एक अनुभव
आम्ही दोघे डॉक्टर (नेत्रतज्ञ) आहोत. आमच्या वेळा नऊ ते एक व चार ते आठ अशी ओ.पी.डी.ची वेळ. पण इतर वेळात ऑपरेशन्स/नेत्रदानाचा कॉल/लेक्चर्स/इमर्जन्सी असतात. तसेच शनि-रवि. बाहेर व्हिजिटस असतात. पण तरीही आम्ही हे एकाआडएक करतो, एकजण कायम घरात राहील हे बघतो. व हे शक्य होतं कारण आमचा विषय एक आहे. व ह्यासाठीच मी M.D. Gynaec असूनही त्याची प्रॅक्टीस न करता नेत्रतज्ञाची डिग्री घेऊन मग त्यातच प्रॅक्टीस करते आहे.
आम्हाला दोन मुलं आहेत. मोठी मुलगी आता वीस वर्षाची – मेडिकलला असते. औरंगाबादला होस्टेलवर राहाते. धाकटा मुलगा नववीत आहे.
माझी मुलगी आता दोन वर्ष होस्टेलवर राहाते. पहिल्या वर्षाची परीक्षा झाल्यावर ती घरी आली. निकाल लागेपर्यंत पंधरा दिवस सुट्टी होती. आम्ही खूप खुषीत होतो, तीही होती. परीक्षेमुळे तिला तीन महिने घरी येताच आले नव्हते. त्यामुळे तिचा आराम चालला होता. दहा जुलैचा सुमार. पाऊस होता. तिच्या भावाची शाळा चालू होती. आमचं रुटीन होतंच पण तरी पंधरा दिवसांचं आम्ही वेळापत्रक केलं होतं. तिला आवडणारे, न मिळणारे खायचे पदार्थ कोणकोणते केव्हा करायचे इ. खरेदी अधून मधून चालू होती.
पहिले दोन-तीन दिवस झोप, कपडे धुणे, खरेदी यातच गेले मग घरात ती एकटी पडू लागली. तिच्या मित्र मैत्रिणी सर्वांचे कॉलेज सुरू असल्याने एकदम संध्याकाळी भेटत.
तिचा कंटाळा समजत होता. म्हणून मग एका रविवारी प्लॅन केलं. पहाटे सिंहगडला जाऊन यायचं. मग सर्वांनी मिळून मस्त बिर्याणी करायची. कॅरम/पत्ते खेळायचे व संध्याकाळी सीडीवर सिनेमा बघायचा, सगळ्यांनी एकत्र धमाल करायची इ.इ. यासाठी तयारी सुरू झाली. सीडी कोणती? सिंहगडवर पिठलं भाकरी खाऊन उतरायचं का? पण मग बिर्याणी जाणार नाही… तेव्हा पिठलं भाकरी कॅन्सल असे आम्ही या प्लॅनमध्ये बुडत होतो.
आणि शुक्रवारी तिच्या मैत्रिणीचा फोन आला. मैत्रीण बारावीनंतर इंजिनियरिंगला गेलेली. या रविवारीच तिच्या मित्र-मैत्रीणी सर्व लोणावळ्याला निघाले होते. ही मोकळीच असल्याने तिला ‘‘चल ना’’ असा आग्रह झाला. आईला विचारते म्हणाली. तिच्या आवाजात उत्साह होता. तिला समवयस्कांबरोबर बाहेर जायला मिळणार म्हणून आनंद झाला होता.
ही सर्व गोष्ट मी घरात असतानाच माझ्या कानावर पडली. मग रात्री जेवताना सगळ्यांचा मूड बघून तिने विषय काढला, विचारलंन्. आम्ही, ‘तू ठरव काय ते’ असे सांगितले.
खरे तर इथेच आमची निराशा झाली. माझ्या अपेक्षेप्रमाणे तिने परस्परच येत नाही असे सांगावयास हवे होते. याला कारणं अनेक – ती खूप दिवसांनी आम्हाला भेटत होती. रविवारचा आमचा कार्यक्रम सर्वांचा मिळून ठरला होता. मित्र-मैत्रिणी अनोळखी होत्या. कुटुंबाला प्राधान्य हा मुद्दा होताच. पण तिच्या मनात समवयस्क व मजा, यालाच प्राधान्य! आम्ही मात्र कायमच आमच्या कुटुंबाला प्राधान्य दिलेलं तिने लहानपणापासून पाहिले आहे.
दुसरी गोष्ट – ती निर्णय घेऊ शकली नाही. कारण मोह ट्रीपला जाण्याचा! जाणार म्हणाल्यावर सगळे रागावतील तर ते सहन करण्याची जबाबदारी नको, म्हणून मग माझ्या मागे सारखी, ‘आई सांग ना? काय करू?’ यातून उघड दिसत होतं की तिला जायचंय. यात वावगं काही नव्हतं पण मीच आमचा सर्व कार्यक्रम रहित करून तिला काहीच जाणीव करून न देता, परत खुषीने, परवानगी द्यायला हवी होती. शनिवारी संध्याकाळी तिला परत फोन येणार होता. त्यामुळे चलबिचल वाढली. शेवटी मी म्हणाले, ‘‘मी सांगेन ते ऐकशील?’’ तर ‘हो’! कारण आजपर्यंत तिला नाही म्हणालोच नाही. तीही खरं तर एक जबाबदार मुलगी. अनेकदा युवाशक्तीबरोबर ट्रेकला गेलेली. नॅशनल लॉन टेनिस प्लेयर असल्यामुळे भारतभर हिंडलेली.
