संवादकीय

पालकनीतीचा हा अंक आपल्या आसपासचं अर्थकारण पालकत्वाच्या भूमिकेतून समजावून घेणारा आहे. अगदी प्राथमिक पातळीवर पाहू गेलं तर ‘आपली आर्थिक परिस्थिती मुलाला जेवू घालण्याइतकी आहे ना’, एवढा प्रश्न तर प्रत्येक पालकाच्या निदान मनात तरी येतोच; पण पालकत्व निभावणं म्हणजे केवळ चोचीला चिमणचारा घालणं नाही. बालकाच्या शिक्षणाचा, छंद-आवडींचा, आनंदाचा विचार करणंही त्यात येतं. प्रत्येक बालकाला मिळायलाच हवेत असे हक्क – सुरक्षित बालपण, आरोग्य, न्याय, दर्जेदार शिक्षण, निवारा, आधार, क्रीडांगणं – मिळवून द्यायला हवेत. त्यातला आपला वाटा किती, तो देणं आपल्याला शयय आहे ना याची आपल्याला जाणीव हवी. शिवाय शाळा-क्रीडांगणं काही एकेका मुलासाठी नसतात. ती सार्वजनिकच हवीत. ह्या व्यवस्था करण्याची सरकारी इच्छा हवी. सरकारला त्यासाठी पैसा मिळायचा तर नागरिकांकडूनच मिळणार. मग तो ठरल्याप्रमाणे मिळावा, वाटेत न सांडता योग्य कारणासाठी वापरला जावा- हे सगळे विषय अर्थकारणाच्या परिघात येतात.

एका बाजूला पालकत्व हा विषय आर्थिक चौकटीच्या बाहेरचा. प्रियजनांशी असलेलं जीवामोलाचं नातं, त्यातलं अन्योन्य प्रेम, आपुलकी, एकमेकांची काळजी हा तर पालकनीतीचा पाया आहे. या गोष्टी पैशात मोजता येणार्‍या नाहीत. आपल्या जीवनातल्या महत्त्वाच्या बाबी – माणुसकी, न्याय, शिक्षण, आरोग्य… ह्या गोष्टीही मुळात आर्थिक नाहीत; पण त्यांची उपलब्धता बघायला गेलात, तर त्यामध्ये मात्र अर्थकारणाचा मोठा वाटा आहे.

वैयक्तिक स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जवळजवळ प्रत्येक व्यवहाराशी ह्या विषयाचा संबंध लागतो. हे संबंध आपल्याला खोलातून समजावेत हे पालकपणाची धुरा खांद्यावर घेणार्‍यांसाठी आज आवश्यक आहे. आपल्या पाल्याला चांगलं पालकपण, शिक्षण, निवारा, आधार, सुरक्षितता आणि मनाची मोकळीक देण्यासाठी आपली तयारी झालीय का? त्यासाठी आजूबाजूची परिस्थिती साजेशी आहे का? की तशी होण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील? आपल्या जीवनातला किती वेळ आपण पालकत्व निभावण्यासाठी देणार आहोत? त्याचा परिणाम आपल्या मिळकतीवर होईल हे आपल्याला चालेल ना? मुळात आपण आयुष्यात काय महत्त्वाचं मानतो? अशा अनेक प्रश्नांकडे आपल्या विचारांची वाट वळवणारा हा अंक आपल्यासमोर आणताना आनंद वाटतो आहे.

अर्थकारणाचा विचार करताना सहज एक प्रश्न मनात येतो. पैसा नावाची गोष्ट माणसाला सुचली तरी कशी? तीस हजार वर्षांपूर्वी माणूस जेव्हा कपडे घालायला लागला त्याच काळात आपल्या जवळच्या वस्तू दुसर्‍याला दिल्यावर त्या उसनावळींची मोजदाद आणि नोंद करण्याचीही सुरवात झाली असावी, असा अंदाज वर्तवला जातो. मात्र त्यावेळी चलन म्हणावं तशी काही वस्तू ठरवली गेलेली नसावी. एरवी कुठल्याही इतर कामात वापरली जात नसलेली ही वस्तू एकमेकांच्यातली देवाणघेवाण न्याय्य व्हावी म्हणून वापरली जायला पुढे अनेक हजार वर्षांचा काळ जायला लागला. ह्या चलन-वस्तूची किंमत किंवा त्या वस्तूला दिलेला अर्थ देवाणघेवाण करणार्‍या सर्वांना मान्य असावा लागतो. वस्तू आणि सेवा यांच्या किंमतीची ही खूण असल्यानं ती वस्तू सुकून, संपून, गंजून, मोडून, वाफ होऊन जाणारी नसावी असा विचार चलनाच्या रचनेत केलेला दिसतो. नेमका अंदाज आज सांगता येत नसला, तरी गेल्या तीन हजारहून जास्त वर्षं मानवी संस्कृतींमध्ये चलन वापरलं जात आहे. गेल्या हजार वर्षांत चलनकल्पनेनं खूप मोठी उडी घेतलेली आहे. सुरवातीला कवड्या- दगड अशा सहज सापडणार्‍या वस्तू वापरलेल्या असाव्यात. बरेचदा सोन्यासारख्या धातूंचा वापरही केला जात असावा. नंतरच्या काळात मात्र राजचिन्हांकित मोहरा-नाणी, आणि त्यानंतर सांभाळायला सोप्या, वजनाला हलयया अशा नाणी-नोटांचा प्रारंभ झाला असावा. देशांच्या सीमा आणि सरकारं तयार झाल्यावर देशादेशांची वेगवेगळी चलनं आणि त्यांच्यातील आंतरसंबंधांचीही रचना तयार झाली. चलनकल्पना आता आणखी पुढे आलीय. बँकेतल्या खात्यांमधून दुसर्‍या खात्यात असा पैशांचा अप्रत्यक्ष प्रवास व्हायला लागला आणि आता तर तो बिटकॉईनसारख्या आभासी चलनापर्यंत येऊन ठेपलेला आहे. हा प्रवास मात्र गेल्या शतकामधलाच आहे. प्रामुख्यानं विसाव्या शतकाच्या अंतापासून ते आतापर्यंतचा आहे.

