मोठी माणसं !
पालकनीती परिवारच्या खेळघरात अनेक वर्षे सातत्यानं येणार्या. मुलांची ही मनोगतं. ही मुलं लक्ष्मीनगर या झोपडवस्तीत राहणारी आहेत. खेळघरात ती विचार करायला, आपलं म्हणणं मांडायला शिकताहेत. त्याचं प्रतिबिंब आम्हा मोठ्या माणसांना विचारात पाडणार्यां या प्रतिक्रियांमधून दिसतं. शुभदा जोशी यांनी मुलांच्या लिखाणांचं संकलन केलं आहे.
२००५ संपलं! आता नवं वर्ष. नवी स्वप्नं, नवे बेत, पुन्हा नवी पालवी फुटल्याची जाणीव!
मला आठवतं आमच्या लहानपणी नव्या वर्षाच्या निमित्तानं मुलांना ‘संकल्प’ करायला सांगितलं जाई. खरं सांगायचं तर असं चारचौघात काही संकल्प करणं खूप धोक्याचं वाटायचं. काही तरी थातूरमातूर संकल्प करून वेळ मारून न्यायचो. थोडं मोठं झाल्यावर, ‘बघतो आम्ही आमचं, तुम्ही कशाला मधे पडता.’ इथवर प्रतिक्रिया उमटल्याचं आठवतंय.
पण मला आजही स्पष्ट आठवतंय, असं विचारायचं कधी मनात आलं नाही की, ‘संकल्प आम्ही एकट्यांनीच का करायचा, तुमचं काय?’
मला वाटतं त्या काळात मोठ्या माणसांबद्दल नक्की काय वाटतं इथवर आम्ही कधी पोचलोच नव्हतो. एक दडपण, भीती, धाक सतत पार्श्वभूमीला असे. दुसरीकडे संगोपनाच्या, मायेच्या हक्कांची जाणीवही मनात असे. अपेक्षा कधी पुर्याा व्हायच्या तर कधी नाही. पण त्याबद्दलचा संवाद-वाद मनातच राही. स्पष्ट बोलणं ना जमत होतं, ना त्यानं काही साधेल असं वाटत होतं.
मोठं होता होता हुकत गेलेल्या संवादाची खंत मात्र मनात राहिली. आपल्या मुलांच्या बाबतीत मात्र असं व्हायला नको असा विचार अग्रणी राहिला. विशेषतः खेळघराच्या कामातून ह्या ‘संवादा’वर खूप काम करायला मिळालं. अनेक गोष्टी लक्षात येत गेल्या.
संवाद साधायचा तर आधी आपल्याला नक्की काय म्हणायचंय ह्याची स्पष्टता हवी. म्हणजे स्वतःच्या भावनांचा, विचारांचा वेध घ्यायला हवा. त्याच्याच पुढची पायरी म्हणजे इतरांना काय वाटतं ह्याची कल्पना करता यायला हवी. त्यासाठी आपल्या भावना-मतं अनेक अंगांनी तपासून पाहता यायला हवं. काय योग्य काय अयोग्य ह्याची न्यायीपणे निवड करता यायला हवी. नि या मंथनातून समजलेलं शब्दात व्यक्त करायचं तर भाषासमृद्धी हवी. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.
खेळघरात ह्या दिशेनं मुलांबरोबर संवाद साधायचा प्रयत्न केला. मुलं बोलायला लागली, लिहायला लागली, प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन विचार करायला लागली. मुलांकडून खूप शिकायला मिळालं.
डिसेंबरमधे खेळघरात मुक्त लिखाणासाठी विषय घेतला होता. ‘मोठी माणसं’. एका बाजूला यापद्धतीनं चर्चा तर दुसर्याद बाजूला साहित्यातून काही निवडक वेचे, कवितांचं वाचन केलं. चर्चेतून विषय समोर आले –
– असे कसे हे मोठ्यांचे वागणे.
– माझ्या मनात घर केलेली व्यक्ती.
