चिमुकले ‘अतिरेकी’

लहानग्यांना सवयी लावताना मोठी माणसं प्रयत्नांची शिकस्त करत असतात. मुलं मात्र नवनवे मार्ग वापरून पाहात या प्रयत्नांवर कुरघोडी करत असतात. विस्मय वाटावा इतक्या विविध प्रकारच्या आयुधांनी मुलं सुसज्ज असतात. त्यांच्याकडच्या आयुधांच्या मार्याचपुढे काही वेळा आपल्या सगळ्या युक्त्या, तंत्रं पार निष्प्रभ ठरतात. अशा प्रसंगी भल्या भल्या पालकांनाही हताशा टाळता येत नाही.

मात्र अशा प्रसंगांमधून पूर्ण शरणागतीसह माघार घेऊन बाहेर पडल्यानंतर त्याबद्दल बोलणं, त्यातल्या बारकाव्यांचं सांगोपांग वर्णन करणं आणि शिकणं यातही गंमत असते.

अशा अनेक प्रसंगांविषयी पालकांकडून वेळोवेळी ऐकायला मिळतं. अशाच एका ‘चिमुकल्या अतिरेकी’चं वर्णन तिच्याच आईच्या शब्दात नुकतंच वाचायला मिळालं. इतरांनाही ते वाचण्यातली मजा मिळावी आणि घडून गेलेल्या अतिरेकी प्रसंगांकडे असंही वळून बघता येतं हे कळावं असं वाटलं, म्हणून निरूपमा सुब्रह्मण्यन् यांच्या ‘माय टायनी टेररिस्ट’चं रूपांतर मराठीत करायचं ठरवलं.

सगळ्या जगभरातले नेते ओसामा बिन लादेन आणि सद्दाम हुसेनसारख्या बलाढ्य दहशतवाद्यांबद्दल चर्चा करण्यासाठी बैठकांवर बैठका घेतात. मी मात्र घरातल्या माझ्या चिमुकल्या ‘अतिरेकी’च्या कारवायांमुळे पूर्णपणे हबकलेली आहे. दहशतवाद्यांच्या अतिरेकी कारवायांवर जग काय उपाय शोधतंय याकडे मी बारीक लक्ष ठेवून असते. कारण त्यातून कदाचित घरातल्या गनिमाच्या काव्यांना तोंड कसं द्यायचं याचा एखादा मार्ग मला दिसू शकेल असं वाटतं.

समर प्रसंगाच्या सुरुवातीला मी सौम्या समोर बोट नाचवत जोरदार अटी घालून पाहिल्या. ‘सौम्या’, मी रागावून म्हणाले, ‘जर का तू खिचडी संपवली नाहीस तर तुला चॉकलेट-बिकलेट अजिबात मिळणार नाही आणि पार्कमधे तर नाहीच नेणार.’

माझं हे बोलणं संपतं न संपतं तोच सूं सूं करत डागलेला खिचडीचा गोळा अचूक माझ्या कुडत्यावर येऊन आदळला. काय नेम होता!
‘‘अस्सं काय! आता बासच! आता तर चॉकलेटचं नावच काढायचं नाही. नाही म्हणजे नाही. मी बोलणार पण नाही आता तुझ्याशी.’’
माझ्या निषेधाला बळकटी आणण्यासाठी मी तिच्यापासून दूर गेले. सौम्या चीत्कारली. माझ्या धमक्या, निषेध, अटी यांच्या तिच्या चीत्कारातल्या उल्हासावर यत्किंचितही परिणाम झाला नव्हता. चमच्याने टेबलावर आणि लाळेर्या वर गिरगोट्या ओढण्यात ती मग्न होती. आनंदापासून जराही ढळली नव्हती.

चूक खरं तर माझीच होती. जगातल्या भल्याभल्यांना करार समजणं आणि ते पाळणं जमत नाही तिथे उण्यापुर्याय २१ महिन्यांच्या या अस्तित्वाला ते कसं समजणार! गाठीला जेमतेम ७० शब्द असणार्यायला माझी भाषा कशी कळावी!
मग या क्षेत्रात अनेक वर्षे वावरलेल्या अनुभवसंपन्न विभूतीचा सल्ला घेण्याचं मी ठरवलं. ‘‘आई गं!’’, मी फोनवर तक्रारीचा सूर लावला, ‘‘ही बया काहीही दिलं तरी खातच नाही. आंघोळ करताना कांगावा करते. ‘भूर’ म्हणून ऊठसूट भटकायला जायला मागते. भर दुपारी बाराला, तळपत्या उन्हातसुद्धा! मला एका क्षणाची उसंत नाही की स्वतःकडे बघायला वेळ नाही. मी जरा वाचायला बसले की ही पेपर ओढते. तत्क्षणी तिला माझ्या पाठीवर स्वार होऊन ‘टॉक टॉक’ खेळायचं असतं.’’

