करोनाकाळ मागे पडून आपलं आयुष्य पुन्हा पूर्ववत झालं त्यालाही काळ लोटला. अर्थात, त्याच्या आठवणी आजही माणसांच्या मनात रेंगाळत आहेत. लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद होत्या. मुलं अभ्यास, वाचन, मित्रांचा सहवास ह्या साऱ्यालाच दुरावली होती. अशा वेळी अनेक शिक्षकांनी आपापल्या स्तरावर काही उपक्रम राबवले. बसवंत विठाबाई बाबाराव हे रूढार्थानं शिक्षक नाहीत. परंतु करोनाकाळात त्यांनी आपल्या गावी मुलांसाठी ‘आनंदशाळा’ हा उपक्रम राबवला. आनंदशाळेत साधारण २५-३० मुलं नियमितपणे येत. त्यातून उमललेल्या ‘ आनंदशाळेतल्या गोष्टी’ पालकनीतीच्या वाचकांसाठी ह्या वर्षभरात घेऊन येत आहोत. ह्या गोष्टींची कथाबीजे, अनेक प्रसंग खरेखुरे आहेत. तर काही प्रसंग काल्पनिक आहेत.

बसवंत विठाबाई बाबाराव 

गेले दोन दिवस महादू शाळेत दिसला नव्हता.
तिसऱ्या दिवशी त्याची बहीण पूजा आली. 

तिला विचारलं, “महादू शाळेत का येत नाही?”

पूजा थोडी गडबडली. मग हळूच म्हणाली, “सर, तुम्ही दिलेलं गणित त्याला सोडवता आलं नाही. म्हणून तो येत नाही.”

“अरे, पण शाळेत नाही आला, तर त्याला गणित कसं येणार?”
मी विचारताच पूजा खाली पाहत म्हणाली, “नाही सर… पण दुसरी पोरं हसतात. म्हणून तो येत नाही.”

पूजाकडे मी महादूला शाळेत येण्याचा निरोप पाठवला, पण पुढचा आठवडा उलटून गेला, तरी महादू काही आला नाही.

तो लॉकडाऊनचा काळ होता. शाळा बंद होत्या, मात्र गावात मुलांची भटकंती, खेळ, गटागटानं फिरणं सुरूच होतं. संध्याकाळी दोन-तीन तास मुलांना एकत्र घेऊन काहीतरी शिकता येईल, या विचारातून आमची छोटीशी आनंदशाळा सुरू झाली होती.

त्या शुक्रवारी शाळा सुटण्याआधी मी मुलांना म्हणालो, “उद्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे.”

मुलं उत्सुकतेनं पाहू लागली.
कोणी कुजबुजलं, “काहीतरी मजेशीर होमवर्क द्या सर!”

मी हसलो.
“उद्या होमवर्क नाही. उद्या शनिवार, परवा रविवार. आणि रविवारी… आपण शिवारफेरीला जाणार आहोत.”

वर्गात एकच कल्ला झाला.
“ओ… शिवारफेरी! मज्जाच मज्जा!”

मी पुढे सांगितलं, “उद्या येताना दोन मूठ तांदूळ आणि एक मूठ डाळ आणायची.
डाळ कोणतीही चालेल आणि तांदूळही कोणतेही चालतील.”

शिवारफेरी म्हणजे रानात मिळून स्वयंपाक… पळसाची पाने गोळा करून पत्रावळ्या… शिवारात मिळतील ते कंद, भाज्या टाकून केलेला मसालेभात… आणि चिंचेच्या झाडाखाली बसून जेवण… मुलांना हे सगळं ठाऊक होतं.

मग मी मुद्दाम सांगितलं, “आज जे हजर नाहीत, त्यांच्यापर्यंतही हा निरोप पोचवा.”

शाळा सुटताना आम्ही ‘खरा तो एकची धर्म…’ ही प्रार्थना घेत असू.