– …हे मला अजिबात आवडत नाही.
– तुम्ही मोठे आहात म्हणून…
– …तर तुम्ही आम्हाला ……….
– आमचा पण विचार करा
– तुम्हीही कधी लहान होतात ना!
– मुलांना वाटतं की –
मुलांनी चित्रं काढली, लिखाणाचे वेगवेगळे प्रकार वापरले. त्यातले काही तुमच्या समोर ठेवत आहे –
मोठ्या माणसांबद्दलच्या संमिश्र भावनांचं चित्र श्रीशैलच्या कवितेतून उमटतं –
तुम्ही मोठी माणसं
पाहिले मी ज्यांना
जन्मानंतर माझ्या |
पोसले मला ज्यांनी
जन्मानंतर माझ्या |
देव मानून बसविले त्यांना
मनामध्ये माझ्या |
राहिले स्वप्न अपुरे
पूर्ण करिल हा राजा |
ठेवा आशिर्वादाचा हात
माथ्यावर माझ्या |
आणीन, एक दिस घरी
आनंदाचा बाजा |
शूर, प्रेमळ, कळवळणारी
असतात मोठी माणसे |
हलत आहेत वार्यासवरती
जशी शेतामधली कणसे |
वृद्ध चावट कामचुकारही
असतात मोठी माणसे |
नसती उठाठेव करत राहतात
गावाला घालतात वळसे |
बोलले असता छान
धरतात आपला कान
तोंडात टाकत पान
म्हणतात ‘‘अजून आहेस लहान,’’
‘‘बघा मोठे झालो आम्ही किती?’’
नाही वाटत त्यांची भीती
भरलं आहे तारुण्य आमच्यात
ठोकून सांगतो छाती |
श्रीशैल बिराजदार (इ. १२ वी)
नितीनच्या आयुष्याला दिशा मिळण्यात मोठ्या माणसांचं महत्त्वाचं स्थान आहे – तो लिहितो, ‘‘मोठ्या माणसांची अनेक रूपे माझ्या डोळ्यासमोर येतात. आई, वडील, आजी, शिक्षक, इ. माझ्या विचारांवर शिक्षकांचा फार मोठा परिणाम झाला. विशेषतः समाजशास्त्राच्या शिक्षकांचा. इतिहासातील घटनांतला चांगलेपणा घेऊन प्रत्यक्ष जीवनात वापर केल्यावर त्यातली मजा काही औरच असते.
मोठ्या माणसांकडून मिळणारे विचार हे त्यांच्या अनुभवातून आलेले असतात. या विचारांचा संग्रह घेऊन आपली बौद्धिक शक्ती वाढते. शिक्षकांच्या संस्कारामुळे चांगली व्यक्ती बनू शकते.’’
नितीन लोंढे (१०वी)
याच्या अगदी उलट राजूचा अनुभव आहे –
कसे हे मोठ्यांचे वागणे!
‘‘काही माणसं दारू पितात. दारू प्यायल्यावर ते वेगळेच वागतात. घरात भांडणं करतात. अशावेळी घरात मुलांना काय करावे ते सुचत नाही. या घरात कधीही सुख येत नाही. या घरात जेवण बनवायला पण पैसे नसतात. मुलं उपाशी राहतात. ती शिकू शकत नाहीत. त्यामुळे ती कधीच पुढे येऊ शकत नाहीत.
