(पुस्तक परिचय)
चिंतन गिरीश मोदी
आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला घटनेने मूलभूत हक्क मिळण्याची खात्री दिली असली, तरी वेगवेगळ्या लोकांचा नागरिकत्वाचा अनुभव कसा वेगळा आहे, ते इथे बोलणार्या आणि बोलू न शकणार्या लोकांवरून लक्षात येईल. आपल्या देशात बोलण्याचे आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असले तरी त्याचा अर्थ अनुभव प्रकाशित होण्याची संधी प्रत्येकाला आपोआप मिळते असा होत नाही, त्या वेगळ्याच गोष्टी असतात.
संघर्ष आणि शांती यांच्याशी शिक्षणाचा काय संबंध, हा प्रश्न वरवर निरागस दिसला तरी प्रत्यक्षात बराच गहन आहे. आपण त्यावर अजून विचार केला नसला, तर लगेच करायला घेतल्यास बरे!
Education and Conflict Review नावाच्या नियतकालिकात मोनिषा बजाज यांचा एक लेख आहे : समाजातल्या संघर्षाच्या काळात शांती-शिक्षणाची संकल्पना (2019). त्या म्हणतात – शांती, संघर्ष आणि शिक्षण जेथे एका बिंदूवर येतात, तेथे वास्तवाच्या अनेक शक्यता जन्म घेतात… एका बाजूला मनांमध्ये हिंसेची पेरणी आणि तिला खतपाणी; दुसर्या बाजूला शांती, मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाची शिकवण; तिसर्या बाजूला शाळेतल्या, समाजातल्या सुशिक्षितांवर समाजातून किंवा शासनाकडून वाढत जाणारा दबाव.
त्या सॅन फ्रान्सिस्को विद्यापीठात आंतरराष्ट्रीय बहुसांस्कृतिक शिक्षण विषयाच्या प्राध्यापक आहेत. हिंसेच्या सर्व प्रकारांचे विसर्जन व्हावे, समतावादी न्यायी अवकाश तयार व्हावा असा प्रयत्न करणार्या शिक्षकांसाठी त्यांनी एक आराखडा तयार केला आहे. त्या म्हणतात, ‘‘आपण शिक्षणाचा आशय, शिक्षणशास्त्र, शिक्षक-विद्यार्थ्यांचे नाते, शिक्षणाच्या मूल्यमापनाची व्यवस्था या सर्वात परिवर्तन घडवले, तर हे शक्य आहे.’’
शिक्षकांना ही जबाबदारी उचलायची असेल, तर सुरुवात कुठून करायची?
2020 साली एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे – Thousand Cranes for India : Reclaiming Plurality amid Hatred (2020), edited by Pallavi Aiyar, Seagull Books या पुस्तकात वेगवेगळ्या 23 प्रकारचे साहित्य आहे. कथा, कविता, स्मृतिचित्रे, वाद-संवाद आणि रिपोर्ताज. स्वतःशीच शांतपणे संवाद करायचा असेल, दुसर्यांशी चर्चा करायची असेल किंवा विद्यार्थ्यांच्या मनातल्या कल्पना – अनुभव यांना स्पर्श करणारे काम करायला मदत करायची असेल, तर हे सगळे साहित्य वापरता येईल.
सदाकोचा पक्षी ज्यांना माहीत आहे, त्यांना आठवेल, की पहिला अणुबॉम्ब पडल्यावर त्यातले विष भिनून ज्या चिमुरडीचा ल्युकेमियाने अंत झाला, तिच्या बालमनाने महायुद्धाच्या भयाण वास्तवातही शांतीची आशा जागवून ठेवण्याचा संदेश जगाला दिला होता.
एक सारस, चिमण्यांचे नीरव उडणे,
एक ठिसूळ आठवण, कागदात गुंफलेली गुपिते.
तिच्या हातात त्यांनी एक रूप घेतले, निष्ठुर प्रेमाचे.