त्या दिवशीची प्रार्थना विलक्षण उत्साहात झाली. प्रार्थना झाल्यावर मुलं उड्या मारत घरी पळाली.

त्याच संध्याकाळी महादू दबकत दबकत माझ्याकडे आला.

आधी अवांतर गोष्टी करून महत्त्वाची गोष्ट महादू नेहमी शेवटी सांगायचा. त्याची सवयच तशी.
आधी त्यानं त्याच्या म्हशीची माहिती सांगितली. तिला कोणता चारा चांगला… खुरपणीतून मिळणारी हरळी, मारवेल, केना गवत… तो गवत कुठून, कसं मिळवतो… कुणाच्या शेतात खुरपणी सुरू आहे… विहिरीचं पाणी सोडल्यामुळे कुणाच्या शेतात कसं हिरवंगार गवत आलं होतं…
हे सगळं सांगून झाल्यावर तो हळूच म्हणाला, “सर, तुम्ही शिवारफेरी नेणार आहात असं कळलं. गंटावारांच्या शेताकडे फेरी नेली तर बरं होईल. तिकडे ओढा आहे, वेगवेगळी झाडं बघायला मिळतात…”

सगळी प्रस्तावना करून मग शेवटचा मुद्दा, “सर, मी शिवारफेरीला आलो तर चालेल का?”

मी मुद्दाम नकारत्मक भूमिका घेतली.
“आपण ठरवलं होतं ना, आठवडाभर शाळेत न आलेल्यांना शिवारफेरीला घेऊन जायचं नाही?”

तो लगेच म्हणाला,
“हो सर… पण या वेळेला येऊ द्या. यानंतर शाळा बुडवणार नाही.”

महादू लेखन-वाचनात मागे होता. गणिताच्या तासाची, गणिताच्या वहीची त्याला धास्ती वाटायची; मात्र व्यवहाराच्या गणितात तो सगळ्यात पुढे होता.
शेतीची मजुरी, खुरपणी, पेरणीसाठी लागणाऱ्या एकरी बियाणाचं प्रमाण…
सगळं त्याला तोंडपाठ.

शेवटी महादूनं शिवारफेरीत सहभागी होण्याची परवानगी मिळवलीच.

घरी जाताना तो वेगळ्याच उत्साहात निघाला.

शिवारफेरीच्या दिवशी सारं चित्रच बदललं.

गावठाण सोडून शिवार सुरू झालं, तसा महादूचा आत्मविश्वास वाढतच गेला.
कुठलं पान खाता येतं, कुठलं नाही… कोणती भाजी कुठे मिळते… तो सगळ्यांना अगदी उत्साहात माहिती सांगत होता.

सीताफळाची झाडं होती. त्याखाली टणटणी पसरलेली. मध्येच तरवडीची झुडपं.
महादू तिथेच थांबला.

“इथं थोडं थांबा,” तो सहज म्हणाला.

रोज शाळेत त्याच्या सूचनांकडे फारसं लक्ष न देणारी मुलं इथे मात्र त्याचा शब्द प्रमाण मानून एकदम थांबली.

तरवड, टणटणी आणि सीताफळाच्या झाडांच्या आधारानं एक वेल वर चढलेली होती. झुडपात शिरून महादूनं त्या वेलीची कोवळी पानं तोडून आणली.

तो झुडपात शिरताना मला काळजी वाटली. 

मी त्याच्याजवळ जात म्हणालो, “महादू, जपून बरं… खाली विंचू-किडे असू शकतात.”

माझं वाक्य पूर्ण होण्याआधी तोच मला थांबवत म्हणाला, “सर, तुम्ही लांबच थांबा. इथं खाली सापं राहतात.”

शिवारफेरीला मुलांना न्यायचं म्हणजे त्यांची जबाबदारी आपल्यावरच असते. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये मी मुलांना फारच सूचना देत असे. पण महादू सोबत असला, की अडचणीची ठिकाणं, जपून थांबायच्या जागा, अंग खाजणारी पानं, वेली… सगळं ओघातच शिकवलं जात होतं. शिवारफेरीत आम्हाला त्याच्या अनुभवाचा, शिवारज्ञानाचा फारच उपयोग व्हायचा.