मुलांच्या मनात तर खूप स्वप्नं असतात. शिकून मोठे होऊ, आकाशातल्या तार्यां्ना शिवू असे वाटते… पण…’’
राजू पवार (७ वी)
मोठ्या माणसांकडून आमच्या काय अपेक्षा आहेत हे मुलं अगदी स्पष्टपणे सांगताहेत –
…तर तुम्ही आम्हाला आवडाल
तुम्ही जर आमच्याशी आनंदाने, प्रामाणिक पणाने बोलाल, आमचे विचार समजून घ्याल तर…
तुम्ही आम्हाला चांगल्या गोष्टी सांगाल, चांगले विचार करायला मदत कराल, बाहेरच्या जगात घेऊन जाल…
तुम्ही आम्हाला प्रोत्साहन द्याल…
निदान स्पर्धेत, गॅदरिंगमधे, सहलीत जायला परवानगी द्याल तर…
गीता राठोड (८वी)
‘‘जर तुम्ही माझ्या मनातल्या गोष्टी जाणून घेतल्यात, त्यातल्या चांगल्या कोणत्या वाईट कोणत्या ह्याबद्दल बोललात, जर मला स्वातंत्र्य व मोकळीक दिलीत, जर माझ्या अडचणी व गरजा जाणून घेतल्यात, तर तुम्ही आम्हाला आवडाल. माझ्या मनात जर तुमच्याबद्दल गैरसमज असतील तर स्पष्ट बोलायला मला आवडेल, पण तशी संधी तुम्ही मला द्यायला हवी.
जर माझ्या अभ्यासाकडे लक्ष दिले तर… जर माझ्या विचारांत भर घातलीत, मी वाईट वळणावर जात नाही ना? याकडे लक्ष दिलेत तर तुम्ही आम्हाला आवडाल.
सुखदेव हासमनी (९वी)
आमचा विचार करा-
‘‘आमचं वय शिकण्याचं, खेळण्याचं, मोकळेपणानं वागायचं असतं. पण तुम्हाला हे वागणं पटत नाही. तुमच्या काळात तुमच्यावर जे संस्कार झाले ते तुम्ही आमच्यावर लादता. मुली म्हणून आता आम्हाला बांधून ठेवू नका. मुलांसारखंच मोकळं वागू द्या, शिकू द्या. आमच्या इच्छा पूर्ण करू द्या.
दीपा घोगरे (८वी)
आम्हाला अशी मोठी माणसं हवीत…
‘‘आपल्या मुलांचे म्हणणे ऐकून घेणारी, त्यांना मान देणारी, त्यांच्या मतांचा आदर करणारी, प्रेम देणारी-घेणारी, मुलांचा विकास चारी बाजूंनी होईल असं वातावरण निर्माण करणारी, स्वातंत्र्य देणारी, स्वातंत्र्य व जबाबदारीची जाणीव करून देणारी, आपली मते आमच्यावर न लादणारी….
अशा मोठ्या माणसांच्या सहवासात आम्हाला सुरक्षित वाटेल.
हे सारं करणं मोठ्यांना फार अवघड आहे. एकाच मोठ्या माणसात एवढ्या सार्याण गोष्टी असतील असेही नाही. पण किमान गोष्टी तरी असाव्यात अशी मी अपेक्षा करते.’’
रेशमा लिंगायत (१०वी)
काही मुलं नेहमी ‘अंग्री यंग मॅन’च्या भूमिकेत असतात. त्यांना अन्याय तीव्रतेनं बोचतो नि तो त्यांच्या प्रतिक्रियांतून उमटतोही.
मोठी माणसं अशी का वागतात?
‘‘त्यांना वाटतं लहानांनी नीट वागावं. पण आम्ही त्यांचंच अनुकरण करणार ना?
खरंच, मोठी माणसं जशी वागतात तसं जर लहान मुलं वागायला लागली तर देश नाश पावायला वेळ लागणार नाही.’’
नितीन मोहिते (१०वी)
‘‘मला तर असं वाटतं की मोठे हे एक अधिकारी आणि आम्ही त्यांचे गुलाम आहोत. ते जसं सांगतील तसंच वागायचं. त्यांच्या हो ला हो म्हणायचं. त्यांचं सांगणं आम्हाला पटत नसलं आणि आम्ही मधे बोललो तर लगेच उत्तर मिळतं, ‘‘तू छोटा आहेस, तुला काहीच समजत नाही. मोठ्यांमधे छोट्यांचे काय काम?’’
