संवाद


‘रीडिंग किडा’ वाचनालयाने 8 वर्षांचा प्रवास पूर्ण केलाय. आणि गेल्या एक
वर्षापासून त्यांचा काछीपुरा वस्तीतल्या मुलांपर्यंत वाचनसंस्कृती पोचवण्याचा,
रुजवण्याचा प्रयत्न चालला आहे. मुलांसाठी हक्काची सर्वसमावेशक जागा असावी;
तिथे त्यांना बोलता येईल, खेळता येईल आणि मोकळेपणी आपली मते मांडता
येतील, असा त्यांचा प्रयत्न आहे.
रविवारचा दिवस होता. काछीपुरा वस्तीत नव्याने सुरू झालेल्या केंद्रावर आम्ही वर्ग
घ्यायची तयारी करत होतो. थोड्या वेळात मुले आली असती. तेवढ्यात शुभम (नाव
बदलले आहे) आला. 9 वर्षांचा शुभम आमच्या साप्ताहिक गोष्टी-वर्गाला वस्तीतल्या
नियमित येणार्‍या मुलांपैकी एक. त्याच्या वर्गाचा दिवस शनिवार. त्यामुळे आज
त्याला वर्गात बसता येणार नाही, असे समजावून सांगूनही त्याचा हट्ट होताच!
म्हणून थोड्या गप्पा करून वर्ग सुरू करायची वेळ झाली की जा म्हटले. तो बसला.
शनिवारी का नाही आला, शाळेत सध्या काय सुरू आहे अशा गोष्टी सांगू लागला.
मग म्हणाला, ‘‘सगळ्या लेकरांचा शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस काऊन
नाही वर्ग घेत तुम्ही?’’
मी म्हटले, ‘‘खूप मुलं असली की कल्ला होतो, मज्जा नाही येत, सगळ्यांशी बोलता
नाही येत, गप्पा होत नाहीत.’’
तोच लगेच म्हणाला, ‘‘हं, मग मारामारीबी होते, झगडा होतो… मी काल नाही
आलो तर तुम्हाला गमत नसेल ना?’’
(बोली भाषेत गमत नसेल म्हणजे करमत नसेल.)
साक्षीताई म्हणाली, ‘‘हो ना, अदितीताई विचारत होती, शुभम का नाही आला?
आता कळलं, तू तुझ्या मावशीकडे गेला होता!’’
पुस्तक वाचले का विचारले, तर ‘हो’ म्हणाला; ‘पण आज नाही आणला, पुन्हा
वाचायचं’.
मग आपणहूनच म्हणाला, ‘‘ही जागा मस्त वाटते, कुठेतरी दूर आल्यासारखं वाटतं,
शांत वाटतं इकडे.’’

मला हे ऐकून आनंदच झाला. 8-10 महिने झाले या वस्तीत मोकळ्या जागेवर
मुलांसोबत वर्ग घ्यायला. आता दोन आठवड्यांपूर्वी वस्तीतच ही छोटी खोली
मिळाली आणि आमचे वर्ग आम्ही इथे सुरू केले.
मी शुभमला म्हटले, ‘‘फळ्यावर काय लिहिले आहे, वाचतोस का?’’
तुटक तुटक का होईना, त्याने हळूहळू दहा ओळी वाचल्या आणि अर्थपण
सांगितला. साक्षीताईने त्याला शाबासकी दिली.
तो ऐटीत म्हणाला, ‘‘मला वाचता येतं.’’
डोळ्यात एक चमक. मग आज आपल्या वर्गाचा दिवस नाही हे त्याला मान्य झाले.
‘पुढच्या शनिवारी येतो’ म्हणत निघाला.
वस्तीतील मुलांसोबत होणारे हे संवाद आमचे मन तर प्रफुल्लित करतातच; पण
वाचनसंस्कृती रुजवण्याच्या वाटेवर आमची पावले योग्य दिशेने पडताहेत, याची
शाश्वतीदेखील देतात.


डॉ. पल्लवी बापट पिंगे
रीडिंग किडा लायब्ररी
पाठिंबा फाउंडेशन, नागपूर
readingkeedalibrary@gmail.com