‘मुलं आणि आपण, अपेक्षा आणि हक्क एक अनुभव’ च्या निमित्ताने
इच्छा – अपेक्षा – हक्क अशी मनुष्याच्या भावनांची चढती भाजणी. सर्वांनीच अनुभवलेली अशी. फक्त मनुष्य प्राणीच असा, की आपल्या अपत्याविषयी ‘होण्या’पासूनच काही इच्छा-अपेक्षा धरतो.
सर्वात आधी मूल हवं – मग शक्यतो मुलगा, मग तो सुदृढ, देखणा, सशक्त, बुद्धिमान, धडाडीचा, छाप पाडणारा….. मागण्या संपतच नाहीत.
हे सगळं असलं तर मग ते वाढावं ही मागणी पुढं येते. मग त्याला यश मिळावं, ते वाढावं, ते टिकावं….. वगैरे. मग त्यानं आपल्याला विचारावं… मानावं…. वगैरे वगैरे.
जे मिळतं त्याच्या पुढची इच्छा होते. ती पूर्ण झाली की ती टिकायची, वाढायची होते. कुठं थोडीशी पूर्तता झाली नाही की मग चुटपुट वाटते, अस्वस्थ वाटतं, हरल्यासारखंही वाटतं.
ज्यांना मूल होत नाही, त्यांची इच्छा अगदी मूलभूत कधीकधी नको इतकी मूलभूत असते! (कसंही चालेल पण मूल हवं). ज्यांच्या मुलात काही कमी असतं, काही निराळं असतं त्यांच्या अपेक्षा बदललेल्या दिसतात. त्यांची स्वतःची अशी एक तत्त्वप्रणाली बनवलेली असते. ‘आपलं वेगळं आहे!’ हीच त्यांची जगण्याची अन् मुलाला वाढवण्याची ताकद बनून राहाते.
एकदा मूलभूत इच्छा पूर्ण झाल्या की अपेक्षांचा जन्म होतो अन् त्याही पुर्याय होताहेत असं दिसत राहिलं की त्यांचे आपोआपच हक्क होतात कारण, त्या ‘गृहीत’ होतात.
सगळं काही ठिकाणी-जागच्याजागी असलं की मग बारीकसारीक गोष्टींचे रेशीमकाटे बोचू लागतात. त्यावर विचार विनिमय करावासा वाटतो, ‘हेच प्रश्न कसे खरे प्रश्न आहेत’ याचंही उदात्तीकरण केल जातं अन् त्यावर बुद्धीजिवींच्यात चर्चा होतात. अर्थात् यात चूक (अन् बरोबर) असं काही नाही, फक्त असं होतं इतकंच.
आता झाल्या प्रसंगाबद्दल अन् त्यातून आलेल्या प्रश्नांबद्दल पाहूया.
आता ‘पालक-मूल’ या जोडीबद्दल आपण विचार करतोय म्हणून, पण कोणत्याही परिस्थितीला लागू पडणार्याज एका सूत्राविषयी पाहूया.
असं म्हणतात की, कोणताही प्रसंग, व्यवहार, win-win situation मधे संपावा. शक्यतो दोन्ही पक्षी ‘जीत’ व्हावी… दोन्ही पक्षी ‘हार’ होऊ नये. ‘हार’ हे परिस्थिती बिघडल्याचं लक्षण आहे. शिवाय ‘जीत’ होताना तिसर्याह कोणाला त्याची झळ लागून त्रास होऊ नये असं हे सूत्र. ते शक्यतो जमतंयना हे पाहावं.
सदरच्या प्रसंगात ‘हार’ (परिस्थितीची) दिसते. या प्रसंगात, win-win किंवा ‘जीत’ कशी झाली असती बरं? केक खाऊनसुद्धा शिल्लक कसा राहिला असता बरं? पाहूया – एक म्हणजे आईने मुलीवर निर्णय सोडला असता अन् मुलीनं तो आईच्या बाजूनं मानला असता अन् तिला अन् सर्वांनाच मजा आली असती तर.
किंवा मुलीवर निर्णय सोडून, तिनं ट्रीपला जाऊनही इतरांनी त्याचं वावगं वाटून घेतलं नसतं, उरलेल्या वेळात तिची गंमत ऐकून, आल्यावर अनौपचारिक गप्पातून तिचा आनंद ‘शेअर’ केला असता तर… किंवा आणखीही कशा प्रकारे जिथं शक्यतो सर्वांनाच ‘बरे’ वाटले असते.
असे झाले नाही म्हणून तर परिस्थिती बिघडली-
win-win situation म्हणजे इथे काय?
एखाद्या प्रसंगात ‘मला वाटते तसेच समोरचा वागतो.’ त्याला तसेच वागावेसे वाटते; नव्हे तसे वागण्यानेच त्यालाही आनंद मिळणार आहे. ही ती परिस्थिती, किती चांगली आहे ना? एक उदाहरण पहा. मला एक छान मोलकरीण मिळाली आहे. छान का? तर तिला काम करण्यातच आनंद आहे! तिच्या मागण्याही अल्प आहेत. तिने आणखी शिकावे-जास्त पैसा मिळवावा कमी श्रम करावेत असे तिलाच वाटत नाही! मी मागे लागूनही तिला तिचे आहे ते आयुष्यच बरे वाटते. मी तिचे शोषण करते असे तिला बिलकूल वाटत नाही. बरीच वर्षे ती तशीच आहे. एकूण हेवा वाटण्यासारखीच परिस्थिती आहे.
