शहाणी आई
दिवसेंदिवस कणाकणाने मी लहान होतेय,
लहान होत जाताना, खरं तर सुजाण होतेय
पूर्वी चित्र रंगवताना आभाळ निळे, डोंगर काळे
आणि सूर्य डोंगरामागे,
आता इवले हिरवे फूल, डोंगरावरची शेंदरी धूळ,
आणि सूर्यावरचे मूल,
तू काढत असताना, मला पण त्यातली गंमत कळतेय,
लहान होत जाताना, खरं तर सुजाण होतेय.
आधी ‘L’ for Lion आणि ‘म’ मगरीचाच होता,
आता ‘L’ for लाडू आणि ‘म’ मंकीचा होताना,
मला पण त्यांची ओळख पटतेय
लहान होत जाताना, खरं तर सुजाण होतेय.
शाळेच्या वाटेवर तुझ्या, बकर्यांतचे school,
म्हशींचा swimming pool,
आणि घरटे बांधणारी बुलबुल,
तुला शाळेत नेता-आणता, मी पण शिक्षण घेतेय,
लहान होत जाताना, खरं तर सुजाण होतेय.
वरातीचा ढम-ढम ताशा, फायर ब्रिगेडची टण-टण घंटी,
आणि कावळ्या-चिमण्यांची ही सुरेल वाजंत्री,
तुझ्यासोबत मीही माझ्या कानात साठवतेय,
लहान होत जाताना, खरं तर सुजाण होतेय.
पूर्वी कधीच जमले नव्हते, पाण्यात डुंबणे,
पावसात भिजणे, आणि चिखल तुडवणे,
आता किल्ला करण्यासाठी, मीच माती कालवतेय,
लहान होत जाताना, खरं तर सुजाण होतेय.
घड्याळाच्या काट्यावरती तोलत होते आयुष्याला,
तू जगात येताक्षणी घड्याळाचा ‘स्टॅच्यू’ झाला.
तू वर चढत असता, मी पायर्याट उतरतेय,
लहान होत जाताना, खरं तर सुजाण होतेय.
तुझ्यामध्ये पाहते मी, बाल्य माझे ‘रिप्ले’ करून,
माझे जगणे सार्थक केले, तू मला आपले करून.
भविष्याची स्वप्ने आता, तुझ्यासोबत रंगवतेय,
लहान होत जाताना, खरं तर सुजाण होतेय.