लोककथा आणि समाजजीवन
माझ्या लहानपणापर्यंत नातवंडांना गोष्टी वगैरे सांगायचं काम आज्याआजोबांचं असे. वाचता येण्याआधी गोष्ट नावाचं प्रकरण मुलांपर्यंत येत असे तेच आजीआजोबांकडून. गोष्ट सांगण्याच्या पद्धती तशा ठरावीकच होत्या. अर्थात त्यात सांगणार्यांचं व्यक्तिवैशिष्ट्यही गुंफलेलं असेच. काही आज्ज्या गोष्ट सांगताना कविता म्हटल्यासारखी तालात म्हणत, काही एकपात्री अभिनयाचा आविष्कार करत. काहींच्या भाषेचा वैशिष्ट्यपूर्ण लहेजा त्या कथाकथनातून जाणवे. काही कथांमध्ये अधूनमधून श्रोत्यांचा हुंकार किंवा उत्तरं मिळणं आवश्यक असे.
अगदी पुढारलेल्या समाजात स्त्रीशिक्षणाचे वारे त्या काळात वाहू लागलेले असले, तरी माझ्या आज्यांच्या काळातल्या बाया फारतर तिसरीचौथीपर्यंत शिकलेल्या असत. इरावतीबाई कर्वे – कमलाबाई निंबकर यांच्यासारख्या कर्तृत्ववान अगदीच विरळा. अर्थात शिकलेल्या नसल्या, तरी त्यातल्या बऱ्याचजणी शहाण्या असत, त्यांना त्यांच्या चौकटीतच असेल; पण आसपासच्या समाजजीवनाचा अंदाज असे. बरेचदा चौकटीतलं रीतसर शिक्षण न घेतल्यानं असेल; पण त्या कल्पकही असत. (आपलं डोकं त्यांनी मराठी मालिकांच्या चरणी वाहिलेलं नसल्यामुळे त्यांच्याकडे नातवंडांसाठी मनापासून वेळ तर असेच; शिवाय नातवंडं काय म्हणत आहेत ह्याकडे दक्ष-लक्षही असे.) या नातवंडांना गोष्टी सांगत, त्या बऱ्याचदा पिढ्यानुपिढ्या रुजलेल्या लोककथाच असत.
लोककथा नेमकं कशाला म्हणावं याचं उत्तर अनेकरंगी आहे. ‘ज्या कथा समाजासोबत चालत आलेल्या आहेत, ज्या अनेकांना माहीत असतात; पण त्यांचा मूळ लेखक कोण याचा नेमका शोध घेता येत नाही,’ असं त्याचं साधं उत्तर असावंसं दिसतं. या कथा पिढ्यानुपिढ्या चालत येतात. थोरली पिढी धाकट्यांना सांगत जाते. असं सांगताना मूळ गोष्टीत अनेक बदल होत जातात. त्या गोष्टीचं बीज आपल्या आपल्या परिस्थितीत भिजवून घेत ती पुढच्या पिढीला सांगितली जाते. देशोदेशीच्या लोककथांकडे नजर टाकली तर अनेकदा त्या कथांचं मूळ एकच असावं की काय असा भास होतो.
