‘एक’ पुरे प्रेमाचा

हल्ली काही प्रमाणात अविवाहित दत्तक माता/पिता क्वचित कुमारी माता समाजात वावरताना दिसायला लागल्याने एकेरी पालकत्व आणि त्यांच्या समस्या हा प्रश्न पुढे येतो आहे. पण जास्त खोलात शिरून पाह्यलं तर लक्षात येईल की आपल्या समाजात वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात एकेरी पालकत्व असत आलं आहे. यात विशेषतः जोडीदाराची साथ नसल्याने, मग ती पालकत्वाच्या जबाबदारीची समज कमी असल्याने असेल, आर्थिक परिस्थितीमुळे असेल किंवा बेजबाबदार जोडीदार असल्याने असेल, पालकत्वाची संपूर्ण किंवा बहुअंशी जवाबदारी एकाच पालकावर आलेली असते. काही बाबतीत (विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत) पालकत्वाच्या जबाबदारीबरोबर जोडीदाराचीही जबाबदारी असते. यात सर्वात वाईट भाग म्हणजे समाजाच्या दृष्टीने हे एकेरी पालकत्व नसतेच. त्यामुळे ‘सगळं काही छान चाललं आहे’ असं दाखवत एकट्यानेच सर्व जबाबदार्याय निभावून नेताना सर्वात जास्त कोंडी होते ती अशा अप्रत्यक्ष एकेरी पालकांची !

विधवा/विधुर, अविवाहित दत्तक माता/पिता किंवा कुमारी माता यांचे एकटेपण उघड तरी असते. विधवा/विधुरांना त्यांच्या कुटुंबाची साथ बहुतेकवेळा मिळते. समाजाचीही सहानुभुती असते. त्यामुळेच ‘अचानक कोसळलेली आपत्ती’ अशा स्वरूपात असले तरी एकेरी पालकत्व निभावण्याची मानसिक क्षमता त्यांच्यात हळूहळू येते. घटस्फोटितांना ही जवाबदारी पेलताना, संबंध पूर्ण तोडलेले असूनही, मुलांच्यामुळे जोडीदाराशी तणावपूर्ण संपर्क ठेवावा लागतो आणि इतर समस्यांबरोबर हाही ताण पेलावा लागतो. कुमारी मातांवरही नाकारलेलं पितृत्व आणि सामाजिक अप्रतिष्ठा हे दोन्ही ताण असतात.

सर्वात कमीत कमी ताण असलेला गट म्हणजे अविवाहित दत्तक माता किंवा पिता. स्वेच्छेने घेतलेला निर्णय व त्यामुळे असलेली एकेरी पालकत्व निभावण्याची आर्थिक, मानसिक तयारी यामुळे यांची सुरुवात नक्कीच आनंददायी असते. ज्यांच्यामुळे एकेरी पालकत्वाचा प्रश्न ठळकपणे समोर आला त्या अविवाहित दत्तक माता/पिता यांना माझ्या मते कमीत कमी समस्या आहेत. (फक्त पालकांना, मुलांना नव्हे) त्यांना इतरांप्रमाणे कुचंबणा, आकस्मिकता, कटुता किंवा सामाजिक अप्रतिष्ठा इत्यादि गोष्टींना तोंड द्यावे लागत नाही.

अर्थात या सर्वांच्याच काही समान समस्या आहेत. एकट्याने आर्थिक जबाबदारी पेलून दैनंदिन व्यवहार करायचे, मुलांना सक्रिय वेळ द्यायचा, एका जोडीदाराची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करायचा, अचानक उद्भवणार्याे संकटांना तोंड द्यायचं ही तारेवरची कसरत असते. जोपर्यंत मुलं लहान असतात तोपर्यंत ‘आपलंच काही बरं वाईट झालं तर?’ ही चिंता खात असते. बर्‍याचदा मोठे, महत्त्वाचे निर्णय एकट्याच्या जबाबदारीवर घेताना टोकाचे ताण येतात. पण या समस्या असल्या तरी माझ्या मते एकेरी पालकांपेक्षा विचार करायला हवा तो त्यांच्या मुलांचा.

बर्‍याचदा एखादा प्रश्न हा ‘प्रश्न’ ठरतो कारण एका विशिष्ट सामाजिक रचनेत ती घटना / परिस्थिती’Odd man out’ असते. आणि त्या अर्थाने ज्या अविवाहित दत्तक माता/पिता यांना कमीत कमी समस्या आहेत, त्यांच्या मुलांना मात्र इतर मुलांच्या तुलनेने जास्त समस्या आहेत. कारण ह्यांचं ‘कुटुंब’ हे प्रस्थापित समाजरचनेत न बसणारं आहे. या उलट जो पालकांचा गट सर्वात जास्त कोंडीत सापडलेला आहे (अधिकृत रित्या दुहेरी पालकत्व व प्रत्यक्षात एकेरी पालकत्व) त्यांच्या मुलांना मात्र कमीत कमी ताणातून जावे लागते. सामाजिक पातळीवर त्यांना आपण ‘वेगळे’ आहोत अशी जाणीव नसते. आपला एक पालक बेजबाबदार आहे ही जाणीवही त्यांना बर्‍याचदा उशिरा नीटशी समज आल्यावर होते. त्यामुळेच लहान वयात त्यांना फारशा ताणांना सामोरं जावं लागत नाही. (आपल्याकडे ‘मान सांगावा जनात आणि अपमान ठेवावा मनात’ या उक्तीमुळे व्यक्तीगत समस्यांविषयी मित्र मैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी बोलले जात नाही. हा संवाद जर वाढला तर या मुलांना बर्याकच लवकर ‘We are sailing in the same boat’ हा शोध लागून आपलाच एक पालक बेजबाबदार आहे याचाही न्यूनगंड वाटणार नाही.)

