पाखरं आणि घोडी

न कळत्या वयापासूनच
लगाम घातलेला बरा असतो.
ओझेही पहिल्यापासूनच
वाहायची सवय असलेली बरी.

बागडत्या पाखरांची
घोडी बनवायची,
त्यांची शर्यत लावायची,
म्हणजे हे सगळं आलंच.

प्रश्न विचारणार्याचचा
वेळीच पाणउतारा झाला पाहिजे,
आपली अक्कल चालविणार्याहला
पहिल्या वेळीच ठोकला पाहिजे.
शर्यतीतली घोडी सरळ धावली पाहिजेत!

ओझ्याबद्दल कुरकुर?
देऊ का दोन थोतरीत?
गतीबद्दल अडचण?
मरायचंय का गल्लीत?

तुमचा-तुमचाच बरं का
उज्वल उद्या (का काय तो) घडतोय!
दमछाक?
मी म्हणतो होतेच कशी?
आम्हीसुद्धा
ओझी उचलूनच ना बांधतो
तुमच्या पाठीवर?
जरा धावायचं तर आळस!
त्या परीक्षेच्या दांडीवर लटकायचंच काय?

प-प-पुढे?
पुढंच पुढं! आता इथून टळा!
थांबा जरा निघण्याआधी
तो दोर जरा गच्च आवळू द्या.

चला पळा…..
बागडत्या पाखरांची
घोडी बनवायची,
त्यांची शर्यत लावायची,
म्हणजे हे सगळं आलंच…..

परीक्षा पार केऽऽल्या,
शर्यती तर जिंकऽऽल्या,
आता द्या आम्हाला आमचा
‘उज्वल उद्या’ (का काय तो).

नाहीतर करा आमची बागडती पाखरं.
नाही येत? नाही येत?
तुम्ही सगळे नापास नापास नापास
शंभरदा-हजारदा-कोटीदा-नापास!