वंदना भागवत
टेबलाशी बसलेल्या वीणाताई उठून दाराशी गेल्या.
कांताबाई आल्या होत्या, त्यांना आत घेऊन दार लावलं.
चष्मा काढला, हातातल्या पुस्तकातलं बोट काढलं.
‘‘ऊन थोडं उतरल्यावर यायचं ना कांताबाई?
काय म्हणता? कशा आहात?’’
कांताबाई गेली तीस वर्षं त्यांचा हात फिरलेल्या घराच्या कानाकोपर्यात बघत होत्या.
‘‘आजही चष्मा लावला नाही तुम्ही कांताबाई, बसचा नंबर दिसतो का?’’
वीणाताई त्यांच्या टेबलाकडे जात म्हणाल्या.
कांताबाई अजूनही घराचाच शोध घेत होत्या.
‘‘आशा भिंती पुसत नाही होय? ती जळमटं तशीच आहेत कोपर्यात.’’
कांताबाईंना जळमटं बरी दिसली? की आपल्याला दिसायच्या गोष्टी शेवटपर्यंत दिसतातच?
वीणाताईंनी भिंतीच्या कोपर्याकडे बघितलं मग कांताबाईंकडे किंचित हसून.
होत नाही काम अलीकडे – असं म्हणून काहीशा अनिच्छेनं
घरात बसलेल्या कांताबाई
यायच्या त्यांच्याकडे, मैत्रिणीकडे याव्यात तशा.
लेकीचा संसार मार्गी लागल्यावर तसाही त्यांचा कामातला
जीव कमी झाला होताच;
पण चार वर्षांपूर्वी लग्न झालेल्या लेकीला भेटायला
वीणाताईंचं घर गरजेचं होतं त्यांच्यासाठी.
ती मुसलमानाबरोबर पळून गेली होती म्हणताना.
ती बुरखा घालून यायची पूजाची झैनब झाल्यापासून.
वीणाताईंच्या सासर्यांना भ्रम व्हायला लागलेले त्या काळात.
त्यांना बुरखेवाल्या बायका म्हणजे पाकिस्ताननं पाठवलेले हेर वाटायचे.
ते निवृत्त पोलीस अधिकारी, नव्वदाव्या वर्षातही पाकिस्तानच्या कारवायांमध्ये गढलेले.
सासूबाई पार बिथरलेल्या कांताबाईंवर, मुलीला मुसलमानाबरोबर कशी पाठवली म्हणून.
‘‘तुम्ही मस तुमच्या लेकीचं लग्न तुमच्या जातीत केलं; पण जावयानं मारहान केली ना?
तुम्ही आणली का लेकीला परत? तशीच मरू दिली! कॅन्सर झालेला सांगता तुम्ही.
माझी लेकबी मस धाडसाची हाय, पायावर उभी हाय, जावयाच्या बरोबरीत कमावतीय अंगनवाडीत.
बुरखा घालीना का!’’ कांताबाई वादाला खमक्या.
दोघं मागे लागलेले तेव्हा कांताबाईंना काढून टाक म्हणून.
पण तेच आधी गेले पाठोपाठ.
कांताबाई खुर्चीवर बसल्या. घाम पुसला. पिशवी खाली ठेवली.
त्या कलाकार. जुन्या कपड्यांमधून झकास पिशव्या बनवायच्या.
‘‘कुठून येताय कांताबाई? घरूनच ना?’’ वीणाताईंनी विचारलं.
इतक्यात दार वाजलं. आशाबाई आल्या. कांताबाईंना पाहून थबकल्या. मग आत गेल्या.
कांताबाईंनी स्वयंपाक घराच्या दाराशी जाऊन सांगितलं, ‘‘फ्रीझमध्ये लिंबं असतील. सरबत करा.’’
आशाबाई घुटमळल्या. तशी त्या म्हणाल्या, ‘‘तीन कप करा. एक खारं बिना साखरेचं.’’
परत येऊन खुर्चीत बसल्या.
कांताबाई गाजवायच्या त्यांच्या घरावर अधिकार नेमका आणि मोजका ते अजूनही शाबूत.
‘‘गणेश लागला का कामाला?’’ वीणाताईंनी विचारलं.
‘‘कसचं काम करतंय! सगळं झालं. मोटरसायकल दिली घेऊन, तुम्ही तेव्हाच नको म्हटलेलात तरी
आता तुमच्यासारख्यांत वावरताना पोराला वाटत असेल ना मोटरसायकल हवी;
पण नुस्तं कोंबडं काढून हिंडायला आवडतंय.’’
कांताबाईंच्या मुलाबद्दलच्या तक्रारींना अर्थ नसतो हे वीणाताईंना माहितीय.
त्यांच्या मुलांना कोणी शब्दानंही काही म्हटलेलं त्या ऐकून घ्यायच्या नाहीत.
आशाबाईंनी सरबत देऊन, झाडूनपुसून घ्यायला सुरुवात केली.
‘‘जळमटं काढा ती कोपर्यातली.’’ कांताबाईंनी सांगितलं.
आशाबाईंनी दुर्लक्ष केलं, वीणाताईपण गप्प राहिल्या.
तिघीजणी हक्कानं घर सांभाळत आहेत तेव्हा असं होणारच असं वाटून.
उन्हं किंचित उतरत चालली होती.
‘‘पोरांना इंग्रजी शाळेत घातलं का?’’ त्यांनी आशाबाईंना विचारलं.
‘‘पोरग्याला घातलं इंग्रजीत, पोरीला नाही. परवडायला नको काय दोघांचं? ती जाती नगरपालिकेच्या शाळंत.’’
