मी मराठी शाळेत शिकवतोय – फारुख काझी
मी मराठी शाळेत शिकवतोय
मी मराठी शाळेत शिकवतोय.
इंग्रजी शाळेकडे जाणारा लोंढा वाढत असताना,
मी मराठीतून शिकवतोय.
मी भाषा नाही,
जगण्याचं एक अंग शिकवतोय.
मी माती अन्
पायांना लागणारा चिखल शिकवतोय…
मी मायेनं आईनं ‘गोदीत घेणं’
काजळाची तीट लावणं
अन पोटाला चिमटा घेऊन स्वत:च्या,
लेकराच्या मुखी घास भरवणं शिकवतोय…
मी मराठी शिकवतोय.
बोली अन प्रमाण या वादाच्या पलीकडचं
वांझोट्या समीक्षेपलीकडचं
‘बहुभाषिकतेचं’ स्वप्न उराशी घेऊन
काही ‘आपलसं’ शिकवतोय
मी जीवनभाषा शिकवतोय…
मी खेड्या-पाड्यातनं
पहिल्यांदा शाळेत येणाऱ्या पिढ्यांना
हात धरून शिकण्याच्या वाटेवर नेतोय,
त्यांना स्वत:ची ओळख न पुसू देता
नवी ओळख बनवायला हात देतोय
मी स्वप्नांचे पंख देतोय…
मी मराठी शिकवतोय
धडे अन कवितांसोबतच
पुरोगामी महाराष्ट्राचं
छोटंछोटं बी मनामनात रुजवतोय..
मी मराठी शिकवतोय…
मी मराठी शाळेत शिकवतोय…
(इथे मराठी म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बोलली जाणारी हरतर्हेच्या मराठीची रूपे असा अर्थ आहे. केवळ प्रमाण भाषा नाही.)
फारूक काझी
faruk_skazi@yahoo.com
8275459276