संवादकीय – जुलै २०२२


मानवजातीसमोर सध्या अभूतपूर्व आव्हाने उभी ठाकली आहेत. युवाल नोवा हरारी
म्हणतो तसे सगळ्या जुन्या गोष्टी (धर्म की धर्मनिरपेक्षता, जमाती की गट,
संघटना की ब्रँड, पैसा की क्रिप्टो चलन, विचारधारा, राष्ट्र) धडाधड कोसळताहेत
आणि त्यांची जागा घेणार्‍या नवीन गोष्टी मात्र अजून उदयाला आलेल्या नाहीत.
अशा अनिश्चिततेने ग्रासलेल्या आव्हानात्मक जगाला सामोरे जाण्यासाठी आपली
तयारी झाली आहे का? जगात आजूबाजूला काय चालले आहे ते आपल्या मुलांना
कळावे आणि जगण्याची गुंतागुंत उकलावी यासाठी त्यांना कसे शिकवायचे?
पूर्वी वडीलधार्‍यांचे अनुकरण करण्यात तुलनेने कमी जोखीम असे. तेव्हा जगातील
बदल संथ गतीने होत होते. मात्र हे एकविसावे शतक वेगळे आहे. आजचा बदलाचा
वेग पाहता आपण मोठे पुढच्या पिढीला जे सांगतोय ते कालातीत शहाणपण आहे
की कालबाह्य पूर्वग्रह आहेत, त्याबद्दल आपल्यालाच खात्री देता येत नाही.
वर्षानुवर्षे आपण आयुष्य दोन टप्प्यांमध्ये विभागत आलोय. आधी शिकायचे, मग
नोकरी किंवा शिकलेले वापरून काम करायचे. रोजीरोटी कमवायची; जमल्यास
समाजाप्रति थोडे फार योगदान द्यायचे, बस्स. आज ज्या झपाट्याने परिस्थितीत
बदल होताहेत, ते पाहता, ही पारंपरिक रचना लवकरच निकालात निघेलसे दिसते.
आजचे शिक्षण तर या बदलत्या वास्तवाच्या दृष्टीने अगदी कुचकामी आहे. शिक्षक
विद्यार्थ्यांवर माहितीचा भडिमार करत राहतात. आजच्या समाजमाध्यमी जगात
मुलांना माहितीची कमतरता अजिबात नाही. मिळालेली माहिती नेमके काय सांगते
आहे, हा अन्वय लावता येणे, ह्याची गरज आहे. आज ज्यांची चलती आहे, अशा
कौशल्यांमध्ये मुलांनी पारंगत व्हावे अशी आपली धडपड असते. प्रत्यक्षात ज्या
वेगाने आजूबाजूची परिस्थिती बदलते आहे, ते पाहता ही कौशल्ये पुढच्या आयुष्यात
कितपत उपयोगी ठरतील हे जरा तपासून बघावे. अशा परिस्थितीत काय टिकणारे
आहे याचा अंदाज घेत आपल्याला पुढे जायला लागेल. परिस्थिती बदलली तरी
माणूसपण बदलत नाही. त्या माणूसपणाला हाक घालून अधिक संवेदनशील आणि
समजूतदार समाजाचे चित्र वास्तवात आणण्यासाठी नेमके काय करावे लागेल?

निदान मुलांना काहीएक सुखाआनंदाने, शांततेने जगता यावे एवढी तरी आपली
इच्छा असेलच ना?
उपलब्ध माहितीचे तुकडे जोडून जगाचे व्यापक चित्र मांडता आले तर बदलाला
सामोरे जाण्याची, नवीन गोष्टी शिकण्याची आणि सर्वस्वी अनोख्या परिस्थितीत
आपले मानसिक संतुलन टिकवण्याची धमक, काटकपणा आपल्या मुलांना शिकावा
लागणार आहे. आपल्याला उत्तम साधणार्‍या गोष्टी कालबाह्य ठरल्याने पुन्हापुन्हा
सोडून द्याव्या लागतील, नव्यांची सवय करावी लागेल. ते शक्य असते यावर
मुळात विश्वास ठेवावा लागेल. अवघड परिस्थितीचा स्वीकार करून नव्या जोमाने
उभे राहण्याची ताकद पुढच्या पिढीमध्ये यावीच लागेल.
अशा ह्या अवघड कामात यशस्वी व्हायचे असेल, तर लहानमोठे सगळ्यांनाच
आपली पाळेमुळे जाणून घेण्यासाठी, आपण कोण आहोत आणि आयुष्याकडून
आपल्या काय अपेक्षा आहेत, हे तपासण्याचा अवघड अभ्यासक्रम शिकावा लागणार
आहे, एवढेच या निमित्ताने सांगावेसे वाटते.