आशाबाईंना पोरांचा विषय नेमका लागेल हे कांताबाईंनी ओळखलं.
वीणाताईंना माहिती होती त्यांची हुषारी.
त्यांच्याजागी आशाबाई आल्यावर अस्वस्थ झाल्या होत्या कांताबाई.
आपण सोडून दिलेल्या नवर्याचं दुसर्या बाईशी बरं जमत असेल तर येणारा कडवटपणा-
पण तो तेवढाच – कांताबाई शहाण्या होत्या.
बायका तशाही असतातच.
कांताबाई वेगळं काही सांगायला आल्या होत्या.
‘‘पूजाच्या नवर्याला वस्तीतल्यांनी चोपलं, गाय मारून खातो म्हणून,’’ कांताबाई म्हणाल्या,
‘‘आता आपल्याला खरनखोटं माहीत नाही. आपण वशाट खातो तसं ते.
तशा तर सोडलेल्या भाकड गायी फासळ्या घेऊन हिंडायल्यात.
मी म्हटलं आपल्या घरी आणू त्या दोघांना; पण गणेश ऐकेना झालाय.
म्हणतो पूजानं चूक केली त्यांच्यात लग्न करून, आता वस्तीत र्हायचं तर हे धंदे चालणार नाहीत,
गणेश कोणत्या लोकांच्या नादी लागलाय काय म्हाईत. पूजाचा नवरा चांगला त्याच्या गॅरेजवर बोलवत होता काम करायला.
हा गेला नाही. बेल घालत हिंडतंय दिवसभर वस्तीत. कोनती, कोनती पोरं असतात बरोबर, काय करतात त्यांनाच माहीत.’’ कांताबाई पहिल्यांदाच गणेशविषयी खरी तक्रार करत होत्या.
आशाबाईंना माहिती असणार, त्या त्यांच्याच वस्तीतल्या.
‘‘काम करत न्हाई तर घरात येऊ नको असं करवादती मी पन.
घर काय असतंय? चुकलंमाकलं मानूस परतून घराशी आलं, तर त्याला काय न पुसता आत घेतं ना?’’
कांताबाईंच्या घराची व्याख्या तशी एकेकाळी वीणाताईंचीपण होती.
पण माणूस नक्की कुठं चुकतंय ते बघून नंतर बदलली.
कांताबाईंना ते परवडणारं नव्हतं हेही त्यांना माहिती.
त्या कांताबाईंकडे वळून म्हणाल्या, ‘‘गणेशला पाठवा सातार्याला. मी फोन नंबर देते. कामाला लागेल.’’
कांताबाई तशाच बसून. थकलेल्या. आल्यावरचा ताव उतरलेला. काळवंडून गेलेल्या.
‘‘त्यांचा भाव हाय की कोल्हापुरात. बँकेत हाय शिपाई कोनत्या तरी, काय हो कांताबाई?’’ आशाबाई एकदम बोलल्या.
कांताबाईंना भाऊ होता माहिती होतं.
त्यानं खरं तर मदत करायला हवी. कांताबाईंना.
पण मतं जुळत नसलेले भाऊ काय करतात हेपण माहिती असतं आपल्याला,
भावाबहिणींच्या प्रेमाच्या गोष्टी काळ्या-पांढर्या सिनेमाबरोबर संपल्या.
कांताबाईंचा फटकळपणा आणि पूजाचं लग्न त्यांना महागात पडलं असणार.
‘‘आशाबाई पोळ्या करायला घेताय ना? कांताबाई जेवून जाताय का?’’
कांताबाईंना मदत लागेल हे तर उघडच.
कुटुंबात झालेला शक्तिपात वीणाताईंना माहिती होता.
वाद, कुरघोड्या, सत्ताकारण, अर्थकारण, अधिकारांना घट्ट करणारं.
इथं सगळी वस्तीच त्या डोक्यात जुळवाजुळव करायला लागल्या.
कांताबाई उठल्या. ‘‘वर्षाकाठी माहेरची म्हणून साडीचोळी करतोय पन बाकी नाही.
आपले आपले तंटे सोडवतोय आपन आपसात; पन हे सगळं इपरीतच झालंय.
टी वी वर चाललंय का शेजारी काय कळत न्हाई.
पूजाला बोलावतोय मी घरी पोरांना घेऊन. तिचा नवरा बघील त्याचं.
गणेशला सांगितलंय त्याला त्रास दिलास तर तंगडं मोडीन म्हणून.
पोरगी काई वेगळं करायलीय तर हे फुकणे आडवे जातात मधीमधी.’’
पायात चपला अडकवत त्या म्हणाल्या, ‘‘नवर्यानं घर मोडलं. पोरगं धरून ठेवलं.
पोरीचं घर उभं होतं ते आपलं म्हटलं तर आता परत हे.
गरिबाला घर नसतंय, आता पोरंबी तोडून नेतात आपल्याधरनं, काय म्हणायचं!’’
वीणाताई काही म्हणणार होत्या. पण काय म्हणावं हे सुचेना.
‘‘लागेल तेव्हा फोन करा.’’ एवढंच म्हणून त्यांनी कांताबाईंच्या हातात पैसे दिले
आणि गणेशसाठी जेवायचा डबा.
वंदना भागवत

onlyvandan@gmail.com
लेखक वरिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजीच्या निवृत्त प्राध्यापक आहेत. अक्षरनंदन शाळेच्या संस्थापक सदस्य. लेखक, समीक्षक आणि भाषांतरकार.
