अंजलीचा शब्द
अंजली अगदी लहान, जेमतेम दोन-तीन वर्षांची असेल तेव्हा
तेव्हा तिच्या आईबाबांनी तिला एक पक्कं शिकवलं की –
‘चुकूनसुद्धा तोंडातून, ‘नाही’ असा शब्द काढायचा नाही.’
आणि जर तिनं ऐकलं नाही,
तर… ‘फटके नि वरच्या खोलीत एकटीनं झोपणं’…
अंजली शहारायची !
तर अशा कडक शिस्तीत अंजली मोठी झाली.
मोठी आणि समजूतदार देखील !
ती कधीच रागावत नसे, संतापत नसे.
ती नेहमी सर्वांचा विचार करी,
सर्वांची काळजी घेई. भांडत तर कधीच नसे.
आई-बाबा सांगतात ते भल्या करताच.
तिच्या मनात कधी निसटतीही शंका उमटली नाही.
अंजली…. ती गुणी पोर, शाळेतही कायम पुढंच राहिली.
शाळेतला प्रत्येक नियम तिनं कसोशीनं पाळला.
ती आज्ञाधारक, शांत गुणी मुलगी आहे, ह्यावर शिक्षकांचं एकमत होतं.
मात्र तिला काय वाटत होतं, हे त्यांना कधीच कळू शकलं नाही.
अंजलीच्या चेहर्यावरचं ते समंजस स्मित !
तिच्या मित्र-मैत्रिणींना आवडायचं.
मदत करायला ती नेहमीच पुढं असायची.
अगदी ती आजारी असली, तिला विश्रांतीची गरज असली तरीही.
अंजलीच्या ह्या स्वभावामुळे, ती सर्वांना आवडायचीच.
वयाच्या तेहतिसाव्या वर्षी….
अंजली एका वकिलाची पत्नी होती, तिचं एक छानसं घर होतं….
कुटुंब होतं…. तिला दोन गोजिरवाणी मुलं होती
नऊ वर्षांचा मुलगा, नि चार वर्षांची मुलगी.
‘तू कशी आहेस?’ असं कधी कोणी विचारलं, तर ती उत्तर देई ‘छान.’
पण एकदा, एके दिवशी,
दिवसा नाही, मध्यरात्री, सारे गाढ झोपेत होते, ती मात्र जागी होती.
कधी नाही ते तिला अस्वस्थ वाटायला लागलं
जणू एक वादळ डोक्यामध्ये घोंघावू लागलं.
का आणि कसं कुणास ठाऊक, अचानक मरावंसंही वाटू लागलं.
‘इथवर आणणार्या शक्तीनं तिला परत घेऊन जावं.’
तिनं आकांतानं विनवलं.
त्याच क्षणाला, आतून, खोलवरून,
तिनं एक शांत पण ठाम आवाज ऐकला.
तो फक्त एकच शब्द होता, ‘नाही’.
क्षणार्धात तिला अर्थ कळून आला
तो शब्द जणू तिचा मंत्रच बनून गेला.
आणि तेच तिच्या प्रियजनांनी ऐकलं.
नाही, मला नकोय…. नाही, मला पटत नाही
नाही, ते तुमचं तुम्ही ठरवा…. नाही, मला वेगळं वाटतं.
नको, त्यानं मला खूप त्रास होतो.
नाही, मी दमलेय…. नाही, मी कामात आहे.
अनपेक्षित, अचानक !
कुटुंबियांना धक्काच बसला, परिचितांनी भुवया उंचावल्या.
अंजलीच्या डोळ्यांतली दुबळी माघार गायब झाली होती.
ती आता बदलली आहे, ह्यात शंकाच नव्हती.
तेव्हापासून, त्या वेगळ्या रात्रीपासून
आमच्या लाडक्या अंजलीला ‘नकार’ कळला होता.
आता अंजली आई आहे, शिवाय एक पत्नी आहे
सर्वांआधी आमची अंजली फक्त एक माणूस आहे.
कुठून सुरवात करायची नि कुठं थांबायचं हे तिला चांगलं उमगलंय.
तिला तिचं, फक्त तिचं स्वतःचं असंही एक जग आहे.
तिच्या मनात प्रज्ञा आणि स्वप्नांची आग आहे.
भावना, गरजा आणि ध्येयांची जाणीव आहे.
तिच्या खिशात आता पैसे खुळखुळत आहेत.
नि सत्ताकारणात तिच्या मताला किंमत आहे.
मुख्य म्हणजे आमची अंजली फार चांगली आई आहे.
ती मुलांना म्हणते, होकार देणं, मान्य करणं चांगलंच असतं.
पण ‘नाही’ म्हणणं शिकल्याखेरीज खरोखर
आपल्याला ‘मोठं’ होता येत नसतं.
‘नाही’ मग ते तुम्हाला कशालाही म्हणावंसं वाटतं,
अगदी मलासुद्धा, तेव्हा तसं म्हणायला विसरू नका.
एक लक्षात ठेवा – तरीही तुम्ही माझे प्रियच राहणार आहात.
कारण मला माहीत आहे की
कुणाचंच म्हणणं नेहमीच ‘बरोबर’ असूच शकत नाही.
बार्बरा बॅसेट, अनुवाद – शुभदा जोशी
(‘चिकन सूप फॉर द वुमन्स सोल’मधून साभार)