लर्निंग कंपॅनिअन्स – शिक्षणातले सोबती


‘लर्निंग कंपॅनिअन्स’ ही संस्था 2018 सालापासून विविध संस्था आणि समूहांच्या
सोबतीने नागपूर परिसरातील शाळांचे वर्ग किंवा शिकण्याच्या इतर जागा अधिक
परिणामकारक, आनंददायी आणि समावेशक बनाव्यात, यासाठी काम करते. सध्या
गोंड, पारधी आदिवासी आणि भरवाड या भटक्या समूहातील मुलांसोबत संस्थेचे
काम सुरू आहे.

https://www.learningcompanions.in/

आज नेहमीप्रमाणे सकाळची प्रार्थना झाल्यावर गप्पांच्या सत्राला सुरुवात केली. पण
वर्गात कोणाचंच लक्ष नाही. आणि असणार कसं? वस्ती झाल्यापासून जवळपास
चाळीस वर्षांनी अखेर सोनखांबला वीज येणार होती. कितीतरी प्रतीक्षा आणि मागील
वर्षभराचे प्रयत्न! एकदाचे विद्युत-जोडणीसाठी खांब येऊन पडले आणि कामाची
लगबग सुरू झाली. मग काय? वर्ग थांबवला आणि आम्हीपण पोचलो कामाच्या
ठिकाणी.
मी मुलांना विचारलं, ‘‘अच्छा बताओ, लाइट आने पर क्या होगा?’’
मेहुल म्हणाला, ‘‘हमको चारे के लिए घूमना नहीं पड़ेगा, हम अगले साल यही पर
चारा उगायेंगे और फिर स्कूल छोड़कर जाना नहीं पड़ेगा।’’
गौरी आणि किशोर म्हणाले, ‘‘भैया हम रातको भी पढाई कर पाएंगे।‘‘
-0-
भरवाड समुदाय दर उन्हाळ्यात पाणी आणि चार्‍याच्या शोधात स्थलांतर करतो.
2-3 महिन्याच्या स्थलांतरामुळे मुलांचं शैक्षणिक वर्ष वाया जातं. मात्र ज्या भरवाड
वस्त्यांवर विजेची सोय आहे, तिथे लोक पाणी आणि चार्‍याची सोय करू शकत
असल्यानं त्यांचं स्थलांतर थांबतं किंवा कमी प्रमाणात होतं. त्यामुळे मुलांचं शिक्षण
चालू राहतं. त्यामुळे आम्ही विजेचा प्रश्न लावून धरायचा निर्णय घेतला होता.
वर्षभरापूर्वी जागेची पाहणी आणि विजेच्या खांबांसाठी मोजमाप झालं होतं. पण
नेहमीप्रमाणे वीजमंडळाच्या अधिकार्‍यांची चालढकल चालू होती. ऋषभ (सोबती
फेलो) आणि मी दर आठवड्याला मुलांना भेटायला जायचो तेव्हा मंडळाच्या

कार्यालयालाही भेट देत होतो. बेड्यातील राहुल, विजय हे तरुण तसेच रामजीदेखील
सातत्यानं पाठपुरावा करत होते. जवळपासचे गावकरी सतत म्हणायचे, की यांची
शेती NA झालेली नाही, त्यामुळे वीज येणं कठीण आहे. बेड्यावरचा विजय
जोगराना हा तरुण आम्हाला शाळेच्या प्रत्येक कामात मदत करायचा. तो नेहमी
त्याचं स्वप्न माझ्याजवळ व्यक्त करायचा, ‘‘आपल्या बेड्यावर वीज आली की
माझा स्वतःचा उद्योग सुरू करणार आणि जे दूध बाहेरील व्यक्ती घेऊन जाते, ते
मी घेऊन जाणार.’’ बाकी सदस्यसुद्धा म्हणायचे, की विद्युतीकरण झाल्यावर
आमचे खूप प्रश्न सुटतील. गाईला ढेप लागते ती आम्ही इथेच तयार करू. कोणी
म्हणे, ‘आमचं दूध पॅकेटमध्ये भरून विकू’.
काही लोकांनी आशा सोडली होती. ‘आम्हाला यांनी विनाकारण आमिष दाखवलं’,
असं त्यांना वाटत होतं. पण शेवटी दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वीज आली. बेड्यावर
दिवाळीचं वातावरण तयार झालं. मागील उन्हाळ्यात सातत्यानं वीजमंडळात चकरा
मारण्याचं सार्थक झाल्याचं समाधान वाटतं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठी
कामं हातात घेण्याबद्दलचा संकोच आणि भीती या निमित्तानं निघून गेली आणि
आपण काहीही करू शकतो हा आत्मविश्वास आमच्यात आला.
कुणाल माहूरकर, लर्निंग कंपॅनिअन्स