मलकप्पा मला पण भोवरा शिकव ना –
माझ्या वर्गातील पाहिलीतला मलकप्पा हा मुलगा रोज वर्गाला अनियमित असणारा, पुर्ण वेळ वर्गात न बसणारा, मनाला वाट्टेल तेच करणारा आणि अभ्यासाच नाव काढलं की पळ काढणारा असा आहे.
आज अचानक वर्गात भोवरा घेऊन आला. दारा आडून येऊ का असं विचारलं. तर मी त्याला म्हणाले, “मलकप्पा मला पण भोवरा शिकव ना!” त्याला ते खोटं वाटलं आणि तो बाहेर पळून जाऊ लागला. मी त्याला म्हणाले, “अरे खरंच मला येत नाही, शिकायचा आहे”, असे म्हटल्यावर तो आत आला. त्याने दोन वेळा मला भोवरा कसा फिरवतात हे फिरवून दाखवले आणि तिसऱ्या वेळेला माझ्या हातात ती दोरी देऊन, कशी पकडायची आणि तो पुढे कसा फेकायचा हे शिकवले. पहिल्या वेळेस मला जमले नाही पण दुसऱ्या वेळेला मी प्रयत्न केल्यावर मला जमले.
वर्गात तो रूळत नाही म्हणून आज त्याचा भोवरा हाच कुतूहल म्हणून सगळ्यांना बघायला दिला. काहींनी खेळून पाहिले. किती जणांना भोवरा फिरवता येतो हे मलाही समजले. मुलींना मात्र भोवरा फिरवायला येत नव्हता. एक दिवस मुलींना भवरा शिकवण्याचाच उपक्रम घ्यायचा असं मी लगेचच ठरवून टाकलं.
आज मला त्याच्यामध्ये खूपच वेगळा बदल जाणवला वर्गाला न बसणारा मुलगा आज पुर्णवेळ वर्गाला बसून मी सांगेल ते ऐकत होता आणि पूर्ण करत होता.
दुसऱ्या दिवशी वर्ग चालू झाला आणि मलकप्पा दारात येऊन उभा राहिला. “सारिका ताई आल्याशिवाय वर्गात येणार नाही”, असे म्हणाला मी आल्यावर तो वर्गात आला.
मुलांकडूनही शिक्षण्यासारखे खूप काही असते, आपण ते समजून घेऊन पुढे आले पाहिजे. कधी कधी रोल बदललेले मुलांना तर अवडतातच पण आपल्यालाही काही नवीन शिकवून जातात.
खेळघर, प्राथमिक गट, सारिका जोरी.