आता आई आपल्याला दुखावणार नाही असं तिला वाटलं कारण सर्व काही तिच्यासाठी चालू होते.
मला निर्णयाचा पूर्ण अधिकार दिल्यावर मी ‘तू जाऊ नको’ म्हणाले. तर नाराज झाली. ‘का जाऊ नको?’
म्हटलं, ‘पहिलं आपलं ठरलंय आणि परत पूर्ण अनोळखी मुलामुलींबरोबर पाठवणंही मला बरोबर वाटत नाही.’
‘‘त्यात काय? आता होस्टेलवर राहाते. तिथे काय ओळखीची होती सगळी? हिमालयात गेले युवाशक्तीबरोबर ती काय ओळखीची होती? तूच म्हणतेस ना नवीन माणसांना बुजायचं नाही, ओळख होते, आपण रमतो, नवीन अनुभव येतो. त्यातूनच आपण शिकतो-वाढतो. मग आत्ताच काही मी वावगं वागेन का? आणि आम्ही ट्रेनने जाणार येणार. रात्री परतच येतोय की आणि माझी मैत्रीण आहेच की !’’
खूप मनस्ताप झाला तिचा. क्षणभर मी गप्प बसले. तिचे बाबा रविवार तिच्याबरोबर पाहिजे म्हणून शनिवारीच रात्रीपर्यंत ऑपरेशनस करून व्हिजिटहून परत येणार होते. त्यामुळे मी एकटी पडले. पण मीही हरणारी नव्हते.
मी म्हणाले, ‘‘हे बघ. आपलं आधीच ठरलं आहे. आपलं घर पहिलं. तुझा भाऊ नाराज होईल याचा विचार तूच करायला हवा होतास.’’
‘‘दुसरं म्हणशील तर जरी मीच तुला ट्रेकला, इकडे तिकडे जायला प्रोत्साहन दिले असले तरी ते नियोजित कार्यक्रम असत. त्या ग्रुपबरोबर एक ठोस उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जाता. त्याच्या अनुषंगाने मजा, एकत्र राहणं, अडचणींवर मात करणं, मदत करणं या गोष्टी शिकता. इथे उद्दिष्टच मुळी मजा आहे. मला विचारलंस, मी सांगितलं. आता तू विचार कर.’’
झालं. ती एवढी बेदरकारही नाही. त्यामुळे ‘नाही येत’ असं कळवलं, पण घरातलं वातावरण गढुळलं. कुठेतरी तिच्यावरचा विश्वास कमी पडतोय, असं तिला वाटलं असावं. एकंदरीत नकार पचवणं जड गेलं.
दुसरा दिवस उजाडला. सिंहगडवर मी व मुलगाच जाऊन आलो. ती आली नाही. बिर्याणी मिळून केली. वातावरणातला ताण सैल करायचा प्रयत्न करत होतो. पण राग शमला नव्हता. मुलगा आता चिडचिडायच्या बेतात होता. त्याला मजा येत नव्हती. मग जेवणाअगोदरच कॅरमचा बेत आखला. आम्ही तिघं मस्त एन्जॉय करत होतो. आमचा दंगा वाढला तसा हळूहळू तिकडे राग खाली आला. मग हळूहळू बाहेर आली, खेळायला लागली, मग रमली. पण या सगळ्यालाच एक गालबोट लागलं. ते मनात, कोपर्याहत राहिलं. मग ठरल्याप्रमाणे जेवण, सिनेमा. पुन्हा बॅटमिंटन झालं पण सगळंच जपून-जपून. एकमेकांना अकारण जपत. कृत्रिम वाटलं.
मी अजूनही हा प्रसंग विसरले नाही. मी तिला खूष करण्याचा मोह टाळला, नकार देऊन एक मूलभूत गोष्ट जाणवून द्यायचा प्रयत्न केला. पण मला वाटतं.
१) मी चुकले का?
२) तिच्या अपेक्षा चुकीच्या होत्या का?
३) गेली असती तर काय बिघडलं असतं?
४) आम्हाला असुरक्षित वाटलं का?
५) का हे सगळं आपण सततच ‘हल्ली पालक कसे चुकतात, मुलांना समजून घेत नाहीत, जबरदस्ती करतात’ हे वाचत राहिल्यामुळे वाटतंय?
मुलांनाही कधीतरी त्यांच्या जबाबदार्या जाणवून द्यायलाच हव्यात ना?
६) मुलांना नकार पूर्ण विचारांती कधीतरी योग्यवेळी द्यायलाच हवा ना? सगळंच त्यांच्या मनाप्रमाणे करायचं का?
७) सगळं करताना माझा मुलगा माझ्यासमोर होता. तो नाराज होईल म्हणून नाही तर तिला जा म्हटल्यावर त्याच्यावर काय संस्कार होईल असं वाटलं. ‘आपण आपल्या मनासारखंच वागायचं. घरची माणसं असतातच मुळी ऍडजस्ट करून घ्यायला’ हा संस्कार मला नको आहे. तो तिच्यावरही आम्ही केलेला नाही. फाजील लाड केले नाहीत, तिनेही अपेक्षिले नाहीत. मग असं का?
तुम्हाला काय वाटतं?