लोककथांमध्ये धार्मिक, सणवार, उपदेश, समाजरीती, प्रेमविषयक असे अनेक प्रकारही दिसतात. त्याशिवाय बालकांना सांगायच्याही काही कथा असतात. बालकांना सांगितल्या जाणाऱ्या कथा वेगळ्याच असत असे नाही. वरील सर्व प्रकारातल्याही काही कथा बालकांना सांगितल्या जात. त्यापलीकडे फक्त बालकांचे मनोरंजन करू शकतील तसेच काही उपदेशही कळत-नकळत देतील अशाही लोककथा आहेत. लोककथा सांगितल्या जाण्याचं प्रमाण लक्षणीय खाली आलेलं असलं, तरी आजही त्या सांगितल्या जातात. काही आज्ज्यांकडे गोष्टींचा खजिना असे तर काहींच्याकडे अलीबाबा आणि चाळीस चोर, भोपळ्यातून लेकीकडे जाणारी म्हातारी आणि इसापनीतीतली चिमणीकावळ्याची किंवा कोल्ह्याच्या आणि कावळ्याच्या चतुरपणाची, कासवाला काठीला लोंबकळून नेणाऱ्या बदकांची, अशा मोजक्या गोष्टी असत. एकच गोष्ट अनेकदा सांगितली जायलाही हरकत नसे त्यामुळे ते चालून जाई. काही वेळा तर नातवंडच कुठली गोष्ट सांगायची त्याची फर्माईश करत असे. आणि मग आज्जी प्रश्न विचारत विचारत गोष्टीला सुरुवात करे आणि नातवंड झोप लागेपर्यंत प्रश्नांची उत्तरंही देई.
या कथांमध्ये कधी प्राणी-पक्षी-कीटक असत, माणसंही असत, काही कथांमध्ये ते सोईस्करपणे माणसांची भाषा बोलत. गोष्ट ऐकण्याच्या-समजण्याच्या वयातल्या बालकाला खरं म्हणजे प्राणीपक्षी माणसांच्या भाषेत बोलत नाहीत हे एव्हाना माहीत झालेलं असेल तरीही त्याची कथेतल्या बोलक्या प्राण्यांबद्दल हरकत नसे. अनेक कथांमध्ये, हवी असलेली वस्तू मिळवण्यासाठी अनेकांना विनंती करत त्या कथेची नायिका किंवा नायक जात असे. नायक किंवा नायिका मनुष्य जातीचीच असण्याची सक्ती नसे. देणाराही सहज देत नसे. त्या बदल्यात आपल्याला हवी असलेली वस्तू मागत असे. मग ती मिळवण्यासाठी आणखी कुणाकुणाकडे मागत फिरावे लागे. कथेची गंमत तीच असे. एकंदरीनं काहीही फुकट मिळत नाही… त्याची किंमत द्यावी लागते, असा संदेश या गोष्टींमधून नातवंडांना मिळेल असा आज्जीआजोबांचा समज असावा. सरकारी काऱ्यालयात जशी आपली फाईल या टेबलावरून त्या टेबलावर फिरत असते, आणि त्याबरोबर आपणही तिचा माग काढत फिरतो तसं एखाद्या भाकरतुकड्यासाठी कुणी म्हातारी कावळ्यापासून अनेक स्टेशनं घेत राजा-राणी, लोहार, मुंगी अशा कुणाकुणाकडे जात असे. मूल झोपेपर्यंत- असा कथेचा काळ निश्चित असल्यानं त्यानुसार ही स्टेशनं कमी किंवा जास्त करता येत.
लोककथा तत्कालीन समाजात चालीरीती कशा असतात याचं वर्णन करतात, तसंच समाजाच्या नीती-नियमांचा ऊहापोह करतात. काही वेळा त्या विनोदी स्वरूपातही आढळतात. भौगोलिक स्थानानुसार त्यात निसर्गाचे वर्णन किंवा लोकसहभाग प्रामुख्याने आढळतो. जसे, राजस्थानी लोककथेमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य असते तसेच रशियन लोककथेत बर्फ आणि अस्वलं दिसतात, इत्यादी.
भोपळ्यातून लेकीच्या घरी तूपरोटी खायला जाणाऱ्यात म्हातारीची गोष्ट ही सगळ्यांना माहीत असलेली अशी लोकमान्य गोष्ट असावी. त्यामुळे या मूळ कथेवर आधारित तिची अनेक रूपं आपल्याला पाहायला मिळतात. मूळ कथेची चौकट तीच ठेवून त्यामधला खाण्याचा पदार्थ, जाण्याचं ठिकाण, रस्त्यात कोणकोण भेटतं, गाडी भोपळ्याची की आणखी कशाची, त्यानुरूप गोष्टींच्या प्रतिमा वेगवेगळ्या होत.
