मुलांच्या शंभर भाषा

मूल

शंभराचं आहे.

मुलाकडे आहेत, 

शंभर भाषा

शंभर हात 

शंभर विचार 

खेळण्याच्या, बोलण्याच्या, विचार करण्याच्या पद्धती

ऐकण्याच्या पद्धती

आनंद घेण्याच्या

प्रेम करण्याच्या

मजा करण्याच्या

गाण्याच्या

शंभर ठिकाणं शोधण्याच्या

समजून घेण्याच्या पद्धती

शंभर ठिकाणची स्वप्नं बघण्याच्या 

मुलांकडे असतात शंभर भाषा

(आणि खरं तर आणखी शेकडो)

पण ते त्यातल्या नव्याण्णव चोरतात.

शाळा आणि कल्चर

अलग करतात 

शरीर आणि मेंदूला.

ते मुलांना सांगतात 

हात न वापरता विचार करा

डोकं वापरू नका

बिन बोलता फक्त ऐका 

आनंद न घेता फक्त समजून घ्या 

ते सांगतात मुलांना 

जे दिसतंय त्याचाच शोध घ्या फक्त 

आणि अशा प्रकारे ते 

नव्याण्णव काढून घेतात

शंभरातले.

ते सांगतात मुलांना,

काम आणि खेळ 

सत्य जग आणि आभासी जग,

विज्ञान आणि कल्पना 

आकाश आणि धरा

तर्क आणि स्वप्न 

कधी एकत्र असूच शकत नाहीत.

आणि असं

सांगतात 

ते मुलांना की

शंभर नाहीचेत मुळी.

मूल म्हणतं

बिलकुल नाही

शंभर आहेतच मुळी

अगदी नक्की.

लोरिस मालागुझी    

भाषांतर: मंजिरी निंबकर