स्थलांतरित मुलांचे विश्व
‘जिज्ञासा चॅरिटेबल ट्रस्ट’ ही संस्था बालकांना सुरक्षित आणि निरोगी बालपण मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी वंचित, स्थलांतरित, तसेच ऊसतोडणी मजुरांच्या मुलांबरोबर काम करते. कोल्हापूर जिल्ह्यातील वंदूर हे संस्थेचे कार्यक्षेत्र आहे.
महाराष्ट्रात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला, की ऊसतोडणी कामगार वेगवेगळ्या भागांतून स्थलांतरित होऊन पूर्ण हंगाम संपेपर्यंत टोळी करून राहतात. त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलेही असतात. त्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून हंगामी साखरशाळा चालतात.
कोल्हापुरातही अशी बरीच मुले साखरशाळेत येतात. त्यांचा शिक्षणातील रस वाढावा म्हणून आम्ही कोरोनानंतर काम सुरू केले. त्यांच्याशी मारलेल्या गप्पांतून त्यांचे भावविश्व मनाला स्पर्शून जाते. बरीच मुले पहाटे 3 वाजता उठून आईवडिलांबरोबर ऊस तोडायला जातात आणि शिकण्याच्या ओढीने दुपारी साखरशाळेत येतात. काही मुले मधल्या सुट्टीत पटकन टोळीत जाऊन गुरांना चारा-पाणी पाजून परत येतात. जाऊन जनावरांना पाणी पाज, वैरण घाल, लहान भावंडांना जेवायला दे, हे त्या लहानग्यांना सांगावे लागत नाही. परिस्थितीच सारे शिकवते. आपण त्यांची आपुलकीने चौकशी केली, की तीच कधी आपलेसे करून घेतात, कळतही नाही.
मासिक पाळी या विषयावर मी मुलींचे माहिती-सत्र घेत होते. बराच वेळ त्या काहीच बोलत नव्हत्या. मग मी त्यांना सांगितले, ‘‘मला पण तुमच्यासारखी प्रत्येक महिन्यात मासिक पाळी येते.’’ आणि तुमच्या-माझ्यासारखी इतर महिलांनापण मासिक पाळी येते. त्यांचा चेहरा एकदम खुलला. त्या नुकत्याच वयात आलेल्या असल्यामुळे त्यांना वाटत होते, की फक्त त्यांनाच मासिक पाळी येते. सांगण्याचे तात्पर्य, समुदायापासून ते स्वतःला किती वेगळे समजतात.
एकदा आमचे एक कार्यकर्ते कामगारांची टोळी राहते तिथून साखरशाळेत जात होते. 4-5 मुले एकदम स्तब्ध उभी असलेली त्यांना दिसली. दूर साखरशाळेत राष्ट्रगीत सुरू होते, म्हणून ही मुले इकडे त्यांच्या तंबूजवळ सावधान स्थितीत उभी होती. त्यांना असे करायला सांगायला इथे कोणीही नव्हते. त्यांची स्वयंप्रेरणा बघून आम्ही चकित झालो.
एका कॉलेज ग्रुपने एकदा साखरशाळेतील सर्व मुलांना चपला दिल्या. दुसर्या दिवशी पाहते, तर मुले अनवाणीच. ‘तुम्ही उन्हात अनवाणी का आलात?’ ह्या प्रश्नाला त्यांनी दिलेले उत्तर मनाला चटका लावणारे होते.
‘‘आम्हाला त्या चपला इथून गावी गेल्यावर वापरायच्या आहेत. नवीन नवीन! म्हणून त्या आम्ही आमच्या ट्रंकमध्ये जपून ठेवल्या आहेत. तिथे आम्हाला काही मुलं चिडवतात.’’ तिथे आपल्याला कुणी कमी लेखू नये म्हणून इथे उन्हात, उसाच्या पाल्यात ही मुले चटके खात, कापत-ठेचकाळत चालत राहतात. खेळण्या-बागडण्याच्या, नवनवीन गोष्टी शिकण्याच्या वयात सामाजिक अवहेलनेचे ओझे वाहतात.
पालकनीतीच्या माध्यमातून सर्व वाचकांना एक विनंती आहे. साखर, गूळ तयार होण्याच्या प्रक्रियेतील हा समाज, वीटभट्टीवर काम करणारी, कचरावेचक, बांधकाम मजुरांची मुले ह्या घटकांसोबत काम करणार्या संस्थांना भेट द्यायला मुलांना घेऊन जा. त्यांच्या अवास्तव अपेक्षा, हट्टीपणा कमी होण्यास निश्चित मदत होईल. तसेच सामाजिक प्रश्नांबद्दल जाणीव निर्माण होण्यास सुरुवात होईल.
दिपाली पाटील | hr.jidnyasa@gmail.com