एक होती बुढी. ती रोज खाई आंब्याची कढी.
शेजी म्हणाली, ‘म्हातारे, म्हातारे, अशी काय करतेस? सोन्यारुप्याचा जीव काय गांजतेस?’
म्हातारी म्हणाली, ‘नाही ग बया, असं कशी करीन? ऐक ऐक, मी आता लेकीच्या घरी जाईन, भाजी खाईन, ताजी होईन, मग मला पहा.
म्हातारीने तयारी केली. पेरकंडाची गाडी केली. उंदराचे बैल केले.
म्हातारीचे खाचर निघाले.
उंदीर पळती सुरूसुरू, बुढीचे केस उडती भुरूभुरू.
अशी ती गोष्ट सुरू होई.
वामन चोरघडे यांचा या संदर्भात एक लेख* वाचायला मिळाला, त्यात त्यांनी लोककथांना रांगोळी काढायला वापरतात ते साचे म्हटलंय. त्यात रांगोळी भरा की दुसरी एखादी पूड भरा. तिचा छाप तसाच उमटेल. मात्र रांगोळीचा किंवा त्या पदार्थाचा रंग आणि पोत तिनं घेतलेला असेल.
लोककथांच्या निर्मितीमागचं कारण सांगताना चोरघडे म्हणतात,
‘लोककथेचे स्वरूप पाहिले म्हणजे ती खरोखरी लोकांसाठी म्हणजेच समाजासाठी लिहिलेली असल्यामुळे तिच्यात समाजमन आणि समाजजीवन यांचा आढळ प्रकर्षाने असतो. ज्या लोककथा आज रूढ आहेत, त्या समाजाच्या मनोभूमिकेच्या दृष्टीने बाल्यावस्थेत रचल्या गेल्या आहेत. या अवस्थेतील भोळेपणा आणि खेळकरपणा त्या कथांत दिसतो. त्यावेळी समाजाला वळण लावण्याचे काम कायदा करीत नसे, तर समाजातील श्रेष्ठवर्ग, समाजधुरीण, गांवप्रमुख करीत. त्यामुळे समाजधारणेची तत्त्वे समाजाला समजावून देण्यासाठी त्यांना लोककथा रचाव्या लागत. लोकांचे मन आकृष्ट करताना त्यांना त्यात भरपूर अद्भुतता भरावी लागे. मानवी मनाची कृत्रिमता त्यांत चालत नसे. आज शरीर उघडे करताना समाजाचा संकोच जसा भोवतो, तसे त्यावेळी नसे. (हा लेख किमान चाळीस वर्षं जुना असावा.) आज शरीरापेक्षा कपड्यांना महत्त्व व प्रतिष्ठा मिळाली आहे. अशिक्षित पण संस्कारी प्रजा समाजाचे, धर्माचे, व्यवहाराचे ज्ञान या लोककथांमधूनच प्राप्त करीत होती. म्हणूनच लोककथांत समाजाचा स्वभाव तंतोतंत चित्रित केलेला आढळून येतो. आजच्या शिक्षणप्रणालीने जी विसंगती आणि कृत्रिमता आमच्या समाजात आली आहे, त्यामुळे लोककथेचे स्वाभाविक संधान अपरिणामकारक झाले आणि नव्या लोककथा रचण्याचे कार्य बंद पडले आहे.’
चोरघडेंनी मांडल्यानुसार लोककथा ही समाजशिक्षणाची पाठ्यपुस्तकं असल्यानं चांगलं काम केलं की देव बक्षीस देतो, वाईट काम करणाऱ्याला देव शिक्षा देतो, अशा समाजोपयोगी कल्पना त्यातून पुन्हा पुन्हा येत.
