‘रस्ता’ पुस्तक – कलेचा वर्ग
लहान मुलं अगदी आत्मविश्वसाने चित्रं काढतात मात्र जसं जसं वय वाढतं तसं चित्र काढून बघणं, त्याकडे कौतुकाने बघणं हे कमी कमी होत जातं आणि आपली अशी स्वतःची चित्रभाषा लुप्त होत जाते. त्याबरोबरच स्वतः चित्रं काढून बघण्याच्या आनंदलाही मूल पारखं होत जातं. दृश्यकलेच्या माध्यमातून सहज प्रकारे आणि आनंदाने होणारा विकास यापासून मूल हळू हळू लांब जातं. हा दुर्दैवी प्रवास खरं तर फक्त मुलांचा नाहीच. हा आपणा सर्व मोठ्यांचाही आहे. अमृता ढगे हिने खेळघरातील आठवीच्या मुलांसोबत पुस्तकाला जोडून कलेचा वर्ग घेतला. अनिता ताई आणि अनुराधा ताई याही सोबतीला होत्या. स्वाती राजे लिखित चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रं असणारं ‘रस्ता’ हे पुस्तक त्यासाठी निवडलं. पुस्तक काही मुलांनी वाचलेलं होतं तर काहींनी नाही पण त्यातल्या चित्रांवर मुलांना बोलतं करत आणि चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांची पुस्तकातलीच ओळख वाचून दाखवत अमृता ताईने ‘रस्ता’ आणि ‘चित्रं’ या विषयाला हात घातला. वस्तीतले रस्ते आणि त्या रस्त्यावरून फिरताना सहज दिसणाऱ्या असंख्य गोष्टी, त्यांचे डोळ्यांना दिसणारे, स्पर्शातून जाणवणारे पोत आणि ते पोत समजून घेताना त्यात असलेले पॅटर्न हा धागा मुलांना विचार करायला दिला. मग मुलांना कांद्याच्या चकत्यांपासून ते मधमाशांच्या पोळ्यापर्यंत निसर्गात कुठे कुठे पॅटर्न असतात त्याचे नमुना दाखल फोटो दाखवले. विषयात रस निर्माण होण्यासाठी त्याचा उत्तम उपयोग झाला. आता असे १६ वेगवेगळे पॅटर्न्स प्रत्येकाने आपापल्या कागदावर बॉलपेनने काढायचे ठरले. या करून बघण्यात मुलं खूपच रंगून गेली. कुणासारखं चित्र काढता येण्याचा ताण तर नव्हताच शिवाय प्रत्येक पॅटर्न मधला वेगवेगळा ताल अनुभवण्यात मुलांना मजा येत होती. एकमेकांचं बघून काढण्याला आणि त्यातून स्फूर्ती घेऊन नवीन प्रयोग करण्याला भरपूर वाव होता. मग सगळी चित्रं समोर मांडून त्याच्या भवताली मुलं बसली आणि चित्रप्रक्रिये बद्दल बोलली- “ताई, सुरुवातीला वाटलच नाही मला काढता येईल”, “ताई असं आम्ही पहिली दुसरीला वह्यांच्या पाठीमागे करायचो”, “करत गेलो तसं सुचत गेलं”, “सगळ्यांची चित्रं बघून किती भारी दिसतंय ना ताई!”, “आज वर्ग किती वेळ छान शांत होता!!” असे अनेक बोलके अभिप्राय मुलांकडून आले.त्यांनीच काढलेल्या पॅटर्नच्या आधारे रस्ता असलेलं निसर्ग चित्र काढण्याची कलेची activity पुढच्या तासाला घेतली त्याबद्दल पुढच्या पोस्ट मध्ये.