नीट लक्ष देऊन घातलेल्या घड्यांमागे निसटती आशा…
तिने तिच्या निराशेला कागदात बांधून घातले.
बोनलेस बर्ड
मी चिमटीत पकडते, कुरवाळते, थोपटते,
फू फू फुंकर घालते.
पक्षी उडत नाही.
हवेचा हळुवारपणा मला देता येत नाही.
ओरिगामी त्याला इच्छाशक्ती देऊ शकत नाही.
या कविता कोणते (भावनिक) सत्य समोर आणतात? कवी प्रतीके का वापरतात? मृत्यू, वंशसंहार आणि रक्तपात याबद्दल बोलणे फार दुःखदायक असते का? कलाकारांना राजकीय आदेश, दिशा यांच्यानुसारच मार्ग निवडावे, वळवावे लागतात का? सौंदर्याची पूजा करत राहिले तर वास्तवापासून सुटका मिळते का? आपल्या मनाला समाधान देईल अशा पद्धतीने आपण हिंसेला विरोध करू शकतो का, मग ते मार्ग इतरांना योग्य वाटू देत अथवा नको… प्रत्येक प्रश्न म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या वागणुकीचे विश्लेषण करायचे आवाहन आहे. पुढे जाऊन वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्यांचे स्वतःचे प्रश्न, अनुभव, विचार यांची देवाणघेवाण करता येणारच आहे.
या संकलनात सलील त्रिपाठी यांचा एक निबंध आहे – ‘अलीकडे इथे सायबेरिअन क्रौंच राहत नाहीत’. ते लिहितात – केवलादेव अभयारण्यात 2001 नंतर पक्षी आलेले नाहीत. उत्तर भारतातल्या शहरांवर जे दाट धुके पसरलेले असते, त्यातून प्रकाशाची नाजूक तिरीप पलीकडे जाऊ शकत नाही… तेव्हापासून पक्षी भारतात येईनासे झालेत. 2002 सालात गुजरातमध्ये झालेल्या नरसंहारानंतर तिथे क्रौंच नाही; पण गिधाडे मात्र दिसत असत, अशी आठवण त्यांनी सांगितली आहे.
पल्लवी अय्यर यांचे हे पुस्तक शिक्षकांना वर्गात सामाजिक राजकीय मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मोलाचे ठरेल. रोज लिहिल्या जाणार्या प्रचंड लेखनातून थोडेच शोधून निवडून घेण्याची सवड काढणे अवघड असते. आता कोणत्याही संपादनाच्या प्रक्रियेत काय निवडले जाते, काय टाळले जाते – याबद्दल विचार करायला शिकवणे महत्त्वाचे असते. प्रस्तावना आणि लेखकांबद्दलची टिपणे यासाठी तपासायला हवीत. कोणत्या गोष्टी सगळीकडे सापडतात? लेखक कोणत्या भागातून येतात? त्यात काही वळण दिसते का? काही पूर्वग्रह आढळतात का?
साधारणपणे अपंग, दलित, आदिवासी, शिक्षण कमी असलेले लोक, ट्रान्सजेंडर, सोशल मीडियावर नसलेले लोक, ईशान्य भागात राहणारे, या सार्यांचा सहभाग भारतात प्रकाशित होणार्या संकलनात नसतो. आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला घटनेने मूलभूत हक्क मिळण्याची खात्री दिली असली, तरी वेगवेगळ्या लोकांचा नागरिकत्वाचा अनुभव कसा वेगळा आहे, ते इथे बोलणार्या आणि बोलू न शकणार्या लोकांवरून लक्षात येईल. आपल्या देशात बोलण्याचे आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असले तरी त्याचा अर्थ, अनुभव प्रकाशित होण्याची संधी आपोआप मिळते असा होत नाही, त्या वेगळ्याच गोष्टी असतात.
