त्सुनामी नंतर…

समुद्राच्या काठावर काही चिमुरडी,
वाळूचे घर बांधून घर घर खेळत होती.
घरात त्यांच्या….
बाबा होते, आई होती.
आबा होते, आजी होती.
तीन दगडांची चूल होती,
चार पाच बोळकी होती.

डोळ्यात त्यांच्या….
भविष्याच्या आशा होत्या,
आई-बाबांची स्वप्नं होती.

त्यांच्या अंगी….
गरुडाची भरारी होती,
आकाशाला गवसणी घालायची शक्ती होती.
पण… पण…

एका क्षणात त्यांची स्वप्ने धुळीला मिळाली.
एका त्सुनामी लाटेने,
त्सुनामी कसल्या कुनामी लाटेने,
त्यांची घरटी गिळंकृत केली.
ती बलवान मुलं निर्बल झाली.
हतबल झाली.

त्यांच्या डोळ्यात……
एक भकासपणा उरला होता.
त्यांच्या नजरांमध्ये अंधुक अंधुक आशा होती,
पण ही आशा भविष्याची नव्हती.

इवल्याशा डोळ्यांनी
ती आईचा ठाव घेत होती.
छोट्याशा कानांनी
बाबांच्या आवाजाचा कानोसा घेत होती.
त्यांची शोधक नजर
आपल्या घराच्या खुणा शोधत होती,
पण बघणार्‍यांच्या हृदयाला घरं पाडत होती.

ती मुलं गोंधळली आहेत,
थोडी घाबरली आहेत,
पण ती खचलेली नाहीत.
ती पुन्हा घरं बांधणार आहेत,
अर्धवट राहिलेला खेळ पूर्ण करणार आहेत

कारण अजूनही त्यांच्या डोळ्यात…..
भविष्याची आशा आहे,
आई बाबांची स्वप्नं आहेत,
आई बाबांची स्वप्नं आहेत…