त्याच चालीवर – मला एक मुलगा आहे. अगदी हवे तसाच तो वागत आला आहे. त्याची माझी वेवलेंग्थ इतकी जुळली आहे की चुकूनही आमच्यात मतभेद-रागवारागवीचे प्रसंग येत नाहीत. यात काही तडजोड-जुळवाजुळवी आहे असे सुद्धा नाही! मला अगदी तृप्त वाटते.
या दोन्ही उदाहरणांबाबत काय वाटते? असे असणे शक्य आहे का? हे खरेच आहे का? असलेच तर तो अपवादच म्हणावा का? आणि खरोखरच हेवा करण्यासारखीच परिस्थिती नाही का?
हे जर आपल्याला पटले असेल तर पालक-मूल संबंधात किंबहुना कोणत्याही दोन व्यक्तीत येणारे छोटे मोठे संघर्ष आपण मान्यच करू. त्यात वावगे वाटणार नाही.
आता आला तो संघर्ष किती मोठा समजावा?
ज्या अर्थी आईला तो विसरता येत नाही त्या अर्थी तिच्या लेखी तरी तो मोठाच होता.
आता तो खरंच इतका मोठा होता का? का तुलनेने (पूर्वी कधीच असा अनुभव नसल्याने) मोठा वाटला?
की यातून काहीतरी नवीन संघर्ष सुरू होण्याची भीती वाटली म्हणून तो आता दखलपात्र वाटत आहे? यावर काही विचार करूया –
असे संघर्ष (शब्द खरं तर जरा मोठाच वापरलाय पण तूर्त तोच वापरू या) हरघडी उभे राहतात-विरतात-किंवा चिघळतात. एकत्र राहताना, प्रेमाच्या माणसांमध्ये बहुतेकदा विरतात.
आयुष्य cross सेक्शन मध्ये म्हणजे ‘आत्ता’ म्हणून पाहिलं तर तो प्रसंग सूक्ष्मदर्शकाखाली ठेवून पाहिल्यासारखा मोठा दिसून अंगावरच येतो.
पण, Longitudinaly view केलं तर तो दिसेनासाच होतो! इतकंच त्याचं महत्त्व. दुसरं असं की आपल्या मनःस्थितीवर पण आत्ता त्याचा परिणाम होणार की नाही हे अवलंबून असतं. आपला मूड चांगला असेल, मुलाशी चांगलं जमलं असेल मुलानं काही चांगलं केलं असेल तर ती ‘चांगली फाईल उघडलेली असते’ सर्व चांगले प्रसंग मनासमोर ओळीनं येतात, आणखीनच चांगलं वाटत राहतं. पण हेच जर वरच्या प्रसंगासारखं असेल, मन गढुळलेलं असेल तर ‘ती वाईट फाईल’ उघडली जाते अन् तसलेच प्रसंग रांगेने मनात डोकावत राहतात. अन् सदरचा प्रसंग आणखीच काळा वाटू लागतो आणि असुरक्षित वाटू लागतं.
असं दोन्ही वाटणं हे मनःस्थितीचा परिणाम म्हणून जाणवतात. तोच प्रसंग दुसर्यार मनःस्थितीत तोच परिणाम करत नाही. हे पुष्कळांनी अनुभवलेलंही असेल.
आता यातून नवं काही वळण पडेल का ही भीती तपासून पाहूया-
कोणत्याही प्रसंगातून दोन्ही व्यक्ती (समाविष्ट सर्वच) काही ना काही शिकतातच. जसं मुलीला समजतं की, आपल्या अशा वागण्यानं कोणीकोणी दुखावले गेले, तेव्हा तिच्या मनात काहीतरी विचार सुरू होतातच आणि काही तरी निर्णय घेऊन हा प्रसंग मनात फाईल बंद होतो.
प्रत्येकजण आपल्या पूर्वअनुभवानुसार, आपल्या तेव्हाच्या मनःस्थितीत दुसर्याच्या वागण्या-बोलण्याचे अर्थ काढतो अन् त्याला रिऍक्ट करतो. अमूक एक असा का वागला असेल असं शोधू लागलं तर ती कारणमीमांसा कळते.
तसेच, भविष्यात आपण कसे वागावे याबद्दलही. कोणीही व्यक्ती मी कसे वागले असता माझ्या फायद्याचे होईल, हे आपोआपच पाहते. विवेक जागृत होऊ लागला की दुसर्यादचाही विचार करू लागते. मग त्यांना बरे कसे वाटेल? असे वागताना मला किती वाईट वाटेल? या चांगलं वागण्याची आत्ता किती गरज आहे वगैरे गणिते क्षणार्धात मांडून तसे वागते. त्यामुळे या प्रसंगात आई जशी पुढे कसे वागावे याची चाचपणी-विचार करत आहे तसेच मुलगीही करतच असणार. अशीच जबाबदारीची जाणीव होत जाणार.