आम्हाला माहीत आहे. ते मोठे आहेत, अनुभवी आहेत, त्यांची विचार करण्याची क्षमता जास्त आहे. परंतु मला एक सांगा, आम्ही जर मोठ्यांचं खंरंच सगळं ऐकायचं ठरवलं तर काय होईल? संसाराची वाट लागेल.’’
अनिल शिंगाडे (८वी)
आठवीतल्या रमेश पवारने गुरु द्रोणाचार्यांची आणि एकलव्याची गोष्ट लिहिली आहे. नि शेवटी कवितेच्या ह्या दोन ओळी –
‘‘मोठी माणसं असतात छान पण मधूनच होतात घाण! झाले नसते घाण तर किती छान !’’
मोठी माणसं अशी का वागतात?
‘‘परवाच घडलेली गोष्ट!
आमच्या शेजारच्या बाईंच्या मुलाने एका मुलीला छेडले व त्या मुलीला खूप त्रास दिला. त्या मुलीने मुलाच्या आईला नाव सांगितले, तेव्हा त्या मुलाच्या आईने त्याला रागवायच्या ऐवजी त्या मुलीलाच ‘पळ घरी जा, उगाच कटकट करू नकोस, माझा मुलगा असे करणे शक्यच नाही’, असे सांगून घालवून दिले.
तुम्हीच सांगा या प्रसंगात आईने काय करायला हवे होते?’’
किशोर गायकवाड (९वी)
दहावीतल्या हनुमंतानं जणू काही सार्याल चर्चेचा निष्कर्ष काढण्याची जबाबदारी घेतली –
तुम्हाला आमच्याबद्दल नक्की काय वाटतं?
‘‘खरं सांगा, आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहचत नाहीत का? जोपर्यंत तुम्ही आम्हाला आपले समजत नाही तोपर्यंत हे मतभेद मिटणारच नाहीत.
तुम्ही जर आमच्यात डोकावून पाहिलेत तर तुमचेही दुःख कमी होईल. तुम्हालाही वाटेल, कोणीतरी आहे, आपला आधार आहे.
खरं सांगू, आम्हालाही तुम्ही खूप हवे आहात. तुम्ही जर आमच्याशी संवाद साधलात तर तुम्ही जबाबदारीच्या ओझ्याखालून मुक्त व्हाल. समजुतीचं एक पाऊल पुढे टाकलंत तर सारं काही लक्षात येईल. संबंध जुळतील, नाती पक्की होतील.’’
हनुमंत मोहिते (१०वी)
रेशमाचं म्हणणं मोठं विचार करायला लावणारं आहे…
‘‘मोठी माणसं जेव्हा मोठी होतात तेव्हा स्वतःला विसरतात. त्यांचे जीवन घड्याळाच्या काट्यानुसार चालू होते. घरातून लवकर जाणे. मुले झोपल्यावर येणे. सुट्टीच्या दिवशी… पाहुणे, सण-समारंभ, पार्ट्या, व्यवसायाविषयी बोलणे.
मधेच मुलांकडे डोकावणे. आम्ही मुले त्यांच्या आयुष्यात नावापुरतीच असतो. हं, मुलांकडून अपेक्षा मात्र असतात. बरेच निर्णय आम्हाला न कळत ते घेतात. व लादतातही. या सार्याात आम्ही पार हरवून जातो. आम्हाला खरंच मोठी माणसं कधी भेटणार आहेत का? ते आमच्यापर्यंत पोचू शकतील का?’’
मुलांची ही मनोगतं वाचून मला वाटून गेलं…. अगदी असंच काहीसं मलाही त्यांच्या वयात वाटत होतं. आज ही मुलं त्याला शब्दरूप देताहेत.
आज काळ पुढे गेलाय, भूमिका बदलल्यात. आज आम्ही दुसर्याण बाजूला आहोत. आमच्या जगण्याच्या वेगात आपल्याला कदाचित ही स्पंदनं समजणार नाहीत. पण आज मुलं हात पुढे करताहेत… त्यांना काय वाटतंय, सांगताहेत… आपण त्यांना प्रतिसाद देणार ना?