मातृभाषा जशी कुणी मुद्दाम न शिकवता केवळ साहचर्यानं आकळते, तितयया जवळिकीनं आज आपल्याला चलनकल्पना कळलेली आहे. शालेय शिक्षणाचं तोंडही न पाहिलेल्या लोकांनादेखील भाजी-धान्य विकताना-विकत घेताना पैशांचे व्यवहार अचूक करता येतात. आयुष्यात पैशांचा संबंध जेवढा येतो, त्या प्रमाणात हे सहजशिक्षण होतं. मात्र अर्थव्यवहारातली गुंतागुंत समजून घेणं इतकं सोपं नाही. त्यासाठी त्या विषयाच्या खोलात शिरायची तयारीच असावी लागते. आज आपण आपल्या आयुष्यामधली गुंतागुंत विविधप्रकारे इतकी वाढवलेली आहे, की त्याच्याशी दोन हात करताना अर्थकारणाचा किमान काही अंदाज प्रत्येक माणसाला असायला हवा. ह्याची जाणीव जनमनाला अद्याप का झालेली नाही ह्याचंच आश्चर्य वाटतं. ह्यामागचं एक कारण आपल्या शिक्षणप्रक्रियेत आहे.

अर्थशास्त्र हा विषय अकरावी एस.एस.सी. पर्यंत नव्हताच. तो दहावी एस.एस.सी.ला आणला गेला होता. शालेय अभ्यासक्रमात अर्थशास्त्राला स्थान दिलं गेलं होतं. आता मात्र दहावीच्या अभ्यासक्रमातून अर्थशास्त्र विषय काढून टाकलेला आहे. त्याआधी अतिशय नाममात्र प्रमाणात तो आहे; पण बोर्डाच्या परीक्षेत स्थान नसलेला, केवळ शाळांच्या पातळीवर शिकण्याजोगा विषय म्हणून ठेवल्यावर त्याकडे जेवढं लक्ष दिलं जावं तेवढंच ते आहे. पुढे उङ्खशिक्षणात विज्ञानशाखेला एकदा गेलात, की अर्थशास्त्राचा आणि तुमचा संबंध येण्याची शययताच नाही. वाणिज्यशाखेच्या अभ्यासक्रमातही अर्थशास्त्राचा अभ्यास समाविष्ट नाही. कलाशाखेत जाऊन अर्थशास्त्राची निवड केली तरच तो शिकता येण्याची शययता आहे. हा अभ्यासक्रम कसा आहे, आणि त्यातून नेमकं काय कळतं हा प्रश्न आपण बाजूलाच ठेवू. परिणामी अनेक उङ्खशिक्षितांना अर्थशास्त्रीय संदर्भ लक्षात घ्यायला हवेत हे सुचत नाही.

पन्नास-साठ वर्षांपूर्वी रुपयाला लिटरभर दूध मिळे, आज त्यासाठी 40 रुपये लागतात. म्हणजे ‘त्याकाळी किती स्वस्ताई होती’, असं आजही लोक म्हणतात. त्या काळातली समकक्ष मिळकत किती असे, आणि त्याच्या किती प्रमाणात दुधाचा भाव होता याचा संदर्भ घेतला तर आजच्या बदललेल्या परिस्थितीत दूध खरं म्हणजे स्वस्त झालेलं आहे. त्यामागे दुधाचं वाढलेलं उत्पादन आहे, दूधव्यवसायांची बदललेली स्थिती आहे, तंत्रज्ञानही आहे. ह्या बदललेल्या किंमतींचं गणित जागा, सोनं, अन्नधान्य, पेट्रोल, फोन, वाहन, आणि संगणक अशा अनेक वस्तूंबाबत करून पाहिल्यास पैशांच्या किंमतीत झालेल्या बदलाची व्यामिश्रता लक्षात येते.

सगळेच बदल चांगले आहेत असं अजिबात नाही. त्यातूनही फसवाफसवी, जनांच्या अगतिकतेचा फायदा उठवणं हे होत राहतंच. ह्यामध्ये बाजार, उद्योग, सरकार अशा सर्वांचाच वाटा असतो. त्यापासून आपली सुटका करून घेतच प्रत्येकाला पुढे जायला लागतं. त्यासाठीच पर्यावरण, मानसशास्त्र अशा विषयांशी अर्थकारणाचे असलेले लागेबांधे जगभरात उलगडून बघितले जातात. पैशांच्या वापराचे निर्णय कसे घेतले जातात यावर अनेक अभ्यास होत राहतात.

जोडअंकाच्या निमित्तानं ह्या विषयाला न्याय देण्याची संधी हाती आली. यावर्षी आजवर कधीही न घेतलेला विषय आम्ही आपल्यासमोर मांडला याचं कारण नवा संपादक गट. त्यांनी आग्रह धरला हेच त्यामागचं कारण. आमचा हा प्रयत्न किती सफल झाला, हे मात्र वाचकांनीच ठरवायचं आहे.