समाजात दु:ख निर्माण होण्याची अनेक कारणं आहेत. अशावेळी ज्यांच्याजवळ अधिक आहे त्यांनी नसलेल्यांना द्यायचं… असा म्हटला तर साधासा नीतीनियम सुचवणारी आटू-बाटूची एक कथाही चोरघडेंच्या लेखात उद्धृत केलेली मिळाली. ही कथा आता काळाच्या पडद्याआड गेलेली दिसते, म्हणून इथे दिलेली आहे. लहान मुलांसाठी बनलेली ही कथा असावी. त्यात विनोद आहे, पुनरावृत्ती आहे. पुनरावृत्ती हा लोककथांमध्ये दोष नसून गुण म्हणून बघावा लागतो. तो अनेक कथांमध्ये दिसतो. अशा पुनरावृत्तीचा कंटाळा न येता उलट गोष्ट सांगण्यात श्रोत्याचाही सहभाग मिळतो. कथा लक्षात राहते.
समाजमनात नीती-मूल्यं टिकून राहण्याचं लोककथा हे एक साधनच आहे. लोककथांचा अन्वयार्थ लावून, ‘आजच्या मानवी हक्कांच्या चौकटीत त्या बसत नाहीत,’ किंवा त्या कंटाळवाण्या आहेत, किंवा त्या अतार्किक आहेत,’ असे निष्कर्ष काढण्यात फारसा काही अर्थच नसतो. तसे करूच नये. कथांमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होते आहे आणि ती लोककथा ऐकल्या-वाचल्यामुळे आपले मूल त्याच्या आयुष्यात चुकीच्या समजुती बाळगेल अशी काळजी करण्याचंही कारण नाही. किंबहुना त्या प्रश्नाकडे मुलाचं लक्ष वेधलं जाण्याची कदाचित थोडी शक्यता त्यातून अदृश्यपणे निर्माण होईल.
मला वाटतं, बाळाला पावडर-तीट लावण्यासारखा हा प्रकार आहे. त्याचा फायदा तीट-पावडरीत नसून त्यानिमित्तानं आईबापाचा प्रेमळ हात बाळाच्या अंगाला लागण्यात आहे. आजच्या काळातही काही आईवडील झोपताना गोष्टी सांगत असावेत. गोष्टीपुरती भर करायची तर यू-ट्यूबवरही कथा सांगितल्या जात असतील; पण त्या ऐकणारी मुलं कमी असावीत असा माझा अंदाज आहे. साहजिकच आहे, आज्जीच्या मांडीवर डोकं ठेवून तिचा हात अंगावर फिरत असताना ऐकण्याची ती गोष्ट आहे; नाहीतर पुस्तकात डोकं घालून घराच्या एकांती कोपऱ्यात बसून… हा दुसरा पऱ्याय अजून उपलब्ध आहे, मुलांच्या हातात.
लोककथा म्हटल्यावर सरोजिनी बाबर ह्यांचे स्मरण होणे अपरिहार्यच आहे. सन 2019-20 हे सरोजिनी बाबर ह्यांचे जन्मशताब्दी वर्ष. महाराष्ट्राची लोकसंस्कृती हा सरोजिनीअक्कांच्या जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय. ओव्या, गीते, कथा-कहाण्या, म्हणी, खेळगाणी, उखाणे अशा लोकसाहित्याचे उत्तम प्रकारे संशोधन, संपादन आणि संकलन करून ह्या संस्कृतीचा फार मोठा ठेवा त्यांनी महाराष्ट्राला उपलब्ध करून दिला. सोपी आणि संवादी भाषाशैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. मौखिक परंपरेने चालत आलेले हे लोकवाङ्मय एव्हाना काळाच्या पडद्याआड गेले असते, परंतु पुढील पिढ्यांसाठी हे लेणे जतन करून ठेवण्यात सरोजिनी बाबर ह्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यासाठी सरोजिनीअक्कांच्या ऋणात राहणेच योग्य ठरेल.
*संदर्भ: ‘लोकसाहित्य व लोकसंस्कृती संमेलन’ – संपादक: सरोजिनी बाबर, ह्या पुस्तकातील वा. कृ. चोरघडे ह्यांचा ‘लोककथा आणि समाजजीवन’ हा लेख.
संजीवनी कुलकर्णी