महादू त्या वेलीची मूठभर पानं घेऊन आला.
सर्वात आधी दोन पानं त्यानं माझ्या हातात दिली.
मग एकेक पान सगळ्या मुलांना देत म्हणाला, “खा बघा ही पानं.”

आम्ही सगळ्यांनी ती पानं चाखली.
वेगळीच चव. बराच वेळ ती चव तोंडात रेंगाळत राहिली. सगळ्यांना छान वाटलं.

“कसली आहेत ही पानं?” मुलांनी एकदम विचारलं.

“ही पानं फांदीची,” महादू सांगू लागला.

“फांदीची?”
“हो, फांदीचीच!”

तो पुढे म्हणाला, “फांदी हे या वेलीचं नाव. या पानांची भाजी करतात. तिला फांदीची भाजी म्हणतात.”

तेवढ्यात मन्मथ झुडपाकडे धावला.
मी त्याला थांबवलं.

महादूला म्हणालो, “मन्मथला थोडी पानं दे.”

महादूनं त्याला पानं दिली.
मन्मथच्या संग्रहात आणखी एका पानाची भर पडली.

थोडं पुढे एका वळणावर डोळ्यात भरणारं बहाव्याचं झाड होतं.

महादू थांबला. थोडा वेळ त्यानं झाडाचं निरीक्षण केलं.

हातात बंद करून काहीतरी घेऊन आला… मुलांनी उत्सुकतेनं त्याच्याभोवती रिंगण केलं. महादूनं अलगद हात उघडले.
एक मोठा भुंगा भुर्रर्र… करत उडून गेला.

“हा सोनकिडा,” महादू सांगू लागला, “बहाव्याच्या झाडावर हमखास सापडतो, त्याला बहाव्याची पानं खायला खूप आवडतात.”

जी मुलं वर्गात महादूला हसत होती, त्याला गणितं येत नाहीत म्हणून हिणवत होती,
तीच मुलं आता त्याच्याभोवती गोळा होऊन त्याचा शब्द न् शब्द विद्यार्थी होऊन ऐकत होती.

शिवारफेरीसाठी आम्ही नागनाथ गंटावार यांच्या शेतीकडे वळलो. आम्हाला पाहताच नागनाथ पुढे आला. 

डोक्याला गुंडाळलेला टॉवेल सोडून त्यानेच तोंडावरचा घाम पुसत म्हणाला, “या या गुरुजी. आज पोरं शिवार पाहायला आलीत वाटतं.”

“हो,” मी म्हणालो, “आज त्यांना पुस्तकाबाहेरचं शिवार दाखवायचंय.”

नागनाथ हसला आणि म्हणाला, “मग आधी नदीकडं जाऊ या. तिथं वेगवेगळे वनस्पती आणि जीव दिसतात.”

तेवढ्यात त्याची मुलं, अमृता आणि अनुज, आमच्याजवळ आली.
“बाबा, चवाळे (रिकामी पोती एकमेकांना शिवून बनवलेलं अंथरूण) चिंचेखाली अंथरू का?” अमृतानं विचारलं.
“अंथर. फिरून आल्यावर तिथंच बसू,” नागनाथ म्हणाला.

थोडं पुढे गेल्यावर ज्वारीचं पीक दिसू लागलं. महादू लगेच पुढे गेला.
“ही ज्वारी आता कणसं धरायला लागलीत,” तो म्हणाला.
“ज्वारीला पाणी नसलं तरी चालते, फक्त थंडीवर येते ही ज्वारी.”

नागनाथनं त्याला दुजोरा देत मान डोलावली.

