्या. त्यांच्या मित्र-मैत्रिणींना घरी बोलवा. त्यांच्याशी गप्पा
मारा, खेळा. मुलांना फिरायला घेऊन जा. वर्गातल्या मुलांच्या एका गटाला घेऊन
सायकल-सहल काढा. यातून मुलांशी जुळणारे बंध फार सुंदर असतील. कुठे जायचे
आहे, तिथे काय काय करायचे हे मुलांना ठरवू द्या. वाढदिवसाला काय कार्यक्रम
करायचा याचे नियोजन त्यांना करू द्या. मुलांना मोकळीक द्या. त्यांच्या प्रत्येक
गोष्टीचा कीस पाडू नका.
मॉडेलिंग – मुलांनी जे करणे आपल्याला अपेक्षित आहे ते आपण करतो ना हे
नक्की तपासावे. आपली भाषा तपासून बघा. पालकांकडून शिव्या शिकलेली कित्येक
मुले आहेत. स्वतः मोबाईल कमी पाहा.

विश्वास – मुलांवर, त्यांच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवा. मुलाने एखादी गोष्ट
करण्यासाठी तुमचा नकार का आहे, किंवा एखादी गोष्ट त्याने / तिने करावी असे
तुम्हाला का वाटते याची कारणमीमांसा द्या.
मोबाईलचा कमीतकमी वापर – मोबाईलचे प्रलोभन टाळणे भल्याभल्यांना शक्य होत
नाही. त्यामुळे घरात जादाचा मोबाईल उपलब्ध नसणे हेच चांगले. मुलांसमोर फोन
ठेवायचा आणि मग त्यांनी तो कमी वापरावा अशी अपेक्षा करायची याला काहीच
अर्थ नाही. काही कामासाठी मुलांकडे मोबाईल दिलाच, तर मुले काय पाहत आहेत
याची पालकांना माहिती असावी. स्वतः मोबाईल कमी वापरा. मुलांना मैदानी खेळ
खेळायला पाठवा.
पालकसभेतून एक नवे भान घेऊन पालक शाळेबाहेर पडले असतील अशी आशा
वाटते.


परीक्षेनंतरही काही दिवस मुले शाळेत येणार होती. दुसर्‍या दिवशी मैदानावर गप्पा
मारत थांबलेल्या सातवीतल्या 3-4 जणांना मंजूताई म्हणाल्या, ‘‘तुम्ही व्हॉलन्टिअर
म्हणून मला मदत करणार का?’’ मुले हो म्हणाली. एकाने हळूच विचारले, ‘‘ताई,
व्हॉलन्टिअर म्हणजे काय?’’ मंजूताई हसल्या आणि म्हणाल्या, ‘‘म्हणजे बिनपगारी,
स्वेच्छेनं काम करायचं.’’ मुले उत्साहाने तयार झाली. ‘‘आम्हाला मंजूताईंनी
व्हॉलन्टिअर म्हणून निवडले आहे,’’ हे ती अभिमानाने सांगत होती. पुढे आठवडाभर
मुले रोज सकाळी आठ वाजता ग्रंथालयात हजर असायची. ग्रंथालयाच्या ताईंबरोबर
स्टॉक-चेकिंगचे काम करायचे आणि मग अभ्यास आणि खेळ. या वयातील मुलांना
मोठे झाल्याची जाणीव असते. त्यांना काम करायला हवे असते. जबाबदारी घेणे
त्यांना आवडते.


पालकांनी सजग राहणे, मुलांशी संवाद असणे महत्त्वाचे आहेच; पण या वयातील
मुलांना स्वतःच्या व इतरांच्या शरीराबद्दल, मनाबद्दल, लैंगिकतेबद्दल, मानवी
नातेसंबंधांबद्दल माहिती मिळणे, त्याबद्दल त्यांचा विचार होणे फार गरजेचे आहे.
लैंगिकतेचे अवडंबर न माजवता ही नैसर्गिक बाब आहे हे समजल्यास मुले मोकळी

होतात. त्याबद्दल कुठूनतरी अशास्त्रीय माहिती मिळवण्याची उत्सुकता राहत नाही.
ह्या सार्‍याचा विचार करून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच सातवीतून आठवीत
गेलेल्या या मुलांसाठी पुण्याच्या ‘आरोग्यभान’ संस्थेचे ‘रिलेशानी’ हे शिबीर घेतले.
मुलांमध्ये हळूहळूच पण आश्वासक पद्धतीने होत असलेले बदल अनुभवणे हा
सध्या आमच्यासाठी आनंदानुभव ठरतो आहे.
नीता सस्ते व मधुरा राजवंशी
nitasastephaltan@gmail.com
rmadhuraa@gmail.com
नीता सस्ते
कमला निंबकर बालभवनमध्ये क्रीडाशिक्षक असून इयत्ता आठवीच्या वर्गशिक्षक
आहेत.
मधुरा राजवंशी
कमला निंबकर बालभवनमध्ये शिक्षण समन्वयक आणि इंग्रजीच्या शिक्षक आहेत.

  • मंजूताई निंबकर या शाळेच्या माजी मुख्याध्यापक आणि प्रगत शिक्षण संस्थेच्या
    माजी संचालक. 25 वर्षांहून अधिक काळ शिक्षणक्षेत्रात काम करण्याचा त्यांना
    अनुभव आहे. लेखाचा बराचसा भाग हा मंजूताईंचे सातवीची मुले आणि
    पालकांसोबत झालेल्या बोलण्यावर आधारित आहे.