‘‘अगं,’’ माझी आई हसत हसत म्हणाली, ‘‘तू तिच्या वयाची होतीस तेव्हा मला तुझ्यामागे टेबलाभोवती चकरा माराव्या लागायच्या. दहा पंधरा चकरा झाल्या की मग कुठे तू एका जागी बसायचीस. एवढंच नाही तर ताटली खिडकीबाहेर भिरकावायलाही तू मागेपुढे पाहायची नाहीस. एकदा तर खालून निघालेल्या पुष्पामावशीलाही तुझा प्रसाद मिळाला होता. कुठेही बाहेर निघालं की तुझ्या चार बाहुल्या, चार टेडी आणि जुनं चिंध्या झालेलं दुपटं बरोबर लागायचंच.’’
आता काहीतरी करायलाच हवं होतं. लवकरच. सौम्याकडे अचानक जबरदस्त घातपात करण्यासाठी मोठा राखीव शस्त्रसाठा होता. तो ती कोणत्याही क्षणी उघडून त्याचा मारा करू शकते हे माझ्या लक्षात आलं. माझा मोबाइल-फोन जमिनीवर आपटून त्यात वापरलेल्या तंत्रज्ञानाची रहस्य समजून घेण्याचा ती प्रयत्न करत होती. मी वेळेवर पावलं उचलली. आणि आणखी नुकसान होण्याआधीच फोन तिच्याकडून काढून घेतला. ताबडतोब तिनं जैवरासायनिक शस्त्र उपसलं. तिचे डोळे पाण्यानं डबडबले, चेहरा लालेलाल झाला आणि तिच्या किंचाळण्यानं घर दणाणून गेलं. तिनं माझ्या पायाशी लोळण घेतली. ‘‘माना फोन पायजे’’चा गजर करत ती दहा मिनिटं लोळत राहिली. तिच्या रडण्या-ओरडण्यानं मी पार स्तंभित झाले.

मग मी आमच्या सपोर्ट ग्रुपमधून आधार मिळवायचा प्रयत्न केला. या क्षेत्रातल्या माझ्याहून जास्त अनुभवी आयांबरोबर युती केली. दोन छोट्या कुप्रसिद्ध अतिरेक्यांच्या छळाची बळी ठरलेली बिचारी मीरा मला म्हणाली, ‘‘अगं, हे तर काहीच नाही. मुली बर्‍या म्हणायच्या. शंभर वेळा सांगूनसुद्धा काल आमचे वीर घरात क्रिकेट खेळत होते. धाकट्यानं षट्कार लगावला तो थेट काचेच्या कपाटावर!’’ ….हा तर बॉम्बहल्लाच म्हणावा लागेल.
परिस्थिती आणखी बिकट होत जाणार याचा मला अंदाज आला. सगळं काही उध्वस्त करणारे भविष्यातले हल्ले थोपवण्यासाठी आत्ताच मला पावलं उचलणं भाग होतं. मी सरसेनापतींचा सल्ला मागितला. त्यांनी मला सुचवलं की वरवर गोडीगुलाबी दाखवून ठामपणे काम साधून घे. नाहीतर तुझं काही खरं नाही.

‘‘हं, म्हणणं सोपं आहे,’’ मी कुरकुरले.
‘‘माझ्याबाबतीत नाही का जमलं तुला!’’ स्मितहास्य करत सेनापती म्हणाले.
‘‘हं! एक दिवस तरी सकाळपासून रात्रीपर्यंत तिचं सगळं करून दाखवा. माझी करीअर सोडून मी घरी बसलीये तिच्यासाठी. सत्तेचाळीस वेळा विनी-द-पूह ची सीडी बघून माझा मेंदू बधिर झालाय. रोज रोज उरलेली मऊ खिचडी आणि कुस्करलेल्या केळ्याचा उष्टा लगदा खाऊन खाऊन माझ्या पोटानं असहकार पुकारला आहे.’’
‘‘मग आता ठरवलंयस तरी काय?’’
‘‘मी आता ‘प्रेमळ आईपणा’ सोडून देणार आहे. हे ‘हसत-खेळत वाढवा’ वगैरे अशक्य आहे. आता पुढच्या वेळी मी
रट्टा-सिद्धांतानुसार पावलं टाकणार आहे.
तिला एका सणसणीत फटक्याचीच गरज आहे.’’
‘‘पण बळाचा वापर करायचा नाही असं आपण ठरवलं होतं.’’ सेनापती म्हणाले.
‘‘हो, खरंय. पण दिवसेंदिवस तिचा हट्टीपणा वाढतच चालला आहे. तिला शरण यायला लावायचं तर माझं तंत्र मला बदलायलाच हवं. या दोन फुटी बुटकूकडून मी नाही छळ करून घेणार….’’
तेवढ्यात आमचा दोन फुटी बुटकू अतिरेकी खोलीत घुसला. तिने मला कडेवर उचलून घ्यायलाच लावलं. तिचा ‘बाळ-वास’ माझ्या नाकात शिरला, मनात आतपर्यंत पसरला. तिचा हळुवार ओला पापा गालावर जाणवला. ‘‘पापू! आवत्ते.’’ तिचे बोबडे शब्द माझ्या कानावर पडले.
‘‘लाडूबाई माझी!’’ मी विरघळले.
पुन्हा एकदा तिनं मला पुरतं निःशस्त्र केलं होतं. दहशतवादाविरुद्धची माझी लढाई मला अर्थातच तहकूब करावी लागली.

फोन – २५४३२९३१,
ई-मेल:antarang2000@hotmail.com