एका पालकाच्या अभावामुळे विधवा/विधुर यांच्या मुलांना ‘स्वप्रतिमा’ हा प्रश्न नसतो. कारण आई वडील या दोन्ही कुटुंबांची ओळख त्याला पुरेशी असते. मात्र बर्यागचदा, घडणार्याय दुर्घटना किंवा येणारे अपयश यांचे खापर अर्थाअर्थी संबंध नसतानासुद्धा एका पालकाच्या अभावावर फोडून आत्मचिंतन पुढे ढकलण्याची वृत्ती या मुलांत निर्माण होऊ शकते. कुमारी मातेच्या मुलांना मात्र स्वप्रतिमेचा प्रश्न सतावू शकतो. पित्याने नाकारले आहे ही भावनाही असते आणि त्यामुळे सबंध आयुष्याकडे बघण्यातच एक कटुता असू शकते.

सर्वात जास्त नाजूक स्थितीतून जावं लागतं ते अविवाहित दत्तक माता/पिता यांच्या मुलांना. त्यांचे जन्मदाते पूर्णपणेच अज्ञात, एकाच पालकाची उपस्थिती आणि दुसर्‍या पालकाचे अस्तित्वच नाही आणि त्याहूनही वाईट गोष्ट म्हणजे या सगळ्याचीच जाणीव फारच लहान वयापासून त्यांना होते. सतत इतरांकडून विचारले जाणारे स्वाभाविक प्रश्न जसे ‘तुझे वडील काय करतात?’ किंवा ‘तुझ्या आईचे माहेरचे आडनाव काय?’ इत्यादींमुळे ही वस्तुस्थिती तितक्या सहजपणे बाजूलाही टाकता येत नाही. (त्यातल्या त्यात सुस्मिता सेन सारख्या प्रसिद्धीच्या वलयात असणार्‍या व्यक्तीने दत्तक पालकत्व स्वीकारल्याने आजकाल लोकांना निदान असेही लोक आपल्या समाजात आहेत / असू शकतात हे माहीत झाले आहे.)

जसजसे एकेरी पालक वाढतील (म्हणजे वाढावेत असं म्हणायचं नाहीये) तसतसे सामाजिक संकेतही बदलतील आणि बरेचसे प्रश्न, जे, त्या त्या वेळची सामाजिक चौकट काय आहे किंवा संकेत काय आहेत, याच्याशी निगडीत असतात ते आपोआपच राहणार नाहीत.

प्रत्येकच व्यक्तीचे जसजसे वय वाढते तसतसे आजूबाजूच्या परिस्थितीचे भान वाढते. आयुष्याची सुरुवात कशी व्हावी, कुठे व्हावी, कोण पालक लाभावेत इत्यादि गोष्टी कोणाच्याच हातात नसतात, हे लक्षात यायला लागते. प्रत्येकालाच आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर समस्या येतात. आणि त्या समस्यांची उकल आपण ज्या वस्तुस्थितीत वावरत आहोत त्यातूनच शोधायला लागते. आपण या वस्तुस्थितीत का आहोत याचा विचार करणे हे समस्या उगीचच अधिक गुंतागुंतीची करणे ठरेल. पालक कोण आहेत यापेक्षा ते पालक म्हणून किती सजग, जबाबदार आणि मुलांशी किती भावनिक जवळीक साधणारे आहेत हे अधिक महत्त्वाचे आहे. चांगले पालक हा ‘संख्यात्मक’ प्रश्न नसून ‘गुणात्मक’ आहे हे जेवढ्या लवकर प्रत्येकाच्या लक्षात येईल तितक्या लवकर ती व्यक्ती ‘एक’ (ही) पुरे प्रेमाचा हे लक्षात घेऊन आपले ‘पाल्य’त्व अधिक आनंददायी बनवू शकेल.

एकेरी पालकत्व
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष
(अधिकृत दुहेरी पण एका पालकाने प्रत्यक्षात जबाबदारी झटकल्याने येणारे)
पालक सर्वाधिक समस्याग्रस्त आणि मुले सर्वात कमी

परिस्थितीने लादलेले स्वेच्छेने अंगिकारलेले अविवाहित दत्तक माता/पिता (पालकांना कमीत कमी प्रश्न मुलांना लहान वयापासूनच ‘वेगळे’पण व ‘स्वप्रतिमा’ यांचा ताण)

विधवा/विधुर
पालक आणि मुलं दोघांनाही तुलनेने कमी समस्या घटस्फोटित
दुसर्‍यात पालकाच्या उपस्थितीमुळेच पालक आणि मूल यांच्यात ताण

कुमारी माता
पालक आणि मूल दोघांनाही नाकारलेपण आणि अप्रतिष्ठा यांचा ताण, कटुता