तेवढ्यात मन्मथ एका झुडपाजवळ थांबला.
“सर, या पानांची मागची बाजू बघा,” तो म्हणाला.
काही पानांच्या मागे छोट्या छोट्या गाठी होत्या.
“मागच्या फेरीत सांगितलं होतं ना,” त्यानं आठवण सांगितली.
अर्जुन, बिबा, पळस… अशा काही झाडांच्या पानांच्या मागे गाठी असतात, असं मागच्या शिवारफेरीत मी मुलांना सांगितलं होतं.

“अशी गाठी असलेली पानं वेगळी गोळा करायची.”

नदीकाठी आलो तसं भुणभुणीचा आवाज जाणवू लागला.
अनुज थोडा घाबरून म्हणाला, “बाबा, इथे मधमाश्या खूप आहेत.”

नागनाथ थांबला. “घाबरायचं नाही. नदीकाठी मधमाश्या पाणी पिण्यासाठी असतातच. त्या आपल्याला त्रास देत नाहीत, आपण त्यांना त्रास द्यायचा नाही.”

महादूनं आसपास पाहिलं आणि म्हणाला, “मधमाश्या असल्या, की पिकालाही फायदा होतो.”

नागनाथ माझ्याकडे पाहून म्हणाला, “गुरुजी, अशीच शिवारातली शिकवण पोरांना मिळाली पाहिजे. हीच खरी शाळा आहे.”

थोडं अंतर आम्ही नदीकाठावरून चालत राहिलो.

काहींनी नदीतले गुळगुळीत गोटे सोबत घेतले, काहींनी नदीतली वाळू एकत्र जमून तयार झालेल्या बेटावर पाय रोवून खोपा तयार केला. मन्मथनी चकाकणाऱ्या गारगोट्या घेतल्या.

वाळूच्या बेटावर मुलं एकत्र रमली, हे पाहून नागनाथ पुढे होऊन त्याच्या जुन्या आठवणी सांगू लागला.

“नदी आटली की ह्या वाळूत खड्डा करून आम्ही पाणी प्यायचो.” 

नदी आटली तरी ह्या वाळूच्या आतमध्ये पाणी असतं. 

अलीकडे खूप लोकांनी घर बांधायला ही वाळू नेल्यामुळे अशा जागा कमी झाल्या वगैरे बरीच माहिती नागनाथ सांगत होता.

एक दोघांनी खड्डा करून त्यात पाणी कसं जमतं हे बघितलं. मुलांना मजा वाटत होती.  

थोडं ऊन वाढायला लागलं होतं.

आता हळूहळू आम्ही चिंचेच्या झाडाकडे निघालो.

शिवारफेरीचा समारोप चिंचेखाली झाला.
काय पाहिलं, काय खाल्लं, काय शिकलो, हे सांगायला सगळ्यांनी सुरुवात केली.

त्यांनी वहीमध्ये बारीकसारीक गोष्टी नोंदवून घेतल्या होत्या. 

काहींनी झाडांची, पानांची, मधमाशी, फुलपाखरांची चित्रं काढली होती. 

मुलं भरभरून बोलत होती. 

मी मुद्दाम महादूच्या शिवारज्ञानाचं कौतुक केलं.
ते ज्ञान किती महत्त्वाचं आहे हे सगळ्यांना सांगितलं.

त्या दिवसानंतर महादू नियमितपणे शाळेत येऊ लागला.

आता तो वर्गात दबकत बसत नव्हता.
हळूहळू त्याच्या गणिताला गती येऊ लागली होती.
शिवारात उमललेला महादू हळूहळू शाळेतही उमलू लागला.

बसवंत विठाबाई बाबाराव

baswantv@gmail.com 

शेतशिवारातली गोष्ट वाचतो आहोत, तर त्यानिमित्ताने पालकनीती ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ च्या अंकात प्रकाशित झालेल्या चिऊताईचं शेतकरीदादाला पत्र ह्या लघुकथेची लिंक येथे देत आहोत. अवश्य वाचा…  https://palakneeti.in/चिऊताईचं-शेतकरीदादाला-पत/