वाचनसंस्कृती रुजली पाहिजे

वाचनसंस्कृती रुजली पाहिजे, मुलांना वाचनाची गोडी लागली पाहिजे असे आपण सर्वत्र ऐकत असतो. मुलांनी वाचते-लिहिते होणे याकडे बहुतेक वेळा फक्त साक्षरतेच्या भिंगातून पाहिले जाते. साक्षरता महत्त्वाची आहेच; पण वाचनाचे महत्त्व त्यापलीकडे जाणारे आहे. वाचन वाचकाला आनंद देते. अधिक विचारी, संवेदनशील, सर्जनशील होण्यासाठी मदत करते. स्वतःची, आजूबाजूच्या समाजाची ओळख सापडण्यासाठी, आपल्या समजुतीपेक्षा वेगळ्या गोष्टींकडे निकोप दृष्टीने पाहण्याची क्षमता तयार होण्यासाठी, आणि आपल्याच विचारांच्या मर्यादा ओलांडण्यासाठी वाचन मदत करते. वंचित समूहांसाठी तर पुस्तके आणि पुस्तकालये यांचे महत्त्व अकल्पित म्हणावे असेच आहे. आणि तरीदेखील आपल्याकडे पुस्तकालयांचा प्रसार म्हणावा तसा झालेला दिसत नाही. अनेक शाळांमध्ये पुस्तकालयेच नाहीत आणि जिथे आहेत त्यांची स्थितीही समाधानकारक नाही. तिथले वातावरणही फारसे स्वागतोत्सुक नाही, असा एक सर्वसाधारण अनुभव असताना मुलांपर्यंत पुस्तके पोचवण्याचे वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवर केले जाणारे प्रयत्न निश्चितच आशादायी वाटतात. फारशी संसाधने हाताशी नसतानाही दोरीवरचे वाचनालय, पथारीवरचे किंवा झोपडीतल्या एका कोपर्‍यात चालवले जाणारे वाचनालय मुलांसाठी किती महत्त्वाचे ठरते हे अनुभव प्रेरणादायी ठरतात. आणि शक्यकोटीतलेही वाटतात. वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक, परिस्थितीत काम करणार्‍या काही पुस्तक-मित्रांच्या उपक्रमांची, कामाची इथे ओळख दिलेली आहे. त्यातून प्रेरणा घेऊन आपापल्या पातळीवर आपल्याला काही करता येईल का?