हरएक वाटेवर अंधार माझा पाठलाग करत येतो आहे,
मी चाचपडतो आहे सूर्यासाठी…
पण कोणत्या मार्गाला गेलाय तो?
ही निराशा म्हणजे पराभव नाही.
सदाकोचा पक्षी मला विचारतो आहे,
तू कोण आहेस? अलिफ म्हणजे काय?
मी सांगतो, मी तो प्रत्येक विचाराचा कारागीर!
पालक आणि शिक्षकदेखील विचारांचे कारागीरच असतात. शिकणार्या मुलाच्या अवतीभोवती करुणा आणि कुतूहल यांना खतपाणी मिळेल असे वातावरण निर्माण करायची ताकद त्यांच्याकडे असते. अनेकजण हे काम प्रशंसनीय निष्ठेने करतच असतात. हा मोलाचा सहभाग कोणत्याही नोंदीविनाच राहतो.
ताबिश खैर यांनी लिहिलेली फोल्डेड पेपर नावाची एक इंग्रजी गझल या पुस्तकात आहे –
एखादा लहानसा हावभाव, साधीशी कृती,
आपल्याला आपले आयुष्य त्या सरत्या काळाकडून परत आणून देते.
हे पुस्तक तयार कसे झाले, याबद्दल पल्लवी अय्यर यांनी लिहिले आहे –
त्या कुटुंबासह हिरोशिमाला गेल्या होत्या. त्याच काळात भारतात असिफाबानोवर अत्याचार झाले. त्या लहान मुलीवर जे प्रसंग ओढवले, त्याबद्दलच्या बातम्या रोज फोनवरून आदळत राहिल्या. हिरोशिमाच्या बळींच्या स्मृती जपणार्या पीस पार्क मेमोरिअलला त्यांनी त्यांच्या मुलांसह भेट दिली, तेव्हा त्यांना वाटत राहिले, की शेजारी असिफाबानो वावरते आहे… तिथेच त्यांना सदाकोच्या पक्ष्याबद्दल माहिती मिळाली. त्या संध्याकाळी त्यांनी तो पक्षी तयार करायचा पहिल्यांदा प्रयत्न केला. हिंसेला विरोध करण्याची ती लहानशी कृती होती. सुधारणेची एक आशा होती. त्यांनी असेच पक्षी तयार करून त्यांचे फोटो पाठवा अशी इतरांना विनंती केली. आणि जगभरातून त्यांच्याकडे असे फोटो आले. हे पक्षी आपल्याला संवादाचे पूल बांधायला मदत करू शकतील, एकमेकांशी बोलून एकत्रपणे विरोध करायचे साधन होतील – असे त्यांच्या लक्षात आले.
तुम्हालाही मुलांबरोबर असे पक्षी करायला आवडेल का? असिफाबानोला काय झाले हे तुम्ही त्यांना सांगू शकाल का? कुठपर्यंत सांगू शकाल? या माहितीचे मुलांना काय करता येईल? असिफाबानो तर गेली, आता पक्षी बनवून काय उपयोग… असे वाटेल का त्यांना? सदाकोची कथा त्यांना आशादायक वाटू शकेल का? अस्त्र-शस्त्रांविना जग निर्माण करायची इच्छा आपण त्यांना देऊ शकू का?
(ह्या लेखाची लहान इंग्रजी आवृत्ती ‘टीचर प्लस’ मासिकाच्या एप्रिल 2021 च्या अंकात प्रकाशित झाली होती.)
चिंतन गिरीश मोदी

chintan.writing@gmail.com
पत्रकार आणि शिक्षणकर्मी. लिखाण, प्रवास, आणि मुलांना शिकवण्याची त्यांना आवड आहे.
शैक्षणिक संस्थांमध्ये शांती-शिक्षण, लिंगभाव, एलजीबीटिक्यू आयडेंटिटी ह्या विषयांवर
कार्यशाळा घेतात.
अनुवाद : नीलिमा सहस्रबुद्धे