प्रेमाच्या नात्यांत एकमेकांना दुखवणे टाळले जाते त्यामुळे तडजोड उभयपक्षी होत राहते तरी ती तडजोड वाटत नाही! प्रसंग win-win होण्याकडे कल राहातो. तशीच शक्यता वाढते. इथेही वाढेल असे अनुमान काढायला हरकत नाही.
मुलांना ‘योग्यवेळी, कधीतरी, नकार द्यायलाच हवा’ यात दुमत नाहीये. फक्त प्रश्न येतो योग्यवेळ कोणती? आणि ‘कधीतरी’ अन् ‘नेहमीच’ या शब्दांच्या खर्याव अर्थाचा! आपण मुलांना खूप होकार दिले तरी खूप नकार दिलेलेच असतात की. ते आपण असं म्हणतो तेव्हा विसरतो अन् मुलांच्या तेवढंच लक्षात राहतं.
आता थोड्या खटकल्या त्या गोष्टी : आई म्हणाली, ‘मी ही हार मानणारी नव्हते’ तसंच, ‘अमूक संस्कार आम्ही तिच्यावर केलेला नाही. अमूक संस्कार मला नको आहे’ हे वाक्य. ही दोन्ही वाक्यं पालकत्वातला (वातावरणातला) आवेश आणि अभिनिवेश व्यक्त करतात. आणि पालकत्व आवेश-अभिनिवेश विरहित असावं असं म्हणतात.
एवीतेवी ती घरी थांबलीच आहे तर आनंदानं थांबून ही परिस्थिती win-win कशी करता येईल याचं शिक्षण दिलं असतं तर ते बरं झालं असतं असंही वाटतं.
थोडक्यात, मला वाटतं ते असं, आपण आपल्या हौसेखातर-अगदी मूलभूत जैविक गरजेपोटी, आंतरिक उर्मीतून मूल जन्माला घालतो (किंवा बहुतेकदा ते जन्म घेतं). आपण कधी असा विचार करून पाहतो का? की या मुलानं कधीतरी म्हटलं होतं का मला तुम्हीच, आत्ताच आणि जन्माला घालाच म्हणून? त्यांना आपण काही चॉईस दिला होता का? दत्तक गेलेलं मूल तरी असं कधी पालकांना म्हणतं का?
मुलांना खरंच असता असा चॉईस तर त्यानं निवडलं असतं का आपल्याला पालक म्हणून? खरंच विचार करावा.
मग लक्षात येईल की आपण पालक म्हणून जरा जास्तच अपेक्षा करतोय.
फार फार तर वीस एक वर्ष मूल आपल्या खरं तर ताब्यात असतं. याचा खरा आनंद घ्यायचा तर त्यांच्यासाठी काढलेल्या खस्ता-देऊ केलेल्या सवलती याचा उच्चार मनात तरी कशाला? हे तर सगळं विनाअट आपण करणारच होतो ना? एकदा त्यांचा त्यांना जोडीदार मिळाला, (या जगात एका वयानंतर आईबाप पुरे पडत नाहीत जगण्याची लढाई लढायला!) की नाही म्हटलं तरी आपली गरज संपत जाणारे-नव्हे-हळूहळू खरं तर आपलंच ओझं होणारेय त्यांना. तसं व्हायला नको असेल तर आपलं वागणं-आचार विचार हे मुलाला पुढं ओझं होणार नाहीत, लाजिरवाणे वाटणार नाहीत असं हवं. प्रयत्नपूर्वक नाहीतर तेव्हा नुसता वयाचा मान ठेवायचा म्हणून कर्तव्यापोटी त्यांनी चांगलं वागलेलं सुद्धा सलू शकतं किंवा त्याचं ओझं आपल्याला वाटू शकतं.
मुलांना त्यांचा जोडीदार मिळेपर्यंत साथ देणं -जगात समर्थपणे जगायला शिकवणं-कोणताही गंड निर्माण न होता equality complex नं आवेशरहित आनंदी आयुष्य असू शकतं ह्याची ओळख करून देणं एवढं आपलं मुख्य कर्तव्य! पुढंसुद्धा तुमच्या आयुष्यात ‘कमी तिथं आम्ही’ची भूमिका मात्र आपण आहोत तोवर मनानं तरी कायम घेतलेली हवी. ही आपली धारणा मुलांपर्यंत पोचली म्हणजे सगळं सगळं पावलं, ‘गाणं समेवर आलं’ म्हणायचं. याचा अनुभव प्रत्येक समरसून धडपडणार्याण पालकाला जरूर मिळावा असं वाटतं…. आणि…. जर, आपले प्रयत्न आतून अन् खरे निर्मळ असतील तर अपवादाने पदरी पडलेलं अपयशसुद्धा पचवायला बळ येईल. एवढंच सांगावंसं वाटतं.