जीवन-भाषा-शिक्षण

भाषेचा अभ्यासक तिच्या व्याकरणाचे नियम शोधून काढायचे म्हणतो, तिच्या उच्चारणाचे बारकावे जाणून घ्यावे म्हणतो, अर्थांगाचा कीस पाडायला बघतो; पण जोपर्यंत तो तिच्यावर प्रेम करीत नाही, तोपर्यंत ती त्याच्या अधीन होत नाही, आपले सगळे गुपित त्याला सांगत नाही; आणि भाषेवर प्रेम करायचे, तर तिला, ती ज्या भाषाव्यवहारात परिणत होते आणि ज्या भाषाव्यवहारातूनच जन्म घेते, त्या भाषाव्यवहारात, संपूर्ण जीवनाच्या संदर्भातच पाहता आले पाहिजे. भाषेत जीवन ओतप्रोत भरलेले आहे. किती, ते परभाषीयाच्या चश्म्यातून आपल्या भाषेकडे पाहू लागले, की तेव्हाच जाणवते.

पण भाषा आणि जीवन यांचे अतूट नाते इथेच संपत नाही. भाषेत जीवन काठोकाठ भरलेले असले, तर भाषाही जीवनात शिगोशीग भरून राहिलेली आहे. कसे, ते पहा. पांढरपेशा मुलाची पाण्याशी ओळख होते आणि दलित मुलाची पाण्याशी काही निराळी ओळख होते – ‘पाणी’ हा एकच शब्द त्यांना काहीशा वेगळ्या जीवनभरल्या अर्थाची ओळख त्यामुळे पटवतो. जीवन भाषेला व्यापते, ते असे.