#सहलीच्या_निमित्ताने_१
कोरोना नंतर खेळघरातील मुलांची मोठी सहल झाली नव्हती, त्यामुळे यावर्षी मुलांची सहल लांब नेण्याचे ठरले. सहल म्हणताच मुलांना अर्थातच आनंद झाला. सगळ्या तायांसोबत आणि मुलांसोबत संवाद करुन १५ डिसेंबरला “मोराची चिंचोली” येथील ‘कृषी मल्हार पर्यटन केंद्राला’ भेट देण्याचे ठरले.सहलीच्या निमित्ताने मुलं चहुबाजूने शिकत असतात. त्यांचं हे शिकणं अधिक समरसून व्हावं यासाठी अनेक संधी मुलांना द्यायच्या होत्या. आठवडाभर आधीपासूनच सहली संदर्भात मुलांशी संवाद सुरु झाला. ट्रीपचे बजेट, जाण्या येण्याचा-जेवणाचा खर्च या बद्दलचे अंदाज करणे, त्याचे गणित मांडणे, जाणार आहोत त्या जागेचा नकाशा, त्या जागी जाईपर्यंतचा रस्ता, रस्त्याने लागणाऱ्या नद्या म्हणजेच एकूण भौगोलिक आणि ऐतिहासिक संदर्भ समजून सांगणे, प्रत्यक्ष जागेचे व्हिडीओ दाखवणे असे रोज काहीना काही सुरु होते. ते सगळे पाहून मुलेही हरखून जात होती आणि सगळ्या प्रक्रियेत उत्साहाने भाग घेत होती.इयत्ता चौथी ते सातवीतल्या तीन गटांच्या सहली एकत्र नेण्याचे ठरल्यावर त्या त्या गटाच्या वर्गतायांनी मिळून जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. तीन गटांनी एकत्र जाणं हा तायांसाठीसुद्धा तितकाच कस पहाणारा निर्णय होता. भिन्न वय आणि तोडीसतोड उत्तरासाठी मारामारी करायलाही पुढे मागे न बघणारी मुलं…असे मिश्रण होते. ‘सहल ही आपली सामूहिक जबाबदारी आहे’ या बद्दलचे भान मुलांना यावे यासाठी सगळ्याच ताया झटत होत्या. १५ डिसेंबरच्या सकाळी अगदी वेळेत मुलं हजर होती. बसमध्ये बसतानाही माझा गट- तुझा गट असं न करता सगळे एकत्रित जबाबदारी घेऊन बसले. पुरेसा वेळ हातात असल्याने रांजण खळगे सुद्धा बघता आले. नदीचा बदललेला प्रवाह आणि बसाल्ट खडकाबद्दल मुलांशी आधी बोलणे झालेच होते. पर्यटन केंद्रावर पोहोचल्यावर खगोल विश्व, किल्ल्यांचं प्रदर्शन, जादूचे खेळ, स्विमिंग, rain dance, घोडा गाडी ,बैलगाडी- राईड, टायरचे झोके आणि अशा प्रकारचे विविध अनुभव सगळ्या मुलांना मिळावेत म्हणून तायांनी उत्तम व्यवस्थापन केलं होतं आणि मुलांनीही त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला. त्या खुल्या आणि मोकळ्या वातावरणात मुलं खुलली, बहरली आणि शांतवली सुद्धा. खेळघरातल्या रेश्मा ताई, अमृता ताई आणि सुषमा ताई तसेच स्वयंसेवी कार्यकर्त्या अरुणा ताई यांनी प्रचंड उत्साहात आणि मुलांवर योग्य तिथे विश्वास ठेवल्याने ही सहल अतिशय आनंदाने पार पडली.तिथून आल्यानंतरही त्या अनुभवांवर बोलणं, किल्ल्यांबद्दल बोलणं, त्याला जोडून activity घेणं आणि feedback म्हणून पर्यटन केंद्राला पत्र लिहिणं या कृती सध्या वर्गात सुरु आहेत.+5